आठ तास झोपेचं महत्त्वं माहिती आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 06:48 PM2018-08-22T18:48:20+5:302018-08-22T18:50:29+5:30
मानवी मेंदूसाठी झोप फार आवश्यक.पण शांत झोपण्याची परवानगी आपण मेंदूला देतो का?
-प्रज्ञा शिदोरे
जवळ जवळ प्रत्येक रात्री आपल्या शरीरामध्ये मेटामॉफरेसिस म्हणजे कायापालट होतो. आपला मेंदू हा बदल घडवून आणतो. आपला मेंदू हे बदल त्याच्या वागणुकीत आणि उद्देशामध्ये करतो. आपली शुद्ध काही काळासाठी मालवून आपला मेंदू अक्षरश: ‘आवरा आवर’ करतो. आपल्याला पुढच्या दिवसासाठी तयार करत असतो. हे सारं ते करत असतो तेव्हा आपण झोपतो!
कोणत्याही शारीरिक क्रि येपेक्षा ‘झोपणं’ याविषयी समजून घेणं खूपच अवघड. कारण झोपलेला ‘शुद्धी’तच नसतो ना ! पण, इस. पूर्व 350 मध्ये अँरिस्टॉटलने पहिल्यांदा ‘ऑन स्लीप अँण्ड स्लीपलेसनेस’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर 2300 वर्ष कदाचित काहीच घडलं नाही. 1924 मध्ये र्जमन शास्त्रज्ञ हान्स बर्जर यानं इलेक्ट्रोएनसीफ्लॉग्राफचा शोध लावला. यामुळे मेंदूमधल्या घडामोडी लक्षात येणं सोपं झालं. यामुळे झोपेचा शोध वैचारिक पातळीवरून शास्त्रीय पातळीवर शोध सुरू झाला.
सध्याच्या काळात आपण आपल्या झोपेला फारच कमी लेखत असतो. ‘झोपेचं कर्ज’ ही आपली जीवनशैली बनत चाललं आहे. ‘इफ यू स्नूज, यू लूज’, जो थांबला तो संपला वगैरे वाक्प्रचार आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक अशा झोपेपासून आपल्याला दूर करत असतात. एवढंच नव्हे तर आपल्या आजूबाजूची आमिषं आपल्याला झोपेपासून दूर दूर नेतात. कसं असतं ना, की आपण जर चांगले 8 तास झोपलो, तर रात्रीच्या सिरिअल्स कोण पाहणार, हॉटेल्स कशी चालणार, सिनेमे कसे चालणार. माणूस ‘कन्झ्युमर’ किंवा उपभोक्ता झाला आणि हे सर्व प्रश्न सुरू झाले.
अरियाना हफिंग्टन (हफिंग्टन पोस्ट या ऑनलाइन वृत्तपत्राच्या संपादक) यांनी नेमकं या विषयावर ‘स्लीप रिव्होल्यूशन’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. 2016 साली प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक अमेरिकेत लगेचच हिट झालं. आपल्याला झोपेची आवश्यकता का आहे, त्यामुळे आपल्या मनावर - शरीरावर कसे परिणाम होतात, कमी झोपेमुळे आपण रोगांना कसं आमंत्रण देतो हे विषय या पुस्तकात हाताळले आहेत.
याविषयी रसेल फॉस्टर यांनी ‘आपण का झोपतो’ या विषयी टेड टॉक दिलं आहे. ते तुम्हाला टेड टॉकच्या वेबसाइटवर बघायला मिळेल. हेसुद्धा नक्की ऐका.
या सगळ्यांचं बेसिकली म्हणणं काय?
तर लोकहो. प्लीज रोज आठ तास शांत झोपा !