इजिप्तच्या नादिनचं इन्स्टा डेअरिंग माहिती आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 07:54 AM2020-11-05T07:54:47+5:302020-11-05T07:55:04+5:30
एक मुलगी न घाबरता बोलली,तर इजिप्तमध्ये हाहाकार उडाला, ते का?
-कलीम अजीम
इजिप्तमध्ये नादिन अशरफ या तरुणीचं एक इन्स्टा अकाउण्ट सध्या चर्चेत आहे. न्यू यॉर्क टाइम्सनं तिच्यावर दोन स्पेशल फीचर केले आहेत. राजधानी कैरो शहरातील दक्षिण भागात राहणारी २२ वर्षीय नादिन अशरफ फिलोसॉफीची रिसर्च स्टुडण्ट आहे. अमेरिकन विद्यापीठात ती शिकते. जुलै महिन्यात ‘असॉल्ट पोलीस’ नावानं इन्स्टाग्राम अकाउण्ट तिनं सुरू केले. त्यावर पहिली पोस्ट लिहिली. ‘अहमद बासम झाकीने ज्या-ज्या मुलींना त्रास दिला, ब्लॅकमेल केले, मारहाण केली, छेडछाड केली आणि बलात्कार केला त्यांनी मेसेज करावेत.’
काही तासांतच बलात्कार केल्याचा दावा करणाऱ्या महिलांकडून अनेक मेसेज आले. अहमदने केलेल्या सेक्श्च्युअल हरॅसमेण्टच्या अनेक तक्रारी येऊन पडत होत्या. स्कीन, चॅट, मार्फ केलेले फोटो इत्यादी धडकत होते. लैंगिक हल्ल्याला बळी पडलेल्या अनेक मुली भरभरून बोलत होत्या. आपल्या वेदना मांडत होत्या. व्हिडिओ, टेक्स्ट, मीम्सच्या माध्यमातून तक्रारींचा ओघ सुरू होता.
ते सारं घेऊन ती पोलिसांत गेली. पोलिसांनी ॲक्शन घेण्यास टाळाटाळ केली. कारण, अहमद हा कैरो शहरातील बड्या उद्योगपती असामीचा मुलगा. सोशल मीडियातून अल्पवयीन मुलींना गाठायचा. त्यांच्यावर प्रभाव पाडायचा. भेटायला बोलवायचा. कोल्ड्रिक्स, कॉफीमध्ये गुंगीचं ओषधं घालायचा.
न्यू यॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नादिन म्हणते, ‘परीक्षेच्या आदल्या दिवशी मी पेज सुरू केलं. पहिल्याच दिवशी ३० मेसेज आले. दिवसभर नोटिफिकेशन येत राहिले. परीक्षेत असतानाही मला पेपरची कमी, पण त्या मेसेजेसची अधिक काळजी वाटायची.’
इजिप्शियन स्ट्रीट नावाच्या वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत नादिन म्हणते, ‘प्रत्येक तक्रारीत, असहायता, लाचारी, हिंसा व क्रूरता दिसून आली. सुरुवातीला मला प्रचंड राग यायचा. अत्याचाराचे असंख्य मेसेज डोक्यात गोंगाट करायचे. मग डोकं शांत ठेवून मी ठरवलं आता गप्प बसायचं नाही.’
तक्रार घेण्यास पोलीस नकार देत होते; पण अत्याचाराच्या तक्रारी आणि दबावामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पडले. आठवडाभरातच अहमदला अटक झाली. काही दिवसांतच खटला कोर्टात. अल्पवयीन मुलींना धमकावणं, लैंगिक अत्याचार करणे असे गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले.
२१ वर्षीय अहमदने सोशल मीडियाच्या माध्यमातून सहा महिलांशी संपर्क साधल्याची कबुली कोर्टात दिली. मुलींकडून फोटो मिळवत त्यांना धमकावलं असंही तो म्हणाला. सरकारी वकिलांनी त्याच्यावर किमान तीन महिलांविरुद्ध लैंगिक हल्ला केल्याचा आरोप ठेवला.
इकडे इन्स्टाच्या ‘असॉल्ट पोलीस’ अकाउण्टच्या लोकप्रियतेत वाढ होत होती. आठवडाभरात ७० हजार फॉलोव्हर्स झाले. अनेकजणी आपापल्या भयकथा सांगत होत्या. सगळ्यांच्या कथा भयानक, हिंसक व क्रूरतेच्या सीमा पार करणाऱ्या होत्या. अहमदच्या निमित्तानं इजिप्शियन महिलांनी कौटुंबिक हिंसा, बलात्कार आणि वैयक्तिक हल्ल्याविरोधात मौन तोडलं होतं.
अहमदचा खटला सुरू असताना सरकारने जुलैमध्ये तडकाफडकी लैंगिक अत्याचारासंबंधी कायदेशीर सहकार्य करणारं एक विधेयक मांडलं.
एका मुलीच्या हिमतीतून एक मोठी चळवळ उभी राहाते आहे.
( कलीम मुक्त पत्रकार आहे.)
kalimazim2@gmail.com