करायचं ते करा बोलताय कशाला?
By admin | Published: November 20, 2014 06:20 PM2014-11-20T18:20:13+5:302014-11-20T18:20:13+5:30
ग्रामीण भागात शहरांइतकं खुलं उघड काही दिसत नसलं तरी ते ‘नाही’ असं नाही. ते दिसत नाहीये, इतकंच. मोबाइल वापरण्यापासून चोरून भेटणं, प्रेमात पडणं, आपला जोडीदार निवडणं ही बंडं तर कधीची सुरू झाली आहेत.
Next
>केरळ व देशातील प्रमुख शहरांमध्ये ‘किस ऑफ लव्ह’ आंदोलन सुरू असताना त्याला पाठिंबा दर्शविणारं पुणे विद्यापीठातही एक आंदोलन झालं. या आंदोलनाचं नाव होतं ‘स्पिक फॉर लव्ह’. प्रेमासाठी बोला.
युवा भारत या संघटनेच्या माध्यमातून वनराज शिंदे यांनी हे आंदोलन छेडलं. यावेळी पुण्यासह खेड्यापाड्यातील मुलं-मुली जमली होती. त्यापैकी अनेकांनी प्रेमविवाह, आंतरजातीय विवाह केलेला होता. त्यांनी आपले अनुभव सांगितले व प्रेमाबद्दल ते भरभरून बोलले. या आंदोलनालाही अपेक्षेप्रमाणे पोलीस व काही परंपरावादी संघटनांनी विरोध केला. त्यांच म्हणणं ‘तुम्ही जे करायचं ते करा पण त्याबाबत बोलताय कशाला?’
म्हणजे प्रेम करा पण चिडीचूप. गुपचूप. करायचं सगळं; पण बोलायचं काहीच नाही. ते दाखवायचं नाही. झाकून ठेवायचं. भिंतीआड, आडोशाआड करायचं. संस्कृतीरक्षकांना आपला हा लपवाछपवीचा सामाजिक व्यवहार मान्य असतो. खरं वागलं की ती चोरी ठरते. खोटं वागलं की ते समाजमान्य बनतं.
वनराज शिंदे म्हणतात, ‘‘राज्यघटनेने आम्हाला आमचं आयुष्य कसं जगायचं याचं स्वातंत्र्य दिलं आहे. मग जातीच्या, धर्माच्या नावानं अडवलं का जातं? प्रेम केलं म्हणून तरुण-तरुणींचे खून का पडतात? तरुण-तरुणी एकमेकांवर प्रेम करू इच्छित असतील तर त्यांना रोखलं का जातं? ‘लव्ह जिहाद’ कसा असू शकतो. लव्ह तर ‘आझाद’ असलं पाहिजे. प्रेम व्यक्त करण्याची मुभा असली पाहिजे. ग्रामीण भागात तर त्याची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे ‘किस ऑफ लव्ह’च निमित्त शोधून आम्ही पुण्यात हे लोकशाहीवादी आंदोलनं उभारलं. ’’
‘प्रेमाच्या आझादी’ची ही लढाई हळूहळू खेड्यापाड्यात सुरू झाली तर नवल वाटायला नको. नगर जिल्ह्यात खर्डा, सोनई या खेड्यांमध्ये तरुणांची हत्त्याकांड झाली. कारण काय तर या तरुणांनी वरच्या जातीच्या मुलींशी प्रेम केलं. गेल्या महिन्यात माहोरला प्रेमसंबंधांमुळे मुस्लीम तरुण-तरुणीची हत्त्या झाली. प्रेमविवाहात साक्षीदार झाले म्हणून बेळगावात भाजपा आमदाराच्या सर्मथकानं दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण केली.
हे सारं एकीकडे आणि दुसरीकडं ग्रामीण भागात प्रेमात पडणं, पडून पाहणं याविषयी कमालीचं अप्रूप दिसतं. मुलं-मुली घरच्यांच्या विरोधामुळे पळून जाऊन लग्न करतात. पण पालक या जोडप्यांना शोधून काढतात. पुढे या तरुणाविरोधात अपहरणाची फिर्याद दाखल करायला लावली जाते. किंवा थेट मुलीलाच हत्यार बनवून बलात्काराची फिर्याद द्यायला लावली जाते. सगळ्याच केसमध्ये असं घडतं असे नव्हे. परंतु अनेक प्रकरणातील पडद्याआडचं सत्य वेगळं असतं. खेड्यापाड्यातून जी मुल-मुली कॉलेजला जातात ती गावाबाहेर पडली की बसमध्ये, कॉलेजमध्ये एकमेकाला भेटतात, बोलतात, व्यक्त होतात. पण गावात शिरताच त्यांचे रस्ते वेगळे होतात. ते एकमेकांशी अबोल होतात. एकमेकांकडे पुस्तक मागायला जायचीदेखील मारामार. कारण भीती.
रस्त्यावर बोलता येत नाही म्हणून मोबाइल चॅटिंगचा आधार त्यांनी आता घेतला आहे. परवा एक प्राध्यापक सांगत होते की, कॉलेजातल्या मुली आता सर्रास मोबाइल वापरतात. कारण व्यक्त होण्यासाठी दुसरं सुरक्षित ठिकाण कोणतं?
शहरांमध्ये खुलेआम शारीर जवळिकीवरून वाद होताहेत. ग्रामीण भागात मुलामुलींनी उघड बोलणंही पाप. त्यावर आता मोबाइलचे उतारे आलेत, हे मात्र कुणाच्याही लक्षात येत नाही. प्रत्यक्ष जे बोलणं होत नाही ते सारं बोलणं, मोबाइलवरून होतंच.
आकडेवारीत नाही सांगता येणार, पण प्राध्यापकांपासून अभ्यासकांपर्यंत एक निरीक्षण असं की, हातात मोबाइल आल्यापासून मुली जास्त मोकळ्या आणि बोलक्या झाल्या आहेत. संस्कृतीरक्षक म्हणतील ‘ही समाज नासल्याचीच लक्षण आहेत’. पण मुली अशा का वागू लागल्या आहेत? हेही बघितलं पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीचा उंबरा ओलांडणार्या अनेक मुलींनी आता ग्रामीण भागातही बंडखोरीला सुरुवात केली आहे. पुरुषांप्रमाणे त्याही स्वातंत्र्य उपभोगू पाहत आहेत. त्यासाठी मोबाइल वापरण्यापासून चोरून भेटणं, प्रेमात पडणं, आपला जोडीदार निवडणं ही बंडं सुरू झाली आहेत.
ग्रामीण भागात शहरांइतकं खुलं उघड काही दिसत नसलं तरी ते ‘नाही’ असं नाही. ते दिसत नाहीये, इतकंच.
साहित्यिक राजन खान यांनी या प्रश्नाची चर्चा त्यांच्या एका पुस्तकात फार नेमकेपणाने केली आहे. ते म्हणतात, ‘‘पूर्वी माणूस उघड्यावर होता. त्यामुळे त्याचे प्रेमाचे व्यवहार व लैंगिक वर्तनही उघड्यावरच होई. पुढं माणसानं अंग झाकलं अन् सगळंच आडोशाआड सुरू झालं. कुत्र्याच्या पिलाला लैगिंक शिक्षण उघड्यावर मिळतं. माणूस प्रगत होऊनही तो त्याच्या पिलांशी मात्र लैंगिक शिक्षणाबाबत काहीच बोलत नाही. निसर्ग मुली-मुलांना १२ ते १६ वर्षांदरम्यान वयात आणतो. अन् आपला कायदा १८ व २१ व्या वर्षी त्यांना लग्नाची मुभा देतो. यातही मुलीच व मुलाच वय समान नाही. का? कुणास ठाऊक?’’
अंगात वासनांचा आगडोंब अन् तोंडी संयमाची भाषा. असा व्यवहार असणार्या समाजाला ‘किस ऑफ लव्ह’ च आंदोलन कसं पचणार? ते जडच जाणार.
- सुधीर लंके