..अ डॉग टेल! प्रेमाची अबोल भाषा सांगणारे दोन सुंदर अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:58 PM2018-02-07T15:58:50+5:302018-02-08T08:45:43+5:30
- प्रज्ञा शिदोरे
माणूस आणि प्राण्याचं नातं ते कित्येक हजार वर्षांचं. इतर प्राण्यांपासून संरक्षण मिळावं, निसर्गातले धोके आधीच समजावेत यासाठी माणसानं जंगली कुत्र्यांना माणसाळवलं. आता माणसाला त्याचं रक्षण करण्यासाठी कुत्र्यांची गरज नाही, पण एवढ्या हजार वर्षांच्या एकत्रित प्रवासामुळे माणूस आणि प्राणी हे नातं घट्ट झालं. आजही अनेक कुटुंबं अशी आहेत ज्यांच्या घरात कुत्रा हा त्या घराचा अविभाज्य भाग आहे. याच विषयावर जॉन ग्रोगन या पत्रकारानं एक कमाल पुस्तक लिहिलं आहे ‘मार्ली अॅण्ड मी’. या पुस्तकावर आधारित एक चित्रपटही गाजला आहे.
कुत्र्याचं पिल्लू आणणं, त्याची काळजी घेणं, त्याला सवयी लावणं (लावण्याचा प्रयत्न करत राहणे! कारण शेवटी काही कुत्र्यांची शेपूट... ) मग त्याचं वृद्धत्व, आणि मग काही अवघड निर्णय. मार्लीच्या या सर्व प्रवासाचं जॉन मस्त वर्णन करतो.
तसाच कमाल चित्रपट म्हणजे ‘हाचि- अ डॉग्ज टेल’. हाचि हा जपानमधील आकिता जातीचा एक कुत्रा. या जातीचे कुत्रे कमालीचे निष्ठावंत. ही गोष्ट आणि त्या कुत्र्याची आणि त्या मालकाची. हाचि दर दिवशी आपल्या मालकाला स्टेशनपर्यंत सोडायला येत असतो आणि नेमक्या त्याच्या यायच्या वेळी त्याला घ्यायला जात असतो. एकदा त्याचा मालक आॅफिसला जातो; पण त्याचा तिथेच मृत्यू होतो. तो परतच येत नाही. तर हा हाचि त्याची रोज ट्रेन यायच्या वेळेला वाट बघत बसतो. एक नाही दोन नाही तर हाचि स्वत: जाईपर्यंत, म्हणजे तब्बल ९ वर्षं!
तुमचा असा जीवाभावाचा प्राणी दोस्त असेल वा नसेल, नितळ प्रेमासाठी हे सारं आवर्जून पाहा. प्रेमाची परिभाषा किती वेगळी असते हे यानिमित्तानं आपल्यालाच जाणवतं.
रिचर्ड गेरचं अप्रतिम काम असलेला हा चित्रपट यू ट्यूबवर तुम्हाला कधीही बघता येईल!
पाहा
https://www.youtube.com/watch?v=BSZk2Ozo2fU