डोह : मनात उठणा-या तरंगाचा ठाव घेत होणारी विचित्र घुसळण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 06:01 PM2018-02-14T18:01:28+5:302018-02-15T10:37:38+5:30

जागतिकीकरणानंतर प्रत्येक क्षेत्रात नव्याचे, बदलाचे वारे वाहू लागलेत. हा नवेपणा आणि बदल अनुभव घेण्याच्या आणि आनंद घेण्याच्या प्रक्रियेतही शिरला आहे.

Doh | डोह : मनात उठणा-या तरंगाचा ठाव घेत होणारी विचित्र घुसळण

डोह : मनात उठणा-या तरंगाचा ठाव घेत होणारी विचित्र घुसळण

Next

- माधुरी पेटकर


जागतिकीकरणानंतर प्रत्येक क्षेत्रात नव्याचे, बदलाचे वारे वाहू लागलेत. हा नवेपणा आणि बदल अनुभव घेण्याच्या आणि आनंद घेण्याच्या प्रक्रियेतही शिरला आहे. स्वत:चा आनंद शोधणं, घेणं, स्वत:च्या स्पेसचा उपभोग घेणं, खासगीपणा जपणं या गोष्टीही टोकदार व्हायला लागल्या आहेत.
मात्र अनुभव, आनंद केवळ तात्पुरता, वरवरचा नसतो. त्याचे खोलवर तरंग उमटतात. एखाद्या डोहात दगड टाकल्यानंतर त्यावर जसे तरंग उमटतात तसे. आपल्याला अनेकदा केवळ वरवरचा तरंग दिसतो; पण तरंगांनी तो अख्खा डोह ढवळला जात असतो. एक छोटासा दगड डोहाच्या तळापर्यंत जाऊन पोहोचतो; तरंग उठतात, पाणी ढवळलं जातं. त्या एका दगडानं किती उलथापालथी होतात; पण त्या डोहातल्या आंदोलनांचा आवाज कोणालाही येत नाही. डोह त्याचा त्याचा अनुभव घेतो, स्वत:पाशीच जपून ठेवतो.
असा हा डोह प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतो. त्या डोहात प्रत्येक अनुभवानं अनेक तरंग उमटतात. आनंदाचे, दु:खाचे, शंकेचे, संभ्रमाचे. व्यक्तीच्या मनातल्या त्या डोहाचं दर्शन ‘डोह’ या १९ मिनिटांच्या लघुपटात होतं. आपल्याला तो डोह भेटतो तो नायिका श्रुतीच्या रुपात. श्रुती एक कॉलेजला जाणारी तरुणी. स्वत:ची स्पेस जपणारी आणि शोधणारीही. डोहची सुरुवात होते ती एका प्रवासानं. मुंबईत राहणारी ही तरुणी लोकलनं कुठूनतरी निघून आपल्या घराच्या दिशेनं निघालेली असते; पण तिचा खरा प्रवास तो नसतोच. मनातल्या आनंदाच्या छटा, त्या आनंदातून आलेला हलकेपणा तिच्या चेहºयावर दिसत असतो, तिच्या हावभावातून व्यक्त होत असतो. ती त्या अनुभवाचाच प्रवास परत परत अनुभवत असते. तो अनुभव असतो शारीरिक सुखाचा. आपल्या मित्रासोबत अनुभवलेल्या एकांताचा. या एकांतासाठी मैत्रिणींना थापा मारलेल्या असतात. घरी-कॉलेजला जाते असा बंडल मारलेला असतो. परीक्षेच्या तोंडावर सगळ्या ताणाचा विसर स्वत:ला पडून ती वेगळंच जगून घेते. घरी जाताना, घरी गेल्यावर, कॉटवर झोपलेली असताना, बाथरूममध्ये गेल्यानंतर प्रत्येकक्षणी तिच्या मनातला तो एकांताचा अनुभव सतत डोकं वर काढतो. प्रत्येक वेळेस प्रेक्षकाला त्या अनुभवांचं एक वेगळंच रूप दिसत असतं. लोकलमधून घरी जाताना आनंदी दिसणारी श्रुती वेगळी. घरी आल्यावरची वेगळी. मित्रासोबत असताना अचानक दारावरच्या टकटक झाली तेव्हा त्यानं तिला बाथरूममध्ये जा म्हणत लपवलेलं असतं. ते आठवून तेव्हा आपण चुकलो तर नाही ना ही शंकाही चेहºयावर येते. लोकलमधून मित्राला फोन करणारी श्रुती मित्राचा फोन लागत नाही म्हणून निराश होते, या माणसानं आपल्याला केवळ ‘यूज’ तर केलं नाही ना, हा प्रश्न तिला काही काळ छळताना दिसतो. घरी गेल्यावर आईपासून काहीतरी लपवणारी, सर्व लक्ष सारखं फोनकडे असणारी, मनातल्या विचारांनी त्रस्त होऊन लहान भावावर चिडणारी श्रुती दिसते. मित्राचा फोन आल्यावर पुन्हा आनंदी होते. हे सारे मनातले तरंग आपणही पाहतच राहतो.
डोहचा लेखक- दिग्दर्शक आणि पटकथाकारअक्षय इंडीकरला या फिल्ममध्ये कोणतीच एकच एक भावना दाखवायची नाहीये. त्याच्या मते, कोणत्याही अनुभवाची अशी एकच एक छटा नसते. कोणत्याही अनुभवाला अनेक भाव चिकटलेले असतात. डोहमधून अक्षयला या एका अनुभवाला चिकटलेले अनेक भाव दाखवायचे होते. चूक-बरोबर असं काहीही ठरवायचं नव्हतं.
जागतिकीकरणानंतर स्वत:ची स्पेस शोधणारी तरुण पिढी दाखवायची होती. जागतिकीकरणानंतर शरीराला, शरीर अनुभवाला आलेलं महत्त्वही दाखवायचं होतं. या सगळ्याच्या माध्यमातून मनातल्या भावनांच्या गूढतेचं दर्शनही घडवायचं होतं. हा अनुभव अस्वस्थ करतोच.

madhuripethkar29@gmail.com

Web Title: Doh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.