मराठवाडय़ातला दुष्काळ पुण्यात शिरतो, तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 01:56 PM2019-01-31T13:56:18+5:302019-01-31T13:57:16+5:30
मराठवाडय़ातून शिकायला म्हणून पुण्यात आलेली मुलं. सध्या त्यांच्या गावी परिस्थिती इतकी बिकट आहे, की वरखर्चाला येणारे पैसे बंद झाले आहेत. ज्यांना हॉस्टेल मिळाली आहेत त्यांचं ठीक, बाकीच्यांना तर जेवायचं काय याबरोबरच राहायचं कुठे? हाही प्रश्न आहे.
राहुल गायकवाड
पुण्यात रस्त्याने जाणार्या कोणालाही मराठवाडय़ाची ओळख विचारली तर त्याच्या डोक्यात दुष्काळ हाच शब्द आधी येतो. इथं पुण्यात डिव्हायडरवर ‘पाणी हे जीवन आहे. जपून वापर करा’, असं लिहिलेलं आम्ही पुणेकर वाचत असतो. पण पाण्याचा एकेक थेंब किती महत्त्वाचा आहे, याचा अनुभव मराठवाडा घेतोय. पुण्यात शिकायला आलेले आमचे अनेक मूळचे मराठवाडय़ातले मित्र सांगत राहतात गावाकडची व्यथा..
गेली अनेक वर्षे पाऊस कमी झाला, पाणी नाही. दुष्काळ. शेतीत काही पिकलं नाही तर त्यापायी स्थलांतर वाढलं. पुण्यात कामाच्या शोधात आलेले अनेकजण दिसतात. मात्र कामाच्या शोधातच कशाला उच्चशिक्षणासाठी, आपलं आयुष्य नव्यानं घडवू म्हणत त्या शिक्षणाकडे आशेनं पाहणारी अनेक तरुण मुलं इथं भेटतात. अगदी ऊसतोड कामगारांची मुलंही स्पर्धा परीक्षांच्या मोहात अडकून पुण्यात तयारीला येतात. पण आता यंदा दुष्काळामुळं घरून पैसे येणं अवघड झालंय. पुण्यासारख्या शहरात राहण्या-खाण्याचा खर्च कसा काढायचा, असा प्रश्न अनेकांच्या शिक्षणाच्या मुळावर उठला आहे.
आजच्या घडीला मराठवाडय़ातील चार ते पाच लाख तरुण विद्यार्थी पुण्यात कुठं ना कुठं शिक्षण घेत आहेत. यातील अनेक विद्याथ्र्याचे पालक शेती करतात. सातत्याने पडणार्या दुष्काळामुळे शेतीत उत्पादन नाही. त्यातच नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधींचा अभाव, हाताला चटकन काम तरी कुठून मिळणार? त्याचा परिणाम असा झालाय की पुण्यात शिक्षणासाठी गेलेल्या आपल्या मुलांना पैसे पाठवणंही आता अनेक पालकांना जमत नाही. प्रवेश तर घेतला जूनमध्ये आता वर्षाचा परीक्षांचा मौसम, अर्धवट तरी कसं सोडणार शिक्षण? पण मग मेसचा खर्च, हॉस्टेलचा, रूमचा खर्च, प्रवासाचा असे सर्व खर्च करायचे तर पैसा हवा. तो कुठून आणणार, पुण्यात कसा निभाव लागणार या काळजीनं अनेक पोरं हवालदिल झाली आहेत.
जुळजापूरची कृष्णा झळेकर पुण्यातल्या फग्यरुसन महाविद्यालयात बारावी आर्ट्सला शिकते. भारु डं, संगीत याची तिला आवड. त्यामुळे कलेतच नाव कमवायचं तिनं ठरवलं. हिम्मत करून पुण्यात तर आली. महाविद्यालयाचं हॉस्टेलसुद्धा मिळालं. पण सगळं काही इतकं सोपं नाही. तिचे पालक शेती करतात. यंदा पावसानं पाठ फिरवल्याने उत्पादन घटलं. कृष्णाचे पालक तिला दर महिन्याला हजार रुपये वर खर्चासाठी देतात. यातच तिला तिचा नास्ता, मोबाइलचा खर्च, कपडे, प्रवास, दवाखाना या सगळ्याचा खर्च भागवावा लागतो. वर्षाच्या सुरु वातीलाच मेसचे पैसे भरलेले असल्यानं दिवसातून दोन वेळा जेवण मिळणार याची तरी तिला शाश्वती आहे. पण मग नास्त्याचं काय? आठवडय़ातून एक दिवस मेस बंद असते, त्या दिवसाच्या जेवणाचं काय? असे प्रश्न कृष्णासारख्या तिच्या अनेक मित्रमैत्रिणींसमोर आहेत. रोज सकाळी 11 वाजता मेस सुरू होते. मेसमध्ये नास्ता हवा असेल तर त्याचे वेगळे पैसे भरावे लागतात. त्यामुळे कृष्णासारख्या अनेक मुली सकाळी उपाशीपोटी लेक्चरला जातात. 11च्या सुमारास मेस सुरू झाल्यानंतरच थेट जेवण करतात. त्यानंतर रात्री 8 नंतरच पुन्हा जेवण.
निदान कृष्णाकडे राहायची नि दोन वेळच्या जेवणाची काही सोय आहे. ज्यांना हॉस्टेल मिळालेलं नाही त्यातले काहीजण मित्रमैत्रिणींच्या रूमवर राहतात. एकेका प्लॅटमध्ये 15 जणसुद्धा राहतात. जेवणाला पैसे नसले की एकच डबा तिघं-चौघं मिळून खातात. कधी नाहीच काही मिळालं तर अर्धपोटीच दिवस ठकलतात.
जळगावचा गोरख महाजन. त्याच्याकडे हॉस्टेलची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. तर त्यानं तब्बल आठ दिवस स्वारगेट एसटी स्टॅण्डवर काढले. पैशांची कुठून तरी व्यवस्था करावीच लागणार होती. शेवटी त्यानं एका पिझ्झा पुरवणार्या आउटलेटमध्ये काम करणं सुरू केलं. गोरखसारखे शेकडो विद्यार्थी पुण्यात आता अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळीमध्ये काम करताना दिसतात. सकाळी कॉलेज करायचं आणि दुपारनंतर हॉटेलात काम.
अनुजा कांबळे बारावीत शिकते. अकरावीत पुण्यात आली तर तिला वेगळंच जग दिलं. आर्थिक विषमता मोठी. लाइफस्टाइल वेगळी. राहणीमानावरून टोमणे तिनंही ऐकले. तिलाही वाटतं वाढदिवसाला मित्रमैत्रिणींना एका चांगल्या हॉटेलात पार्टी द्यावी, भारीतले कपडे घालावेत. पण ते तिला सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे इतरांच्या पार्टीलाही या मुली जात नाहीत.
डोंगरेवाडीचा सुरेश बर्हाटे रायगडच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याची बहीण पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करते. घरची परिस्थिती हालाखीची. सुरेशच्या नावावर एज्युकेशन लोन असल्यानं त्याला शिक्षण घेता येतंय; परंतु त्याच्या बहिणीच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तरुण मुलांना भेटत जा, अशा अनेक कहाण्या, हतबलता आणि तरीही मागे न हटण्याची जिद्द दिसते. पण पैशाचं सोंग कुठून आणणार हा प्रश्न काही पाठ सोडत नाहीत.
दुष्काळाचं हे भयंकर रूप आहे, जे जगण्याला तडे देतं आहे.
ते तडे कसे सांधायचे आणि कशी उमेद मनी धरायची हाच या मुलांसमोरचा आजचा अवघड प्रश्न आहे.
हेल्पिंग हॅण्ड
या मुलांच्या मदतीला आता काही तरुण मुलं पुढे येत आहेत. मराठवाडय़ातला दुष्काळ सोसलेल्या विद्याथ्र्यानी हेल्पिंग हॅण्ड ही संस्था सुरू केली आहे. मराठवाडय़ातलाच असणारा कुलदीप आंबेकर यानं ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या विद्याथ्र्याचा मेसचा आणि राहण्याचा खर्च भागवता यावा यासाठी ही मुलं देणगीदार शोधत आहेत. नुकताच कुलदीप आणि त्याचे सहकारी संध्या सोनवणे, ईश्वर तांबे, दयानंद शिंदे, लक्ष्मण जगताप, रचना परदेशी यांनी पुण्यात दुष्काळ परिषद भरवली होती. या परिषदेच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्तींना या विद्याथ्र्याच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं.
ज्यांना मदतीची गरज आहे अशा आठशे ते हजार विद्याथ्र्याची यादी कुलदीपनं तयार केली असून, शक्य तेवढी मदत करण्याचं काम सुरू झालं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कुलदीपनं दुष्काळग्रस्त भागातील विद्याथ्र्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. कुलदीपसोबत कुलदीप त्याचे सहकारी मित्रमैत्रिणी संध्या सोनवणे, गणेश चव्हाण, नारायण चापके, सुमित वणवे यांनीही कामाला वेग दिला. या सगळ्यांनी मिळून 12 डिसेंबरला दुष्काळग्रस्त विद्याथ्र्याची परिषद पुण्यात भरवली होती. या परिषदेला शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात पुण्यातील देणगीदारांनी अनेक मुलांची जबाबदारी घेतली. सध्या स्टुडंट हेल्पिंग हॅण्डच्या माध्यमातून 350 विद्याथ्र्याना मदत मिळाली आहे. ज्या देणगीदारांना विद्याथ्र्याना मदत करायची आहे, त्यांची कुलदीप विद्याथ्र्याशी भेट घडवून देतो. विद्यार्थी ज्या मेसमध्ये जेवण करतात त्या मेसला देणगीदार थेट चेक देतात. कुलदीप हा विद्यार्थी मेस आणि देणगीदार यांच्यातील दुवा म्हणून काम करतो. हळूहळू हे काम आकार घेतं आहे.
.............
(राहुल लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे.)