ड्रम बीट
By Admin | Published: November 3, 2016 06:08 PM2016-11-03T18:08:00+5:302016-11-03T18:08:00+5:30
ड्रमर आणि ड्रमिंगचं पॅशन आता छोट्या शहरातही उतरलं आहे.. त्या पॅशनसाठी जिवाचं रान करणारे ड्रमर्स आपण निवडलेली एक नवीन वाट चालताहेत.. त्या वाटेवर त्यांना सापडलेल्या बीटविषयीच्या या खास ‘लोकल’ गप्पा..
>- मयूर देवकर
तुम्ही कधी रॉक कॉन्सर्ट पाहिली आहे? एकदा निदान यू ट्यूबवर जाऊन एखादा व्हिडीओ तरी पहायला हवा.. स्टेजवर ‘आग’ लागलेली असते.. बँडमधील लीड सिंगर, गिटार प्लेअर, कीबोर्ड प्लेअर आणि ड्रमर यांच्या जबदरस्त एनर्जेटिक सादरीकरणामुळे नुसता कल्ला असतो. असं वाटतं की आपणही नाचावं.. विसरून जावं स्वत:ला.. इंग्रजी संगीताची आवड असणाऱ्यांना हे सारं काही नवीन नाही.. पण हल्ली रॉक, जॅझ हे सारे शब्द तसे तरुण मुलांना अपरिचित राहिलेले नाही.. इतकं उत्तम काही ‘ऐकायला’ मिळतं की देशी-विदेशी असा भेदच मिटतो.. रॉक बॅण्ड्सच्या जगात तर कायम नवीन काही ना नाही येतं. मेटालिका, बिटल्स, लेड झेडपलिन, एसी/डीसी, डीप पर्पल या रॉक बॅण्ड्सनी तर संपूर्ण विश्वात रॉक संगीत पोहचवलं. आणि रॉक बॅण्ड्सच्या जगात सगळ्यात महत्त्वाचे असतात ते ड्रमर. बॅण्डमधल्या इतर सदस्यांपेक्षा ड्रमरची शानच काही और असते. संपूर्ण परफॉर्मन्सला आधार देण्याचं, तो एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम ड्रमर करतो. ड्रम्सच्या पाठीमागे बसून दोन्ही हातांनी संपूर्ण शक्तीनिशी देहभान विसरल्यागत तो वाजवत असतो. वैयक्तिक सांगायचे झाले तर ड्रमर्सबद्दलची खरी रुची निर्माण झाली ती ‘व्हिपलॅश’ या चित्रपटामुळे. माईल्स टेलर आणि जे. के. सिमन्सच्या अविस्मरणीय अभिनयाने ड्रमर्सचे पॅशन आणि त्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती कळून आली. पण ड्रमरचा हा प्रवास सोपा नव्हता. आज ड्रमर्सना जगात मोठा मान असला तरी सुरुवातीला हुल्लडपणा आणि धांगडधिंगा म्हणून त्याला नावंही ठेवली गेली. अमेरिका, युरोप ते थेट दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका असं जग गाजवत भारतातही ड्रमर्सनं आदराचं स्थान मिळवलं आहे. त्याविषयी बोलायचं तर एकच नाम काफी आहे.. शिवमणी. त्यांचं वादन, त्यांचे ड्रम ऐकले की वाटतं याहून काही आता ऐकूच नये. कधी कधी वाटतं यू ट्यूबसारख्या माध्यमात तर फुकट उपलब्ध आहे हे सारं, आपण किती किती काय काय पाहणार? तर मुद्दा हा की, भारतातसुद्धा आता ड्रम आणि पर्कशन प्रकारातील वाद्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. शिवमणींसह दर्शन दोशी, रणजित बरोत यांसारखे ड्रमर्स जगभर लोकप्रिय होताहेत. देशातील तरुण ड्रमर्सचे तर ते आदर्श आहेत. आणि म्हणूनच ड्रमर्स ही गोष्ट आता काही मुंबई-पुण्यासह मेट्रो शहरापुरती उरलेली नाही. छोट्या शहरांमध्येदेखील ड्रमची लोकप्रियता वाढते आहे. बासरी, तबला, पेटी अशा पारंपरिक वाद्यांचा क्लास लावणारी अनेक मुलं आता जशी गिटार, पियानो आणि व्हायोलिन शिकतात तसेच त्यांच्यातले काही आता थेट ड्रम्सही शिकू लागले आहेत. कॉलेजेसमध्येसुद्धा आता बँड कल्चर निर्माण होते आहे. मग ते रॉक असो वा जॅझ, ड्रमरशिवाय त्यात काही मजा नाही. म्हणून मग औरंगाबाद शहरातल्या ड्रमर्स दोस्तांना भेटलो. तसाही नोव्हेंबर हा महिना ‘इंटरनॅशनल ड्रम मंथ’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं भेटलो या ड्रमर्स दोस्तांना आणि विचारलंच की, हे काय तुमचं नवीन पॅशन? कसं जगता ते?
मोहम्मद शहबाज अर्थात ‘शॅबी’
औरंगाबाद शहरात एक स्थानिक रॉक बँड आहे- ‘एन.ओ.बी.’. त्याचा ड्रमर म्हणून शॅबी म्हणजेच मोहम्मद शहबाज प्रसिद्ध आहे. गेल्या सहा वर्षांपासून ‘एन.ओ.बी.’सह तो परफॉर्म करत आहे. त्याला भेटलं की कळतं ड्रमर्सचं ड्रमवरचं प्रेम. तो सांगतो, ‘ड्रम्स थेट मनाला भिडतात. ड्रमवरच्या पहिल्या ठोक्यापासून ड्रमर आणि श्रोता, दोघंही ड्रमबीटच्या तालात मिसळून जातात. एक होतात. बाकी जग उरत नाही. हेच कारण असावं म्हणून मी ड्रम्सकडे ओढला गेलो. शॅबी प्रोफेशनल ड्रमर आहे. पण विशेष म्हणजे त्याला कोणी ड्रम्स शिकवला नाही. केवळ आवडीपोटी तो ड्रमकडे आकर्षित झाला आणि मग स्वत:च स्वत:चा गुरू बनला. तो सांगतो, ‘मी शाळेत असताना औरंगाबादमध्ये ड्रम शिकण्याची फार कमी संधी होती. पण शिकण्यासाठी व्यवस्थेपेक्षा इच्छेची गरज असते. म्हणून मग मी स्वत:हून ड्रम्सवर प्रॅक्टिस करू लागलो. इंटरनेटवर माहिती मिळवून माझं शिक्षण सुरू झालं.’ एकच माणूस ड्रमसेटमधली एवढी वाद्यं कशी काय वाजवू शकतो याचं शॅबीला भयंकर कुतूहल होतं. त्याच कुतूहलाचा हात धरून त्याचा प्रवास सुरू झाला. तो आपले आपण ड्रम शिकला, ते पॅशन जगला. बँडसह मुंबई, नाशिक, पुणे अशा विविध शहरांत परफॉर्म करू लागला. लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून अधिक तयारीनं, अधिक जोमानं ड्रम वाजवू लागला. आणि आता तर वेगानं बदलणाऱ्या, मोठ्या होत जाणाऱ्या औरंगाबाद शहरात ड्रमिंगबद्दल फार उत्साहवर्धक स्थिती आहे असं त्याला वाटतं. त्याला विचारलं की, पॅशनसमोर अडचणी काही नसतात हे मान्य; पण तरी तुझ्या या कलासाधनेत काही अडचणी तर येत असतीलच ना? तो म्हणाला, ‘अडचण एकच, इतर वाद्यांप्रमाणे ड्रम्स सहज कुठंही घेऊन जाता येत नाहीत. त्यांचा आवाज खूप जास्त असल्याने घरी प्रॅक्टिस करणं अवघड असतं. शिवाय ड्रम वाजविण्यासाठी शारीरिक स्टॅमिनासुद्धा लागतो. मेहनत अपार करावी लागते. त्यामुळे ज्यांना ड्रम शिकायचा त्यांना मी हेच सांगतो की, तुमच्याकडे ड्रमसाठी डाय-हार्ड पॅशन असेल तरच ड्रम उत्तम वाजेल. आवड म्हणून सहज शिकावं इतकं हे सोपं नाही. त्यासाठीचा ताल डोक्यात सतत वाजत राहिला पाहिजे, कशातलाही बीट ऐकू आला पाहिजे!
राहुल जोशी, ड्रमशी गट्टी
राहुल जोशी. ड्रमवादक म्हणून असलेली त्याची कामगिरी खरंच कौतुकाची बाब आहे. गेली १५ वर्षे तो संगीत क्षेत्रात कार्यरत असून, मुंबई-पुणे-औरंगाबाद अशा तिन्हीही ठिकाणी सक्रिय आहे. विविध हिंदी व मराठी चित्रपटांसाठीसुद्धा तो वादन करतो. या संगीतप्रवासाबद्दल तो सांगतो, ‘माझ्या आतेभावाने मला प्रेरित केले. माझ्या वडिलांनीसुद्धा थोड्या प्रमाणात चाळीस वर्षांपूर्वी वादन केले होते. बालपणापासून माझे गाण्यातील शब्दांऐवजी त्याच्या पार्श्वसंगीताकडे जास्त लक्ष असायचं. त्याचा ठेका, बीट्स कसा आहे यामध्ये मला अधिक रस होता. आणि त्यातल्या त्यात ड्रमकडे मी विशेष आकर्षित झालो. का झालो याचं काही उत्तर नाही. परंतु ते आपोआपच झालं. ड्रमला हात लागला आणि त्या क्षणापासून माझी ड्रमशी गट्टी जमली, ती आजपर्यंत कायम आहे.’ राहुल सांगतो, ‘थोडं मोठे झाल्यावर आॅर्केस्ट्रा बघू लागलो. त्यातून ड्रमविषयी असणारी ओढ आवडीमध्ये रूपांतरित झाली. पण त्याकाळी ड्रमचं प्रशिक्षण आजसारखं सहज उपलब्ध होण्यासारखे नव्हतं. दरवर्षी केवळ नवरात्रीच्या काळात दांडियाच्या निमित्ताने ड्रम वाजवण्याची संधी मिळायची. मग काय, हाताला जखम होईपर्यंत ते वाजवायचं. त्यात घरी कोणतंच वाद्य नसल्यामुळे आतून येणारी संगीतप्रेरणा मग व्यक्त कशी करायची म्हणून ते तोंडानेच ड्रम्सचे बीट बनवायचे. गाणं ऐकलं की त्यातील ड्रम बीट्स तोंडाद्वारे वाजवण्याचा जणू छंदच जडला. पुढे जाऊन कळालं की, त्याला ‘बीट बॉक्सिंग’ म्हणतात. तेव्हा मला एकच कळलं की, इन्स्ट्रुमेंट नाही म्हणून संगीत थांबत नसतं.’ आपल्या मुलाची आवड आणि कौशल्य पाहून मग वडिलांनी ड्रम घेऊन दिला. येथून मग खऱ्या अर्थाने त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. पुढे स्थानिक आॅर्केस्ट्रांमध्ये वादनही सुरू झालं. आणि मग त्याच्या संगीतकलेला कलाटणी देणारी गोष्ट घडली. तो सांगतो, ‘जगप्रसिद्ध पर्कशन आर्टिस्ट उस्ताद तौफिक कुरेशी आणि पं. पंकज शर्मा यांच्याकडे ड्रम शिकण्याची मला संधी मिळाली. तो माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. सहा वर्षे मी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं. या काळात दर आठवड्याला केवळ दोन तासांच्या क्लाससाठी औरंगाबाद-मुंबई अपडाऊन केलं. पण त्यांनीच मला ड्रमवादनातील बारकावे आणि खरा अर्थ शिकवला. गुरूंच्या सहवासाने मग राहुलची कला आणखी बहरली. ‘धूम २’, ‘एबीसीडी’, ‘बालगंधर्व’, ‘बाजीराव मस्तानी’ अशा चित्रपटांच्या पार्श्वसंगीतासाठी ड्रमवादन केलं. उस्ताद कुरेशींसोबत अनेक शो आणि विदेशात सादरीकरण करण्याचीसुद्धा संधी मिळाली. लाइव्ह संगीत वादनाकडे त्याचा कल आहे. खासकरून भारतीय संगीत परंपरेत ड्रमवादन हा त्याचा आवडीचा प्रकार. राहुल सांगतो, ‘कलाकार हा ग्रामीण किंवा शहरी नसतो. टॅलण्ट काही जागा किंवा ऐपत पाहत नसतं. फक्त त्या टॅलण्टला योग्य दिशा आणि संधी देण्याचं काम केलं गेलं पाहिजे. मग ते ड्रम असो किंवा आणखी इतर कला, आपल्यात त्या भिनू शकतात.
इंटरनॅशनल ड्रम मंथ काय आहे?
आपल्याकडे अनेक प्रकारचे दिवस असतात. फुलांपासून ते माणसांपर्यंत सर्वच ‘डे’ आपण साजरे करत असतो. पण नोव्हेंबर महिना हा ‘इंटरनॅशनल ड्रम मंथ’ असतो. ऐकायला थोडं आॅड वाटेल पण हा संपूर्ण महिना ड्रम या वाद्यासाठी समर्पित आहे.
अमेरिकेतील ‘पर्कशन मार्केटिंग काउंन्सिल’ (पीएमसी) या नॉन प्रॉफिट संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. ड्रम्स आणि पर्कशन वाद्यांचा प्रसार, प्रचार आणि त्याविषयी अभिरुची निर्माण करण्याच्या हेतूने ही संस्था संपूर्ण महिना विविध कार्यक्रम आयोजित करत असते. एवढेच नाही तर अमेरिकेत ते ड्रम शिकण्यास इच्छुकांना मोफत ड्रम स्टीक्स देतात.
१९९५ सालापासून ही संस्था प्रत्येक व्यक्तीला ड्रमिंगचा सकारात्मक अनुभव घेता यावा म्हणून काम करते. व्यक्तीचं लिंग, वय, सांगीतिक पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि भौगोलिक स्थिती काही असू देत, सर्वांनी या ऊर्जाशील वाद्याचा वादक आणि श्रोता म्हणून आनंद घेतला पाहिजे या हेतूने ते प्रेरित आहेत.
ड्रम आणि पर्कशन वाद्यांचे निर्माते, पुरवठादार, डीलर हे या संस्थेचे सदस्य आहेत. ड्रमिंगचे महत्त्व आणि फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. नवीन पिढीच्या वादकांना या वाद्याकडे आकर्षित करून ड्रमर्सचा विकास करण्यात येतो. तसंच ही वाद्यं सगळीकडे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी संघटित प्रयत्न करणं, संगीत क्षेत्रात ड्रम या वाद्यप्रकाराचा दबदबा निर्माण करणं आदि कामं ‘पीएमसी’ करते..
त्याचाच एक भाग म्हणून संस्थेतर्फे ‘इंटरनॅशनल ड्रम मंथ’, ‘वॅन्स वार्प्ड टूर’, ‘ड्रम्स अॅक्रॉस अमेरिका’, ‘रुट्स आॅफ रिदम’ आणि शाळेत जाऊन मुलांमध्ये गोडी निर्माण करण्यासाठी ‘पर्कशन इन द स्कूल्स’ अशा विविध अॅक्टिव्हिटीज्चं आयोजन केलं जातं.
‘रॉक ऑन’मुळे आली लाट!
२००८ साली आलेल्या ‘रॉक आॅन’ सिनेमानंतर आपल्याकडे विदेशी संगीताची आणि पर्यायाने ड्रम्सची लोकप्रियता तरुणांमध्ये खूप वाढली. अनेक तरुण याकडे आकर्षित झाले. तसं पाहिलं गेलं तर फार पूर्वीपासून भारतीय चित्रपटसंगीतामध्ये ड्रम्सचा वापर होत आलेला आहे. परंतु ‘रॉक आॅन’मुळे वेस्टर्न स्टाईल ड्रमिंग प्रसिद्धीस आलं. पाश्चिमात्य देशांतील ‘रॉक स्टार्स’ पाहून अनेक तरुण प्रभावित झाले. त्यांच्या म्युझिकपासून ते लाइफस्टाइलपर्यंत सगळ्याच गोष्टींची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. परंतु जे खरे ड्रमर्स आहेत ते सल्ला देतात की, नववादकांनी वेस्टर्न कलाकारांच्या हेअरस्टाइल व कपड्यांपेक्षा त्यांच्या संगीत स्टाइलकडे जर गांभीर्याने बघितलं तर नक्कीच सकारात्मक ड्रमिंग कल्चर विकसित होण्यास मदत होईल.
ड्रमर लूकची क्रेझ
ड्रम वाजवता येवो ना येवो, सध्या ड्रमर लूकची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे. ड्रमर लूक आणि चेहऱ्यावर खासअॅटिट्यूड ही एक नवीन फॅशनच म्हणा.. ड्रमर लूक म्हणजे काय तर स्पाईक्स किंवा लांब केस.. केसांची खास स्टायलिश रचना.. दाढी. काळाच टी शर्ट. त्यावर जॅकेट. मोठ्ठा जाडेजाड बेल्ट.. हे सारं म्हणजे हा ड्रमर लूक.. त्या लूकसाठी बॉडीशॉडी बनवणारेही हल्ली अनेकजण भेटतात..
(मयूर ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)