D.Y.O.T

By admin | Published: September 8, 2016 12:43 PM2016-09-08T12:43:51+5:302016-09-08T13:29:45+5:30

डू यूवर ओन थिंग. असं महानायक दादाजी अमिताभ बच्चन नातीच्या वयाच्या मुलींना सांगताहेत.

D.Y.O.T. | D.Y.O.T

D.Y.O.T

Next

 - चिन्मय लेले

 डू यूवर ओन थिंग.

असं महानायक 
दादाजी अमिताभ बच्चन 
नातीच्या वयाच्या मुलींना सांगताहेत.
तिकडे लाहोरला फ्लॅशबॅक करून 
मुली समाजाला ठणकावताहेत की,
तुम्ही कोण 
आम्हाला चार भिंतीत डांबणारे?
या दोन घटना नेमकं काय 
सांगतात?

४-५ दिवसांपूर्वी दोन घटना चांगल्याच चर्चेत होत्या.
हाडवैरी असलेल्या दोन देशातल्या.
पहिली घटना म्हणजे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातींना आणि पर्यायानं आजच्या घडीला भारतातल्या मुलींना उद्देशून लिहिलेलं पत्र. ‘लोग क्या कहेंगे’ याकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या मनासारखं जगण्याचा प्रयत्न करा. इतरांनी तुमच्यासाठी बांधलेल्या चौकटीत तुम्ही स्वत:ला बांधू नका. अशा आशयाचं हे पत्र.
ते व्हायरल झालं. सोशल मीडियात प्रचंड गाजलं. चर्चेत राहिलं. अनेकांनी त्यांच्यावर सूचक आरोपही केलेत की, येत्या सिनेमाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून हे पत्रंबित्रं लिहिणं. नातींना लिहायचं तर नेटसॅव्ही अमिताभ मेलही करू शकले असते. हातानं लिहिलेलं पत्र, ते लिहितानाचे फोटो, त्या पत्रांचे फोटो हे सगळं कशासाठी केलं? 
- अशी बरीच उलटसुलट चर्चाही झाली.
हे सारं सुरू असताना शेजारी पाकिस्तानात एका जाहिरातीनं चर्चेची लाट उसळली.
महिलांच्या कपड्यांच्या ब्रॅण्डची ती जाहिरात. त्या जाहिरातीत दाखवलं आहे, जुनं लाहोर. चिंचोळ्या गल्ल्या. रस्त्यावर थाटलेली कपड्यांची दुकानं. चहाच्या टपऱ्या. खरेदीदार, त्यातही विशेषकरून पुरुषांची गर्दी. आणि त्या गर्दीतल्या काही तरुण मुली. त्यांच्यावर खिळलेल्या नजरा, पासिंग कमेण्ट. पुरुषी नजरेतलं आपल्या इलाख्यात काय करताहेत या मुली असं कुतूहल मिश्रित वैतागलेपण. हे सारं होत असताना त्या मुली एकदम फ्लॅशमॉबच सुरू करतात. तुफान नाचतात. लोक गोळा होतात. गर्दी होते. हा डान्स काहीजण शूटही करतात. पण कुणी काही त्यांना बोलू शकत नाही. 
लाहोरच्या रस्त्यावर फ्लॅशमॉब, तोही मुलींचा. हे धाडसी कृत्य दाखवणं आणि बॅकगाउण्डला गाणं वाजणं की, गर्ल्स वूई फाइण्ड धीस मेथड!
हे सारं सध्या तिकडेही प्रचंड चर्चेत आहे. गाजतंय. टीका होतेय. सगळं सुरू झालंय का?
तर मुलींचं धाडस, मनासारखं जगणं आणि व्यवस्थेसह पुरुषी समाज मानसिकतेला चॅलेंज करणं हे भर रस्त्यात नाचण्याइतकं सुलभ आहे का, असा सवाल करत काहीजण म्हणताहेत की उलट अशा जाहिराती दाखवून तुम्ही पुरुषी मानसिकताना बळ देत खऱ्या स्त्रीवादी कल्पनांचाच बळी देतहात.
तर काहींचं म्हणणं की, जाहिरात म्हणूनसुद्धा लाहोरच्या रस्त्यावर मुलींचा फ्लॅशमॉब दाखवणं, तसा विचार सुचणं, ते शूट करणं आणि दाखवणं हे सारंच धाडसी आणि कल्पक आहे.
आणि मुख्य म्हणजे त्यातला संदेश महत्त्वाचा आहे.
‘डू यूवर ओन थिंग!’
***
या दोन्ही घटनांनी देशभरात म्हणजे खरं तर सोशल मीडियात जास्त चर्चा झाली.
मात्र दोन्ही घटनांचं सूत्र एकच होतं. ऊडळ म्हणजेच डू यूवर ओन थिंग किंवा डिझाईन यूवर ओन थिंग.
सध्या तरुण मुलांचा अ‍ॅटिट्यूड सांगणारी ही चर्चेतली फेज आहे.
त्यानुसारच ही नवी चर्चा म्हणतेय की, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा, तुमच्या मनासारखं जगा, जगाला घाबरून, भिवून राहू नका. तसं केलं तर तुम्ही जे निर्णय घ्याल त्याला तुम्हीच जबाबदार असाल, जग नाही!
समाजाच्या नियमांनुसार जगणं बंधनकारक असलेल्या दोन्ही देशातल्या स्त्रियांच्या चित्राविषयीच बोलणाऱ्या या दोन घटना म्हणूनच महत्त्वाच्या आहेत.
ज्या म्हणताहेत,
मनासारखं जगण्याची हिंमत ठेवा, त्याची किंमत चुकवावी लागली तरीही..!
हे सारं दोन्हीकडे पचणं, पटणं अवघड आहेच. तरीही निदान आता या गोष्टी उघड बोलल्या जाताहेत, त्यांची चर्चा आहे, हे सारंही नसे थोडके!!


अमिताभचं नातींना पत्र
प्रिय नव्या आणि आराध्या,
तुमच्या खांद्यावर वारसाहक्कानं आलेली मोठी जबाबदारी आहे. नंदा आणि बच्चन ही दोन नावं ही तुमची ओळख आहेत..
तरीही..
तुम्ही मुली आहात.. स्त्रिया आहात.
आणि तुम्ही मुलगी आहात म्हणून लोक तुमच्यावर तुमचे विचार थोपवतील, त्यांनी बनवलेल्या मर्यादांच्या चौकटी तुमच्याभोवती आखतील. असं वाग, तसेच कपडे घाला, अमक्या ठिकाणी जायचं नाही, तमक्याला भेटायचं नाही. हे सारं तुम्हालाही सांगितलंच जाईल!
मात्र लोकांच्या निर्णयाप्रमाणे स्वत:चं आयुष्य बेतू नका, त्या सावल्यांत जगू नका. स्वत:ची बुद्धी, स्वत:चं शहाणपण वापरूा निर्णय घ्या. तुमचे कपडे, तुमच्या स्कर्टची उंची यावरून तुमचं चारित्र्य ठरतं असं कुणी तुम्हाला सांगितलं तर ते खरं आहे असं समजून त्यावर विश्वास ठेवू नका. कुणाशी मैत्री करावी हे ठरवण्याचा अधिकार दुसऱ्याला देऊ नका, त्यांनी तसे फर्मान काढले तरी त्याला बळी पडू नका. लग्न करायचंच असेल तर ते तुम्हाला करावंसं वाटतं म्हणून करा, दुसरे म्हणतात म्हणून करू नका.
लोक बोलतीलच. बोलतातच. ते तुमच्याविषयी वाईट साईट बोलतील; पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचं ऐकलंच पाहिजे. ‘लोग क्या कहेंगे?’ 
या प्रश्नाची कधीही काळजी करू नका.
लोकांना तुमच्या वतीनं, तुमच्यासाठी निर्णय घेऊ देऊ नका..
हे अवघड आहे.. या जगात बाई म्हणून जगणंही अवघड आहे..
पण मला खात्री आहे की, तुमच्यासारख्या मुलीच उद्या हे जग बदलतील..
सोपं नसेलच, स्वत:साठीच्या मर्यादा ठरवणं, स्वत:साठी निर्णय घेणं, लोकांच्या निर्णयापलीकडे जाऊन स्वत:चा विचार करणं, पण तरीही ते करणं हे इतर महिलांसाठीही महत्त्वाचं ठरेल..
सगळ्याच मुलींसाठी महत्त्वाचं ठरेल!!
- अमिताभ बच्चन

Web Title: D.Y.O.T.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.