हॉटेलात खातो पण आपल्या अन्नसुरक्षेचं काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 07:10 AM2019-08-29T07:10:01+5:302019-08-29T07:15:03+5:30
तरुण मुलांचे अड्डे तर हमखास काही हॉटेल्सवर जमलेले दिसतात. कॉलेजात डबा नेणं हे तर अनेकांना भयंकर काहीतरी वाटतं. मात्र प्रश्न असा आहे की, हे बाहेरचं खाणं आणि त्यातही हॉटेल्समधली स्वयंपाकघरं, तिथली स्वच्छता याचा काही विचार केला जातो का?
- शिल्पा दातार-जोशी
प्रसंग 1
एका प्रगत देशात भारतीय कुटुंब गेलं होतं. तिथं एका खाद्यपदार्थाच्या दुकानात गेल्यावर त्या कुटुंबातल्या छोटय़ा मुलानं उत्सुकता म्हणून केकला हात लावून पाहिला. ते पाहिल्यावर दुकानातली कर्मचारी लगबगीनं आली आणि काहीही न बोलता तिनं तो हाताळलेला केक कचर्याच्या टोपलीत टाकून दिला.
का? नंतर येणार्या ग्राहकानं तो केक खरेदी करू नये म्हणून घेतलेली ती खबरदारी होती.
अनेक प्रगत देशांत खाद्यपदार्थ विक्रीच्या बाबतीत हे निकष पाळले जातात.
***
प्रसंग 2
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या चर्चेत असलेल्या बसमधून पुण्याहून नाशिकला येत होते. बरोबर छोटी मुलगी होती. साधारण संध्याकाळी साडेसातची वेळ असावी. चालकाने आडमार्गावरील उपाहारगृहात गाडी थांबवली. तेव्हा तेथील ताटल्या, पेले, इतर भांडय़ांवरून अक्षरशर् झुरळं फिरत होती. ते पाहून भूक लागल्यावरही न खाणं एवढंच हातात होतं.
***
प्रसंग अनेक र्
पुण्यातील एका नामांकित उपाहारगृहातील बिर्याणीत सापडलेली अळी, नाशिकमधील राजेशाही थाटाच्या जेवणात सापडलेले उंदराचे केस व तुकडे.. औरंगाबादमध्ये झोमॅटोवरून मागवलेल्या अन्नपदार्थात प्लॅस्टिक सापडल्यामुळे करण्यात आलेली तक्रार, नागपूरमध्ये एका प्रसिद्ध कंपनीच्या मिठाईत मेलेली पाल सापडल्यामुळे तयार पदार्थाबाबत निर्माण झालेला अविश्वास. या आणि अशा प्रकारच्या बातम्यांनी अलीकडील काळ गाजवलाच. या बातम्यांनी तरुणांना सोशल मीडियावर चघळायला विषयही दिला.
पण यानिमित्तानं एक महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला. तो म्हणजे गरज किंवा जिभेचे चोचले म्हणून बाहेरचं खाणं कितपत सुरक्षित आहे? अन्न व औषध सुरक्षा यंत्नणेच्या हाताबाहेर बाहेरचं खाणं हे प्रकरण गेलंय का? तसं असेल तर त्याची आपल्याला काय किंमत मोजावी लागेल?
ग्राहक त्यातही तरुण मुलं-मुली भरपूर पैसे खर्च करून चांगल्या उपाहारगृहात जातात. इटिंग आउट हा अनेकांच्या जगण्याचा भाग आहे. तरुण मुलांचे अड्डे तर हमखास काही हॉटेल्सवर जमलेले दिसतात. कॉलेजात डबा नेणं हे तर अनेकांना भयंकर काहीतरी वाटतं. मात्र प्रश्न असा आहे की, हे बाहेरचं खाणं आणि त्यातही हॉटेल्समधली स्वयंपाकघरं, तिथली स्वच्छता याचा काही विचार केला जातो का?
बाह्य रूपात कितीही स्वच्छ, अद्ययावत, आकर्षक उपाहारगृह असलं तरी त्याच्या भटारखान्यात त्याला डोकवावसं वाटत नाही. कदाचित अनेकांना आतील दृश्य पाहिल्यावर अन्नावरची वासना उडेल किंवा आनंदात विरजण पडेल असंही वाटत असावं. ताटात वाढण्यासाठी येणारे पदार्थ सुसज्ज असा कर्मचारीवर्ग आदबीनं घेऊन येत असतो. अशावेळी पदार्थाचा रंग-रूप, वास आणि उपाहारगृहातील वातावरण आपल्याला मूळ पदार्थाच्या पोषणमूल्याला, स्वच्छता आणि ताजेपणाला आव्हान देऊ देत नाही. पण, तसं होत असेल तर?
हे झालं मोठय़ा प्रसिद्ध उपाहारगृहांमधलं चित्न, पण ज्यांना इथलं अन्न परवडत नाही, ते रस्त्यावरच्या गाडय़ांवरचं खाणं खातात.
तिथल्या अन्नसुरक्षेचं काय?
वडापाव, भेळ, पाणीपुरी, पावभाजीसारखे तत्सम पदार्थ जिथं विकले जातात ते गाडेही कितपत स्वच्छ आणि सुरक्षित खाणं भुकेल्या किंवा जिभेचे चोचले पुरवायला येणार्या ग्राहकांना देतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अस्वच्छ हातांपासून ताटल्या, पाणी पिण्याचे पेले इथर्पयतच्या स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. कधी आदल्या दिवशीची भाजी वापरून केलेले वडे असोत वा बुरशी आलेला पाव असो, असं अन्न खाल्ल्यानं त्नास होण्याची शक्यता जास्त असते. रस्त्यावर मिळणारं बहुतांश खाणं असं असेल तर खाणार्याच्या पोटात नक्की काय जाईल? त्याला फक्त पोट भरल्यासारखं वाटेल, आणि मिळाला तर एखादा आजारच मिळेल. पोटदुखीपासून फूड पॉयझनिंगर्पयतचे आजार यामुळे होऊ शकतात.
जगभरात निकृष्ट अन्नसेवनामुळे होणार्या गंभीर आजारांसाठी नायजेरिया, पाकिस्तान, इथिओपिया या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे, असं इंटरनॅशनल लिव्हस्टॉक रिसर्च इन्स्टिटय़ूटनं नमूद केलं आहे. त्यात असंही म्हटलंय की विकसनशील देशांतील अधिकतर अन्न हे अनौपचारिक ठिकाणी किंवा पारंपरिक पद्धतीनं शिजवलेलं असतं. त्यामध्ये देखरेख किंवा नियमनाचा अभाव आढळतो. परवडणारं अन्न सर्वसामान्यांना देताना स्वच्छता व ताजेपणापेक्षा पोट भरण्याकडे जास्त कल असतो. पण त्यातूनच फूड पॉयझनिंगमुळे होणार्या डायरिया, ताप, उलटय़ा यांसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.
थायलंडमधील एका नियतकालिकेनं केलेल्या सर्वेक्षणातून दिलेल्या 7 ऑगस्ट 2019 च्या बातमीत असं सिद्ध झालं की जगभरात एचआयव्ही-एड्स, मलेरियाहून अधिक मृत्यू हे असुरक्षित अन्न-पाण्यामुळे होतात. वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार दरवर्षी भारताला दूषित अन्न-पाण्यामुळे होणार्या आजारांवर 15 अब्ज डॉलर्स इतका खर्च करावा लागतो. भारताबरोबरच चीन या आशियाई देशातील अर्थव्यवस्थेवर तिथल्या दूषित अन्न-पाण्यामुळे होणार्या आजारांमुळे 49 टक्क्यांनी ताण पडतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेल्या फूड सेफ्टी कॉन्फरन्समध्ये जाहीर करण्यात आलं. पण भारतात अन्न व औषधी संरक्षण मंत्नालयाकडून स्वच्छता, ताजेपणा व र्निजतुकीकरणाचे निकष इतक्या काटेकोरपणे पाळले जातात का, हा लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे.
पदार्थाचे ताजेपणाचे काही निकष असतात. उदाहरणार्थ, अनेक वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात की, ताजं अन्न खावं, खूप काळ चिरून ठेवलेला कांदा आहारात घेणं विषासमान असतं वगैरे. पण अनेक गाडय़ांवर कदाचित मोठय़ा उपाहारगृहांमध्येही कांदा दिवसभर चिरून ठेवलेला आढळतो. गुटखा, तंबाखू खाऊन, सिगारेट ओढून त्याच हाताने पुरीत पाणी भरून ती खायला देणं असो, अस्वच्छ ठिकाणी व घाणेरडय़ा फडक्याला हात लावून तोच हात खाद्यपदार्थाना लावणं, सतत थुंकणं, नाक शिंकरणं वा शौचालयात जाऊन आल्यावरही हात पुरेसे स्वच्छ न करता त्याच हातांनी खवय्यांना फास्ट फूड खायला देणं असो.. याबाबत भारतीय ग्राहक आवाज उठवत नाहीत, असंच चित्न दिसतं. यामागे उदासीनता हे कारण असेल वा अन्य कारण; पण आवाज उठवणारे कमीच. पण, असे पदार्थ खाल्ल्यामुळे फूड बर्न आजार होऊ शकतात.
देशात आज लाखो लोक या व्यवसायात आहेत, लाखो लोक त्यांचे ग्राहक आहेत; पण एखादीच केस समोर येते, असं का? कारण कुठं तक्र ार करायची ते माहीत नाही, तक्र ार केल्यावर न्याय मिळेल याची शाश्वती नाही, त्याबाबत तांत्रिक मदतीचा अभाव, स्थानिक व सरकारी पातळीवर जागरूकतेचा अभाव, प्रकरण न्यायालयात गेलं तर तेवढा वेळ आणि पैसा असेलच असं नाही, फूड अॅण्ड सिक्युरिटीच्या कायद्याबाबत अज्ञान, सरकारी पातळीवर उदासीनता ही कारणं असावीत.
याबाबत एफएसएसएआयचे सीईओ पवन अग्रवाल यांच्याशी संपर्क केला असता ते सांगतात,
‘उपाहारगृह सुरू करणार्यांसाठी फूड सेफ्टी व हायजिन याबाबत मोठय़ा प्रमाणावर कार्यशाळा घेण्याची गरज आहे. पण हे फक्त चर्चेत असून चालणार नाही, तर त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. अन्न व ग्राहक संरक्षण अधिकार्यांकडून तडजोड न करता अशा उपाहारगृहांची तपासणी होऊन गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. कारण अस्वच्छ, जंतुसंसर्ग होऊ शकणार्या अन्नाद्वारे ते खवय्यांच्या जिवाशीच खेळत असतात. पोट दुखण्यापासून आतडय़ाच्या आजारांर्पयत गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यासाठी सरकारी पातळीवरील जागरूकतेबरोबरच ग्राहकांच्या निर्भीडतेचीही गरज आहे. ’
( शिल्पा मुक्त पत्रकार आहे.)