इट प्रे अ‍ॅण्ड लव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:22 AM2018-05-31T10:22:38+5:302018-05-31T10:22:38+5:30

एक असं जग जे आपल्याला सोबत करतं, प्रश्नं विचारतं आणि भानावरही आणतं..

eat pray & love | इट प्रे अ‍ॅण्ड लव्ह

इट प्रे अ‍ॅण्ड लव्ह

googlenewsNext

अमेरिकन लेखिका एलिझाबेथ गिलबर्ट हिचं हे पहिलं पुस्तक नाही. ती तिच्या लेखणीतून वाचकांना खिळवत आलेली आहे. पण इट प्रे अ‍ॅण्ड लव्ह हे पुस्तक तसं खास आहे. कारण ते तिच्या स्वत:च्या आयुष्यावर आधारित आहे असं ती म्हणते.

३२ वर्षांच्या एलिझाबेथचा घटस्फोट झाला तेव्हा ‘माझ्या आयुष्यातलं सारं काही संपलं’ अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. खरंतर अनेक वर्षे तिचे आणि तिच्या नवऱ्याचे वाद होत असत. पण कसं असतं ना, की काही काळ गेला की आपल्याला आपल्या आसपासच्या माणसांची सवय होऊन जाते. ती माणसं नसली की आपल्याला हरवल्यासारखं वाटतं. एलिझाबेथबद्दल नेमकं तेच झालं.
या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी एलिझाबेथने बाहेर पडायचं ठरवलं. आणि या हरवलेल्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी, स्वत:ला शोधण्यासाठी ती प्रवासाला निघाली. एलिझाबेथ ही लेखिकेपेक्षा खरंतर पत्रकारच होती. तिचं सुरुवातीचं पॅशन म्हणजे ट्रॅव्हल रायटिंग पण संसाराच्या गराड्यात ती हे सगळं विसरूनच गेली होती. या प्रवासामधून तिनं तिचं आयुष्य पुन्हा सुरू करायचं असं ठरवलं. या तिच्या वर्षभराच्या प्रवासामध्ये ती तीन देश फिरली- इटली, भारत आणि इंडोनेशिया. प्रत्येक ठिकाणी तिला नवी माणसं भेटली. नव्या अनुभवांमधून ती समृद्ध झाली. आणि तिला जगण्यातला सूर पुन्हा गवसला, अशी ही गोष्ट आहे.
तिच्या या पुस्तकामधून आपण एक ट्रॅव्हलॉग म्हणजे भ्रमणकथा वाचतो आहोत असं वाटतंच नाही. आपण एलिझाबेथशी मैत्री करायला लागतो. अनेक वेळा तिच्यामध्ये स्वत:लाही शोधायला लागतो. एखाद्या मैत्रिणीबरोबरच्या सहज संवादासारखं तिचं लिखाण आहे.
या पुस्तकावर आधारित याच नावाची फिल्मही आली आहे. ज्युलिया रॉबर्ट्सने एलिझाबेथचं काम केलं आहे. कमाल फिल्म आहे ती. हे पुस्तक, मूळ इंग्रजीमधलं नक्की वाचा. या पुस्तकाचा मराठी अनुभवादही उपलब्ध आहे.
eat pray & love असा सर्च मारला तर या सिनेमाचे ट्रेलरही पाहता येतील.

- प्रज्ञा शिदोरे pradnya.shidore@gmail.com

 

Web Title: eat pray & love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.