JUNK खाताय? डोळे जातील, कान बधीर होतील, सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 07:45 AM2019-09-12T07:45:00+5:302019-09-12T07:45:07+5:30
सतत जंक फूड खाऊन खाऊन डोळे जाऊ शकतात, कान बधिर होतात, कुपोषणाचा फटका बसतो. तरी जंक खायचंच आहे?
इंग्लंडमधली एक अलीकडची घटना.
एका सतरा वर्षाच्या मुलाची दृष्टी अधू झाली आणि श्रवणशक्तीवरही परिणाम झाला. कारण असं की गेले साधारण दशकभराचा काळ तो सलग फक्त जंक फूडच खात होता.
जेवण म्हणून दहा वर्षे फक्त जंक फूड?
तेही फक्त वेफर्स, व्हाइट ब्रेड, प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थ.
त्याचं कारण तो असं सांगतो की, त्याला एक वेगळ्याच प्रकारची डिसऑर्डर आहे. ज्याला इटिंग डिसऑर्डर म्हणतात. त्याचं नाव अव्हॉइडण्ट रिस्ट्रीक्टिव्ह फूड इनटेक डिसऑर्डर. त्याचा अर्थ असा की तो प्राथमिक शाळेत होता तेव्हापासून त्याला फळं आणि भाज्या खाण्यानं त्रास व्हायचा. त्यामुळे त्यानं ते खाणंच बंद केलं.
परिणाम असा झाला की, पोषण आहारच घेत नसल्यानं आणि निकृष्ट दर्जाचं अन्न सतत सेवन करत राहिल्यानं त्याच्या शरीरात विविध व्हिटॅमिनच्या कमतरता निर्माण झाल्या. त्यामुळे त्याचं पुरेसं पोषण तर झालं नाहीच, पण कुपोषण झालं. जे आजार कुपोषित मुलांमध्ये दिसतात तेच आजार त्याला झाले, त्यानं त्याच्या मेंदूकडे जाणार्या नसांवर परिणाम झाला. विकसित देशात कुपोषण ही समस्याच नाही, मात्र त्यापद्धतीचा आजार मात्र या तरुण मुलाला झाला आणि त्यानं त्याच्या डोळ्यांच्या नस दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्याची दृष्टी अधू झाली.
आता वेळीच उपचार केले नाही तर तो कायमचा अंध होण्याची शक्यता आहे.
या मुलाची ही केस अलीकडेच अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसीन या अहवालात प्रसिद्ध झाली आहे. डॉ. डेनीझ अटन यांनी ही केस मांडली. आणि जंक फूडच्या सतत सेवनाचे परिणाम, त्यातून होणारे आजार ही समस्या पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे मांडली. सतत जंक फूड खाल्ल्यानं डोळ्यांवर परिणाम होतो याची जाण अजूनही डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांना नाही, तर लोकांना असण्याचं काही कारण नाही असं ते मांडतात.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, या केसमध्ये अतिच जंक फूड खाणं होतं, मात्र वेळीच निदान झालं नसतं तर या मुलाला दृष्टी कायमची गमवावी लागली असती. अ-पोषण आणि कुपोषण आणि डोळ्यांवर त्यांचा होणारा परिणाम याचं अत्यंत जवळचा संबंध आहे. मेंदू-डोळ्यांचे डॉक्टर याची मांडणी सतत करत आहेत. मात्र अजूनही जंक फूड खाणं, कुपोषण आणि दृष्टिदोष यांचा एकत्र विचार केला जात नाही.’
या केसच्या निमित्तानं सध्या तरुण मुलं घेत असलेला आहार, त्यांचं कुपोषण, जंक फूड खाण्याचं प्रमाण, आहारातील अनियमितता हे सारे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
आणि आपण गांभीर्यानं आपल्या आहाराचा विचार केला नाही तर आपलं शरीर त्याच्या क्षमता गमावून बसेल.
आणि ते आपल्याला परवडणारं आहे का?