इराणच्या रस्त्यावरचा ‘तरुण’ भडका नेमकं काय साधणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:40 PM2019-11-28T12:40:11+5:302019-11-28T12:41:13+5:30
इराणच्या रस्त्यावर हिंसक उद्रेक आहे, पेट्रोलच्या किमती भडकल्या म्हणून लोकही भडकले आहेत आणि एक राष्ट्र अस्वस्थतेच्या उंबर्यावर धगधगतं आहे.
कलीम अजीम
इराण हा जगातील सर्वात मोठा पेट्रोल उत्पादक देश मानला जातो. अन्य देशांच्या तुलनेत इथे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं; पण आज हाच देश पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे त्नस्त झाला आहे. परिणामी स्थानिक जनतेने सरकारविरोधात बंडाचं हत्यार उपसलंय. इराणमध्ये पेट्रोलच्या दुप्पट झालेल्या किमतीमुळे जनक्षोभ उसळला असून, सरकारविरोधात अनेक लोकं रस्त्यावर उतरली आहेत.
इराणच्या सुमारे 100 शहरांत सरकारविरोधात जनआंदोलने उभी झाली आहेत. शासनाने आंदोलकांना दंगलखोर आणि देशद्रोही घोषित करत, त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्यावर गोळीबारदेखील केला आहे. सरकारविरोधक व पोलीस यांच्यामधील चकमकीत आणि हिंसक प्रदर्शनात शेकडो लोकं मारली गेली आहेत. एमनेस्टी इंटरनॅशनलच्या मते या विरोध प्रदर्शनात तब्बल 106 लोकांना जीव गमवावा लागला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मते हा आकडा वाढू शकतो. अर्थात इराणने मात्न हा दावा फेटाळून लावला आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी म्हणजे शुक्र वारी, 15 नोव्हेंबरला या वादाची ठिणगी पडली. इराण सरकारने पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या. पेट्रोलवरची सबसिडी इराणी सरकारने पूर्णपणे बंद केली आहे. शिवाय पेट्रोलच्या अतिरिक्त वापरावर र्निबध घातले. पेट्रोलची वितरणव्यवस्था रेशनिंगद्वारे सुरू केली. वाढलेल्या किमतीतून जो अतिरिक्त पैसा शासनाकडे येईल त्यातून गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचं सरकारचं धोरण आहे.
सध्या इराणमध्ये पेट्रोलची किंमत 1500 रियाल म्हणजे भारतीय 32 रुपये आहे. महिनाभरापूर्वी ही किंमत 21 रु पये प्रतिलिटर होती. नव्या नियमांमुळे आता नागरिकांना महिन्याला केवळ 60 लिटर पेट्रोल खरेदी करता येणार आहे. यापेक्षा जास्त हवं असेल तर त्यासाठी लिटरला दुप्पट रक्कम म्हणजे 30 हजार रियाल अर्थात 64 रु पये द्यावे लागतील.
या निर्णयाच्या विरोधात लोकांनी नाराजी दर्शवली. इराणी लोकांनी सरकारविरोधी निदर्शने सुरू केली. हळूहळू करत हा विरोधी सूर अन्य देशांत पोहोचला आणि एकच भडका उडाला. सोशल मीडियातून या ठिणगीला हवा मिळत गेली व विद्रोही आंदोलनाला
सुरुवात झाली. बघता-बघता हजारो तरुण चौकाचौकांत येऊन जमा झाले. वाहने एकाएकी थांबली. अचानक झालेल्या या कृतीमुळे सगळीकडे ट्रॅफिक जॅम झाले.
दुसर्या दिवशी म्हणजे शनिवारी आंदोलन अन्य शहरांत पसरले. आंदोलनाची दाहकता ओळखून सरकारने इंटरनेट बंद केलं. देशभरात इंटरनेट शटडाउन केलं गेलं. यासंदर्भात इंटरनेटवर नजर ठेवणार्या ‘नेटब्लॉक’ या संस्थेने एक निवदेन जारी करत सांगितले की हळूहळू अन्य शहरांतील नेटवर्कमध्ये कपात केली जात आहे. शेवटची माहिती हाती आली त्यावेळी इराणमध्ये इंटरनेट बंद होऊन 5 दिवस उलटले होते. इंटरनेट बंद केल्याने सरकारविरोधातला उद्रेक आणखीनच वाढला.
इराणी लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तोडण्यात आलेला आहे. त्यांना सोशल मीडिया हाताळण्यास बंदी करण्यात आली आहे. इंटरनेट बंद केल्याने त्याचा मोठा फटका अन्य उद्योगांवर पडला आहे. मुद्रित प्रसारमाध्यमांच्या निवडक आवृत्त्या निघत आहेत. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठय़ा शटडाउनला सामोरे जातोय.
लोकांची नाराजी इतकी वाढली की, त्यांनी हातात शस्त्नं घेतली. जाळपोळ व नासधूस सुरू केली. हजारो आंदोलकांनी रस्त्यावर येऊन सरकारी बँका, खासगी दुकाने, पेट्रोलपंप्स आणि शासकीय कार्यालयांना आग लावली.
राष्ट्रपती हसन रुहानी यांनी
प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ‘लोकांना विरोध, निदर्शने करण्याचा अधिकार आहे; परंतु दंगली आणि निदर्शनात फरक असतो. आम्ही समाजात असुरक्षा माजविण्याला परवानगी देऊ शकत नाही.’
गेल्या वर्षी मे महिन्यापासून अमेरिकेने इराणवर अनेक आर्थिक र्निबध लादली आहेत. परिणामी देशातील अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. अनेक मूलभूत वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. र्निबधामुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. आयात बंद झाल्याने देशात गरजेच्या वस्तू बाजारातून हळूहळू गायब होत आहेत. परिणामी मूलभूत वस्तूंसाठी जनतेला दुप्पट-तिप्पट किंमत मोजावी लागत आहे.
इराण पुन्हा धगधगतं आहे आणि तरुणांसह सामान्य जनता रस्त्यावर उतरली आहे.