..अजूनही शिकतोय!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:53 AM2018-04-05T07:53:06+5:302018-04-05T07:53:06+5:30
शिक्षणानं नवीन जग दाखवलं, संधी दिल्या, प्रवास सुरुच ठेवला..
मी बीड जिल्ह्यातील बनसारोळा या गावचा. ग्रामदैवत बनेश्वराच्या आशीर्वादाने गावामध्ये चांगल्यापैकी सुखसमृद्धी आहे. गावात नामांकित शाळा व महाविद्यालय आहे. मात्र माझा प्रवास खूप वळणा- वळणाचाच आहे.
सध्या मी अष्टविनायक महाविद्यालय, मुरूड. ता. जि. लातूर येथे प्राचार्यपदावर कार्यरत आहे; परंतु ईथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नाही. माझं प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर महाराष्ट्र विद्यालयातून दहावी पास झालो. अकरावीला अंबाजोगाई येथे अॅडमिशन घेतले. सोळाव्या वर्षी पहिल्यांदा गाव सोडलं. मी व माझे मित्र भाड्यानं एक खोली घेऊन राहायचो. प्रतिमहिना १५० रुपये भाडं होतं. तीनशे रुपये मेसचे. बारावी झालो.
गावात नुकत्याच सुरू झालेल्या जनविकास महाविद्यालयात बी.ए. साठी प्रवेश घेतला. चांगल्या प्रकारे कॉलेज करून पास झालो. जिवाभावाचे मित्र सोबत होतेच. याच काळात (२००१-०२) लोकमतचा मैत्र हातात पडला (आताचा आॅक्सिजन). जीवन जगण्याचा एक नवा आयाम मिळाला. जगात काय घडतंय, आपण कुठे आहोत, आपल्याला काय करता येईल, अशा प्रकारच्या डोक्याचा किस पाडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोडण्यास त्यावेळच्या शुक्रवारच्या ‘मैत्र’ची मला अनमोल अशी मदत मिळाली.
बी.ए. झाल्यानंतर पुढे वैद्यनाथ महाविद्यालय, परळी येथे लोकप्रशासन विषयात एम.ए. केलं. कृष्णाई अध्यापक महाविद्यालय, मुरूड, ता. जि. लातूर इथं बी.एड. केलं.
लगेच अंबाजोगाईमध्ये संगणकशास्त्र महाविद्यालयात क्लार्क म्हणून रूजू झालो. ही माझ्या जीवनातली पहिली नोकरी. याच काळात मी इंग्रजीतही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पुढे २०११ साली ज्या महाविद्यालयात मी बी.ए. केलं तिथंच प्राध्यापकपदी रूजू झालो. तीन वर्षे या ठिकाणी अध्यापन केल्यानंतर २०१४ मध्ये मुरूडच्या महाविद्यालयात प्राचार्यपदी रूजू झालो ते आजतागायत.
दररोज बनसारोळा ते मुरूड अप-डाउन. हा तीन जिल्ह्यांचा प्रवास आहे. अजून हा प्रवास कुठे घेऊन जाणार हे माहीत नाही; पण या प्रवासानं हिंमत शिकवली आणि सतत शिकत राहण्याची प्रेरणा दिली हे नक्की.
- चंद्रकांत उमाकांत गोरे
ता. केज, जि. बीड.