एक करंजी-एक लाडू म्हणत टेम्पो भरभरून पाडय़ांवर जाताय? -जरा थांबा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 04:50 PM2018-11-01T16:50:43+5:302018-11-01T16:51:29+5:30
शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या, पण फराळवाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका. आनंद शेअर करायला या. -जमेल?
मिलिंद थत्ते
दिवाळी हा आपला सर्वाचा सण.
प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी. कुठे गूळ घालून गोड करायची रीत, तर कुठे साखर. कुठे ओलं खोबरं, तर कुठे सुकं खोबरं. कुठे तूप तर कुठे तेल. दिवाळी साजरी करताना काकडीच्या रसात तांदळाचे पीठ भिजवून केलेली पानात वाफवलेली गोड सावळी भाकरी, घुगर्या आणि अर्थातच घरातल्या गावठी कोंबडय़ाची भाजी असा मस्त बेत आमच्या जव्हार-मोखाडय़ाच्या पाडोपाडी असतो. याचवेळी कांदफळे आणि चवळीची भेट घरोघरी लोक देतात. सावळी भाकरी आणि भाजीची ताटेही एकमेकांच्या घरोघरी जातात.
दिवाळीआधी घरातला पुरुष बाहेरगावी कामाला गेला असेल तर परत आलेला असतो. त्याने आणलेल्या पैशांतून नवीन कपडय़ांची खरेदीही झालेली असते. शाळांना सुटी असल्यामुळे बाहेरगावी शाळेत गेलेली मुले-मुलीही परत आलेली असतात. गाव कसं भरलेलं असतं, आनंदाचं वातावरण असतं. काही ठिकाणी शेणाचा गोळा कुडावर थापून त्यावर झेंडूच्या फुलांनी शाकारलेले असते.
अशी आमची पाडय़ावरची दिवाळी होत असतानाच एखादा टेम्पो येतो..
त्यातून आलेल्या लोकांनी लाडू-करंजी-चिवडा आणि काही काही वस्तू आणलेल्या असतात. आमच्या काही गावांना तर याची सवयच झाली आहे. असा टेम्पो दिसला की छोटी पोरं धावतात, गर्दी करून टेम्पोवाले जे काही देतील ते घेतात. त्यातले काही पदार्थ आम्हाला सवयीचे नसतात, आवडीचे नसतात, मग ते फेकून द्यायचे आणि आवडलेले खायचे.
पुढचा टेम्पो किंवा कार आली की त्यात काय आहे हे बघून ठरवायचे, जायचे की नाही! काही कारवाले तर भराभर पाकिटं वाटतात, पोरांना तसंच उभं करून फोटो काढतात, आपला बॅनर लावतात, स्वतर्च कॅमेर्याकडे बघून हसतात. सगळी मजाच वाटते आम्हाला..
आम्ही दिवाळी कशी करतो हे बघायलाही या पाहुण्यांना उसंत नसते. आमची दारं उघडी असतात, आल्या पाहुण्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आम्ही शेतकरी असल्यामुळे जेवण मोजून वाढत नाही, जो पाहुणा येईल त्याला पोटभर जेऊ घालतो. आम्हाला जे छान वाटतं, खायला आवडतं, ते आमच्या दिवाळीत असतंच.
एखादं पाहुणा सवडीनं आला तर आम्ही आमच्या मेजवानीत त्याचंही ताट वाढू की!
पण हे फराळवाटे पाहुणे भलतेच घाईत असतात. त्यात त्यांना असं वाटतं की आमच्याकडे त्यांच्या आवडीचे लाडू-करंजी वगैरे नाही म्हणजे जशी काही आम्ही दिवाळीच करत नाही.
खरं तर हे पाहुणे चांगल्या मनाने येत असतील, तर त्यांनी थोडा संथ श्वास घ्यावा. आमच्याकडची शुद्ध हवा भरून घ्यावी. आमच्या घरात मांडी घालून घटकाभर बसावं. आमची कांदफळं, दिवाळीतले इतर पदार्थ चाखावेत. आम्हीही त्यांच्याकडचे चाखू.
सारे भारतीय माझे बांधव आहेत, हीच तर आपली सर्वाची प्रतिज्ञा आहे.
मग दिवाळीसारख्या सणात भावाभावांनी एकत्र येणं, एकत्र जेवणं, एकमेकांचे आनंद अनुभवणं- यासारखी दुसरी छान गोष्ट काय असू शकते?
शहरातल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आमची हीच विनंती आहे. पाडय़ावर दिवाळीत जरूर या; पण वाटपखोर म्हणून येऊ नका. आम्हाला बिचारे समजून येऊ नका. दानाचे पुण्य कमवायला येऊ नका.
आनंद शेअर करायला या.
तरुण असाल तर आमच्याबरोबर खेळायला या.
छोटे असाल तर आमच्याबरोबर जंगल फिरायला या.
कुणाकडे पाहुणे जाताना आपण खाऊ नेतोच की, तसाच थोडा फराळ घेऊनही या. (डबाभर, टेम्पोभर नाही). आणि फराळापेक्षा माणसांनी एकमेकांच्या जवळ येणं मोलाचं हे विसरू नका.
- एक पाडय़ावरचा रहिवासी