मोलदोव्हाचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 07:57 AM2020-12-10T07:57:39+5:302020-12-10T08:00:17+5:30
मोलदोव्हा नावाचा चिमुकला देश, तिथलं तारुण्य सध्या लोकशाहीसाठी लढत आहे.
-कलीम अजीम
मोलदोव्हा. या नावाचा एक देश आहे. जेमतेम पावणेतीन कोटी लोकसंख्या आणि ३३ हजार स्क्वेअर किलोमीटर भूगोल असलेला हा छोटासा देश. युरोपियन युनियनमधला सर्वात गरीब देश म्हणून त्याची ओळख आहे. हा देश सध्या राजकीय संकटातून जात आहे. हुकूमशाही प्रवृत्तीचा विरोध करत तिथलं तारुण्य सध्या आंदोलन करतं आहे. रविवारी तब्बल २०,००० जणांनी संसद परिसरात निदर्शनं करत अध्यक्षांनी खुर्ची सोडण्याची मागणी केली.
गेले दोन आठवडे मोलदोव्हामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. पराभवानंतरही विद्यमान अध्यक्ष इगोर डोडॉन खुर्ची सोडत नाहीत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. विरोधी पक्षातील नेत्या माईया सांडू यांना तब्बल ५८ टक्के मते पडली, तर सत्ताधारी इगोर यांना केवळ ४२ टक्के मते मिळाली. नव्या संसदेचं गठण २४ डिसेंबरला होणार आहे. मात्र, अध्यक्ष इगोर डोडॉन यांना मात्र हा पराभव मान्य होत नाहीये.
मावळत्या अध्यक्षांनी नव्या अध्यक्षासाठी खुर्ची रिकामी करावी व विधिमंडळाची सूत्रे त्यांच्याकडे द्यावीत, अशी मागणी करत रविवारी राजधानी चिसिनौमध्ये ठिकठिकाणी निदर्शने झाली. विजयी उमेदवार माईया सांडू यांनी या रॅलींना उद्देशून भाषण केलं. ४८ वर्षीय माईया सांडू एक बँकर महिला आहेत. वर्ल्ड बँकेत त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहिलं आहे. यापूर्वी पार्टी ऑफ ॲक्शन अँड सॉलिडेटरी अर्थात ‘पीएस’ पक्षाच्या वतीने पंतप्रधान व शिक्षणमंत्री म्हणून सरकारमध्ये काम केलं आहे. अल्पमतामुळे २०१९ला त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची सोडावी लागली होती. आता त्या पुन्हा निवडून आल्या आहेत.
युरोपियन युनियन समर्थक असलेल्या माईया तरुणांमध्ये त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत. आणि तिथं तरुण मुलांचे दोन प्रश्न गंभीर आहेत. एकतर उत्तम शिक्षण नाही. दुसरं म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण मोठं.
पूर्वी मोलदोव्हा हा देश सोविएत रशियाचा भाग होता. १९९१मध्ये सोविएतचे विघटन होऊन मोलदोव्हा स्वतंत्र देश म्हणून जन्मास आला. आज हा देश युरोपियन युनियनचा भाग आहे. इथे शेती अर्थव्यवस्थेचं प्रमुख साधन आहे. आजही मोलदोव्हावर रशियाचा प्रभाव आहे. शेजारी क्रिमिलिया व युक्रेनवर पुन्हा रशियाने ताबा मिळवला आहे. मोलदोव्हीयन जनतेला भीती आहे की, आपला देश पुन्हा रशिया गिळंकृत करेल. मतदानातून मोलदोव्हीयनांनी इगोरविरोधात कौल दिला. देश रशियाला जोडणारे इगोर जनतेला नको आहेत.
विरोधी पक्षाचा आरोप आहे की, रशियाच्या हस्तक्षेपामुळे मोलदोव्हामध्ये राजकीय परिस्थिती चिघळली आहे. विशेष म्हणजे बेलारुसमध्येही गेल्या तीन महिन्यांपासून पराभूत अध्यक्षाविरोधात आंदोलने सुरू आहेत. तिथले अध्यक्ष एलेक्झांडर लुकाशेंको रशिया समर्थक असून, त्यांना पुतीन यांचे पाठबळ लाभले आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही देशात महिलांनीच हुकूमशाह शासक आणि रशियाला जेरीस आणले आहे. दोन्ही देशातील जनता विशेषत: तरुण हुकूमशाही शासकांना आव्हान देत त्यांच्याविरोधात एकवटली आहे.
( कलीम मुक्त पत्रकार आहे)
kalimazim2@gmail.com