एंगेजिंग, इंटरॅक्टिव्ह, एक्सायटिंग
By admin | Published: January 4, 2017 03:46 PM2017-01-04T15:46:48+5:302017-01-04T16:21:56+5:30
मुलामुलींच्या सिक्रेट जगात, स्वेच्छा,सक्ती आणि एक्साईटमेण्ट! वयात येणाऱ्या मुलांच्या जगाशी ‘आतून’ जोडले गेलेले समुपदेशक काय पाहतात हल्ली?
- डॉ. दीपक शर्मा
मुलांच्या हाती मोबाइल आहे हा प्रश्न नाहीये.. प्रश्न आहे, त्यांच्या हाती दुसरे पर्याय उपलब्ध नाहीत, हा! इझी अॅक्सेस कुणाला नको असतो? पण मुलांच्या संदर्भात ‘एंगेजिंग’ अर्थात गुंतवून ठेवू शकेल अशी एखादी गोष्ट फार महत्त्वाची असते. एंगेजिंग, इंटरॅक्टिव्ह आणि एक्सायटिंग असं काहीतरी आयुष्यात घडावं असं हे वय असतं.त्यात हातात मोबाइल येतो. त्यावर गाणी ऐकता येतात, सिनेमे पाहता येतात, चॅटिंग करता येतं, माहिती वाचता येते, पोर्न पाहता येतात, आपले फोटो टाकून चारचौघात घरबसल्या मिरवता येतं.
हे सारं ज्या एका गोष्टीनं होतं ती मुलं का सोडतील? आणि प्रश्न इथं खरा निर्माण होतो..
मुलांशी आईबाबा बोलतात ते चौकशा आणि सल्ले या दोनच रूपात. पूर्वी मुलांना धाक तरी होता आईबाबांचा. आता त्यांना वाटतं की, आईबाबाच हे सारं करतात तर ते आपल्याला का रोखतील?
जे पालक मुलानं पाठवलेले चावट फॉरवर्डस एन्जॉय करतात ते मुलाला व्हॉट्सअॅप वापरू नको असं म्हणाले तरी मुलं ते गांभीर्यानं घेतील का?
- असे अनेक प्रश्न आहेत.
प्रश्न साधनांत आणि माध्यमांत नाहीत, तर मनोवृत्तीत आहेत.
सेक्स ही गोष्ट वाईटच आहे असं नव्हे, तर ती योग्य वयात आयुष्यात येणं महत्त्वाचं आहे. त्या आधीच्या टप्प्यात अन्य थरारक, आनंददायक गोष्टी असू शकतात हे मुलांपर्यंत नेण्यात आपण अपयशी ठरलेलो आहोत.
त्यामुळे दोष समाजानं, पालकांनी आणि शाळांनी घेतला पाहिजे स्वत:कडे!
अर्थात तो कुणालाही दिला तरी समस्या तीच आहे.. मुलांच्या एकाग्रतेची. ओव्हर एक्सायटमेण्टची. अकाली मोठे होत सेक्समधलं थ्रिल शोधण्याची. प्रेमात पडणं आणि त्यातल्या थ्रिललाच प्रेम समजण्याची..
याचे वर्तन परिणाम मात्र गंभीर आहेत. सोशल मीडिया, अब्युझिंग, ट्रोलिंग ते प्रत्यक्षातल्या मारामाऱ्या आणि न्यूनगंड इथपर्यंत गोष्टी जात आहेत. त्या नेमक्या कशा जातात याचाच अभ्यास आम्ही करतो आहोत. तो अभ्यास आमच्या संस्थेला करावासा वाटणं हीच समस्या गंभीर असण्याचं लक्षण आहे. वर्तन समस्या आणि मोबाइल यासंदर्भात सध्या आम्ही निम्हान्समध्ये संशोधन करतो आहोत. उत्तरं सापडतीलही, पण प्रश्न आहेत, हे आधी आपण मान्य करायला हवं.
(लेखक नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ मेण्टल हेल्थ सायन्सशी संलग्न अभ्यासातील संशोधक आहेत.)