इंजिनिअरिंग केलं, प्राध्यापकही झाला पण चहाचं हॉटेल उघडणं भाग पडलं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 07:00 AM2018-09-06T07:00:00+5:302018-09-06T07:00:00+5:30
भेटा एका प्राध्यापक चहावाल्या उत्साही कल्पक तरुणाला...
नम्रता फडणीस
प्राध्यापक. हा फक्त एक शब्द नाही तर ते स्वप्नं असत तरुणांचं! वर्षोनुवर्षे उराशी बाळगलेलं. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. पोटाला चिमटा काढून एक तरुण छोटय़ाशा गावातून शहरात इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेतो. जीव तोडून अभ्यास केल्यानंतर डिग्री सर्टिफिकेट त्याच्या हातात येतं. तेव्हा खरंच ‘साला मैं तो साब बन गया’ असा फील येतो.
सुखावून जायला होतं.
पण मग त्यानंतर सुरू होतो स्वप्नांच्या मागे धावण्याचा खेळ. ‘इंजिनिअर’ झाल्यानं अगोदरच कॉलर ताठ झालेली. मार्क चांगले असतील तर चांगल्या नोकर्यांच्या ऑफर्स उंबरठय़ार्पयत येऊन धडकतातच.
पण जेव्हा स्वप्नभंग होतो. प्राध्यापकी करण्याचं भूत एका क्षणात उतरतं आणि प्रश्न पडतो.
आता पुढे काय?
महेश तनपुरे या मॅकेनिकल इंजिनिअरिंग केलेल्या तरुणाची ही काहीशी सगळ्यांसारखीच कहाणी.
मात्र त्याच्या कहाणीत कपभर चहानं एक ट्विस्ट मारला. चहा ही त्याची अत्यंत आवडती गोष्ट. एकेकाळी दहा दहा कप चहा पिणार्या या तरुणाला कधी वाटलंही नव्हतं की आपण एक दिवस चहा बनवून दुसर्याच्या हातात कप देऊ.
पण तसं झालं. पुणे- बॅँगलोर हायवेजवळील नर्हे गावात ‘जस्ट टी’ कॅफे त्यानं सुरू केला. आपल्या इंजिनिअरिंग स्किलचा वापर करून या कॅफेचं एका ब्रॅण्डमध्ये रूपांतर करण्याचं स्वप्न पाहू लागला.
महेश सांगतो, इंदापूर तालुक्यातील बेलवाडी हे माझं गाव. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एसएनडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. मास्टर डिग्री पुणे विद्यापीठातून घेतली. युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवसह्याद्री आणि मग सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीही केली. त्याआधी एका इंडस्ट्रीमध्येदेखील एक वर्ष जॉब केला. प्राध्यापक म्हणून नोकरी करणं हे माझं पॅशन होतं. कॉलेजला असताना मित्रांना शिकवायचो. क्लासेसदेखील घ्यायचो. शिकवणं हेच माझं ध्येय होतं; पण प्राध्यापक म्हणून शिकविताना त्याच्या मर्यादा हळूहळू लक्षात यायला लागल्या. इंजिनिअरिंग कॉलेज मग ते कोणतही असो त्याला शिक्षण सोडून वेगळीच काम दिली जातात. अॅडमिशन करणं, हे त्याला दिलेलं एक महत्त्वाचं काम. जीएफएम नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे गार्डियन फॅकल्टी मेंबर हे अजून एक प्रकरण. विद्याथ्र्याचं रेशन कार्ड जमा करण्यापासून ते कुठं आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांना फोनाफोनी करणं, इतकी कारकूनी कामं दिली जातात. त्यात आजर्पयत ज्या तीन महाविद्यालयांमध्ये शिकविलं तिथ पगारही वेळेवर मिळायचा नाही. मग काय आमची सहनशक्ती संपली, म्हणून आम्ही प्राध्यापकांनी आंदोलन केलं. विरोध केला. पगार वेळेत द्या आणि राष्ट्रीय बँकेत पगार जमा करा अशी आमची मागणी होती. पण आम्हा जवळपास 500 प्राध्यापकांना ‘टर्मिनेट’ करण्यात आलं. मी अक्षरशर् रस्त्यावर आलो. घरभाडं भरायला पैसे नव्हते. मित्र, नातेवाइकांकडून पैसे उधार घेतले. तेवढय़ात एक ते दोन पगार झाले, ती रक्कम आणि मित्रमंडळीकडून घेतलेले पैसे असे मिळून हा कॅफे मी सुरू करण्याचं ठरवलं. त्यातही चहाचा व्यवसायच करायचा असं काही नक्की केलेलं नव्हतं. पण पैसे कमी असल्यानं चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. हे आवडीनं करत असलो तरीपण चहाचा व्यवसाय करणं ही माझी पॅशन कधीच नव्हती. चहाच्या व्यावसायिकांशी एका इंजिनिअरिंगनं स्पर्धा करावी यासारखं दुसरं दुर्दैव नाही.
माझ्या या स्थितीला शिक्षणक्षेत्र हेच जबाबदार आहे असं वाटतं. भारतात आज एकूण जीडीपीच्या 1.5 टक्के इतकीच रक्कम शिक्षणावर खर्च केली जाते. जे अप्रगत देश आहेत त्या देशांमध्ये एवढी रक्कम दिली जाते. मग भारताला प्रगतिशील म्हणायचं का? कोणत्याही इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रॅक्टिकल्ससाठी योग्य सुविधा मिळत नाही. विद्याथ्र्याना भारतात संशोधन करण्यासाठी पुरेशा लॅबदेखील नाही. शिक्षकांना सन्मान दिला जात नाही, ही शिक्षणव्यवस्थेची शोकांतिका आहे. मी माणूस म्हणून समाधानी आहे; पण प्राध्यापकीला न्याय देऊ शकत नाही याचंच दुर्ख वाटत राहातं..
पण या कॅफेमध्ये माझं इंजिनिअरिंगचं स्किल वापरणार आहे. माझ्याकडे पैसे आल्यानंतर एक रिसर्च लॅब विकसित करण्याचा विचार आहे. सोलर आणि विंड एनर्जीचा वापर करून चहा उकळवणं असा प्रयत्न करणार आहे. कारण इंजिनिअरिंग अप्रोच आपण कुठेही दाखवू शकतो. आयुष्यात प्रत्येक तरुणानं आपल्याला नक्की काय करायचं आहे हे ठरवलं पाहिजे.’ - महेश सांगत राहतो त्याची गोष्ट.
आज त्याच्या चहाच्या दुकानाचे सोशल मीडियात चर्चे आहेत.
जिद्द माणसाला परिस्थिीला वेगळं उत्तर द्यायला शिकवते, याचंच हे एक उदाहरण.