एथनिक, लोकल, फॅशनेबल- कोणता मास्क आहे तुमच्याकडे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 05:00 PM2020-07-16T17:00:51+5:302020-07-16T18:21:34+5:30
मास्क हा न्यू नॉर्मल जगण्याचा भाग आहेच; पण आता लोकल-व्होकल होत हातमाग, स्थानिक वस्रकलाही मास्कवर स्वार होत आहे. त्या मास्क फॅशनची ही झलक.
सारिका पूरकर-गुजराथी
कोरोनाचा विळखा अजून सैल झालेल नाही. भय इथले संपत नाही अशी स्थिती आहे. लॉकडाऊन-अनलॉकचा खेळही सुरूच आहे. आणि तोंडाला मास्क हा आता आपल्या न्यू नॉर्मल जगण्याचा भाग झाला आहे. एकच एक मास्क न घालता मॅचिंग मास्कही बाजारात आलेत. ऑनलाइन पोर्टल्सवर, बाजारातही डिझायनर मास्कची भरपूर व्हरायटी पाहायला मिळतेय. पण या डिझायनर मास्कबरोबरच भारतात आता एथनिक मास्क ही नवी संकल्पना, ट्रेण्ड जोर धरतोय. भारतातील अनेक प्रांतांमधील हस्तकलेला यानिमित्त पुन्हा एकदा मागणी वाढल असं चित्र आहे.
हॅण्डमेड मास्कची क्रेझ वाढते आहे. त्यात देखणी रंगसंगती आहे आणि फॅशनप्रेमी, उत्साही आपला मूड उत्तम राखण्यासह जगण्यात थोडे रंग भरण्यासाठी आता मास्कही देखणो वापरू लागले आहेत.
त्यातून आता अनेक प्रकारच्या मास्कचा ट्रेण्ड, फॅशन आणि चर्चाही सोशल मीडियात दिसते. अर्थात मास्क तीन लेअर, सिक्स लेअर असावेत, वॉशेबल असावेत ही सारी माहितीही गुगल करून आपला मास्क निवडत आहेत.
एकूणच फॅशनप्रेमी ग्लोबलकडून लोकलकडे वळाले आहेत. लॉकडाऊन काळात हस्तकला कामगारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. परंतु या एथनिक मास्कमुळे त्यांच्या कलेला नवसंजीवनी मिळाली आहे. देशभरातील 12,5क्क् हस्तकला केंद्रांमधील 40 लाखांपेक्षा अधिक स्थानिक कलाकार यामुळे पुन्हा एकदा त्यांची रोजीरोटी मिळणार आहे.
मधुबनी मास्क
बिहारमधील ही अत्यंत लोकप्रिय चित्रकला यापूर्वीच जगभर प्रसिद्ध झालीय, परंतु आता कोरोनापासून संरक्षणासाठी येथील स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या मधुबनी मास्कला प्रचंड मागणी आहे. कॉटनच्या तीन लेअर्स कापडावर पारंपरिक चित्रकृती या मास्क्सवर चितारलेल्या दिसून येताहेत. निसर्ग, महिला, देव-देवता, कोरोना जनजागृती असे प्रसंग चितारून हे मास्क बनवले जाताहेत. रेमंत कुमार मिश्र या एका गरीब चित्रकार बांधवाला लॉकडाऊनमध्ये आर्थिक चणचण भासत होती, त्याने मग हे मास्क तयार केले. एका कलाप्रेमीने ते सोशल मीडियावर शेअर केले, मग काय त्या मास्कला जोरदार मागणी आली. मधुबनीप्रमाणोच बिहारची मंजूषा चित्रकलाही मास्कवर दिसतेय, ऑनलाइन असे मास्क विकले-घेतले जात आहेत.
चेरियाल पेंटिंग मास्क
बाराव्या शतकातील चेरियाल पेंटिंग ही कला सध्या मास्कच्या माध्यमातून पुन्हा नव्याने समोर येतेय. तेलंगाना राज्यातील साईकिरण धनलाकोटा यांनी हे मार्क्स तयार केले आहेत. खादी, कॅनव्हासच्या कापडाला चिंचोके पावडर, भाताची खळ, झाडावरचा डिंक, खडू पावडर यांचा थर लावून त्यावर सुंदर चित्रे ते रेखाटतात, नैसर्गिक रंगांनी रंगवतात. या चित्रंमध्ये रामायण, महाभारतातील प्रसंग तसेच कोविड जनजागृती संदेश देणा:या चित्रंचा समावेश आहे.
फड पेंटिंग
रंगीला राजस्थानची ही लोककला. खूप मोठय़ा आकाराच्या कापडावर खरं तर ही चित्रे काढली जातात. कारण यात सण-उत्सव, युद्ध-रणभूमीतील प्रसंग चितारले जातात. पण सध्या कोविड काळात मास्कवर ती अवतरली आहे. जोडीला स्थानिक भाषेत त्यात विशेष संदेशही दिले जाताहेत.
पत्तचित्र
ओरिसातील या अत्यंत प्राचीन व लोकप्रिय कला प्रकाराचा उपयोग स्थानिक कलाकार मास्कसाठी करताहेत. पत्तचित्र मास्कबरोबरच डोंगरिया कोंध या आदिवासी जमातीच्या बांधवांनी विणलेले मास्कही मागणी मिळवताहेत.
मात नी पचेडी
गुजरातमधील हा कलाप्रकार कोरोनाकाळात प्रचंड लोकप्रिय झालाय तो मास्कमुळेच. कलमकारी नावानेही हा प्रकार ओळखला जातो. अजित भाई या स्थानिक कलाकाराने मातनी पचेडी कलाप्रकारातील एक मोतिफ चित्र मास्कवर चितारले व सोशल मीडियावर शेअर केले. या मास्कला इतकी मागणी आली की पंधरा दिवसात अडीच हजार मास्क त्यांनी तयार केले. बंगळुरू, कोलकाता, दिल्ली, हैदराबादमध्येही त्यांच्या या मास्कला मागणी वाढलीय. गुजरातमधील लेहरिया व बांधणी, बाटिक (शिबोरी) या कलाप्रकारातील मास्कही प्रचंड म्हणजे प्रचंड हिट झाले आहेत.
बाघ पेंटिंग
मध्य प्रदेशची ओळख असणारा हा कलाप्रकार. मध्य प्रदेशातील धर या जिल्ह्यातील बाघ गुहेतील भित्तचित्रंवर आधारित ही संकल्पना मास्कवरही लोकप्रिय होते आहे. त्याशिवाय गोंद पेंटिंग या मध्य प्रदेशातील आणखी एका लोककलेच्या डिझाइन्स मास्कवर दिसू लागल्या आहेत. या मास्कलाही चांगली मागणी आहे.
एम्ब्रायडरी मास्क
भारताला सुंदर भरतकाम कलेचा मोठा इतिहास लाभलाय. भरतकामाच्या माध्यमातून आता मास्कलाही डिझायनर बनविण्यात येतेय. तामिळनाडूमधील निलिगरी भागातील तोडा भरतकाम या प्राचीन भरतकामाने मास्कच्या दुनियेतही लोकप्रियता मिळवली आहे. पांढ:या, क्रीम रंगाच्या कापडावर लाल, काळ्या रंगाच्या धाग्यांनी बारीक डिझाइन बनविण्यात येते. लग्नसमारंभासाठी डिझायनर मास्क म्हणून जरदोसी भरतकाम केलेले मास्क यापूर्वीच हिट झाले आहेत. उत्तर प्रदेश (लखनौ)ची अत्यंत लोकप्रिय कला म्हणजे चिकनकारी भरतकाम. मलमल कापडावर बारकाईने केले जाणारे हे भरतकाम आता मास्कवरही भाव खातंय.
खादी
खादीला जगभरात मागणी वाढत आहे. खादीच्या मास्कला तर खूप मागणी आहे. खादी ग्रामोद्योग आयुक्तालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. याबरोबरच इकत, लिनन, महेश्वरी, संबलपुरी, पासापल्ली, खुर्दा गमूचा या हातमागाच्या कापडापासून बनवलेल्या मास्कलाही सर्वच वयोगटाची पसंती मिळतेय. त्रिपुरातील त्रिपुरी फॅब्रिक मास्कही चर्चेत आहेत.
(सारिका मुक्त पत्रकार आहे.)