प्रसिद्धी, कौतुक आणि focus

By admin | Published: January 14, 2016 09:37 PM2016-01-14T21:37:52+5:302016-01-14T21:37:52+5:30

१००९ नॉट आउट. प्रणव धनावडेच्या निमित्ताने खेळाच्या मैदानावरल्या झगमगत्या यशामागच्या कष्टांच्या तरुण कहाण्या

Fame, appreciation and attention | प्रसिद्धी, कौतुक आणि focus

प्रसिद्धी, कौतुक आणि focus

Next

१००९ नॉट आउट. 

प्रणव धनावडेच्या निमित्ताने
खेळाच्या मैदानावरल्या
झगमगत्या यशामागच्या
कष्टांच्या तरुण कहाण्या..
 
पाठीवर क्रिकेटचं कीट घेऊन धावणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या गर्दीतलाच तोही एक होता.. अगदी कालकालपर्यंत.
पण आज त्याच्या नावावर एक रेकॉर्ड आहे..
आणि एक असं रेकॉर्ड जे गेल्या ११६ वर्षांत तुटलं नव्हतं, ते रेकॉर्ड तर त्यानं तोडलंच पण नवीन विश्वविक्रमही करून ठेवला.
आज तो १००९ धावांवर नॉट आउट आहे.
कल्याणच्या प्रणव धनावडेची ही गोष्ट!
शालेय क्रिकेटमध्ये त्यानं एक विक्रम रचला आणि राष्ट्रीयच नाही, तर आंतरराष्ट्रीय मीडियावाले त्याचा पत्ता शोधत कल्याण गाठू लागले.
एका रिक्षाचालकाचा, साध्या चाळीत राहणारा हा मुलगा, आता मोठ्या स्वप्नांचीच नाही तर एका बड्या कर्तबगारीचीही दावेदारी सांगतो आहे.
आर्थिक विवंचना, हलाखी आणि सुविधांची मारामार याची काहीही गाऱ्हाणी न सांगता केवळ आपल्या कर्तबगारीवर नव्या जगात एक भक्कम पाऊल टाकून उभा राहिला आहे.
वय वर्षे फक्त १५.
ज्या वयात क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे फोटो क्रिकेट खेळणारी मुलं जमवतात, त्याच वयात प्रणवला या दैवतानं स्वत: सही केलेली बॅट बक्षीस म्हणून द्यावी, यापेक्षा अधिक नशीब आणि कर्तबगारी काय असावी?
आज प्रणववर सगळीकडून बक्षिसं, कौतुक आणि प्रसिद्धीचा वर्षाव होतो आहे. त्याचं साधं चाळकरी, सर्वसामान्य घर त्या ‘मीडिया अटेन्शन’मधे न्हाऊन निघालं आहे.
प्रणवला विचारलं की, ‘प्रेशर वाटतंय या साऱ्याचं? दडपण येतंय..?’
तो म्हणाला, ‘नाही, प्रेशर कसलं घ्यायचं? अजून तर खूप खेळायचंय, मला क्रिकेटमधेच करिअर करायचंय. तेच माझं ध्येय आहे.’
वयाच्या पंधराव्या वर्षी प्रसिद्धी अशी घेरत असताना, अजून प्रणवला आपलं ध्येय आठवतंय याचा खरंतर या वातावरणात आनंदच मानायला हवा. कारण ही प्रसिद्धी, हा कौतुकाचा पाऊस, हे चहूबाजूनं अंगावर येणारं अटेन्शन आणि कुठले रेकॉर्डही सदासर्वकाळ टिकत नाहीत. ते तुटतातच. आॅर्थर कॉलीस नावाच्या मुलानं इंग्लंडमध्ये १८९९ मध्ये ६५२ धावा करण्याचं एक रेकॉर्ड केलं होतं, ते इतक्या वर्षानं का होईना तुटलं. आणि इतिहासात त्याच्या नावावरचा हा विक्रम फक्त कायम राहिला!
मात्र आजच्या वेगवान आणि अतीव स्पर्धेच्या काळात अनेकांची वर्तमानातली कामगिरीही चटकन ‘इतिहास’ ठरते. आणि पुन्हा गुणवत्तेला आणि कर्तबगारीला ‘परफॉर्मन्स’ नावाच्या अग्निदिव्याला सामोरं जायला भाग पाडते.
२००९ पासून मुंबई-ठाणे-कल्याण विभागातल्या शालेय स्तरावरच्या मुलांनी पाच रेकॉर्ड केले. सगळ्यांनीच व्यक्तिगत स्तरावरचे अत्युच्च विक्रम नोंदवले. मात्र त्यांचं हे यश त्यांना दुसऱ्या टप्प्यात नेता आलं का?
प्रसिद्धी-कौतुक आणि विक्रमाच्या आनंदात क्रिकेटवरचा फोकस हलला की वाढला?
क्रिकेट करिअरच्या नव्या पायरीवर चढता आलं, की साधारण खेळात हरवून गेला परफॉर्म करण्याचा हुरूपही आणि गुणवत्तेची चकाकीही?
सोपं नसतं, यशाचं ओझं घेऊन पुढची वाट चालणं. अनेकदा ते यशही पुढची वाट अवघड करतं!
क्रिकेटसारख्या अतीव ग्लॅमरस, अतिश्रीमंत आणि अतिमहत्त्वाकांक्षी क्षेत्रात करिअर करताना, यशाची वाटचाल चालताना सतत परफॉर्मन्सचा कस लागतो, थोडी वाईट कामगिरी आणि आउट असंही होऊ शकतं!
गेल्या काही वर्षांत रेकॉॅर्डवीर ठरलेले तरुण दोस्त आज कुठे आहेत, याचाच एक शोध या अंकात.. आणि त्याच सोबत आपल्याच बदलत्या संवादावर एक नजरही! खास संक्रांतीनिमित्त..
गोड तर काय, बोलतोच आपण एकमेकांशी! पण पाठीत धपाटे घालण्याचा हक्कही अबाधित ठेवू आपल्या दोस्तीत, काय?
 
- आॅक्सिजन टीम

Web Title: Fame, appreciation and attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.