गूगल अलर्टचा निर्माता करतोय शेती

By Admin | Published: June 16, 2016 12:16 PM2016-06-16T12:16:11+5:302016-06-16T12:32:35+5:30

त्याचं नाव नागा कटारू. तो ‘गूगल अलर्ट’चा निर्माता आहे. पण डोक्यातला ‘किडा’ त्याला शांत बसू देईना... शेवटी त्याने निवडली ‘वेगळी’ वाट!

Farming Google Alert | गूगल अलर्टचा निर्माता करतोय शेती

गूगल अलर्टचा निर्माता करतोय शेती

googlenewsNext

गूगलमध्ये नोकरी करायला कोणाला आवडणार नाही? नागा कटारूदेखील आयआयटीचं शिक्षण पूर्ण केल्यावर २००० साली ‘गूगल एम्प्लॉयी’ झाला. मात्र काही तरी नवीन आणि वेगळे करण्याची ओढ होती म्हणून त्यानं गूगलची नोकरी सोडून आयुष्याला नवीन वळण दिलं. सध्या तो कॅलिफोर्नियामध्ये बदामाची शेती करतो. 
आंध्र प्रदेशमधील गम्पालगुडेम हे नागा कटारूचे गाव. नव्वदच्या दशकात (किंबहुना आजही!) जशी गावांची स्थिती होती तशीच गम्पालगुडेमचीही होती. शिक्षणाच्या बाबत मागासलेलं ते गाव. हजेरीपटावरील केवळ अर्धेच मुलं रोज शाळेत हजर राहत असत.
नागा सांगतो, शिक्षण घेणं हे गावासाठी ‘पर्यायी’ किंवा ‘ऐच्छिक’ होते. परंतु माझे वडीलच शाळेचे हेडमास्तर असल्यामुळे मी शिकावं असा त्यांचा आग्रह होता. 
लहानपणापासून अभ्यासात हुशार नागाने पदवीसाठी ‘कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग’ची निवड केली. पुढे त्यानं आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. ‘आयआयटी’नंतर त्याची गूगलमध्ये निवड झाली. 
तंत्रज्ञान हेच भविष्य असणार याची जाणीव ठेवून तिथं तो विविध प्रयोग करू लागला. एका ‘आउट आॅफ द बॉक्स’ विचारातून त्याला गूगल अलर्टची कल्पना सुचली. लोक एखाद्या गोष्टीविषयी जाणून घेण्यासाठी गूगलवर सर्च करतात. पण जर गूगलने स्वत:हून ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध झाल्यावर तत्काळ यूजर्सपर्यंत पोहचवली तर? 
याच तत्त्वावर त्यानं ‘गूगल अलर्ट’चा प्रोटोटाईप बनवला.
सर्वात आधी त्याने जेव्हा ही संकल्पना त्याच्या बॉससमोर मांडली तेव्हा त्याने ती साफ फेटाळून लावली. त्याचं म्हणणं होतं की, ‘आपण जर यूजर्सना स्वत:हून माहिती पुरवली तर ते कशाला गूगलवर सर्च करतील? अशाने कंपनीचा व्यवसाय कसा होणार?’
मात्र या नकारामुळे नागा खचून गेला नाही. स्वत:च्या संकल्पनेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. तो थेट कंपनीचे संस्थापक सर्गेय ब्रिन आणि लॅरी पेजकडे गेला. त्यांना ‘गूगल अलर्ट’ची संकल्पना समजावून सांगितली. दोघांनाही ती खूप आवडली. त्याचं पेटंटही नागाला मिळालं. २००३ मध्ये ‘गूगल अलर्ट’ लाँच झाल्यापासून कोट्यवधी लोक त्याचा वापर करत आहेत.
डोक्यात जेव्हा विचारांचं काहूर माजू लागलं तेव्हा त्यानं नोकरीचा राजीनामा दिला आणि माहितीपट निर्मिती आणि ‘प्रयोगशील’ नाट्यक्षेत्रात उडी घेतली. काही काळ तेथे काम केल्यानंतर त्याने पुन्हा ‘गिअर’ बदलण्याचा निर्णय घेतला. कॅलिफोर्नियातील मोडेस्टो येथे २००८ साली त्याने ३२० एकर शेती विकत घेतली. तो सांगतो, ‘सुरुवातीला शेती करण्याचा माझा विचार नव्हता. एक गुंतवणूक म्हणून मी जमीन खरेदी केली होती. मला वाटलं पाच वर्षांनंतर जास्त किमतीत ती विकून टाकू. पण डोक्याचं चक्र पुन्हा फिरलं. ही शेतजमीन बालपणाची आठवण करून देऊ लागली. म्हणून ‘फुलटाइम’ बदामाची शेती करण्याचं ठरवलं.’
पण शेती कशी करतात याची त्याला काहीच कल्पना नव्हती. मग सुरू झालं शेतीचं शिक्षण. कोणतीही गोष्ट इच्छा असेल तर शिकता येते यावर त्याचा दृढ विश्वास. मेहनत आणि अभ्यास करून त्यानं शेतीचं तंत्र शिकून घेतलं. अक्षरश: घाम गाळून त्यानं बदामाच्या शेतीत नफा मिळवून दाखविला. आज तो शेतीतून दरवर्षी २.५ मिलियन डॉलर्सचे (१६.७ कोटी रुपये) उत्पन्न घेतो. 
एवढे करूनही नागा शांत बसण्याच्या मूडमध्ये नाही. आता त्यानं स्वत:समोर नवीन ‘चॅलेंज’ ठेवले आहे. ते चॅलेंज म्हणजे शेतीला अधिक टेक्नोसॅव्ही करणं ! केवळ कुतूहल आणि उत्सुकता कायम ठेवली म्हणून नागा आता एक वेगळा प्रवास करत मजेत जगतो आहे!


- मयूर देवकर

Web Title: Farming Google Alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.