तिला वाटणारी "ती "चार भिंतीतली भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 05:29 PM2018-07-11T17:29:47+5:302018-07-11T17:31:19+5:30
तो जवळ आला तशी ती घाबरली रडायलाच लागली हमसून हमसून.
- श्रुती मधुदीप
.आणि त्यानं तिचा हात पकडला. तिच्या हातांवर शहारे उमटले. त्याच्या या बंद खोलीत त्याने असा तिचा हात पकडणं त्या दोघांनाही सुखावणारं होतं. हळूहळू त्याचे हात तिच्या खांद्यावरून पूर्ण हातावर फिरू लागले. तसतशी तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्याने तिचे बांधलेले केस मोकळे केले. त्या केसात हात घालून, डोळे मिटून सगळ्या जगाला विसरून जावं असं वाटलं त्याला. अधिकाधिक तिच्या धुंदीत जाऊ लागला होता तो. एका स्त्नीला अशाप्रकारे पहिल्यांदा अनुभवत होता तो.. इतक्यात त्याने डोळे उघडले आणि तिच्या डोळ्यात पाह्यलं तर ती त्याच्याचकडे बघत होती. त्याचे तिच्या केसातले हात बाजूला करत ती म्हणाली, ‘एक मिनिट हं’ असं म्हणून ती त्याच्यापासून दूर झाली आणि आतल्या खोलीत गेली. त्याला काय झालं ते कळेना. तो तिला कवेत घेण्यासाठी आसुसला होता.
‘अगं काय झालं ?’ असं म्हणून तो तिच्या मागे मागे आतल्या खोलीत गेला.
‘अरे काही नाही. पाणी प्यायचं होतं’ ती त्याला पाठमोरी होत म्हणाली.
‘‘पाणी ? अगं!..’’ इतका सुंदर क्षण तिने असं पाणी पिण्यासाठी म्हणून ब्रेक करावा हे काही त्याला रुचलं नाही. पण तरीही त्या क्षणीचं इरिटेट होणं त्यानं पुन्हा तिला जवळ घ्यायचा प्रय} केला, तशी ती एकदम बाजूला होऊन बाहेरच्या खोलीत निघून गेली.
आता मात्न त्याला तिचा रागच आला. एकतर रूमवर कुणी नसताना असा पहिल्यांदा चान्स मिळत होता. त्यात ही असं वागते, त्याला सहनच होईना. वाटलं, जाब विचारावा, ‘काय प्रॉब्लेम आहे बाई तुला? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर मग साधं जवळ येण्यासाठी इतकी नाटकं का करतेयस? की माझ्यात काहीतरी कमी आहे का? काय आवडत नाहीय.’
क्षणात त्याचे डोळे लाल झाले. जाब विचारायचा म्हणून तो बाहेरच्या रूममध्ये गेला.
‘‘तुझा मुद्दा काय आहे गं? का डोक्यात जातेयस माझ्या?’’- तो उद्गारला.
त्याच्या लक्षात आलं की ती गुडघ्यात मान घालून हमसून हमसून रडतेय. त्याला कळेचना काय झालं ते. आपल्याकडून काही चूक झाली का? असं त्याने स्वतर्लाच विचारलं. झालेलं सगळं सगळं रिकॉल केलं. मग त्याला वाटलं, कदाचित आपण असं न सांगता जवळ गेलो तेच आवडलं नसावं तिला.
‘‘सॉरी गं’’ तो एकदम गोंधळून म्हणाला तिला.
तरी ती रडत राह्यली.
बराचवेळानं तिने गुडघ्यातून मान काढली.
‘‘इकडे ये.’’ असं म्हणून तिने त्याला तिच्याशेजारी बसवून घेतलं. म्हणाली,
‘‘तू सॉरी का म्हणतोयस? तुला माहित्येय, मला तुझ्या खूप खूप जवळ यायचंय रे. पण येताच येत नाही.’’
‘‘म्हणजे?’’ त्याच्या भुवया प्रश्नार्शक वळल्या.
‘‘म्हणजे भीती वाटते खूप!’
‘‘कसली?’’ - तो म्हणाला. ‘‘अगं मी इतकं काही करणार नव्हतो. वेडीयेस का !’’
‘‘तसं नाही.’’
‘‘मग?’’
काही क्षण ती काहीच बोलली नाही. त्याला काही कळेना. तो तिच्याकडे निव्वळ पाहत राह्यला आणि मग हळूहळू तिच्या तोंडून काही शब्द उमटू लागले.
‘‘तुझ्याशी कधी बोलता आलं नाही मला. म्हणजे मलाच सांगता येत नव्हतं. पण आज’’ असं म्हणून तिने आवंढा गिळला.
‘‘आज सांगायला हवं तुला. मी लहान होते. चौथी-पाचवीत असेन. माझ्या मावशीचं घर तेव्हा आमच्या घरापासून जवळच होतं. मी अनेकदा तिकडेच राहायचे. कारण अमेय! अमेय- माझा मावस भाऊ आम्ही दंगा घालायचो खूप. एकमेकांशिवाय राहायचोच नाही. एकेदिवशी मी तिकडेच झोपलेले असताना माझे काका. म्हणजे मावशीचे मिस्टर.’ असं म्हणून तिने तिचा वरचा ओठ खालच्या ओठावर दाबला. श्वास रोखून धरला. तिचे डोळे पाणावले.
‘‘त्यांचं काय?’’ - त्याने तिला विचारलं. तिचा हात पकडणं किंवा तिच्या जवळ जाणं त्याला या क्षणी बरोबर वाटेना.
‘‘त्यांनी मला नको त्या ठिकाणी हात लावायला सुरुवात केली. छाती दाबायला सुरुवात केली. माझे कपडे काढले त्यांनी.’’ तिने एका घोटात बोलावं तसं सगळं बोलून दाखवलं. ती हमसून हमसून रडू लागली.
‘‘असं बरेचदा झालं तेव्हापासून मला खूप भीती वाटते रे अशा चार बंद भींतींची. जवळ येण्याची. खूप खूप भीती वाटते. आय एम सॉरी! खूप सॉरी!’’ असं म्हणून ती खूप रडायला लागली.
त्याचेही डोळे पाणावले. आपण रागात आतल्या खोलीत काय काय विचार करत बसलो याचा त्याला गिल्टच आलं. काय करावं हे त्याला सुचेना.
‘‘तू रागावला नाहीयेस ना माझ्यावर ?’’ - ती त्याला म्हणाली.
‘‘अगं! वेडीयेस का?’’ त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला.
ती त्याच्या कुशीत शिरली. त्याच्या कुशीच्या या चार भींती आता तिला खूप उबदार वाटू लागल्या होत्या!