वाटतं, जावं पळून
By Admin | Published: March 1, 2017 01:37 PM2017-03-01T13:37:01+5:302017-03-01T13:37:01+5:30
नको नको झालं, पळून जावंसं वाटतं, असं प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतं. त्यात अमुक तमुक घरातून पळाला आणि यशस्वी झाला अशा हिरोबाज कहाण्याही आपण वाचलेल्या असतात. पण आपली आधीच खटारा झालेली गाडी रस्त्यावर पळवायची म्हटली तर ती पळेल का याचा विचार नको करायला?
- प्राची पाठक
दूर कुठेतरी पळून जावंसं वाटणं.. ‘मैं घर छोड के जा रहा हूँ..’ अशी भावना, अशी वेळ आयुष्यात एकदा तरी अनेकांच्या मनात येते. काही जण खरंच जातातही पळून. कुणी नुसत्याच धमक्या देऊन थोडंसं कुठेतरी पळून जाऊन परत येतात. कुणी घरातल्या घरातच हे वाक्य हजारदा बोलतात. म्हणतात, वाटतं की नको, हे पळून जावं ! आणि त्यावर घरचे मनातल्या मनात म्हणतही असतील, ‘अरे, जा की एकदाचं’ असंही काहींच्या बाबत घडत असेल. कधी असहायतेतून, कधी नैराश्यातून, कधी समस्यांपासून पळण्यासाठी, तर कधी निदान रूटीनमध्ये बदल व्हावा म्हणूनदेखील अनेकांना पळून जावंसं वाटतं. सध्याचं आयुष्य, आजूबाजूची माणसं, परिस्थितीचा तोच ट्रॅप नकोसा झालेला असतो. ‘तोंड नको पाहायला यांचं पुन्हा’, असं होतं अगदी. आपल्यालाही वाटतं असं कधी. पण म्हणून लगेच काही कुणी पळत नाही. आपण नेटवर शोधाशोध करतो. रिलॅक्स कसं व्हावं. त्यातल्या टिप्स काय असतात? ‘स्पा’ला जा. ‘बबल बाथ’ घ्या. क्लबला जाऊन गेम्स खेळा. त्यांना सांगावंसं वाटतं. ‘अहो, इतके पैसे असते तर आधीच नसतं का केलं हे !’ पैसे नाहीत म्हणूनपण पळून जावंसं वाटतं आम्हांला, हे यांना कधी कळणार? मग मनात येतं, यार आपण पळून गेलो आणि ‘आपण यांना पाहिलंत का’ अशी घरच्यांनी जाहिरात दिली तर?’ उगाच तोंड लपवत फिरावं लागेल. म्हणजे पळून गेलो तरी घरचंच टेन्शन घ्यायचं! तरीही पळून जावंसं वाटतच राहतं. थोडीशी घरातली परिस्थिती सुसह्य झालेली हवी असते. फार अपेक्षा पण नसते. कोणीतरी आपल्याकडे लक्ष दिलेलं हवं असतं. ऐकून घेतलेलं हवं असतं. पण ते काही होत नाही. मग पळून जाण्यानंच सगळे प्रश्न सुटतील असं वाटत राहतं. पण असं ‘रणछोडदास’ होणं विशेष कामास येईलच, असं नाही. आपण पळून जाऊन यशस्वी झालेल्यांच्या गोष्टी वाचतो. सिनेमे पाहतो. त्यातून पण एक ट्रिगर आपल्या मनात येतो. या लोकांचा सगळाच संघर्ष आपल्यापर्यंत येत नाही. म्हणजे त्या यशस्वी झालेल्या लोकांच्याही आयुष्यात आज पळून गेला आणि उद्या यशस्वी झाला, असं होत नाही. हे नीटच समजून घेतलं पाहिजे. आपण आधीच निराश असू तर पळून गेल्यावर येणारी आव्हानं आपल्याला झेपतीलच असंही नाही. म्हणजे, गाडी आधीच खटारा आहे आणि तिला जोरात अनोळखी जागी पळवायचं आहे, असं झालं. तिचं इंधन तरी सुटेल की नाही, तेही माहीत नाही. गाडी दुरुस्त करायची सोय नाही. विशेष काही माहिती नाही. फक्त आहे गाडी तर पळव, असा पळून जाण्याचा प्लॅन यशस्वी होणार नाही. ठणठणीत तब्येत, नीट प्लॅनिंग, आर्थिक पाठबळ असताना कुठं जाणं वेगळं आणि केवळ समस्यांपासून, माणसांपासून सुटका म्हणून पळून जाणं वेगळं. शरीर- मनाला इतका अचानक बदल झेपलाही पाहिजे. म्हणूनच आहोत त्याच मैदानात घट्ट पाय रोवून उत्तरं शोधायचं, परिस्थिती बदलायचा प्रयत्न करायला हवा. बोला आजूबाजूच्यांशी तुमच्या मनातलं. कधी कधी आजूबाजूच्या नात्यात साचलेपण येतं. एकमेकांना गृहीत धरणं होतं. अशा वेळी सध्या संपर्कात नसलेली; पण तुमची हितचिंतक अशी प्रेमाची व्यक्ती शोधा. ती वयानं लहान-मोठी कोणीही असू शकते. तिला सहजच फोन करा. जमलं तर भेटा. तिला मनातलं सांगून बघा. मन मोकळं तर होईल. ती रोजच्या संपर्कात नसल्यानं वेगळ्या नजरेनं तुमच्या समस्येकडे पाहू शकेल. कदाचित गुंता चटकन सुटून जाईल. वेगळा काही मार्ग मिळेल. पळून जाण्यापेक्षा फिरून या. छोटीशी ट्रिप करा. म्हणजे कुठे तरी गेल्यासारखंही होईल आणि थोडा बदलदेखील होईल. एकट्यानं प्रवास करून पाहा. कोणी म्हणेल, आम्ही मारे बदल म्हणून फिरायला जायचं; पण पुन्हा त्याच परिस्थितीत परत यावं लागतं ना? त्यानं काय फरक पडणार? हो, पण बदल झाला, की लढायचं बळदेखील मिळतं. ‘अरे, हे इतकं काही वाईट नाही’, अशी दृष्टीही कधीकधी सापडून जाते. आपल्याहून वाईट दिवस काढणारे लोक दिसू शकतात. आपलं खूप बरं आहे, असं वाटायला लावू शकतात ते. मन फ्रेश होतं. विचारांना वेगळं खाद्य मिळतं. घरात साफसफाई करणं, घराची रचना बदलणं, आपल्याच छोट्याशा कोपऱ्यात काही नवीन मांडणी करणं हेदेखील त्याच परिस्थितीकडे बघायचा दृष्टिकोन बदलू शकतं. बदललेल्या रचनेमुळे घरी परत जावंसं, घरात नवीन काही करावंसं वाटू शकतं. प्रसन्न वातावरण तयार होतं. छान गाणी ऐकावीशी वाटू शकतात. सिनेमे घरातच बघता येतात. आपल्याबाबत पूर्वी याच परिस्थितीत चांगलं काही झालेले आठवू शकतं. सगळंचकाही फार बोगस नाही यार, असंही वाटू शकतं मग ! आपलं रुटीन अधिक चांगलं करायची ऊर्जा मिळते. व्यायाम, आहार यांच्याकडे लक्ष देऊन पळून जायची भावनाच पळवून लावता येते. स्वत:च्या शरीराची काळजी घेऊन बघा, मस्त गरम पाण्यात अंघोळ करून बघा. आवडतं जेवण बनवा किंवा बनवून घ्या. भरपेट खा आणि मस्त ताणून द्या. जेव्हा जेव्हा पळून जावंसं वाटेल, तेव्हा तेव्हा आयुष्यात घडलेलं चांगलं आठवत, दीर्घ श्वास घेत मस्त दहा-बारा तास झोप काढा. गाढ झोपदेखील अनेक समस्या झोपेतच सोडवून टाकते. शेवटी काय आहे, इतरांपासून भलेही आपण पळून जाऊ. स्वत:पासून, स्वत:च्या मनापासून कसं पळणार? तिथे स्वत: ‘तय्यार’ होत सामना खेळावाच लागतो. खेळ खेळण्यात मजा आहे. पळून जाण्यात नाही! प्राची पाठक
prachi333@hotmail.com