कोरोनाकाळात फटीग आला? त्यावरचा रामबाण उपाय -उठा आणि कामाला लागा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:31 PM2020-08-06T17:31:40+5:302020-08-06T17:34:03+5:30
मला बोअर होतंय, फटीग आलाय, उदास वाटतं आहे, मूडच नाहीये अशा तक्रारी करत आपण स्वत:चे फाजील लाड करतोय का? - विचारा स्वत:ला!
-प्राची पाठक
मला ना जाम फटीग आलाय,
मी फार बोअर झालेय,
फार लो वाटतंय,
आज बॅटरी डाऊन आहे,
मी तर डिप्रेस झालोय,
खूप स्ट्रेस आलाय..
ही फार सहजच उच्चारायची वाक्यं आहेत. या वाक्यांमधल्या सगळ्या शरीर मनाच्या लक्षणांना आपण इंग्रजी शब्द सहजच वापरून टाकतो.
मी आज नाराज झालेय, मी आज जास्त श्रम केलेत, म्हणून थकलो आहे, माङया मनावर ताण आलाय..
असे शब्द आपण सहसा वापरत नाही. फटीग येणं, बोअर होणं, स्ट्रेस, डिप्रेशन, लो वाटणं, बॅटरी डाऊन वगैरे बोलायलासुद्धा आपल्याला नकळत कुठेतरी स्टायलिश वाटत असतं. आपल्याला जे वाटतंय ते इतर भाषेच्या आधाराने आपण कधी आणि कसं सांगतो, याचाही तज्ज्ञांनी अभ्यास केलेला असतो.
कधी आपण जे शब्द सहजच वापरून मोकळे होतो, त्यांचा खरा अर्थ, त्यांचे खरे ‘डायनॅमिक्स’ आपल्याला कळले तर आपण ते शब्द इतके सहजच वापरणार नाही.
जसं की डिप्रेशन. तात्पुरत्या थकव्याला, एखाद्या लो फिलिंगला, थोडय़ाश्या ताणाला आपण सहजच डिप्रेशन आलंय, असं निदान करून टाकतो. डिप्रेशन हे इतकं सहज सोपं नाही. तो एक गंभीर मानसिक आजार आहे. आणि तो योग्य उपचारानं बराही होतो.
मात्र अनेकदा आपण आपल्यातल्या आळशी वृत्तीलादेखील डिप्रेशन आलंय म्हणून आपर गोंजारत बसतो. तसंच काहीसं मानसिक थकव्याचं असतं. त्याला आपण चटकन नाव देऊन टाकतो, काय फटीग आलाय.
चकचकीत काँक्रिट रस्त्यावर एकदम नवी कोरी हाय फाय मॉडेलची गाडी चालवत जाणं, इतकं स्मूथ तर आपलं आयुष्य कधीच नसतं. त्यात खाचखळगे, खराब रस्ते, बिघडलेली खटारा गाडी असे कॉम्बो असतातच. कधी तर खटारा गाडीदेखील मिळत नाही. सायकल वापरायची किंवा पायी जायची तयारी ठेवावी लागते. कधी चिखल तुडवत बिन चपलेचंदेखील जावं लागू शकतं. कधी रस्ता उत्तम असेल; पण तो उन्हाने रापला असेल आणि आपली चप्पल इतकी चांगली नसेल की ते ऊन सहन करू शकेल. कधी रस्ताही उत्तम असेल आणि आपल्याकडे भारीतले शूज असतील. पण परिस्थितीच वेगळी असेल. भरपावसात आपल्याकडे लेदर किंवा कापडी शूज असतील, तर उत्तम रस्त्यावरदेखील चालतांना प्रॉब्लेम येईलच! त्या त्या वेळी ही परिस्थिती कठीण असेलही. पण तो आपल्या प्रवासाचा केवळ एक भाग असतो. असा प्रवास म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य नसेल. तो तर अगदी तसाच असा संपूर्ण प्रवासदेखील नसतो!
जेव्हा जेव्हा आपण ‘मला फार फटीग आलाय’, असं वाक्य सहजच वापरतो, तेव्हा तेव्हा आपण हेच भान ठेवलं पाहिजे. तो थकवा मानसिक आहे की शरीराचा? ते आधी स्वत:ला विचारायचं.
शरीराचा थकवा आराम करून, झकास झोप काढून जाऊ शकतो. मानसिक थकवा मात्र खरोखर थकवा आहे की आपला आळस, की आपले मूड स्विंग, ताण की सगळं एकत्रच, हे स्वत:ला कोणतीच सवलत न देता विचारायचं. अनेकदा आपण काहीच करण्या-बोलण्यासारखं सुचत नसेल, तर त्यालाही फटीग म्हणतो. कधी आपल्याला आपल्या रुटीनचा कंटाळा आलेला असतो. कधी आपल्याला कमी वेळात जास्त कामं पडतात. कधी काही पेचातून मार्ग काढत बसावं लागतं. अशा सर्व तात्कालिक कारणांचं बिल मात्र आपण फटीग, स्ट्रेस, डिप्रेशन या शब्दांच्या नावाने फाडत असतो. हे फार लोडेड शब्द आहेत.
एखाद वेळी गुडघ्याला जरासं खरचटतं म्हणून लगेच आपण आता नी रिप्लेसमेंटची वेळ आलीये किंवा आता नां गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागेल, असं बोलत नाही.
एखादा डास चावून लहानसा फोड आला, तर आपण ती गाठ पाहून आपण घाबरून जात नाही, कळतं आपल्याला बसेल थोडय़ा वेळात. लगेच निदान करून टाकत नाही.
तेच सूत्र फटीग, स्ट्रेस, डिप्रेशन वगैरे शब्द वापरताना पाळलं पाहिजे.
आपल्या हातात मनोरंजनाची इतकी साधनं आहेत. इतक्या लोकांचे नंबर्स आपल्या फोनमध्ये स्टोअर केलेले आहेत. तरीही आपण फार चटकन ठरवून टाकतो की, मला जाम बोअर होतंय. मी एकटाच पडलो आहे. त्या त्या वेळी कदाचित काही काळासाठी ते खरंही असू शकतं. पण मुळात आपण जे निदान स्वत:च स्वत:बद्दल चटकन करून टाकतो, तिथे थोडा पॉज घेऊन बघा. खोल श्वास घेऊन डोळे मिटून जरासा विचार करा. आपल्याला त्या-त्या वेळी जे काही वाटत असतं, ते कंटाळा, आळस या गटातलं आहे का? आपण शरीर हालचाल होईल, खाल्लेलं अन्न नीट पचेल, असं शरीर कष्टाचं काही काम केलंय का? किती व्यायाम आपण रोज करतो? आपला आहार कसा असतो? झोप कशी असते? त्यात काय सुधारणा करता येईल? ते स्वत:ला विचारा. काही नवीन शिकून बघा. आपल्या नेहमीच्या रु टीनपेक्षा काही वेगळं करा. वेगळ्या लोकांना भेटा, त्यांच्याशी बोलून बघा. रुटीनमध्ये ठरवून केलेले बदल, चांगल्या आरोग्य सवयी यांच्यामुळेदेखील आपल्या मनाच्या लहान सहान कुरबुरी दूर निघून जातील. आपल्याला फ्रेश वाटेल. सदा रडं बनून हे नाही, ते नाही, हे मिळालं की मी ते करेन असल्या अटी शर्ती बसल्या-बसल्या स्वत:वर लादल्या, तर आयुष्याची गाडी आणखीनच चिखलात रु तेल.
त्यावर उपाय काय?
या कोरोनाकाळात जे घरात बसून कंटाळलेत आणि मला फटीग आलाय म्हणून चिडचिड करत आहेत, त्यांच्यासाठी तर तो फारच महत्त्वाचा आहे.
उठा आणि कामाला लागा.
हा इतका साधा मंत्र आहे.
हा मंत्रच अनेकदा आपल्या आयुष्यात कामास येतोय, याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकेल. पुन्हा कधीही लो वगैरे वाटलं, फटीग आलाय असं वाटलं, तर स्वत:ला हेच आधी बजावायचं. उठ-कामाला लाग!
फटीग, ताण, बसल्या जागी कल्पना करत डोक्यात घुसवून ठेवलेला स्ट्रेस असाच पळून जाईल!
आणि झडझडून काम केल्यानं आपण काहीतरी ‘करत’ असल्याचं समाधानही मिळेल.
(प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्नची अभ्यासक आहे.)