फायटर
By admin | Published: December 3, 2015 10:22 PM2015-12-03T22:22:50+5:302015-12-04T15:22:06+5:30
रूपा आणि रितू. भर रस्त्यात अॅसिड हल्ला झाला आणि त्या दोघींचं जगणंच त्यात खाक झालं. तरी मोठ्या हिमतीनं उभं राहत
Next
- हीनाकौसर खान-पिंजार ( हीना लोकमतच्या पुणे आवृत्तीत बातमीदार/ उपसंपादक आहेत.)
रूपा आणि रितू.
भर रस्त्यात अॅसिड हल्ला झाला
आणि त्या दोघींचं जगणंच त्यात खाक झालं.
तरी मोठ्या हिमतीनं उभं राहत
त्यांनी या हल्ल्याविरोधात जनजागृतीचे प्रयत्न सुरू केलेत.
वयाच्या ऐन पंचविशीत रंगरूपाची फिकीर न करता
त्या एक मोठी लढाई लढताहेत.
आणि सांगताहेत,
आम्ही कोणी पीडित नाही,
बिचाऱ्या नाही.
आम्ही आमच्यावरच्या हल्ल्याविरुद्ध
शारीरिक, मानसिक लढा देत संघर्ष करतोय.
तोंड लपवत नाही, तर ताठ मानेनं जगतोय.
आम्हाला दया नको, कुणाची कीवही नको!
त्यापेक्षा साथ द्या,
आणि आपल्या अवतीभोवती मुलींवर
असे हल्ले होणार नाहीत याची तेवढी काळजी घ्या.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्त्रियांना एकत्र आणून
दरवर्षी एका नव्या चर्चेला व्यासपीठ देणारी
‘लोकमत विमेन समीट’.
त्या चर्चेत सहभागी झालेल्या
अॅसिड अॅटॅक फायटर मुलींशी या विशेष गप्पा.
अॅसिड हल्ला झाला,
हे सिद्ध करतेय!
मी व्हॉलिबॉल खेळाडू होते. व्हॉलिबॉल खेळणं हे माझं पॅशन होतं. त्याही दिवशी मी मैदानावरून व्हॉलिबॉलची प्रॅक्टीस करून घरी परतत होते. सायंकाळची ४-४.३० ची वेळ होती. माझ्या ३९ वर्षांच्या आतेभावानं एकाला सव्वा लाखाची सुपारी देऊन माझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले. चेहऱ्यावर अॅसिड पडताच, मला जळजळ व्हायला लागली आणि क्षणात काहीही दिसणे बंद झाले. नुसताच काळोख दाटला. मी विव्हळत होते, तडफडत रस्त्यावर पडले. रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमा झाली. मात्र कोणीही मदत करायला पुढे आलं नाही. तो मात्र त्याच चौकात एका गाडीत बसून माझी तडफड पाहत होता. थोड्या वेळाने कोणीतरी माझ्या भावाला ही घटना सांगितली आणि मग मला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. या सगळ्यात एक तास गेला आणि तोवर मी बरंच काही गमावलं.
आणि हे सारं का झालं तर माझे वडील, काका आणि आत्यांमध्ये एका घराच्या मालमत्तेवरून वाद सुरू होते. त्या वादविवादाची मी बळी ठरले. त्यात मला असं वाटतं की, त्याच आत्याच्या मुलाला मी बहुधा आवडूू लागले होते. फोन यायचा तेव्हा तो माझ्याशीच बोलायचा. तो माझ्या दुप्पट वयाचा होता. मला नीटसं समजत, उमजतही नव्हतं. अप्रत्यक्षपणे मी आईला एकदा सांगण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र तिलाही तेव्हा ते नीटसं उमगलं नाही. आणि त्यानं माझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलंच. हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी जेव्हा मी माझा चेहरा आरशात पाहिला तेव्हा वाटलं, ‘इससे बेहतर तो मै मरही जाती..’ पण नंतर या ट्रॉमातूनही मी बाहेर आले. ज्यानं माझ्यावर अॅसिड फेकलं तो आज तुरुंगात आहे. मात्र न्यायालयात त्याच्याच समोर उभं राहून मला स्वत:वर झालेला अॅसिडहल्ला सिद्ध करावा लागतोय. पण मी तेही करतेय! आपण आपली लढाई आपल्यासाठीच लढायची, दुसरं कोण लढणार?