एका स्वप्नाची विमान भरारी

By अोंकार करंबेळकर | Published: March 1, 2018 09:40 AM2018-03-01T09:40:53+5:302018-03-01T09:40:53+5:30

अमोल यादव. आता भारतातील पहिला विमान कारखाना सुरू करणार आहेत. लवकरच पालघरमध्ये राज्य शासनाच्या मदतीने भारतातील पहिला विमानबांधणी उद्योग सुरू होणार आहे. कसा झाला हा प्रवास, कुठून आली या नव्या भरारीची जिद्द?

Fighter of a dream plane | एका स्वप्नाची विमान भरारी

एका स्वप्नाची विमान भरारी

Next

ऐंशी वर्षांपूर्वी शिवाजी यादव यांचे वडील साताऱ्यात पोट भरेनासे झालं म्हणून मुंबईत आले. मुंबईत येऊन लहान-मोठे व्यवसाय, नोकऱ्या करत त्यांनी बस्तान बसवलं आणि मुलांना शिकवलं. लहानपणापासून गरिबी पाहिलेल्या शिवाजी यादव यांनी सुरुवातीस शिक्षकी पेशा स्वीकारला आणि नंतर ते बँकेत मोठ्या पदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी बांधकामाचा व्यवसायही सुरू केला. आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन नाव कमवावं अशी सगळ्याच पालकांची इच्छा असते; पण शिवाजी यादव आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत थोडे जास्तच आग्रही होते. मुंबईत मराठी माध्यमातच त्यांची मुलं शिकत होती. पण, आपल्या मुलानं म्हणजे अमोलने वैमानिक व्हावं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी ते काहीही करायला, त्याला कोणतीही मदत करायला तयार होते. अमोललाही शाळेत असल्यापासूनच आपण वैमानिक व्हावं असं वाटायला लागलं होतं. वडिलांचं स्वप्न आणि त्याची जिद्द यावर त्याने वैमानिक होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. बारावीनंतर त्यानं अमेरिकेत कमर्शिअल पायलटचा कोर्स करण्यासाठी प्रवेश मिळवला.

अमोल यादव तिकडे गेला शिक्षणासाठी, विमान उडवायचं शिक्षण घेतलंही. पण केवळ विमान उडवण्यापेक्षा त्याच्या डोक्यात नवे विचार घोळू लागले. आपलं स्वत:चं विमान असावं असं त्याच्या डोक्यात आलं. अमेरिकेत जुनी विमानं विकणाऱ्या कंपन्या, एजंट असतात. अमोल आणि त्यांच्या चार मित्रांनी एकत्र येऊन एक छोटेखानी विमानच विकत घेतलं. आता विमान हातात आल्यावर त्याचा सराव करून गप्प न बसता त्यांनी ते विमान पूर्ण सुटं करून उघडून पाहिलं. त्यावेळेसच त्यांच्या लक्षात आलं आपल्याला विमानाच्या रचनेत, ते उडतं कसं, ते कसं तयार केलं जातं यामध्ये जास्त रस आहे. विमान उडवता येतंच आता आपणच विमान बनवायचं. हेच महत्त्वाकांक्षी स्वप्न मनाशी बाळगूनच तो भारतात आला.

विमान बनवायचं म्हणजे चला सगळं साहित्य जमवलं आणि जोडायला सुरुवात केली असं मुळीच नसतं. आपण स्वप्न तर पाहिलंय, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्या वाटेने जायचं हेसुद्धा त्याला माहिती नव्हतं. भारतात कुठंच विमान तयार केलं जात नसल्यामुळे मदतीसाठी कोणीच नव्हतं. एअरोनॉटिक्स शिकणाºया मुलांचीही उडी विमानाचं एअरोमॉडेल बनवण्यापलीकडे जात नाही. १९९८ साली अमोल यादव शिक्षण घेऊन भारतात आला तेव्हा वेगवान इंटरनेट आणि सगळं काही एका बटणावर उपलब्ध करून देणारे मोबाइलही नव्हते. त्यामुळे विमानाच्या रचनेबद्दल जे काही अर्धमुर्ध माहिती होतं त्याच्या जोरावर अमोलनी विमान बनवायला घेतलं. पण वर्षभरातच ते नीट जमत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं.

मग त्याने मुंबईतील सगळी पुस्तकांची दुकानं पालथी घालायला सुरुवात केली. दुकानात विमानासंदर्भातलं पुस्तक शोधायचं, शक्य असेल तर विकत घ्यायचं नाहीतर तिथंच बसून नोट्स काढायच्या असा सगळा प्रवास झाला. पुरेशी माहिती मिळाली असं वाटल्यावर त्यानं दुसरं विमान करायला घेतलं. २००३ साली ते पूर्णही केलं; पण तो प्रयोगही यशस्वी झाला नाही. या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांचा खर्चही भरपूर झाला होता. कर्ज, हात उसने पैसे घेऊन किती दिवस हे चालवणार हा प्रश्न होताच. २००५ साली त्यानं वैमानिकाची नोकरी पत्करली. पण, आपल्या मुलाने पाहिलेलं स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही हे शिवाजी यादव विसरले नव्हते. थोडी स्थिरता आल्यावर त्यांनी पुन्हा अमोलच्या मागे टुमणं लावलं. अरे किती वेळ वाया घालवतोस, विमानाचं काम पुन्हा हातात घे. त्यांच्या मदतीमुळं अमोलनी २००९ साली पुन्हा तिसºया विमानाचं काम हाती घेतलं. सहा लोक बसू शकतील असं हे विमान २०१६ साली लोकांच्या नजरेत पहिल्यांदा आलं. भारतात घराच्या गच्चीवर विमान तयार करणाºया या माणसाचं नाव सगळ्यांच्या चर्चेमध्ये आले. कौतुक, कुतूहल, शंका, आनंद अशा वेगवेगळ्या भावनांनी भारलेल्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत येत होत्या. पण तयार झालेलं विमान, त्याच्या तांत्रिक व उड्डाणाच्या चाचण्या हा पल्ला विमान तयार करण्याच्या वेळापेक्षा लांबलचक होता. भारतामध्ये विमान तयार केलं जात नसल्यामुळे कोणत्याही विमानाला परवानगी देणारी यंत्रणा नव्हती. विमान उड्डाणाचं देशांतर्गत काम पाहणारी संस्था म्हणजे डीजीसीएला (नागरी विमान उड्डाण महासंचालनालय) यासाठी अमेरिकेच्या फेडरल एव्हीएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे या विमानाच्या परवानगीमध्ये अनेक अडथळे आले. त्याची नोंदणी होण्यामध्येही बराच काळ गेला; पण या सगळ्या प्रवासामध्ये पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मागे उभे राहिले. मुख्यमंत्री फडणवीस नसते तर आपला प्रवास कधीच थांबला असता अशा शब्दांमध्ये अमोल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्याबद्दल बोलताना अमोल सांगतो, ‘आपल्या राज्यातला माणूस विमान तयार करण्यासाठी धडपडतोय म्हणून त्याच्यामागे उभे राहा अशी घाई त्यांनी केली नाही. सर्व तांत्रिक मुद्दे त्यांनी जाणून घेतले, स्वत:च्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेतलं आणि खात्री झाल्यावर मात्र ते माझ्यामागे पूर्ण ताकदीनिशी उभे राहिले.’

आता गेल्या आठवड्यामध्ये राज्य सरकार आणि अमोल यादव यांच्या कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला आहे. पालघरमध्ये भारतातील पहिला विमानबांधणी उद्योग आणि त्याच्या पूरक उद्योगांचा क्लस्टर उभा राहणार आहे. या सगळ्या क्लस्टरमधून ३५ हजार कोटी रुपयांच्या कामाची निर्मिती आणि १० हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध होण्याची आशा राज्य सरकारला आहे. अमोल यादव सांगतो, ‘पहिल्या वर्षभरात या क्लस्टरमध्ये तीन विमाने तयार होऊ शकतील. भारतामध्ये लोकसंख्येचा येणारा ताण पाहता आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे निर्मिती क्षेत्रावर अधिक भर दिला पाहिजे असं मला वाटतं. चीनने या क्षेत्रावर भर देऊन त्यांच्या देशात रोजगाराची निर्मिती केली. आपणही त्याचं अनुकरण करायला हरकत नाही. गेली १९ वर्षे मी माझं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडत आहे, अजूनही त्याला पूर्ण यश आलेले नाही. त्या दिशेने माझा प्रयत्न सुरू आहे. कोणतंही स्वप्न साकार करण्यासाठी आत्मविश्वास लागतो आणि इच्छाशक्ती असेल तरच आत्मविश्वास येतो. मी सगळं केलं किंवा जे करतोय ते केवळ याच इच्छाशक्तीच्या जोरावर. मी दिवसातला जास्तीत जास्त वेळ या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी देतो. त्याला यश येईल ही आशा आहेच.’
लहान विमानं का?
अमोल यादव यांच्या कारखान्यामध्ये १९ आसनांची लहान विमानेच तयार होणार आहेत. अमोल सांगतात, इंग्रजांनी आपल्या देशात ठिकठिकाणी धावपट्ट्या तयार करून विमानप्रवासाची पार्श्वभूमी तयार केली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर त्यांचा वापरच झाला नाही. आता कोठे त्या धावपट्ट्यांच्या दुरुस्तीचा विचार करून त्यांचा वापर सुरू होणार आहे. महाराष्ट्र आणि भारतातील दुर्गम भागामध्ये पोहोचण्यासाठी विमानं हाच उपयोगी पर्याय आहे. त्यामुळे लहान विमानं तयार करण्याचा माझा विचार आहे. रिजनल कनेक्टिव्हीटी चांगली झाली तर लोकांना अनेक सुविधा, जलद प्रवास शक्य होणार आहे. वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन मदत यासाठी लहान विमानं आपल्या देशात मोलाची मदत करू शकतील.

गच्चीवर विमानाचं काम...
कॅप्टन अमोल यांनी आपल्या तिन्ही विमानांची बांधणी घराच्या टेरेसवरच केली होती. आताही त्यांच्या घराच्या गच्चीवर एका १९ आसनी विमानाची बांधणी सुरू आहे. सुरुवातीला लाकडी मॉडेलचा सांगाडा तयार करून मग अ‍ॅल्युमिनियमचा वापर करून विमान तयार करण्यात येत आहे. अमोल यादव एका विमान कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. नोकरीचा वेळ संपला की दिवसातला जास्तीत जास्त वेळ या कामासाठी देतात. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा प्रवास हीच आपली लाइफस्टाइल झाली तर ध्येय साध्य होऊ शकतं असं त्यांना वाटतं. भारतात विमान तयार केल्यास सध्या आपण आयात करत असलेल्या विमानांपेक्षा किमान २५ टक्के कमी खर्चांमध्ये विमानं तयार करता येतील असा त्यांचा अंदाज आहे. विमानातील इतर तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी परदेशी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे.

Web Title: Fighter of a dream plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.