झगडतोय.
By admin | Published: October 16, 2014 07:47 PM2014-10-16T19:47:18+5:302014-10-16T19:47:18+5:30
मनात आग ठेवून हे सगळं लिहितोय हे खरं, पण प्रकाशित होईल की नाही कुणास ठाऊक? रात्रभर रडून किंवा इमोशनल होऊन लिहितोय असं नाही.
- राजेश ढवळे
मनात आग ठेवून हे सगळं लिहितोय हे खरं, पण प्रकाशित होईल की नाही कुणास ठाऊक? रात्रभर रडून किंवा इमोशनल होऊन लिहितोय असं नाही. पण गेल्या पाच वर्षात मनावर साचलेलं मळभ थोडं कमी होईल या उद्देशाने मांडतोय कागदावर हा पसारा.
माझं पूर्ण नाव राजेश, गोंदिया जिल्ह्यातील बोदरा-देऊळगाव हे माझं जन्मगाव. पन्नास घरांचं एक खेडं. गावात दवाखाना नाही, की साधी लायब्ररी नाही. बस येत नाही की कुणाच्या घरी चारचाकी नाही. शाळा शिकायलाही रोज पाच किलोमीटर चालत जावं लागायचं. मध्यम घरातला मी, सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार. दहावीपर्यंतच शिक्षण झालं. पण त्याच वर्षी बाबांना कावीळ झाली. त्यात ते वारले. बारावी विज्ञान शाखेतून केली; पण लहानपणापासूनच डोक्यात काहीतरी हटके करण्याचा किडा होताच. अधून मधून काहीतरी वेगळं करण्याचे झटके यायचे. पेपरांमध्ये लिहायला सुरुवात केली. अगोदर कविता, रोमॅण्टिक लेख असं काहीबाही प्रकाशितही झालं. पण पुढे ते लिहिणंही आवडेनासं झालं. मग इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. या सगळ्यांमध्ये वयाची बावीस वर्षे झाली. आता घरातले सगळे माझ्याकडून अपेक्षा करू लागले.
त्याचकाळात मला एका नंबरवरून फोन आला. म्हणाले, ‘चित्रपट पटकथा लिहिशील का?’ मी जाम खूश. चित्रपट जरी म्हटलं तरी जेवण विसरणारा मी सिनेमा लिहिणार म्हणून हुरळूनच गेलो. सुरुवातीला कामाबद्दल काहीच कळत नव्हतं. डायरेक्टर कुणाला म्हणतात? फिल्म कशी तयार केली जाते? यातलं काहीच माहिती नव्हतं. म्हणून एका प्रोडक्शन कंपनीत कामाला लागलो. पण काही तांत्रिक कारणाने ते प्रोडक्शन बंद पडलं. दोन वर्ष फुकट गेली म्हणून रडलो. घरचे आता बोलायला लागले. पोरगा वाया जाईल म्हणत बोंब ठोकायला लागली.
खूप विचार करून ठरवलं. एखादी शॉर्ट फिल्म करावी, पण पैसे नव्हते. घरच्यांना कळलं तेव्हा तर ते हिरोशिमावर बॉम्ब पडल्यावर झाला तसा हैदोस करू लागले. मी गेल्या तीन वर्षांपासून त्यांना दुरावलो होतो. कुठलीच नोकरी केली नव्हती. एक पैसाही घरी दिला नव्हता. नातलग, मित्रांमध्ये मी पूर्ण बदनाम झालो होतो. कुणीही माझ्यावर विश्वास ठेवेना. कुणीच मदत करीत नव्हता. तरीही मनातली काहीतरी करण्याची लहर काही शांत बसू देत नव्हती. माझ्या सोबतीला गणेश ढाले नावाचा माझा एक मित्र होता. तो पण खूप गरीब घरातला. त्याला पण याच क्षेत्रात पुढे जायचं होत. दोघांचंही स्वप्न परत तग धरू लागलं. ठरवलं जे वाटोळं व्हायचं ते होवो, हिंमत सोडायची नाही.
‘काजळ’ या शॉर्ट फिल्मस्ची सुरूवात झाली. सर्वप्रथम प्रश्न होता पैशाचा. तो कुठून आणणार? कुणीच मदत करेना. मी माझा मोबाइल विकला अन् इकडून तिकडून करून पैसे गोळा केले. कथा लिहिली. शुटिंग पूर्वीची सगळी काम आटोपली. पण कलाकार सापडेना. सतत एक महिना फिरलो. उपाशी राहून कलाकार शोधले. शुटिंग केलं. आत्मविश्वास वाढला .
त्यानंतर ‘मुंडण’ ही माझी दुसरी शॉर्ट फिल्मस. फक्त चार मित्रांनी मिळून तयार केली. स्वत:च्या कष्टानं शॉर्टफिल्म मेकर बनलो. काम जिद्दीनं करत पुढे चाललोय.