प्रथम
By Admin | Published: October 6, 2016 05:23 PM2016-10-06T17:23:24+5:302016-10-06T17:25:17+5:30
इस्त्रोच्या विद्यार्थी योजना प्रोत्साहन उपक्रमांतर्गत मुंबई आयआयटीचा ‘प्रथम’ उपक्रम गेल्या आठवड्यात आकाशी झेपावला, त्याच्या घडण्या-उडण्याची ही कहाणी...
>- स्नेहा मोरे
भारतीय तरुण संशोधन क्षेत्राकडे कमी वळतात अशी खंत कायम व्यक्त केली जाते. तरुणांनी संशोधन क्षेत्रात यावं, कसून अभ्यास करून प्युअर सायन्समध्ये काम करावं, ते करणं किती गरजेचं आहे असं सतत बोललं-लिहिलं जातं!
आणि नुस्तं बोलणं नको. त्या वाटेनं जाणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळावं, त्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात म्हणून काही प्रयत्नही आता संस्थात्मक स्तरावर होऊ लागले आहेत.
साऱ्या उपक्रमांचा भाग म्हणूनच इस्त्रोही काही अभिनव उपक्रम राबवते आहे. तरुण विद्यार्थ्यांना संशोधनात रस निर्माण व्हावा या उद्देशाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (अर्थात इस्त्रोने) विद्यार्थी उपग्रह योजनेला सुरुवात केली. पुण्याच्या आणि चेन्नईच्या कॉलेजातल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत यशस्वी उपग्रह बनवल्यानंतर आता मुंबई आयआयटीच्या तरुण दोस्तांनीही एक नवीन उडान घेतले आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी घडविलेल्या ‘प्रथम’ या उपग्रहाच्या घडण्याची आणि आकाशात झेपावण्याच्या प्रवासाची कहाणी जाणून घेण्यासाठी त्या टीममधल्या शशांक तमासकर आणि सप्तर्षी बंडोपाध्याय या दोस्तांशी गप्पा मारल्या..
आकाशात झेप घेण्याची हाक
एरोस्पेस क्षेत्रात करिअर करायचं असं मी मनापासून ठरवलंच होतं. आयआयटीमध्ये प्रवेश घेतला आणि या क्षेत्राचे वेगवेगळे पैलू माझ्यासाठी उलगडायला लागले. त्यातून मला कळत गेलं की आपल्याला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं, पण त्यातलंही रुटीन असं काही करायचं नाही. म्हणजे इंजिनिअरिंग किंवा एव्हीएशन क्षेत्रात जायचं नाही. काहीतरी वेगळं करायचं. ते शोधायला मित्र, प्राध्यापकांशी चर्चा सुरू झाली. तासन्तास ही चर्चा कमी भांडणंच चालायची. खूप बाजूनं आम्ही विषयाचा विचार करायचो. आणि त्या चर्चांमधूनच ‘प्रथम’चा विचार जन्माला आला. ते साल २००७ होतं. त्यानंतर सप्तर्षी या मित्रासोबत त्यावर काम सुरू झालं. आणि मग आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिळून प्रथमची बांधणी सुरू केली.
- शशांक तमासकर
जीव जाईस्तोवर प्रयत्न आणि कष्ट
प्रथमची नुस्ती संकल्पना डोक्यात चमकली तिथपासून ते थेट ‘प्रथम’ प्रत्यक्षात साकारण्यापर्यंतच्या प्रवासात खूप चढउतार आले. शारीरिक थकवा तर होताच, पण बऱ्याच वेळा मानसिक ताणालाही सामोरं जावं लागलं. संकल्पना निश्चित झाल्यानंतर टप्प्याटप्प्यानंतर सर्व स्तरातून अपेक्षा वाढत होत्या, जबाबदारी वाढत होती. त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करायची आणि शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत हे मनाशी पक्कं केलं होतं. मित्रपरिवार, महाविद्यालय यांच्या गटापासून सुरू झालेला प्रवास मग वाढत गेला. त्यात समाज, कुटुंब, राष्ट्र, जागतिक पातळीवर आपल्या कामाकडे कोणीतरी पाहतंय याची जाणीव होत होती.
‘प्रथम’ आकाशात झेपावणार होतं त्याच्या आदल्या रात्रीची परिस्थिती आठवली तरी अजून अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्या ‘स्वप्नपूर्ती’चा दिवस उद्या उजाडणार या विचारानं आम्ही झोपलोच नाही. प्रथम यशस्वीरीत्या आकाशात झेपावला त्याक्षणी एक भावना आमच्या साऱ्यांच्याच मनात चमकून गेली. आपण आपल्या देशासाठी काहीतरी केलं या आनंदानं मन भरून गेलं. आता खरंतर आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आणि या अनुभवातून आम्ही एकच गोष्ट शिकलो की, आपलं जे स्वप्न आहे त्याच्या झपाटून मागे लागलं आणि जीव जाईपर्यंत प्रयत्न केले तर आपली स्वप्नं सत्यात उतरताना दिसतात. आपलंच नाही तर आपल्या देशाचं नाव जगाच्या कॅनव्हासवर उमटवण्यासाठी पुढाकार तर आपणच घ्यायला हवा ना?
- सप्तर्षी बंडोपाध्याय
प्रथमचा प्रवास
आयआयटीच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक असणाऱ्या ‘प्रथम’ या उपग्रहाने नुकतीच अवकाशात झेप घेतली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेतील हा सातवा उपग्रह आहे. या उपग्रहामुळे विद्युत परमाणू मोजता येणार आहेत. आयआयटीचे माजी विद्यार्थी सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर या दोघांनी २००७ मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना मांडली. २००९ मध्ये ‘इस्त्रो’ आणि ‘आयआयटी’मध्ये करार झाला. आयआयटी मुंबई आणि इस्त्रो यांच्यात झालेल्या करारानंतर २०१२ मध्ये या उपग्रहाचे प्रक्षेपण अपेक्षित होते. पण प्रशासकीय दिरंगाई आणि काही तांत्रिक अडचणींमुळे उपग्रहाचे प्रक्षेपण होऊ शकले नाही. तरीही या उपग्रहाचे काम मात्र अविरतपणे सुरू होते. २०१४ साली या सामंजस्य कराराला मुदतवाढ देण्यात आली. तब्बल नऊ वर्षांच्या वाटचालीनंतर या उपग्रहाने अवकाशात झेप घेतली.
३० विद्यार्थ्यांच्या चमूने ‘प्रथम’साठी काम केले असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ‘प्रथम’मुळे देशातील १५ विद्यापीठांतील माहिती संकलन केंद्रांमध्ये विद्युत परमाणंूची नोंद होणार आहे. ‘प्रथम’सह बेंगळुरूच्या पीएसई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रहही अवकाशात सोहण्यात आला. ‘प्रथम’कडून येणाऱ्या माहितीचे निरीक्षणही विद्यार्थ्यांमार्फतच करण्यात येणार आहे. आणि ती माहिती इतर शैक्षणिक संस्थांना पाठविली जाणार आहे.
नकाराच्या सुरांनाच नकार
भारताला अनेक सामाजिक, आर्थिक समस्यांनी विळखा घातला आहे. अशी परिस्थिती असताना देशात असे अवकाश कार्यक्रम राबवू नये असा सूर आळवला जात होता. परंतु त्याला प्रत्युत्तर देत सर्वसामान्यांच्या जगण्याला आधार देणारे तंत्रज्ञान विकसित करून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आपली वाटचाल सुरू ठेवली. विद्यार्थी उपग्रह योजना हा त्याचाच एक भाग आहे.
जागतिक बाजारपेठेची दारं उघडतील
२०१६ च्या अखेरीस जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेइकल मार्क-३ (जीएसएलव्ही) याद्वारे चार टन एवढ्या जास्त वजनाचा दूरसंचार उपग्रह अवकाशात झेपावणार आहे. त्याचे प्रक्षेपण झाले की जागतिक बाजारपेठेची दारे आपल्यासाठी सताड उघडतील. कारण भारतीय ‘जीएसएलव्ही’ इतरांपेक्षा अर्ध्या किमतीत मोठ्या वजनाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करू शकेल. या यशाबरोबरच देशाची अवकाश मोहिमेद्वारे मिळालेली कमाई १२ कोटी डॉलरपर्यंत पोहोचलेली असेल.
(स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.)