एका उडण्याची गोष्ट
By admin | Published: June 1, 2017 11:06 AM2017-06-01T11:06:39+5:302017-06-01T11:06:39+5:30
असल्या नसल्या पंखात बळ भरणारी स्वप्न माणसाला उडायला लावतात, हे शब्दश: खरं होतं तेव्हा..
Next
>साहेबराव नरसाळे
लहान वयात सिनेमा पाहून कळलं, हवेत मोठा फुगा घेवून उडता येतं, त्यानं ध्यासच घेतला आकाशात उडायचा. पण जमीनीवरचं वास्तव असं की, पैशाची चणचण, मदतीला कुणी नाही, नगरपालिकेची कचरा डेपोत राखणदाराची नोकरी. पण मन मानायला तयार नव्हतं. म्हणून तो धडका मारत राहिला.. आणि शेवटी उडालाच..अजून उडतोय..नवनवे विक्रम करत..त्या एका ध्येयवेड्याचा हा प्रवास
लहानपणी आई त्याला सूर्याला गिळायला निघालेल्या हनुमानाची गोष्ट सांगायची.
ती गोष्ट सोबत होतीच आणि मग एकदा याराना सिनेमा पाहिला.
आणि वाटलं आपणही असं का उडू नये?
मग त्यानं तसं उडण्याचा ध्यासच घेतला.
आप्पासाहेब ढूस नावाच्या तरुणाची ही गोष्ट.
उडून पाहण्याचं वेड वाढत्या वयात असं काही होतं की आप्पासाहेबने बारदानाचा भला मोठा पतंग केला अन घेतली घराच्या छतावरुन उडी़ हा पतंग हवेत उडाला नाही़ मात्र, जमिनीवर धाडकन हा पोरगा आदळला़ हात-पाय मोडले नाहीत़ पण आईचा जोरदार रट्टा पाठीत बसला़
आप्पासाहेब त्यावेळी सहावीत शिकत होता.
अठराविसे दारिद्र्य असलेल्या शेतकरी कुटुंबात आप्पासाहेब यांचा जन्म झाला़ वडील भीमराज यांचे अपघाती निधन झाले़ त्यावेळी आप्पासाहेब अगदी न कळत्या वयातच होते़ पितृछत्र हरपलेल्या आप्पासाहेब व त्यांच्या तीन भावंडांना आई चांगुणाबाई यांनी काबाडकष्ट करून वाढवले़
वय वाढलं पण हे उडून पाहण्याचं वेड काही कमी झालं नाही. ते ही सोबत वाढलंच. देवळाली प्रवरा नगरपरिषदेमध्ये १९९० साली आठ रुपये रोजंदारीप्रमाणे नोकरी मिळाली़ नगरपरिषदेमध्ये काम करता करता अर्धवट राहिलेलं शिक्षणही सुरु होतं. दरम्यान १९९३ मध्ये नंदाशी लग्न झालं. पण आर्थिक परिस्थिती नाजूकच राहिली़ संसाराच्या ओढाताणीत हनुमान उडीचं स्वप्न मात्र मनात मूळ धरुन होतंच. पण वृत्तपत्र व पुस्तकांमधून उड्डाणाबाबतची माहिती एकत्र करण्यापलीकडे आप्पासाहेबांना काहीच करता आलं नाही.
मात्र एकदा पुण्याच्या राजन जुवेकरांनी नगर येथे पॅराग्लायडींगचा कॅम्प भरवला होता़ त्या कॅम्पला जायचं आप्पासाहेबने ठरवलं. ४३ लोकांच्या त्या कॅम्पमध्ये आप्पासाहेबांचे खेळाचं कसब पाहून राजन जुवेकरांनी अर्धी फी माफ केली व पुढील अद्ययावत प्रशिक्षणासाठी पुण्याला बाणेर येथे नेलं. एक महिना जुवेकरांकडे प्रशिक्षण घेतलं आणि २६ डिसेंबर १९९९ ला पाचगणीच्या हॅरीसन फॉलवरुन अडीच हजार फूट उंचीवरुन स्वत:ला हवेत झोकून दिलं. ही आप्पासाहेबाची पहिली हनुमान उडी़ मग त्यांनी मनाशी घेतलं की श्रीलंका ते भारत हा प्रवास हवेतून करायचा.
दरम्यान अहमदनगरला काही हौशी खेळाडूंनी एकत्र येत एक जुनं पॅराग्लायडर विकत घेतलं व त्यावर गोरक्षनाथ डोंगरावरून सरावाला सुरुवात झाली. २००१ व २००२ मध्ये याच जुन्या साहित्यावर पुणे येथे राष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धेत आप्पासाहेबानी सहभागही घेतला. पण जुन्या साहित्यावर किती दिवस व कसे खेळणार, हा प्रश्न होताच़ म्हणून नवीन साहित्य घेण्यासाठी कोणी आर्थिक मदत करतंय का याचा शोध सुरु झाला़ पण मदतीऐवजी हा मूर्खपणाचा खेळ थांबवण्याचा सल्ला मिळू लागला़
रेमन्ड कंपनीचे मालक डॉ़ विजयपत सिंघानिया २००५ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी बलूनमधून उंच उडण्याचा विश्वविक्रम करणार असल्याची माहिती आप्पासाहेबांना वृत्तपत्राने दिली़ आप्पासाहेबांनी सिंघानियांशी संपर्क साधला़ १ मे २००६ रोजी मुंबई येथे समक्ष भेट झाली़ डॉ. सिंघानियांनी सारं ऐकून घेतलं आणि सांगितलं की पुढील प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जा. त्यांचं मार्गदर्शन होतंच. पण पैसा कुठून आणणार एवढा? वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यावर अनेक दानशूर व्यक्ती व संस्था मदतीसाठी धावून आल्या.
श्रीरामपूर नगरपरिषद, राहुरी नगरपरिषद, संगमनेर नगरपरिषद, शिर्डी नगरपंचायत, श्री साईबाबा संस्थान (शिर्डी), काही सहकारी पतसंस्थांनी आप्पासाहेबांना भरीव मदत केली़ राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनीही मदत केली. स्वत:च्या खिशातून पैसे देण्यापासून ते शासकीय पातळीवरील मदत मिळवून देण्यातही विखे यांचा सिंहाचा वाटा होता़ देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण आणि राहुरी कारखान्याचे माजी संचालक कारभारी डौले हे दोघेही हातातील कामे सोडून आप्पासाहेबांना उभारी देत होते़ माध्यमांपुढे सतत सकारात्मक बाजू मांडत होते़ काहीजण टिंगल, टीका करायचे त्यानं आप्पासाहेब निराश व्हायचे. पण मित्रांनी आधार दिल्यानं त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करायचा ध्यास घेतला.
आप्पासाहेबाची अमेरिकेला जाण्याची जय्यत तयारी सुरु झाली होती़ त्याचवेळी माध्यमातूनही प्रसिद्धी मिळत होती़ कधी कधी ही प्रसिद्धीच माणसाचा घात करते, याचा प्रत्यय आप्पासाहेबांना त्यावेळी आला़ नगरपरिषदेत सहकारी आणि वरिष्ठांकडून आप्पासाहेबांची पिळवणूक सुरु झाली़ पदवीधर आप्पासाहेबांना नगरपरिषदेने थेट कचरा डेपोची राखण करायला पाठवलं गेलं. दुसरीकडे अमेरिकेचा व्हिसा मिळावा, म्हणून आप्पासाहेबांनी पायाला चक्र बांधलं होतं. एकीकडे व्हिसासाठी प्रयत्न तर दुसरीकडे कचऱ्याची राखण, अशी दुहेरी कसरत. दिवसभर कचरा डेपोतील दगडावर बसून आपलाच कचरा झाल्याची खंत आप्पासाहेबांना खायला उठायची़ ही खंत आप्पासाहेबांनी नगरपरिषदेला लेखी कळवली़ मात्र, या पत्राचा उलटा परिणाम झाला़ आता आप्पासाहेबांना कधी गटार साफ करायला धाडायचे तर कधी नाली उकरायला़ कधी कधी सकाळीच ड्यूटी लागायची कचरा गोळा करायला़ हे सगळे करुन झाले आणि पुन्हा ड्यूटी लागली कचरा राखायला़ दिवसभर सडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी नाकात साठवून आप्पासाहेब मुर्दाड मनाने घरी जायचे़
त्यात आणखी भर म्हणून की काय अमेरिकेने व्हिसा नाकारला होता़ आता सर्व संपले होते़ उमेद खचली होती़ पण शेवटचा चान्स घ्यायचा म्हणून आप्पासाहेबांनी थेट काही प्रशिक्षकांना गाठले़ सर्व हकीकत सांगितली़ त्यांनी यातून मार्ग काढत हे प्रशिक्षण अमेरिकेत करण्याऐवजी दुबईत करण्याचा सल्ला दिला़ अमेरिकेतील प्रशिक्षक स्टिफन यांना दुबईत पाचारण केले़ तेही येण्यास राजी झाले़
नगरपरिषदेच्या कचरा डेपोतून उड्डाण घेत आप्पासाहेब पोहोचला थेट दुबईत़ प्रशिक्षण सुरू झालं. विमानातून १२ हजार फूट उंचावरुन उडी मारायची होती़
आप्पासाहेब सांगतात, ‘ही वेळ करा किंवा मरा अशीच होती़ उडी मारली तर यश आणि नाही मारली तर कचरा डेपो दिसत होता. आपल्याला खूप वाईट काम दिलं म्हणून त्यावेळी वाईट वाटायचं. पण त्यांच्यामुळेच मी आज मोठा विक्रम करीत असल्याच्या विचारानं सुखावलोही. त मी २००८ मध्ये दुबईत १२ हजार फूट उंच विमानातून १२ वेळा उडी मारण्याचा पराक्रम केला़ लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझ्या पहिल्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली. माझा पुढील प्रशिक्षणाचा रस्ता मोकळा झाला आणि हवेत उडण्याच्या विविध क्रीडा प्रकारातील प्रशिक्षणाला सुरुवात झाली.’
आप्पासाहेबानी पॅराग्लायडींगचा विक्रम नावावर केला होता़ आता त्यांना वेध लागले होते़ पॉवर पॅराग्लायडींगचे (पॅरामोटर)़ २००९ मध्ये त्यांनी पॅरामोटरचे प्राथमिक प्रशिक्षण पुण्याला घेतलं. २०१० मध्ये नॅशनल अॅडव्हेंचर फाऊंडेशन (दिल्ली) या संस्थेच्या विंग कमांडर एस़ के़ जे़ नायर यांनी पॉवर हँग ग्लायडींग प्रकाराचे प्रशिक्षण केरळच्या मुझपिलंगड जिल्ह्यातील थेलीचेरी बिचवर दिले. त्यानंतर देशातील विविध ठिकाणी जाऊन साहित्य भाड्यानं घेवून सराव सुरू झाला.
आणि एकेक करत आप्पासाहेबानं या साहसी क्रीडा प्रकारात अनेक विक्रम केले.
मनात उडायची इच्छा असली तर असल्या नसल्या पंखात बळ भरलं जातंच, याचं हे एक उदाहरण आहे.
सन २०१६ मध्ये जागतिक पॅरामोटर स्पर्धा थायलंड येथे झाली़या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांनी बायकोचे काही दागिने गहाण ठेवले, मित्रांकडून कर्ज घेतले. या स्पर्धेत एक रजत आणि दोन कांस्यपदकं त्यांनी जिंकली. पॅरामोटर या साहसी क्रीडा स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावणारा भारतीय खेळाडू म्हणून आप्पासाहेब ढूसचं नाव स्पर्धेच्या इतिहासात नोंदलं गेलं. एका स्पर्धेत तीन मेडल मिळविणारा साहसी खेळाडू म्हणून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने आप्पासाहेबांच्या नावाची नोंद केली़
साहसी क्रीडा प्रकारात आप्पासाहेब ढूस यांनी मारलेल्या हनुमान उडीची महाराष्ट्र शासनानेही दखल घेत त्यांना २०११-१२ साठीचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा शिवछत्रपती राज्य साहसी पुरस्कार देऊन सन्मानित केल्र. त्याचबरोबर विखे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून पाच लाख रुपये आर्थिक मदतही मिळाली. शासनाच्या पैशात काही कर्जाऊ मिळविलेली रक्कम टाकून आठ लाख रुपये किमतीचे साधे पॉवर पॅरामोटर आप्पासाहेबांनी विकत घेतलं. त्यावर हवेत उंचच उंच उडण्याचे तंत्र आत्मसात केलं. पुढे २०१४ मध्ये थायलंड येथे पॉवर पॅराग्लायडींगचे (पॅरामोटर) अद्ययावत प्रशिक्षण घेतलं.
यंदा १ ते ७ मे दरम्यान एशियन ओशियानिक पॅरामोटर चॅम्पियनशिप व वर्ल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिप टेस्ट कॉम्पीटिशन स्पर्धा थायलंडला झाली़ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीही आप्पासाहेब ढूस यांनी पुन्हा महाराष्ट्र शासनकडे आर्थिक मदतीची मागणी केली. पण मदत आली नाही. मग आप्पासाहेबांनं शेतातला हरभरा, सोयाबीन विकून स्पर्धेसाठी पैसे उभे केले़ काही पुन्हा मित्रांकडून हातउसने घेतले़ पॅरामोटर या हवेतील साहसी क्रीडा प्रकारातील प्युअर इकॉनॉमी टास्क प्रकारात आप्पासाहेबांनी सुवर्णपदक पटकावलं. या सुवर्णपदकाने पुढील वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरामोटर स्पर्धेत त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे.
(साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत सहाय्यक उपसंपादक आहेत़)