फुटबॉलची किक - वेगवान स्वप्नाचा पाठलाग करणारी एक थरारक गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 03:09 PM2017-10-04T15:09:30+5:302017-10-05T08:54:51+5:30
उद्यापासून १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप देशाच्या राजधानीत सुरू होतो आहे. फुटबॉल खेळणा-या देशांच्या वेगवान जगात भारताचं हे पदार्पण आहेच; पण फुटबॉलवेड्या भारतीय तरुणांसाठीही ही एका नव्या स्वप्नाची सुरुवात आहे. त्या वेगवान स्वप्नाचा पाठलाग करणारी एक थरारक गोष्ट...
- मेघना ढोके
FIFA U-17 World Cup INDIA
हे वाचताना काय येतं मनात?
भारत? आणि फुटबॉल?
क्रिकेट चॅम्पियन असलेला हा क्रिकेटवेडा देश.
या मातीत फुटबॉल रुजेल? मुख्य म्हणजे फुटबॉल खेळणाºया देशांच्या झेंड्यांच्या तक्त्यात कधी ‘तिरंगा’ दिसेल..
अशी स्वप्न या देशातल्या फुटबॉलप्रेमी तारुण्यानं आजवर पाहिली असतील; पण ती खरी होतील, असं कुणाला वाटलं होतं...
पण ते स्वप्न खरं होतंय, फुटबॉल वर्ल्डकप ना सही, १७ वर्षांखालील मुलांचा फुटबॉल वर्ल्डकप तरी भारतात, देशाच्या राजधानीत, दिल्लीत उद्यापासून सुरू होतो आहे.
भारतासाठी, भारतीय फुटबॉलसाठी ही एक मोठी घटना आहे, आणि आपण सारे या एका नव्या पर्वाचे साक्षीदार आहोत. एक नवा गोल होतोय भारतीय फुटबॉलच्या इतिहासात, ते आपण पाहणार आहोत ही भावनाही काही कमी थरारक नाही.
फिफा, अर्थात फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन या अधिकृत संस्थेमार्फत भारतात भरवला जाणारा हा फुटबॉल वर्ल्डकप, देश म्हणून भारत पहिल्यांदा या फुटबॉलवेड्या जगात दाखल होतो आहे. त्या जगात आपल्या ‘अरायव्हलचा’ अर्थात आगमनाचा बिगुल वाजतो आहे आणि भारतीय तारुण्याच्या नसांतही फुटबॉलचा थरार उसळतो आहे हे जगाला दाखवण्याची ही एक संधी आहे...
खरं सांगायचं तर भारतीय फुटबॉलसाठीच ही नाऊ अॅण्ड नेव्हर अशी एक महत्त्वाकांक्षी संधी आहे. आणि मैदानात हारजितीपलीकडचा फुटबॉल ही संधी भारतीय जनमानसात फुटबॉलप्रेम पोहचवू शकली तर ते या वर्ल्डकपचं मोठं यश म्हणायला हवं !
आजच्या घडीला जगभरातले २४ देश हा वर्ल्डकप खेळायला भारतात दाखल झाले आहेत. प्लेइंग चॅम्पियन आहे, नायजेरिया. दक्षिण आफ्रिकेतला हा छोटासा देश; पण फुटबॉलच्या जगात त्यांनीही आपली कर्तबगारी सिद्ध करायला सुरुवात केली आहे.
जे त्यांना जमलं ते भारतीय खेळाडूंना जमेल का?
- जमेलही ! कारण भारतीय टीमचे कोच लइस मातोस म्हणतात तसं, ‘टीमची तयारी अशी आहे की, गेम संपेल, प्रत्येक मॅच संपेल तेव्हा या टीमला स्वत:विषयी आणि देशाला टीमविषयी नक्की अभिमान वाटेल. आंतरराष्टÑीय स्तरावरचे अशा पद्धतीचे सामने खेळण्याचा अनुभव या टीमला नाही. बट वी वील फाइट नो मॅटर व्हॉट !’ हा अॅटिट्यूड हीच या खेळाडूंची मोठी कमाई आहे.
कारण आजवरच्या भारतीय फुटबॉलच्या इतिहासात सगळ्यात ‘तयार’ अशी ही टीम आहे. इतकी वर्षे भारतीय फुटबॉल टीमना विदेशी भूमीवर खेळण्याचा अनुभव फार क्वचित मिळायचा. एखादा बायचुंग भूतिया त्यातही आपल्या खेळाची चमक दाखवायचाच. पण टीम म्हणून विदेशात, त्यांच्या दर्जाचा फुटबॉल खेळणं हे भारतीय फुटबॉल खेळाडूंसाठी एक अशक्य वाटणारं स्वप्न होतं. पण सुदैवानं या टीमचं तसं नाही. भारतीय फुटबॉलच्या संदर्भातही काही चांगलं घडतं आहे, अशी आशा वाटावी इतपत चांगल्या गोष्टी या टीमच्या वाट्याला आल्या आहेत. सराव म्हणून २०१५ पासून या भारतीय संघानं विदेशात १७ वेळा प्रवास केला. त्यात त्यांनी १८ देशांमध्ये सामने खेळले. सुमारे ८४ सामने तयारीसाठी हा संघ विदेशात खेळला आहे. आणि त्यापैकी ३९ सामने तो जिंकलाही आहे, १५ सामने ड्रॉ करण्यात यशही मिळवलं आहे. त्यातले काही स्पर्धात्मक होते, काही मैत्रीपूर्ण लढती होत्या. पण तरीही होते फुटबॉल सामनेच. आणि विदेशी ‘तयारी’च्या खेळाडूंसोबत खेळण्याच्या अनुभवानं या टीमचं मनोधैर्य उंचावलेलं आहे. विशेष म्हणजे जिंकण्याचा सरासरी रेटही या टीमचा चांगला आहे. सरकार आणि आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनने तयारीसाठी पैसा ओतला ही आणखी एक महत्त्वाची बाब.
खेळात आकडेवारीला महत्त्व असतं आणि नसतंही. पण तरीही ही आकडेवारी यासाठी सांगितली की, आपल्याला फारसं माहिती नसलं तरी जेमतेम १७ वर्षांच्या आतले हे भारतीय फुटबॉलपटू तयारीनं जागतिक फुटबॉल स्पर्धेत उतरत आहेत.
जागतिक स्तरावर खेळल्या जाणाºया थरारक स्पर्धेत भारतासारखा महाकाय देश आपलं नाणं वाजवून दाखवण्याच्या तयारीत असताना, या देशाची टीमही अत्यंत मेहनतीने, जिंकण्याच्या ईर्षेनं मैदानात उतरत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
फुटबॉल, त्यातला पैसा, त्याला असलेलं ग्लॅमर, अमेरिका-रशिया-युरोप यांसारख्या मातब्बर बाजारपेठेत भारतानंही वाटा सांगावा याअर्थीही या फुटबॉल सामन्यांना मोठं महत्त्व आहे. जो खेळ जगभर खेळला जातो, त्याखेळावरही आमची पकड असू शकते, त्यातून एक मोठी स्पोर्ट डिप्लोमसी घडू शकते याअर्थानं आंतरराष्टÑीय राजकारणातही भारताचं फुटबॉल खेळणं बरंच काही सांगणारं, सिद्ध करणारं असू शकतं. पण तो झाला आंतराष्टÑीय क्रीडा कुटनीतीचा भाग.
त्याशिवायही हा थरारक खेळ भारतात, भारतीय तारुण्यात रुजेल यासाठीची एक सुरुवात आहे. आणि सुरुवात आहे आजवर ‘मेनस्ट्रिम’ न मानल्या गेलेल्या एका छोट्या राज्यानं भारताचं प्रतिनिधित्व करण्याची.
मणिपूर.
हे एक ईशान्येतलं छोटंसं फुटबॉल वेडं राज्य.
आज भारतीय फुटबॉलचं नेतृत्व करतं आहे.
वर्ल्डकप खेळणाºया टीममध्ये आठ खेळाडू मणिपूरचे आहेत.
अत्यंत कष्टात, गरिबीत आणि सतत ‘बंद’च्या छायेत, कर्फ्युच्या सावटात आणि मिल्ट्रीच्या धाकात जगणारं मणिपुरी तारुण्य.
अत्यंत अस्वस्थ उद्रेकी वातावरणात फुटबॉलने जगण्याची उमेद दिलेली हे तारुण्य, आज त्याच्यावर भारतीय फुटबॉलचा सारा करिश्मा अवलंबून आहे.
त्या तरुणांना भेटलं तर भारतीय जिद्दीचा, वेगाचा आणि गुणवत्तेचा आणखी एक चेहरा आपल्याला भेटतो.
त्यांना भेटा..
फुटबॉलवर असलेलं प्रेम या मणिपुरी तारुण्यावरही प्रेम करायला भाग पाडेल आणि भारतीय म्हणून आपल्याला परस्परांशी जोडताना फुटबॉल एक नवा देशांतर्गत पूलही बांधेल अशी आशा वाटेल...
त्या आशेनं, उमेदीनं मूळ धरावं, याच या फुटबॉल वर्ल्डकपला शुभेच्छा!
मणिपूरचा मास्टरस्ट्रोक
मणिपूरमध्ये फुटबॉल फीव्हर मोठा. घरोघरची मुलं फुटबॉल खेळतात. पहाडी राज्य. पण मिळेल त्या मोकळ्या मैदानात दिवस दिवस फुटबॉल खेळणारे अनेकजण. अतिरेकी कारवाया, मिल्ट्रीचा चोख पहारा, रात्रंदिवस घरासमोर पहारा देणारे सैनिक, सतत अतिरेकी गटांकडून पुकारले जाणारे बंद, रास्ता रोको यासाºयात जीवनावश्यक गोष्टींच्या यादीत तिथं फुटबॉल कधी आला आणि त्यानं तरुण मुलांना जगवलं हे कुणाच्या लक्षातही आलं नाही.
एकीकडे मणिपूर हे सर्वाधिक व्यसनाधिन राज्य. ड्रग्ज घेण्याचं प्रमाण मोठं. तरुण-तरुणी पन्नास रुपयांचं एक नशिलं इन्जेक्शन ( त्याला स्थानिक भाषेत पीस म्हणतात) टोचून घेतात. उद्ध्वस्त होतात आयुष्य.
अशा तारुण्याला इथं जगायचं बळ दिलं ते फुटबॉलनं. आणि आता तर भारतीय १७ वर्षांखालील टीममध्ये आठ मणिपुरी खेळाडू आहेत.
त्या प्रत्येकाची गोष्ट, नुस्ती प्रेरणादायी नाही तर अस्वस्थ करणारी आणि तितकीच उमेद देणारी आहे..
सामने पाहण्यापूर्वी म्हणूनच या त्यापैकी काही तरुण मुलांना भेटायला हवं..
अमरजित सिंग कियाम
अमरजित सिंग मणिपूरचा. भारतीय संघाचा कप्तान. भारतीय फुटबॉलचा नवा चेहरा म्हणून या मुलाचं नाव फुटबॉल जगात कौतुकानं घेतलं जातं. संघाचे कोच मातोस यांनी एक निवड चाचणीच घेतली आणि २१ मुलांपैकी बहुसंख्य मुलांनी अमरजितला मतं दिली.
मणिपुरातल्या थौबल जिल्ह्यातल्या हाओखा मामंग नावाच्या छोट्याशा खेड्यातला हा मुलगा. मणिपूरची राजधानी इम्फाळपासून २५ किलोमीटरवरचं हे गाव. वडिलांची अगदी छोटीशी शेती. त्यात जेमतेम पिकणारा भात. आई तळ्यातून मासे आणून विकायची, कधी इम्फाळला जाऊनही मासे विकून यायची. त्यावर या कुटुंबाची गुजराण चालते. शेती बारमाही नसल्यानं वडील सुतारकामही करत. पण आपल्या मुलाच्या फुटबॉलवेडासाठी त्या दोघांनी पै पै जमवले.. शक्य होतं तेव्हा इम्फाळला खेळायलाही पाठवलं.
अमरजित सांगतो, कधीतरी देशासाठी फुटबॉल खेळेन असं माझं स्वप्न होतं. अजूनही ते स्वप्नच आहे, आणि आता संधी समोर असताना मी ती सहजी गमावणार नाही.
अमरजितचा भाऊ उमाकांता सिंगपण फुटबॉलवेडा. त्याचा चंदीगडच्या फुटबॉल अकॅडमीत नंबर लागला होता. पुढे अमरजितलाही तिथं प्रवेश मिळाला. राहणं, खाणं, शिक्षण आणि फुटबॉल यासाºयाची जबाबदारी अकॅडमीनं घेतली आणि तो मणिपूरच्या बाहेर पडला. २०१५मध्ये गोव्याच्या स्पर्धेत अमरजितने उत्तम कामगिरी केली तेव्हा तो एकदम नॅशनल रडारवर झळकला. आणि त्यानंतर गोव्याच्या एआयएफएफ अकॅडमीत त्याचं प्रोफेशनल ट्रेनिंग सुरू झालं.
आणि आज तो भारतीय फुटबॉल संघाचा कप्तान आहे.
मोहंमद शाहजहान
शाहजहान संघात मिड फिल्डर म्हणून खेळतो. त्याच्या घरात एकूण आठ भावंडं. हा सगळ्यात लहान. फुटबॉल खेळायचा; पण पायात चांगले बूट नाही. पहिल्यांदा सगळ्यात महागडे २५० रुपयांचे बूट त्यानं घेतले तेव्हा वडिलांनी त्याला विचारलं की, ‘एवढे महाग बूट का घेतलेस, असं काय मिळेल तुला हा फुटबॉल खेळून?’
त्यावर त्यानं शांतपणे सांगितलं होतं, ‘बाबा, मी एक दिवस वर्ल्डकप खेळेल !’
ते शब्द आज हा मुलगा खरे करतोय. घरात गरिबी. वडील टेलर. शाहजहानचा भाऊ सुलेमानही फुटबॉलवेडा. पण परिस्थितीमुळे तो आॅटोरिक्षा चालवायला लागला. पण आपल्या भावावर ही वेळ येऊ नये म्हणून त्यानं नऊ वर्षाच्या शाहजहानला एका क्लबमध्ये दाखल केलं. खुरी नावाच्या गावात, इम्फाळपासून सहा किलोमीटर अंतरावर हे कुटुंब रहायचं. आणि शाहजहान रोज सहा किलोमीटर फुटबॉल खेळायला इम्फाळमध्ये यायचा.
क्लबचे प्रमुख प्रशिक्षक बिरेन सिंग यांनी शाहजहानची गुणवत्ता हेरली. त्याला विविध मॅचेस खेळवल्या आणि आज तो भारतीय संघात आहे.
सुलेमान सांगतो, ‘जिंकणं हरणं नंतर, शाहजहान भारतीय संघात खेळतोय ही भावनाच इतकी भव्य आहे की, आम्ही सारं कुटुंब, आईवडील त्या दिवशी खूप वेळ फक्त रडलो.. ’
निथोंगबा मिताइ
इम्फाळ हा मिताईबहुल भाग. मिताई समाज मोठा. पण गरीब. निथोंगबा त्यातलाच एक. आज भारतीय संघात खेळतोय; पण सामने संपल्यावर घरी जाईल तेव्हा एक झापवजा घर त्याची वाट पाहत उभं असेल...
निंथॉय म्हणतात त्याला सारे. दोनच महिन्यांपूर्वी त्याचे वडील अकाली गेले. ते दूध विकायचे. आई मीना, कशीबशी लेकरांचं पोट भरतेय. गावच्या बाजारात त्या सुकट विकतात. बंद नसला तर तो बाजार भरतो, नाहीतर नाहीच. इम्फाळला लेकाची मॅच पहायला त्या कधी जाऊ शकल्या नाहीत, कारण हातात पैसे नाही, रोज बुडाला तर खायचं काय?
आणि आज तोच निंथॉय देशाच्या राजधानी आंतराष्ट्रीय सामने खेळेल, त्याच्या आईला मॅच पाहता येईल का, शेजारीपाजारी जाऊन पाहीलही ती कदाचित...
जॅकसन सिंग
जॅकसन मणिपूरचाच. उत्तम पंजाबी बोलतो. थौबल जिल्ह्यातलाच. पण ११ वर्षांचा होता, तेव्हा चंदीगडला अकॅडमीत शिकायला गेला. त्याचे वडीलच कोच होते, त्यांनाही फुटबॉलचं वेड. अमरजित त्याचा चुलत भाऊ. सारं खानदान फुटबॉलवेडं.
आणि आता त्या घराचं एक नवं स्वप्न आकार घेतं आहे..
(मेघना लोकमत वृत्तपत्रसमूहात मुख्य उपसंपादक आहे. meghana.dhoke@lokmat.com)