टिपीकल रेझ्युमे विसरा, आता व्हिडीओ रेझ्युमे पाठवायचा कसा ते शिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:00 PM2019-11-01T13:00:18+5:302019-11-01T13:00:42+5:30
फक्त 90 सेकंद आहेत तुमच्याकडे, तुमचा सेल्फी व्हिडीओ शूट करा, आणि सांगा, हा जॉब तुम्हाला का हवाय? जमलं तर संधी, नाही तर कटाप!
-डॉ. भूषण केळकर
आपण गेले तीन लेख ‘छापील रेझ्युमे’ कसा असावा याविषयी तपशिलात बोललो. आपण रेझ्युमे उत्तम लिहायचा तर असतोच, त्यातून आपले नोकरीचा कॉल मिळण्याचे चान्सेस वाढतात किंवा कमी होतात, याविषयी आपण बरंच बोललो.
परंतु आपण हे लक्षात ठेवू की आपल्या भोवतीचं जग विलक्षण वेगानं बदलतं आहे. मागील वर्षी आपला संवाद हा ‘इंडस्ट्री 4.0’ या विषयावर होता. त्याच्याच एक भाग असणारं तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत. या एआयमुळे कदाचित 5-10 वर्षात छापील रेझ्युमेची जागाच लिंकडीन वगैरेसारखी समाजमाध्यमं तरी घेतील नाहीतर/ आणि व्हिडीओ रेझ्युमे तरी.
तर आपण आता या लेखात व्हिडीओ रेझ्युमे म्हणजे काय हे समजावून घेऊ आणि मग त्याचे भाग व उपविभाग तपासू.
पूर्वी छापील रेझ्युमेच्या पातळीच्या पुढे असायचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू किंवा स्काइप इंटरव्ह्यू किंवा व्हिडीओ कॉल कॉलिंग. या सार्याच्या साहाय्याने घेतला गेलेला इंटरव्ह्यूच्या पलीकडे पोहोचलेली पायरी म्हणजे हे व्हिडीओ रेझ्युमे. तुम्ही कंपनीला अप्लाय करतानाचा हा व्हिडीओ रेझ्युमे पाठवायचा आहे. तो पाहूनच कंपनी ठरवणार की, तुम्हाला मुलाखतीला बोलवायचं की नाही. आणि ते बोलावणंही माणसं नाही तर तुमचा व्हिडीओ रेझ्युमे पाहून, एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ताच करेल.
मला आठवतंय की यावर्षीच ‘लोकमत’च्या ‘ऑक्सिजन’ पुरवणीतच या विषयावर एक सुंदर लेख आलेला होता. हा व्हिडीओ रेझ्युमे, त्याचे बदलते संदर्भ हे सारं त्या लेखात होतं, तुम्ही वाचलंही असेलच.
मात्र या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडीओ रेझ्युमे हा नुसता रेझ्युमे नसून एक प्रकारचा व्हिडीओ इंटरव्ह्यू. थोडक्यात सांगायचं तर व्हिडीओ रेझ्युमे ही एक प्राथमिक मुलाखतच आहे. व्हिडीओ रेझ्युमेमध्ये तुम्ही तुमच्याबद्दल साधारण 50 सेकंदात सेल्फी व्हिडीओ काढून पाठवायचा असतो. त्यात तुम्हाला सांगायचं असतं की ज्या जॉबसाठी तुम्ही अर्ज करता आहात तो जॉब तुम्हाला का हवा आहे. तुम्ही त्यासाठी कसे सुयोग्य आहात हे शूट करून सांगायचं असतं.
आपल्याला वाटतं तितकं ते सोपं नसतं.
अलीकडेच एक मुलाखत वाचली.
लीना नायर या ग्लोबल चीफ एचआर या पदावर काम करणार्या युनिलिव्हर या मल्टिनॅशनलच्या उच्चपदाधिकारी. त्या असं सांगतात की दरवर्षी जगभरातून 18 लाख लोक युनिलिव्हरला अप्लाय करतात आणि कुढल्याही मानवी हस्तक्षेपाविना त्यातून 3500 लोकं निवडली जातात. त्यातील फक्त 800 लोकांचा फेस टू फेस म्हणजे प्रत्यक्ष इंटरव्ह्यू होतो. बाकी सर्व प्रक्रिया ही एआयवर आधारित आहे. त्यात उमेदवारांनी पाठवलेला 90 सेकंदाचा व्हिडीओ रेझ्युमे याचं अॅनालिसीस होतं त्या उमेदवाराने त्याची गुणवर्णने सांगताना वापरलेले शब्द, शब्दांचे उच्चारतानाचे आरोह-अवरोह, देहबोली इ.चे पृथकरण / विेषण / सेंषण हे बव्हंशी प्रमाणात संगणकच्या आधारे करतात !
म्हणजे तुमच्या लक्षात हे आलं असेल की जर व्हिडीओ रेझ्युमेच्या 90 सेकंदाच्या कालमर्यादेत तुम्ही योग्य शब्द मांडले नाहीत तर तुम्ही पुढच्या पायरीला जाणार नाही!
ऐकावं ते नवलच, वाटेल अशी ही गोष्ट. मागील वर्षी तर एका कंपनीच्या गाडीनेच काही इंटरव्ह्यू घेतले होते. लोक हो, जग फार वेगानं बदलतंय, बरं का !!