पाळीचे चार दिवस, त्यात काय आहे हॅपी ?

By admin | Published: December 3, 2015 10:27 PM2015-12-03T22:27:07+5:302015-12-03T22:27:07+5:30

‘हॅपी टू ब्लीड’ हे काय आहे? मला नाही काही हॅपी वाटत पाळीच्या दिवसात. उलट पाळी येणार म्हटलं की आधी काटाच येतो अंगावर

Four days, what's in it? | पाळीचे चार दिवस, त्यात काय आहे हॅपी ?

पाळीचे चार दिवस, त्यात काय आहे हॅपी ?

Next

 सोशल मीडियावर ‘ हॅपी टू ब्लीड’वाले हॅशटॅग मिरवणाऱ्या शहरी मुलींसाठी गावाकडून आलेला खासगी एक प्रश्न

‘हॅपी टू ब्लीड’ हे काय आहे? 
मला नाही काही हॅपी वाटत पाळीच्या दिवसात. 
उलट पाळी येणार म्हटलं की आधी काटाच येतो अंगावर. पाळी आलेल्या मुलीला, बाईला देवळात जाता यावं की नाही हा एक प्रश्न झाला.. 
पण त्यापलीकडचेही खूप प्रश्न आहेत. ते का नाही दिसत कुणाला? मी तर म्हणन, पाळी आलेली असतानाही बाईला देवळात जाता यावं, पूजा करता यावी असा आग्रह धरण्या आधी शहरातल्या माझ्या शिकलेल्या, श्रीमंत मैत्रिणींनी अजून एक गोष्ट करायला हवी : जिथे वयात आलेल्या मुली शिकायला जातात अशा खेड्यातल्या प्रत्येक शाळा-कॉलेजात आवश्यक तेवढं तरी पाणी असणारी स्वच्छतागृहं असणं सक्तीचं करा म्हणून सरकारशी भांडायला हवं. काय वाटतं तुम्हला?
- मराठवाड्यातल्या एका खुर्दबुद्रुक गावातली मुलगी रागरागून आॅक्सीजन टीमला विचारत होती.
आम्हाला प्रश्न पडला, काय उत्तर देणार तिला? तिच्या फोनमध्ये फेसबुक आहे, तरी तिला हॅपी टू ब्लीड म्हणावंसं वाटत नाहीये, हे खरं होतं..
आणि जास्त महत्वाच्या प्रश्नाला हात घालणारंही!
‘हॅपी टू ब्लीड’
नावाची एक मोहीम सध्या बरीच गाजते आहे. देवस्थानांमधे त्या ‘चार दिवसात’ महिलांना प्रवेश न देणाऱ्या आणि त्यासाठी स्कॅनर लावण्याची भाषा करणाऱ्या वृत्तींना ठोस प्रतिउत्तर म्हणून अनेक मुली, महिला सोशल साइट्सवर जाऊन आपल्या ‘हॅपी टू ब्लीड’ हा हॅशटॅग मोठ्या हिमतीनं मिरवत आहेत.
महिलांना, मुलींना कमी लेखणाऱ्या वृत्तींचा निषेध करत आपण स्त्री आहोत याचा अभिमान वाटतो आणि त्यापायी सहन कराव्या लागणाऱ्या चार दिवसांच्या वेदनांचाही आम्हाला अभिमान आहे, असं सांगणारी ही मोहीम!
हे सारं महत्त्वाचं आहे. आणि ज्या या मोहिमेत सहभागी होत आहेत, सोशल मीडियावर उघडपणे हा विषय मांडत आहेत, त्या मुलींच्या धाडसाचं कौतुक करायला हवं!
मात्र सोशल साइट्सवर हा विषय चर्चेत येऊनही खेड्या-पाड्यातल्या, छोट्या गावातल्या मुलींचे या संदर्भातले, खरे आणि बरेचसे अवघड प्रश्न सुटणार आहेत का, असा एक मुद्दा आहे.
कारण ‘त्या’ दिवसात मंदिरात प्रवेश मिळावा की न मिळावा, या प्रश्नाइतकेच किंवा खरं तर त्याहूनही जास्त महत्त्वाचे प्रश्न या मुलींसमोर आहेत.
आणि ते प्रश्न आहेत आरोग्याचे, पाण्याचे, स्वच्छतेचे आणि घुसमटीचे!
‘आॅक्सिजन’ला नियमित येणारा मुलींचा प्रतिसाद म्हणूनच या प्रश्नांचा एक वेगळा आणि जास्त काळजीचा भाग समोर आणतो.
खेड्या-पाड्यात आजही प्रश्न आहे तो त्या ‘चार दिवसात’ वापरण्यात येणाऱ्या सुती कपड्यांच्या घड्यांचा!
सॅनिटरी नॅपकिन्स सहज परवडेल अशा किमतीला काही उपलब्ध नाहीत. जाहिराती कितीही दिसत असल्या टीव्हीवर, तरी सॅनिटरी नॅपकिन्सवर पैसे खर्च करता यावेत इतपत आर्थिक स्थिती अनेक घरात नाही किंवा अगदी आईकडेसुद्धा त्यासाठी पैसे मागता येत नाहीत. आणि मिळालेच तरी गावच्या दुकानात किंवा मेडिकल स्टोअरमधे स्वत: जाऊन ही जरुरीची गोष्ट विकत आणण्याचं धाडस हीही अनेक मुलींसाठी मोठी परीक्षा आहे. अजूनही आहे.
म्हणजे एकीकडे विनासंकोच स्वस्त आणि सहज सॅनिटरी नॅपकिन्स मिळू शकतील, अशी काही व्यवस्था नाही आणि दुसरीकडे आर्थिक चिंता आहेच.
त्यात आज जिथं दुष्काळ आहे तिथंच नाही तर अन्य अनेक ठिकाणीही मुली त्या चार दिवसातही डोक्यावरून पाणी वाहतात. सगळं घरकाम करून निंदायला, खुरपायला जातात. कष्ट चुकत नाहीत. त्यात अ‍ॅनिमियासारखे प्रश्न आहेत. कॅल्शियम आणि लोहाच्या गोळ्याही मिळत नाही, तिथं याकाळात विश्रांती आणि पोषण आहाराची काय चर्चा करणार?
मग त्या चार दिवसातही मुली राबत राहतात. कपडा घासला गेल्यानं होणाऱ्या वेदना सहन करतात. ते कपडे धुवून कुठंतरी तारेवर कपड्यांच्या आत दडवून तरी नाहीतर घरात अंधाऱ्या कोपऱ्यात वाळवले जातात. नाहीच वाळले तर ओलसर कापड पुन्हा जखमा करतंच. त्यातून होणारे इन्फेक्शन्स, आजारपणं याविषयी तर बोलायचीही सोय नाही.
कारण या प्रश्नांना ग्लॅमर नाही आणि ते कुठं बोलायचीही सोय नाही!
आता खरा प्रश्न हाच आहे की, या मुलींनी ‘हॅपी टू ब्लीड’ असं का म्हणावं?
कारण जर तसं म्हटलं तर चर्चा वरवरची होत राहणार पण मूळ प्रश्न तसेच राहतील, ते गांभिर्यानं कुणी सोडवायचे?
की त्या प्रश्नांना हातच न घालता आणि जमिनीवरचं वास्तव न बदलता आपण फक्त फेसबुकीय चर्चा करणार?
अजूनही अनेक महाविद्यालयांमधेसुद्धा स्वच्छ लेडिज रूम नाही, चेंजिंग रूम नाहीत. स्वच्छतागृह नाहीत. तिथं या चार दिवसात एसटीनं प्रवास करून खेड्या-पाड्यातून कॉलेजात येणाऱ्या मुलींचं काय होत असेल?
त्यांना कुठल्या सुविधा देणार?
असे अनेक प्रश्न आहेत...
त्यांच्या विषयी उघड चर्चा होऊन ते सुटणं, हे खरं तर बदलाचं एक चित्र मानलं जायला हवं..
नाहीतर फेसबुकसह सोशल साइट्सवर नेहमी जे ट्रेण्डस येतात, त्याप्रमाणे हा एक ट्रेण्ड आला, चर्चा झाली आणि संपला विषय असं होऊ नये..
तुम्हाला काय वाटतं?
 
 
-आॅक्सिजन टीम
> ते चार दिवस
 
तुमचाही असाच काही अनुभव आहे का?
खेड्यापाड्यात, छोट्या शहरात राहता तुम्ही?
साधं दुकानात जाऊन सॅनिटरी नॅपकिन विकत आणण्याची सोय नाही,
की घरी त्यासाठी पैसे मागण्याची?
घुसमट होते?
संताप होतो?
आजारपणं येतात त्यातून वाट्याला? त्यावर औषधपाणी करता?
असे किती प्रश्न, पण खरेखुरे,
‘त्या चार दिवसातले?’
ते तुमचे प्रश्न आणि तुमचे अनुभव
न भिता, न लाजता मांडा,
पत्रावर नाव घाला किंवा घालू नका
पण लिहा मनापासून,
त्या ‘चार दिवसातल्या’ खऱ्या आणि अवघड प्रश्नांविषयी..
पत्ता नेहमीचाच, शेवटच्या पानावर
अंतिम मुदत १५ डिसेंबर २०१५
पत्रावर ‘ते चार दिवस’ असा उल्लेख करायला विसरू नका.

Web Title: Four days, what's in it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.