जिराफांचा मित्र; आवडीच्या कामासाठी सोडली कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी

By अोंकार करंबेळकर | Published: March 1, 2018 09:43 AM2018-03-01T09:43:24+5:302018-03-01T09:44:50+5:30

आपल्या आवतीभोवती जिराफ नसताना मुंबईकर तुषार कुलकर्णीनं जिराफांसाठी काम करायचं ठरवलं आणि..

Friend of giraffes; Jobs in corporate sector left for favorite work | जिराफांचा मित्र; आवडीच्या कामासाठी सोडली कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी

जिराफांचा मित्र; आवडीच्या कामासाठी सोडली कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी

Next

तुम्ही कधी जिराफ पाहिलाय का? प्रत्यक्ष पाहणं तसं अवघडच. आपल्याकडे कुठं दिसतात जिराफ? पण मुंबईच्या तुषार कुलकर्णीनं थेट जिराफावरच संशोधन करायचं ठरवलं.
खरं तर तुषारचं आयुष्य अगदी तुमच्या-आमच्यासारखंच होतं. वाणिज्य शाखेतून पदवी मिळवल्यानंतर तो एका कार्पोरेट कंपनीत नोकरीलाही लागला. पंचविशीनंतर त्याला वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाच्या अभ्यासाची गोडी लागली. शाळा-कॉलेजात शिकत असताना वन्यजीवांसंदर्भात त्याने कोणतेच शिक्षण घेतले नव्हते. मग त्यानं सरळ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या गोरेगावमधील एज्युकेशन सेंटरमध्ये काम करायला सुरुवात केली. कार्पोरेट क्षेत्रातील नोकरी करून त्यानं २०१०-१२ या वर्षांसाठी इन्टर्नशिप करायला सुरुवात केली. २०११ हे वर्ष त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष ठरलं. यावर्षी तो युगांडाला गेला. तिथल्या युगांडा वाइल्डलाइफ एज्युकेशन सेंटरला भेट दिल्यानं त्याला जिराफांना जवळून पाहाता आलं. त्यांचा अभ्यास करता आला, त्यांची दिनचर्या, स्वभाव जाणून घेण्याची पहिली संधी मिळाली.
याच काळामध्ये त्याची भेट नामिबियामधल्या एका भन्नाट व्यक्तीशी झाली. ही व्यक्ती म्हणजे डॉ. ज्युलियन फेनेसे. डॉ. ज्युलियन नामिबियाच्या जिराफ कॉन्झर्वेशन फाउण्डेशनचे संचालक होते. त्यांच्यामुळे तुषारला जिराफांच्या जीवनाची खरी ओळख झाली. जिराफ हा जमिनीवरचा सर्वात मोठा प्राणी असला तरी तो सध्या सर्वात वेगाने नष्ट होणारा प्राणी ठरत असल्याचं त्याला समजलं. मग त्यानं मिळालेली सगळी पुस्तकं, इंटरनेट उलटीपालटी करून मिळेल ती माहिती गोळा करायला सुरुवात केली. आपल्याला आवडणारा हा प्राणी आज संकटात सापडलाय असं लक्षात आल्यावर त्यानं जिराफाचाच अभ्यास करायचं ठरवलं. तुषारने फेसबुक आणि ई-मेलवरून जगभरातल्या अभ्यासकांशी संपर्क साधला, त्यांच्या अभ्यासाबद्दल माहिती घेतली, त्यांना शंका-प्रश्न विचारले. या अभ्यासात त्याला मदत करायला डॉ. ज्युलियन फेनेसे होतेच.
कार्पोरेट क्षेत्रात तोवर त्याची १० वर्षे नोकरी झाली होती; पण तोपर्यंत तुषारच्या जिराफ अभ्यासानं पुढचा टप्पा गाठला होता. जगभरातील जिराफप्रेमी, जिराफ अभ्यासकांच्या मदतीनं त्याचा स्वत:चाही अभ्यास वाढला होता. त्यानं मग नोकरी सोडून पूर्णवेळ हेच काम करायचं ठरवलं. सध्या तो अमेरिकेच्या इंडियाना राज्यामध्ये वायन चिल्ड्रेन्स झू येथे जिराफांच्या आरोग्याचे प्रश्न, त्यांचा स्वभाव, दैनंदिन हालचाली यासंदर्भात काम करतोय.
२०१५-१६ या एका वर्षासाठी त्याने कोलकाता आणि म्हैसूर इथल्या प्राणी संग्रहालयातील जिराफांवर काम केलं आणि कोलकात्याच्या जिराफांच्या अभ्यासावर आधारितच एक शोधनिबंध शिकागोमधील ब्रुकफिल्ड झू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जिराफ संशोधन परिषदेत सादर केला. या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्त्व करणारा तो एकमेव संशोधक होता. या शोधनिबंधाचे जगातील विविध देशांमधून आलेल्या संशोधकांनी कौतुक केलं. सध्या तो कोलकाता प्राणी संग्रहालयातील जिराफांवर डॉ. एच. एस. प्रयाग आणि डॉ. सुनील आर. पिल्लई यांच्याबरोबर अधिक संशोधन करत आहे. भारतात सध्या ९ प्राणी संग्रहालयांमध्ये २७ जिराफ आहेत.
वन्यजीवक्षेत्रात काम करायची इच्छा असणाºया मुलांबद्दल तो सांगतो, तुम्हाला कोणत्या प्राण्यासाठी किंवा कोणत्या प्रश्नावर काम करायचे आहे आधी निश्चित करा. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये जरी ते निश्चित नसलं तरी नंतर मात्र एखादं विशेष क्षेत्र निवडून त्यात पूर्ण प्रयत्नांनिशी झोकून देऊन काम केले पाहिजे असं तो म्हणतो. आता नवं तंत्रज्ञान हाताशी आहे, ते वापरून सतत अपडेट राहत मनापासून आवडत्या प्राण्यासाठी काम करायला हवं. त्यासाठी प्राणीशास्त्रचं शिकायला हवं असं काही नाही.

* १९८५ साली आफ्रिकेमध्ये १ लाख ५५ हजार जिराफ होते; मात्र २०१६ साली ते केवळ ९७ हजार ५०० इतकेच उरल्याचे आढळले.
* केवळ तीन दशकांमध्ये ४० टक्के जिराफ नष्ट झाले आहेत, इतकेच नाही तर आफ्रिकेतील सात देशांमध्ये तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
* २०१६ साली इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन आॅफ नेचरने जिराफाला असुरक्षित श्रेणीतील प्राणी घोषित केलं आहे.

Web Title: Friend of giraffes; Jobs in corporate sector left for favorite work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.