बावखळ वाचवणारे दोस्त

By अोंकार करंबेळकर | Published: January 31, 2018 05:21 PM2018-01-31T17:21:14+5:302018-02-01T16:19:36+5:30

सचिन मार्टी आणि त्याच्या दोस्तांनी वसई-विरार परिसरात एक बावखळ बचाओ अभियानच सुरू केलं आहे..

friends of wetlands of Vasai (Bavkhal) | बावखळ वाचवणारे दोस्त

बावखळ वाचवणारे दोस्त

Next

वसई-विरार म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते वेगाने पसरत चाललेलं अस्ताव्यस्त शहर. या शहरात एक नवीनच उपक्रम सुरू झाला. त्याचं नाव ‘बावखळ बचाओ अभियान’. सचिन मार्टी आणि त्याचे मित्र हे बावखळं वाचवण्यासाठी धडपडत आहेत.
बावखळ म्हणजे तळं. वसईला बसीन असंही म्हटलं जातं. बसीन म्हणजे खोलगट भाग. एका बाजूला तुंगारेश्वराचं जंगल आणि दुसºया बाजूला अरबी समुद्र यांच्यामध्ये हा खोलगट भाग आहे. पूर्वेला असणाºया तुंगारेश्वराच्या उतारावरून येणारं पाणी झरे, ओढे, नद्यांच्या माध्यमातून समुद्रात जातंय हे लक्षात आल्यावर या परिसरामधील लोकांनी कोणे एकेकाळी ही तळी तयार केली होती. ते हे बावखळ. या सगळ्या बावखळांना पाण्याच्या अंतर्गत स्रोतांनी जोडून एक साखळीच तयार करण्यात आलेली होती. साधारण एक गुंठा, दोन गुंठ्यांपासून आकार असणारी बावखळं दोन एकर इतक्या मोठ्या आकाराचीसुद्धा असतात. या बावखळांची मालकी काही कुुटुंबांकडे असे. त्याच्या पाण्याचा उपयोग ही कुटुंबं शेतीसाठी करत.
मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या बावखळांकडे दुर्लक्ष झालं. लोकसंख्या वाढली. शेतीचं प्रमाण कमी होत गेलं. जमिनीला भाव आल्यावर शेतजमिनी विकायची स्पर्धा सुरू झाली. बावखळांचं अस्तित्वच धोक्यात आलं. काही ठिकाणी तर त्यांचा उपयोग सांडपाणी सोडण्यासाठी होऊ लागला. वसई-विरार परिसरामध्ये बांधकामं मोठ्या वेगाने व्हायला लागल्यावर लोकांनी बावखळांमध्ये किंवा त्यांच्या आजूबाजूला डेबरीस टाकायला सुरुवात केली.
हे सारं सचिन पाहत होता. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसमध्ये सोशल वर्क शाखेत तो पदव्युत्तर शिक्षण घेत होता. शिक्षण घेत असताना दुस-या वर्षी या बावखळांचाच अभ्यास करण्याचा प्रकल्प त्यानं हाती घेतला. वसई-विरारजवळच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या विहिरींचा, जलस्रोतांचा अभ्यास त्यानं केला. पाण्याची पातळी, गुणवत्ता तपासल्यावर त्याच्या लक्षात आलं की विहिरींमधलं पाणी हे अधिक पिण्यायोग्य आहे आणि मुख्य म्हणजे ते वर्षभर उपलब्ध आहे. दुरून जलवाहिनीचं पाणी आणण्याऐवजी तुमच्याजवळ असणारं विहिरीतलं पाणी वापरा असं मग त्यानं लोकांना सांगायला सुरुवात केली. बावखळांबरोबर वसईतील मोठे तलाव वाचवणंही गरजेचं आहे हे त्यानं पटवून द्यायला सुरुवात केली. वसई आणि विरार परिसरामध्ये जी ५००हून अधिक असलेली बावखळं आहेत ती सर्व वाचवणं गरजेचं असल्याचं तो सांगतो.
मात्र बावखळांची सामूहिक कचराभूमी झालेली स्पष्ट दिसत होती. मग सचिनबरोबरच या परिसरामधील तरुणांनी 'बावखळ बचाओ' हे अभियान सुरू केलं. गेल्या सहा वर्षांमध्ये या परिसरामधील सहा बावखळं वाचवण्यात त्यांना यश आलं. बावखळ बचाओ अंतर्गत आधी लोकांनी त्यात कचरा टाकणं बंद करावं याची त्यांनी काळजी घेतली. त्यानंतर बावखळांमधील गाळ काढण्यात आला. या गाळाचा खतासारखा वापरही करण्यात येतो. त्यामुळे ही बावखळं पुन्हा नैसर्गिकरीत्या पाणी साठवण्याचं काम करू लागली आहेत.
सचिन म्हणतो, ‘वसई परिसरामध्ये साधारणत: २००० ते २२०० मिली पाऊस पडतो. घरांवर पडणारं पावसाचं पाणी गटारांमधून नेहमी वाहूनच जातं. पावसाचे पाणी असं वाया घालवण्यापेक्षा तेच पाणी या बावखळांमध्ये सोडलं तर त्यातील पाण्याची पातळीही वाढू शकते.’
या अभियानांतर्गत आता आणखी तीन बावखळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. या अभियानात अनेकजण सहभागी आहेत. युवा विकास संस्था, नानभाट ग्राम, किलबिल संस्था यांच्यासह जोएल डाबरे, माल्कम परेरा आणि व्हीनस डाबरे, ऑल्विन रॉड्रिग्ज यांचीही या अभियानासाठी विशेष मदत होते. वसईतील समाजसेवक फादर फ्रान्सीस दिब्रिटो आणि सचिनचे मार्गदर्शक हिमांशू कुलकर्णी आणि अनिरुद्ध पॉलही त्याला वेळोवेळी मदत करत असतात.
सचिन म्हणतो, ‘वसई-विरार परिसराची लोकसंख्या झपाट्यानं वाढते आहे. या शहरातील लोकांची तहान भागवायची तर प्रत्येकवेळेस तुम्ही पालघर, डहाणूमध्ये धरणं बांधून तेथील आदिवासी लोकांना त्रास देणार का? धरणांचं पाणी वेगळ्या लोकांसाठी, त्रास वेगळ्यांना असं का? त्यापेक्षा आपण आपले आहे ते नैसर्गिक स्रोत, तळी, पाणवठे टिकवले तर भविष्यात लागणाºया पाण्याचीही आपण तरतूद करून ठेवू शकतो!

 
( ओंकार आॅनलाइन लोकमतमध्ये उपसंपादक आहेत. onkark2@gmail.com )

 

 

Web Title: friends of wetlands of Vasai (Bavkhal)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.