येत्या रविवारी Friendship day- सिनेमात बदलत गेलेल्या मैत्रीचं दिलखुलास चित्र, दोस्त होते किस लिए है?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:34 PM2018-08-02T14:34:28+5:302018-08-02T14:38:58+5:30
मुन्नाच्या कहाणीत मुन्ना असतो त्याहून भारी वाटतो सर्किट. आपले मित्रही असेच ‘सर्किट’ असतात. म्हणून तर ते बेस्ट असतात.
- अमोल उद्गीरकर
मैने प्यार किया हा एकेकाळी तुफान गाजलेला सिनेमा. जागतिकीकरणाचं वारं भारतात यायच्या दोनच वर्षे आधी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमात दोस्ती होती. पण एका मुलाची आणि मुलीची. त्यांचे आणि त्यांच्या मैत्रीविषयीचे (ते ही भिन्न लिंगी मैत्री बद्दल) संवाद त्याकाळी तुफान लोकप्रिय झाले होते. ‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते..’, ‘दोस्तीमें नो सॉरी नो थँक यू.’ ‘दोस्ती की है, निभानी तो पडेगी..’
हे संवाद त्याकाळच्या तरु ण पिढीच्या तोंडात रु ळले होते. निमशहरी आणि ग्रामीण भागात तर हा सिनेमा, हे संवाद तुफान गाजले. त्याकाळी कोएड म्हणजेच मुलामुलींना एकत्र शिक्षण देणार्या शाळा फारच कमी असतं. फक्त मुलांची, फक्त मुलींची शाळा असे. फार क्वचित मुलामुलींची शाळा एकत्र असली तरी मुलंमुली एकमेकांशी बोलत नसत. आणि हा सिनेमा तर मुलामुलीच्या मैत्रीची कहाणी सांगत होता. मुलामुलीच्या मैत्रीचं त्याकाळी प्रचंड आकर्षण होतं. सिनेमात दाखवल्या जाणार्या मैत्री चा आणि नातेसंबंधांचा भारतीय तरु णांवर किती प्रभाव पडतो, याची जणू लिटमस टेस्टच या सिनेमाने केली होती. हा सिनेमा प्रदर्शित झाला त्यानंतर भारतात जागतिकीकरणाचं, उदारीकरणाचं वारं वाहायला लागलं. जुन्या बंदिस्त समाजरचनेलाही धडका बसायला लागल्या. काही जुनाट गोष्टी निदान किलकिल्या व्हायला लागल्या. एक नवीन सुरुवात त्या दशकात झाली आणि म्हणता म्हणता केवळ दहा वर्षाच्या आतच तोर्पयत फक्त सिनेमातच दिसणारी मनमोकळी मैत्नी सगळीकडे दिसायला लागली. हा योगायोग खचितच नव्हता. मैत्रीच्या या नव्या नात्याची एक नव्यानं पायाभरणी या सिनेमाने अगोदरच केली होती. जागतिकीकरणामुळे पुढच्या काळात बदलेल्या सामाजिक - आर्थिक परिस्थितीने त्यावर कळस चढवला इतकंच.
खरं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीची काही दशकं तरी आपल्या देशाच्या वातावरणात एक आदर्शवादी भाबडेपणा होता. त्याचं प्रतिबिंब त्याकाळी सिनेमात दाखवल्या जाणार्या मैत्नीत पडल्याचंही दिसत. 1964 साली प्रदर्शित झालेला दोस्ती हा सिनेमा हे याचं उदाहरण. सिनेमात दोन अपंग मित्न चांगल्या-वाईट काळात एकमेकांची कशी साथ देतात हे त्या सिनेमात दाखवलं होतं. सिनेमा चांगला असला तरी पटकथेत प्रामाणिक भाबडेपणा उतू जात होता. आनंद, याराना, शोले या अमिताभ बच्चनच्या सिनेमांमध्ये तर मैत्नीचं विलोभनीय चित्नण दिसतं. या सिनेमातली मैत्री अशी की दोस्तीसाठी कुछभी या भावनेवर विश्वास ठेवायला ती कथा भाग पाडते.
पुढे नव्वदच्या दशकात आलेले जो जिता वो ही सिकंदर, साजन, खिलाडी आणि तत्सम सिनेमातपण मैत्नीच्या कथा होत्या. जिवाला जीव देणारे दोस्त, त्यांच्या उनाडक्या, त्यांची मस्ती सारं गुंतवून ठेवणारं होतं. अर्थात पडद्यावर बघायला कितीही मनोरंजक वाटत असलं तरी ही त्याकाळची सिनेमातली मैत्नी बरीचशी एकसुरी आणि मैत्रीच्या नात्याचे मर्यादित पैलू दाखवणारीच होती. मैत्नीमधली गुंतागुंत, मैत्नीमधले वादविवाद (म्हणजे दोन मित्न एकाच मुलीच्या प्रेमात पडतात असल्या सिच्युएशन्सच्या पलीकडे जाऊनचे वाद), मानसिक पैलू हे माठय़ा पडद्यावर दाखवण्यात आपले सिनेमे कमी पडत होते. सिनेमे, त्यातली मैत्रीकथा लोकप्रिय होती; पण ‘खरी’ वाटण्यात जरा कमीच पडत होती.
रील लाईफमधली दोस्ती आणि रिअल लाईफमधली दोस्ती यांच्यातलं अंतर कमी होण्याची सुरुवात झाली ती दिग्दर्शक नागेश कुकनूरच्या रॉकफर्डपासून. एका उच्चभ्रू शाळेत शिकायला आलेल्या टीनएजर मुलाच्या आयुष्यात आलेले मित्न त्याच्यात कसे बदल घडवतात याचं फार वास्तवदर्शी चित्नण या सिनेमात होतं. या सिनेमातलं ‘यारों..’ हे गायक केकेच्या आवाजातलं गाणं हे आजही आपल्याकडे ‘फ्रेण्डशिप अँथम’ समजलं जातं. पण मैत्नी हा विषय सिनेमाच्या मुख्य पटलावर खर्या अर्थानं आला तो फरहान अखतरच्या ‘दिल चाहता है’ या सिनेमापासून..
फरहानला ‘दिल चाहता है’ बनवण्याची प्रेरणा खासगी आयुष्यातल्या काही प्रसंगांवरून मिळाली होती. आपल्या मित्नांसोबत लॉस एंजेलिसला तो ट्रीपवर गेला होता. त्याकाळी त्याला डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीमधले अनेक प्रसंग हे ‘दिल चाहता है’च्या स्क्रीन प्लेमध्ये आले आहेत. आकाश, समीर आणि सिद ही पात्नं काहीशी फरहान आणि त्याच्या मित्नांसारखी आहेत. त्यांच्यावर आधारित आहेत. ‘दिल चाहता है’ हा अनेक अर्थाने बॉलिवूडला वेगळं वळण देणारा चित्नपट ठरला. खरं तर ‘दिल चाहता है’च्या थोडं अलीकडंच ‘लगान’ आणि ‘गदर’ हे दोन भव्यदिव्य चित्नपट आले होते. त्यांच्यामुळे तिकीट खिडकीवर त्सुनामी आली होती. ‘दिल चाहता है’ प्रदर्शित झाला त्यावेळेस या दोन चित्नपटांचा प्रेक्षकांवरचा हँग ओव्हर बराच टिकून होता. पण तरीही ‘दिल चाहता है’ने आपला स्वतंत्न ठसा उमटवलाच. नव्या आशा, नव्या आकांक्षा आणि मुख्य म्हणजे, नव्या संवेदनांचं या चित्नपटातून अत्यंत तरल दर्शन झालं..
मला आठवतंय, ‘दिल चाहता है’ बघून मी भारावलेल्या अवस्थेत थिएटरमधून बाहेर पडलो होतो. मित्नांसमोर फरहानच्या स्तुतीचे पूल बांधत असताना एकानं मला विचारले की, हे बाकी सगळं ठीक आहे, पिक्चरची स्टोरी काय आहे? आणि मी अडखळलो. मला साक्षात्कार झाला, की सुरु वात, मध्य आणि शेवट या सरधोपट कथानक शैलीला ‘दिल चाहता है’ने मोडीत काढलं होतं. चित्नपट भारी, कडक असायलाच हवा असं त्याकाळी समज होता. पण सिनेमा ‘कुल’ असू शकतो, याची जाणीव पहिल्यांदाच मला या चित्नपटामुळे झाली होती. नंतर ‘दिल चाहता है’ कसा तितकासा क्रांतिकारी सिनेमा नाही, यावर बरंच वाचनात आलं. काही लोकांनी त्याची क्रूरपणे केलेली चिरफाडपण ऐकली. मात्र तरीही दिल चाहता है त्याच्या ‘ताज्या’ दिग्दर्शकीय दृष्टिकोनामुळे कायम आवडता चित्रपट राहिला. मुख्य म्हणजे, त्यात दोस्तीची एक समकालीन कथा पडद्यावर पाहता आली होती. एकूणच फरहान अखतर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल प्रोडक्शन हाऊसने मैत्नीचे विविध पैलू हाताळणारे सिनेमे बनवले आहेत. लहानपणासून मित्र असणारे तीन मित्र, ते रोड ट्रिपला जातात. आणि ती एक रोड ट्रिप त्यांच्या आयुष्यात कसे बदल घडवते, ते तीन मित्र आपापल्या मनातल्या भीतीवर कशी मात करतात याचं अतिशय तरल चित्रीकरण झोया अख्तरच्या ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’ या फिल्ममध्ये होतं.
असाच एक भन्नाट सिनेमा म्हणजे रॉक ऑन. आयुष्याच्या एका टप्प्यावर घनिष्ट मैत्र असणारा रॉक बँड व्यक्तिगत मतभेदांमुळे कसा फुटतो आणि नंतर ते बँडची आणि एकूणच आपल्या आयुष्याची सेकंड इनिंग कशी सुरू करतात हे रॉक ऑन सिनेमात फार छान दाखवलं होतं. त्या अर्थाने रॉक ऑन हा सिनेमा अनेकांना आयुष्यातली सेकंड इनिंग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करून गेला. एक्सेलच्या सिनेमात फक्त उच्चभ्रू, श्रीमंत लोकांच्या मैत्रीचं चित्रीकरण असतं असा एक आरोप होतो. त्याला खोडून काढण्यासाठीच त्यांनी बहुदा ‘फुकरे’ सिनेमा काढला असावा. फुकरे हा सिनेमा एक समान अजेंडा घेऊन एकत्न आलेल्या मित्रची धमाल विनोदी कथा सांगतो. या सिनेमातली बहुतेक पात्र काठावरच्या मध्यमवर्गीय परिवारातली आहेत. हा सिनेमापण प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
2001 नंतर हे नायक/नायिकेच्या मित्रच्या भूमिकांच्या ग्राफमध्ये प्रचंड वेगाने बदल होत गेले आहेत. साइडकीक पात्न कथानकात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुख्य म्हणजे त्यांना स्वतर्च असं एक अस्तित्व आहे. मुन्नाभाई सिरीजची कल्पना एकवेळ संजय दत्तशिवाय करता येते; पण अर्शदच्या सर्किटशिवाय करता येत नाही. रांझना मधला झिशानचा मुरारी माझा अतिशय आवडता आहे. रांझना मधलं जवळपास प्रत्येक पात्र ग्रे आहे आणि प्रत्येक पात्र वर्तणुकीमागे स्वतर्च्या स्वार्थापूर्तीची कारणमीमांसा आहे. याला अपवाद फक्त मुरारीच पात्न आहे. मुरारी स्वतर्च्या कुठल्या स्वार्थाशिवाय कुंदनच्या मागे उभा राहतो. त्याला त्याचं प्रेम मिळवण्यासाठी सपोर्ट करत असतो. हिमांशू शर्मानेने लिहिलेल्या पलंगतोड डायलॉगच त्यानं सोनं केलं. ‘तुम्हारा प्यार ना हो गया, यूपीएससी का एक्झाम हो गया. दस साल से पास ही नही हो रहा.’ अशी धनुषची खिल्ली उडवताना असो किंवा ‘गली के लडके का प्यार हमेशा इंजिनिअर या डॉक्टर ले जाते है. दिल छोटा ना कर.’ असं हृदयभंग झालेल्या धनुषला कन्सोल करण असो त्यानं त्या भूमिकेत अक्षरशर् जीव ओतला.
एकूणच आनंद एल रायच्या सिनेमात नायक-नायिकेच्या मित्नांना खूप स्कोप असतो. तनु वेड्स मनू मधला दीपक डोब्रियाल आणि स्वरा भास्करची पात्न हे याचं अजून एक महत्त्वाचं उदाहरण. झिरोमध्ये झिशान पुन्हा बुटक्या शाहरूखच्या मित्नाच्या महत्त्वाच्या भूमिकेत आहेच. नायकाचा मित्न हा नायकाशी एकनिष्ठ असावा आणि त्याच्या मनात नायकाचं चांगलंच व्हावं, असं असण्याची गरज नाहीये. तोपण एक स्वार्थी माणूस असू शकतो आणि गरज पडली तर नायकाच्या खांद्यावर पाय ठेवून वर जाण्याची आकांक्षा बाळगू शकतो. सैफचा ओंकारा मधला लंगडा त्यागीपण असाच आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तो आपल्या मित्नांच्या आकांक्षांना चूड लावू शकतो.
दिबांकर बॅनर्जीच्या ओये लक्की लक्की ओये मध्ये मनू ऋषी या भन्नाट अभिनेत्याने केलेला भन्नाट बंगालीपण असाच आहे. तो लंगडा त्यागी इतका भयंकर नसला तरी तो वेळोवेळी लक्कीच्या (अभय देओल) शत्नूंशी हातमिळवणी करतो. लक्कीला तोंडघशी पाडतो. पण तरी लक्की आणि बंगाली मधला बॉण्ड एवढा स्ट्रॉँग असतो की ते शेवटर्पयत एकत्रच राहतात. आपल्या खर्या आयुष्यातले मित्र दीपक तिजोरीसारखे आदर्श नसतात. ते असतात बंगालीसारखे. कधी आपल्याला फसवतात, तोंडघशी पाडतात, खोटं बोलतात; पण ते आयुष्यभर आपले मित्न असतात. आदर्श मित्र नावाची कुठलीही गोष्ट नसते. त्या अर्थाने तुम्ही आम्हीपण बंगालीच. सर्वसाधारण, इम्परफेक्ट, वेळप्रसंगी बालिश आणि बेभरवशाचे. आपण तरी कुठं आदर्श मित्र असल्याचा दावा करू शकतो. पण आपलं आदर्श नसणंचं आपल्याला एक बर्यापैकी मित्र बनवत असावं.
मुलींच्या मैत्रीचं काय?
भारतीय चित्रपट हे फक्त मेल बॉण्डिंग दाखवतात; पण मुलींमधली मैत्री दाखवण्यात त्यांना फारसा रस नसतो असा एक आरोप नेहमी केला जातो. या आरोपात बर्यापैकी तथ्य आहेच. आपल्या देशातल्या इतर अनेक क्षेत्नांप्रमाणे सिनेमाचे क्षेत्रपण पुरुष प्रधान आहे. तिथे एकूणच स्त्री प्रधान सिनेमापण खूप कमी बनतात. पण हळूहळू का होईना परिस्थिती बदलत आहे. मराठीत पूर्वी येऊन गेलेले बेधडक मुलींच्या मैत्रीची गोष्ट सांगत होता. नुकताच येऊन गेलेला वीरे दि वेडिंग हा सिनेमा हा अनेक अर्थानी ग्राउण्डब्रेकिंग सिनेमा आहे. मुलींची मैत्नी हा विषय सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे. तो सिनेमा हिट होणं हे भारतीय प्रेक्षकांच्या बदलत्या मानसिकतेचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
लंगडय़ा आणि सल्या
मराठी सिनेमात त्याकाळी महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्या सिनेमात मित्नांची धमाल असायची. त्याकाळात अशी ही बनवाबनवीसारखे दोस्तीचे काही यादगार सिनेमे आले. अलीकडे आलेला सैराट हा आर्ची आणि परशाच्या खालोखाल लंगडय़ा आणि सल्याचा सिनेमा आहे. प्रेक्षकांना हे परशाचे जिवाला जीव लावणारे मित्न खूप आवडले. स्वतर्चे काहीही पणाला लागले नसताना मित्नाच्या प्रेमासाठी सर्वस्वाची कुरवंडी करणारे परशा आणि सल्या प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतील. अविनाश अरुणच्या किल्लामध्येपण शाळकरी मुलांच्या निर्मल मैत्नीचं सुंदर चित्नण होत. बेंगलोर डेज हा मल्याळम सिनेमापण मैत्नीच्या नितांत सुंदर चित्नणासाठी आवर्जून पाहण्यासारखा आहे.
हे कोण साइडकिक?
आपल्या सिनेमात नायक किंवा नायिकेच्या मित्न/मैत्रिणींच्या भूमिकांमध्ये झालेली इव्हॅल्यूशन हा अजून एक रोचक विषय आहे. पूर्वी या भूमिका करणार्या अभिनेत्याचं काम फक्त स्वतर् विनोदाचा विषय बनून नायकाला पडद्यावर लार्जर दॅन लाईफ बनवणं असायचं. नायकाच्या मित्नाचं काम करणार्या अभिनेत्याला साइडकिक असं गोंडस नाव देऊन त्याला कोपर्यात बसवण्याची व्यवस्था केली होती. हे साइडकिक बहुतेक वेंधळे, आचरट विनोदी असत. आपल्या अंगभूत गुणांमुळे ते खलनायकाच्या कचाटय़ात सापडत आणि नायक ग्लोरियस एंट्री करून त्यांना वाचवत. थोडक्यात, हे साइडकिक म्हणजे नायकाची रेघ मोठी करण्यासाठी मारलेली छोटी रेघ असत. दीपक तिजोरी, गुड्डी मारोती, शक्ती कपूर (कारकिर्दीचा एक मोठा भाग), सतीश कौशिक, चंकी पांडे, हरीश (प्रेमकैदी फेम) आणि नाव नसलेले आणि फक्त चेहरा असलेले असे अभिनेते आहेत ज्यांच्या कारकिर्दीचा मोठा भाग फक्त हिरोची पडद्यावरची रेघ मोठा करण्यात गेला आहे. या प्रक्रियेत यांच्यातल्या अभिनेत्यावर अर्थातच अन्याय झाला. मागे मी एकदा फ्रेण्डशिप डे ला हॅपी दीपक तिजोरी डे अशा शुभेच्छा द्याव्यात आणि सगळ्यांना पडद्यावर दीपक तिजोरी आहे तसा मित्न सगळ्यांना मिळो अशी सदिच्छा दिली होती. लोकांना ते भन्नाट आवडलं होतं. मतितार्थ असा की, जंजीर मधल्या शेरखानसारखे काही तुरळक अपवादवगळता नायकाचा मित्न दुय्यम विनोदनिर्मिती करण्यासाठीच असतो असं लोकांना वाटायचं आणि ते साहजिकच होतं.
( लेखन पटकथा लेखक आहेत.)