झिरमिळ्या...फ्रिन्जेस ही एक नवीच फॅशन, पण, ती सोबर दिसते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 06:20 PM2018-02-21T18:20:47+5:302018-02-22T08:44:54+5:30
फ्रिन्जेस ही एक नवीच फॅशन, पण, ती सोबर दिसते का?
- श्रुती साठे
फ्रिन्जेस हा शब्द गेलाय का तुमच्या कानावरून?
नसेल तर ही एक नवीन, कोरीकरकरीत फॅशन आहे. नेहमीच्या ड्रेस, जॅकेट, स्कार्फमुळे येणाºया लूकला अजून हटके करायची संधी हे फ्रिन्ज तुम्हाला देतात. म्हणजे नक्की काय हे पाहण्यासाठी सोबतचा फोटो पाहा.
अलीकडेच एका पार्टीत मलायका आणि अमृता भगिनी फ्रिन्ज ड्रेसमध्ये दिसल्या. त्याच पार्टीत करिनाने तर ही फ्रिन्ज स्टाइल बुटांसाठी वापरली.
फ्रिन्जचा इतिहास अनोखा आहे. त्याचा वापर पहिल्यांदा अमेरिकेत फ्लॅपर गर्ल्सनी केला. फॅशनेबल, बिनधास्त आणि समाजची चौकट न मानणाºया या मुलींना फ्लॅपर म्हणत असत. त्यांचा पेहराव, केसरचनासुद्धा साधारण स्त्रियांपेक्षा वेगळी असायची. नंतर त्यावर आधारित फ्रिन्ज ड्रेसेस बॉलिवूडच्या कॅब्रे, डिस्को अशा बेधडक गाण्यांसाठी वापरू जाऊ लागले. झिरमिळ्यांचे बिंदू आणि हेलनचे ड्रेस आठवा.
आता पुन्हा नव्यानं या फ्रिन्जचा वापर खास तरु णींसाठी कपडे बनवणारे ब्रॅण्ड्स वेगवेगळ्या रूपात करताना दिसतात. कधी ड्रेसच्याच कापडाच्या, मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट, कधी फुटवेअर, कधी पर्सनासुद्धा लावलेले फ्रिन्जेस पहायला मिळतात. थोडक्यात झिरमाळ्याच त्या. आताशा त्या ड्रेसच्या आणि बाह्यांचा काठाला लावल्या जातात. लोकरीच्या, लेदर आणि पॉलिस्टरमध्ये त्या विविध रंगात मिळतात. शॉर्ट आणि लॉँग श्रगला लावलेले फ्रिन्जेस अतिशय सुरेख दिसतात, ट्रेण्डी लूक देतात. फ्लोरल आणि आॅल ओव्हर प्रिंटेड श्रगच्या काठांना लेदरच्या फ्रिन्जेस सुरेख दिसतात.
फ्रिन्जेसचा वापर फक्त पॉप आणि वेस्टर्न लूकसाठीच होतो हे श्रुती हसनने साफ खोटं ठरवलं. पारंपरिक लेहेंगा चोलीवर गुलाबाचे नक्षीकाम केलेली आणि फ्रिन्जेस लावलेली ओढणी आकर्षक आणि सोज्वळ दिसली. त्यावर घातलेले फ्रिन्जेसचे कानातलेपण शोभून दिसले. हा नवा प्रकार ट्राय करून पहायला हरकत नाही.