फु युहानहुई

By Admin | Published: August 25, 2016 04:54 PM2016-08-25T16:54:28+5:302016-08-25T17:29:26+5:30

रिओमध्ये वैयक्तिक १०० मीटर जलतरणात तिने ब्रॉन्झ मेडल जिंकलं. या स्पर्धेनंतर तिची रिले होती. चार बाय शंभर मीटरच्या या जलतरण स्पर्धेत फु आणि तिची टीम चौथ्या क्रमांकावर ढकलली गेली. ती जाहीरपणे म्हणाली, ‘याला मी जबाबदार आहे, कारण माझे पिरिएड्स चालू होते.’

Fu Yuanhui | फु युहानहुई

फु युहानहुई

googlenewsNext

 - माधुरी पेठकर

साक्षी आणि सिंधूची आॅलिम्पिक मेडल्स सेलिब्रेट करताना रिओ आॅलिम्पिकमधल्या आणखी एका मुलीकडे तुमचं लक्ष गेलं का?
तिने ब्रॉन्झ मेडल जिंकलंय आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे एका ‘न बोलण्याच्या गुप्त गोष्टी’तली हवा काढून टाकली आहे.
तिचं नाव फु युहानहुई. ही चीनची सुप्रसिद्ध जलतरणपटू! आहे जेमतेम वीस वर्षांची, पण अनेक जागतिक स्पर्धा तिने गाजवल्या आहेत. बॅकस्ट्रोकमध्ये तिचा हातखंडा. चीनमध्ये तिच्या पोहण्याचे लाखो चाहते आहेत. एका अर्थाने फु चीनची युथ आयकॉन आहे. वेबवर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात. रिओमध्ये वैयक्तिक १०० मीटर पोहण्याच्या शर्यतीत फुनं ब्रॉन्झ मेडल जिंकलं. म्हणजे रिओमध्येही ती भलतीच फॉर्मात होती. या स्पर्धेनंतर तिची रिले होती. चार बाय शंभर मीटरच्या या जलतरण स्पर्धेत फु आणि तिची टीम चौथ्या क्रमांकावर ढकलली गेली आणि चीनमध्ये सगळ्यांनाच हळहळ वाटली.
फुच्या टीमनं पराभव स्वीकारला. पण स्पर्धा संपल्यावर तिच्या निराश चेहऱ्यावरचे हावभाव मात्र काही वेगळंच सांगत होते. माध्यमांनाही त्याची चाहूल लागली. आणि फुनंही काहीही आडपडदा न ठेवता आतापर्यंत क्रीडांगणावर फारशा बोलल्या न गेलेल्या विषयाला वाचा फोडली. 
ती म्हणाली,
‘पाण्यात असताना माझ्या पोटात दुखत होतं. स्पर्धेच्या आदल्या दिवशी माझे पिरिएड्स सुरू झाले. स्पर्धेच्या दिवशी पोटात प्रचंड दुखत होतं. पायात पेटके येत होते. मला अशक्तपणा आला होता. माझ्या टीमनं चांगला प्रयत्न केला, पण माझ्यामुळे आम्ही स्पर्धेत मागे पडलो.’

स्वत:ला आलेल्या पाळीची गोष्ट फुने सगळ्यांसमोर ही अशी जाहीर सांगून टाकल्याने जगभरात चर्चांना उधाण आलं. तिच्या या मुलाखतीमुळे अख्ख्या जगाच्या विशेषत: चिनी लोकांच्या कपाळावर आठ्या पडल्या.
एकीकडे फुच्या वडिलांनी मात्र तिला चांगलं पाठबळ दिलं. तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था समजून घेत तिला तिच्या शरीरातल्या निसर्गाच्या हाकेचा आदर करण्याचा सल्ला दिला. 
पण चीनमधल्या प्रसारमाध्यमांना आणि चिनी जनतेला फु जे काही म्हणत होती त्याचं आश्चर्य आणि कुतूहलच वाटलं.
एक मात्र झालं, जे वेगळं होतं.
फुवर कोणी टोकाची टीका केली नाही. 
२०१० च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये चीनच्या एका विजयी खेळाडूने जिंकल्यानंतर नेहमीच्या परंपरेप्रमाणे देशाचे, देशातल्या कम्युनिस्ट पार्टीचे आभार मानले नाहीत. उलट त्यानें थेट आपल्या आई-वडिलांचे, मित्रांचे आभार मानले. या प्रकाराला थेट देशद्रोह ठरवून त्याच्यावर प्रचंड टीका झाली.
विशेष म्हणजे, पूर्वेकडच्या संस्कृतीत बायकांनी ‘न बोलण्या’ची गोष्ट थेट आॅलिम्पिकच्या क्रीडांगणावरून बोलूनही फुला चिनी माध्यमांनी धारेवर धरलं नाही.
या चर्चेला काहीशा आश्चर्याचाच पदर तेवढा आला.
फुच्या या जाहीर कबुलीनंतर कोणी म्हटलं, ‘खरंच पाळीचा असा परिणाम होतो जसा फुवर झाला?’
‘म्हणजे पाळी असतानाही स्विमिंग करता येतं’. 
‘पण मग स्विमिंग पूलमध्ये तशा कोणत्याच खुणा दिसल्या नाहीत?’
‘कशा दिसतील खुणा? तिनं टॅम्पून्स वापरले असतील कदाचित.’
‘छे छे. टॅम्पून्स कशी वापरेल ती? चीनमध्ये व्हर्जिनिटीला किती महत्त्व आहे ते माहिती आहे ना!!’
‘आपली व्हर्जिनिटी नवऱ्यासाठी राखून ठेवणं खरंच इतकं गरजेचं आहे का?’
- अशा अनेक वळणाच्या चर्चा सध्या चीनमध्ये चालू आहेत म्हणे. 
महिन्याचा रक्तस्त्राव ही निसर्गनियमानुसार येणारी गोष्ट मानून त्याचं दडपण न घेता क्रीडांगणावरली आपली कामगिरी पार पाडल्याबद्दल फुचं सध्या कौतुक होतं आहे.
त्याहीपेक्षा मोठी चर्चा आहे, ती एरवी तरुण मुलींना संकोचाच्या वाटणाऱ्या शारीरिक स्थितीबद्दल तिने केलेल्या मोकळ्या खुलाशाची!
फुच्या आधी २०१५ च्या आॅस्टे्रलियन ओपनच्या स्पर्धेत हरलेली ब्रिटनची खेळाडू हिदर वॅटसननं आपल्या खराब कामगिरीचं कारण सांगताना आपल्या पाळीचा जाहीर उल्लेख केला होता. 
- आपल्याकडल्या एकूणच ‘झाकपाक’ करत सगळं गुप्त ठेवायचे संस्कार असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फुची ही गोष्ट मुद्दाम सांगावी अशीच आहे.
अर्थात, आता आपल्याकडेही परिस्थिती बरीच बदलली आहे. निदान काही जणींच्या बाबतीत तरी बदलली आहे! पूर्वी पाळी आली की मुलीला एका कोपऱ्यात बसवून ठेवलं जायचं. तिनं त्या चार दिवसात कोणतीच कामं करायची नाहीत आणि आपण असं वेगळं का बसलोय हेही कोणाला कळता कामा नये असा दंडकच असायचा. 
पण पुढे शिक्षणानं समज वाढली, घराबाहेर पडण्याची अपरिहार्यता तयार झाली आणि पाळीच्या चार दिवसांत सोवळ्याओवळ्याचा बाऊ न करता मुली-बायका आपली रोजची कामं करू लागल्या. पण म्हणून पाळीबद्दलच्या सर्वच समज-गैरसमजांना पूर्णविराम मिळाला असं नाही. शिवाशिवीचे, धार्मिक कार्याबद्दलचे पाळीला जोडून असलेले समज आजही तसेच आहेत. काहीजणी ते मुकाट्यानं पाळतात, तर काही जणी आपआपल्या पातळीवर बंड करून उठतात. 
हल्ली टीव्हीवरच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती बघितल्या की पाळीबद्दलच्या बदललेल्या समाजमनाचा सहज अंदाज येतो. मुलीला पाळी आहे म्हणून तिला साध्या भाषणाच्या स्पर्धेलाही पाठवायला काचकूच करणारी आई दिसते, तशीच पाळीच्या दिवसात मैदानावर आपल्या नेहमीच्याच उत्साहानं खेळणारी, आॅफिसमध्ये तासन्तास काम करणारी मुलगीही दिसते. 
पाळीभोवतालचं विचारविश्व बदलतंय, विस्तारतंय हे मान्य; पण पाळीच्या चार दिवसांत खेळणं याकडे घरात, बाहेर अजूनही भुवया ताणूनच पाहिलं जातं. किंबहुना त्याबद्दल न बोलण्याची मानसिकताच जास्त. 
- फुने आता हाही विषय चर्चेत आणला आहे, म्हणून तिचं विशेष कौतुक!!
सगळे समज-गैरसमज आणि मुख्य म्हणजे संकोच बाजूला ठेवून पाळी आणि परफॉर्मन्स यांचा नेमका विचार करण्याची संधी फुने सगळ्यांना दिली आहे, 
ती कशाला उगाच वाया दवडता?

पाळी आणि परफॉर्मन्स
१. खेळाडू असलेल्या मुली आणि सामान्य मुली यांच्यात प्रत्येक बाबतीत वेगळेपणा असतो. सामान्य मुलींचा आहार, त्यांचा व्यायाम आणि स्पर्धात्मक क्षेत्रात खेळाडू असलेल्या मुलींचा आहार आणि व्यायाम यात फरक असतो. आणि म्हणूनच सामान्य मुलींच्या हार्मोन्सवर याचा परिणाम वेगळा होतो आणि खेळाडू मुलींवर वेगळा परिणाम होतो. 
२. खेळाडू मुली सामान्य मुलींपेक्षा खूप जास्त व्यायाम करतात. त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटी खूप असतात. त्यामुळे त्यांचा बोन मास आणि मसल मास हा सामान्य मुलींपेक्षा जास्त असतो. 
३. आहारामध्येही खेळाडू मुली हाय प्रोटिन्सचा आहार घेतात त्याचा थेट परिणाम त्यांच्या हार्मोन्सवर होतो. म्हणूनच अनेक खेळाडू मुलींचं पाळीचं चक्रही इतर सामान्य मुलींपेक्षा वेगळं असतं. बऱ्याचदा ते अनियमित असतं. 
४. सामान्य मुली आणि खेळाडू मुली यांच्यातला फरक यासाठी महत्त्वाचा कारण पाळीकडे बघण्याचा खेळाडू आणि सामान्य मुलींचा दृष्टिकोनही वेगळा असतो. 
५. सामान्य मुलींसाठी ‘पाळी’ हे एखादं काम न जमण्याचं / नेहमीच्या क्षमतेने काम न करण्याचं ‘कारण’ ठरू शकतं. खेळाडू मुलींना हा पर्याय उपलब्ध नसतो.
६. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये उतरणाऱ्या खेळाडू मुलींच्या मागे मोठा बॅकअप असतो. क्रीडा प्रशिक्षक, फिजिओथेरिपिस्ट, डाएट सल्लागार वगैरे वगैरे. 
७. या यंत्रणेच्या मार्फत या मुली जशा आपल्या खेळाशी जोडल्या जातात, त्यात निष्णात होतात तशाच आपल्या शरीरातील नैसर्गिक चक्राशीही त्या व्यवस्थित डील करतात. किंबहुना त्यांना त्यांच्या प्रशिक्षणातून हे व्यवस्थित शिकवलेलं असतं. त्यामुळे पाळीसारख्या नैसर्गिक घटनेचा खेळावर परिणाम होऊ न देण्याचाही त्यांना सराव होत जातो.
८. यातही व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं फु, हिदर सारख्या मुली अपवाद ठरू शकतात. पाळीच्या वेळेस टोकाच्या वेदना, अतिरक्तस्त्राव होऊ शकतो. पण असे प्रसंग पाळीव्यतिरिक्त कारणांनीही खेळाडूंवर ओढवू शकतात.
९. खेळाडू असलेल्या आणि विशेषत: मोठमोठ्या स्पर्धेत उतरणाऱ्या मुली यावर वेळीच उपचार घेतात.
१०. अर्थात फु जे म्हणते त्यात तथ्य आहे पण म्हणून पाळीचा खेळातील परफॉर्मन्सवर नकारात्मक परिणाम होतं असं अजिबात नाही. 
- डॉ. गौरी करंदीकर

Web Title: Fu Yuanhui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.