गॅरेजवाला ते हेलिकॉप्टरवाला! -नववी नापास गॅरेजवाल्या तरुणानं कसं बनवलं हेलिकॉप्टर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:00 AM2018-10-04T06:00:00+5:302018-10-04T06:00:00+5:30

ज्यानं प्रत्यक्ष हेलिकॉप्टरच फार उशिरा पाहिलं तो धडपडत हेलिकॉप्टर बनवत सुटला, त्यापायी गॅरेजमध्ये राबून कमावलेले पैसे खर्च केले आणि प्रत्येक अपयशातही तो यशाचं एक छोटं पाऊल शोधत राहिला त्या कल्पक तरुणाची ही गोष्ट.

 Garage to helicopter! when a small town garage mechanic makes a helicopter | गॅरेजवाला ते हेलिकॉप्टरवाला! -नववी नापास गॅरेजवाल्या तरुणानं कसं बनवलं हेलिकॉप्टर?

गॅरेजवाला ते हेलिकॉप्टरवाला! -नववी नापास गॅरेजवाल्या तरुणानं कसं बनवलं हेलिकॉप्टर?

googlenewsNext
ठळक मुद्देपडत-उडत गिरक्या घेणार्‍या हेलिकॉप्टरवेडय़ा तरुणाची एक जिद्दी कहाणी

हणमंत पाटील

पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवडमध्ये देहू रस्त्यावर तळवडे येथे श्री सिद्धनाथ गॅरेज नावाचं एक गॅरेज आहे. साधं पत्र्याचं गॅरेज. कुठल्याही गॅरेज सारखंच हे गॅरेज. पण या गॅरेजमध्ये गाडय़ा-मोटारी नाही तर थेट हेलिकॉप्टर दिसतात.
गॅरेजमध्ये हेलिकॉप्टर? एरव्ही कुणीही  विश्वास नसता ठेवला पण या गॅरेजमध्ये असलेले स्वदेशी बनावटीचे हॅलिकॉप्टर पाहण्यासाठी लोक आता गर्दी करू लागलेत. रस्त्यावरून जाणारे-येणारेही क्षणभर थांबतात, हे हेलिकॉप्टर पहायला येतात. देशाच्या संरक्षण विभागात असतात तसे ग्रीन कलरचे हे हेलिकॉप्टर इथं कुठून आले? गॅरेजमध्ये कसे आले? खासगी गॅरेजमध्ये काय करतात? असे प्रश्न मनात येतातच, तर त्यांची उत्तरंही याच गॅरेजमध्ये मिळतात.  आणि ती उत्तरं देतो एक साधासा तरुण. कुठल्याही गॅरेजमध्ये काम करणार्‍या तरुण, कष्टाळू, मेकॅनिकसारखाच तो दिसतो. आपण ते हेलिकॉप्टर पाहत असतो, आपल्या मनातले प्रश्न चेहर्‍यावर दिसतातच तेव्हा तो तरुण अत्यंत नम्रपणे सांगतो, ‘हे मी बनविलेले हेलिकॉप्टर हाय!’
आपण काय ऐकलं यावर आपला क्षणभर विश्वासच बसत नाही; पण गॅरेजमधील गाडय़ांच्या दुरुस्तीचं काम थांबवून आपल्याशी बोलणारा हा साडेपाच फुटाचा पस्तीशीतील तरुण अभिमानाने पण अत्यंत सहज सांगतो की, हे हेलिकॉप्टर मी बनवलंय.
आपल्याला वाटतंच की कसं शक्य आहे? गॅरेजमध्ये कुणी हेलिकॉप्टर बनवतं का? हेलिकॉप्टर एकतर संरक्षण विभागाकडे असतात, नाहीतर एखाद्या मोठय़ा उद्योगपतीकडे. ज्यांच्याकडे हेलिपॅडची सुविधा आहे अशा मोठय़ा व्यक्तींकडे हॅलिकॉप्टर असू शकतं, कुणी ते हौशीनं भाडय़ानंही घेऊ शकतं; पण गॅरेजमध्ये हेलिकॉप्टर?
मळलेल्या निळ्या कपडय़ातला हा गॅरेजवाला मात्र छातीठोकपणे सांगतो, हे माझंय, मी बनवलंय. देशातील पहिलं स्वदेशी बनावटीचं हॅलिकॉप्टर आहे. तेव्हा उत्सुकता आणखी ताणली जाते. आपल्याला कळत नाही, हा काय प्रकार?


मग त्याच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर कळतं की त्याचं नाव प्रदीप शिवाजी मोहित. मूळचा सांगली जिल्ह्यातील वांगी गावचा हा मुलगा. लहानपणापासून त्याला हेलिकॉप्टर या शब्दानं अक्षरशर्‍ वेड लावलं होतं. गावात गॅरेजमध्ये तो काम करायचा, हातात गाडी, तो अनेकदा गाडीच्या खाली; पण डोक्यात हेलिकॉप्टरचा विचार गिरक्या मारायचं.  त्यात गावात काही पोट भरत नाही म्हणून मेहुण्याच्या सांगण्यावरून तो पिंपरीत आला.
केव्हापासून हेलिकॉप्टरनं तुला वेड लावलं असं विचारलं तर तो म्हणतो, आता बसा जरा निवांत. गॅरेजमधील एक खुर्ची पुढय़ात ठेवून त्यानं चहा मागवला आणि म्हणाला,‘अहो, हे वेड लहानपणापासूनचं आहे. माझ्या जन्म 1983 चा. पहिली ते तिसरी मी मामाच्या गावात (शेनोली स्टेशन) शिकलो. पुन्हा वडिलांनी आमच्या वांगी गावातल्या शाळेत घातलं; पण माझं मन शाळेत रमत नव्हतं. मग आई-वडिलांमागे शेतात मदतीसाठी जायचो. शेतात नवीन यंत्र आलं की तसंच हुबेहूब यंत्र बनवायचो. त्यासाठी कधी कागद, लाकूड, पत्रा अन् भंगाराच्या साहित्याचा उपयोग करायचो. शाळा सुटली की माझा हा उद्योग सुरू व्हायचा. पहिल्यादा भुईमुगाच्या शेंगा फोडण्याचं मशीन बनवलं. त्यानंतर ऊस गाळणीचं मशीन पाहून तसंच पत्र्याचं बनविण्याचा प्रयत्न केला. घराजवळ बैलगाडीचा एक छकडा पडलेला होता. त्याला लाकडी चाकांऐवजी सायकलची चाकं दोनऐवजी चार बसवून त्याची मोटार तयार केली. त्यानंतर विहिरीतून पाणी काढण्याची यारी (मोट) पाहिली. झाडाच्या फांद्या व दोरीच्या साह्याने तशी हुबेहूब यारी तयार केली. माझा हा उद्योग काही थांबत नव्हता; पण शाळेत लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे नववीत नापास झालो. मग वडिलांनी माझं हे वेड पाहून गॅरेजमध्ये काम करण्यास सांगितलं. गावातील जयंत कुंभार मिस्त्रीच्या गॅरेजमध्ये आयटीआय शिकलेल्या मुलांबरोबर काम करत होतो. पण गावात पोरं हिणवायची. म्हणायची, अरं शाळा सोडून हे काय करतोय? तेव्हा मी त्यांना सांगायचो मला हेलिकॉप्टर बनवायचं आहे. त्यासाठी मी गॅरेजमध्ये काम करतोय. हे ऐकल्यावर सर्वजण मला हसायचे; पण मला मात्र दिवसभर अन् स्वप्नातही हेलिकॉप्टरच दिसत होतं. माझ्या डोक्यात एकच विचार होता. हेलिकॉप्टर आकाशात कसं उडत असेल. त्याला पंखं का आहेत. पक्षी पंखांच्या साह्याने उडतात म्हणून हेलिकॉप्टरलाही पंखं लावतात. कधीतरी विमान अन् हेलिकॉप्टरचा आकाशात उडताना आवाज आला की काम टाकून जिथे असू, तेथून बाहेर येऊन मी ते दिसनासे होईर्पयत पाहत बसायचो. पण मार्ग सापडत नव्हता. 
एक दिवस गॅरेजमधील मित्रांबरोबर थ्री इडिएट पिचर पाहत होतो. त्यावेळी आमीर खान (रँचो) ड्रोन कसा जिद्दीने उडवितो, हे पहिले अन् पिचर अर्धा सोडून पळालो. आता आपणही हेलिकॉप्टर केल्याशिवाय थांबायचं नाही, असं ठरवलं.  
गॅरेजमध्ये काम केल्याचे सहा महिन्यांत जमा झालेले 12 ते 15 हजार माझ्याकडे होते. हे सर्व पैसे घेऊन पलूस हे तालुक्याचं ठिकाण गाठलं. लोखंडी पाइप, पत्रा, नट-बोल्ट असं साहित्य गाडीत घेऊन घरी आलो. माझं हे वेड घरच्यांना माहिती असल्याने कोणी काही बोललं नाही. लगच दुसर्‍या दिवशी डोक्यातील कल्पनेप्रमाणे हेलिकॉप्टरचं काम सुरू केलं. दिवसभर भूकही लागली नाही. सहा महिने दिवसा गॅरेजचं काम आणि रात्री हेलिकॉप्टरचं काम सुरू होतं. हेलिकॉप्टरसाठी गरजेचे पत्र्याचे सुटे भाग केले. पहिल्यांदा पंखा तयार केला. गॅरेजमधील जुन्या गाडीचं इंजिन बसविले. बॉडी तयार करून उडविण्याचा पहिला प्रयत्न डिसेंबर 2009 साली केला; परंतु पंखे जड झाल्याने हेलिकॉप्टर जागेवरच गडगडलं. तरीही मला आनंद झाला की, आपण ते काही वेळ सुरू करू शकलो. अन् पुन्हा पत्र्याच्या पंख्याचं वजन कमी करण्यासाठी देवधर लाकडय़ाच्या फळ्यांचा पंखा म्हणून जोडला. आता दुचाकीऐवजी चारचाकी गाडीचे इंजिन बसविलं; पण दुसर्‍यांदा अंदाज चुकला. कारण इंजीन जड झालं होतं. घरी एकही रुपया न देता गॅरेजमध्ये मिळतील ते सर्व पैसे मी हॅलिकॉप्टरच्या वेडात घालवत होतो. हे पाहून घरचेपण ओरडू लागलेत. 
एकेदिवशी आमचे मंत्रीमहोदय डॉ. पतंगराव कदम साहेब भिलवडी-वांगी मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टर घेऊन आले होते. त्यावेळी मी ते मैदानात जाऊन जवळून पहिल्यांदा प्रत्यक्ष अन् निरखून पाहिलं. आणि पुन्हा माझ्या स्वप्नानं उचल घेतली. दुसर्‍या ठिकाणी काम करून हॅलिकॉप्टरसाठी पैसे अन् वेळ मिळत नसल्याने कडेगावला स्वतर्‍चं गॅरेज सुरू केलं. ट्रॅक्टरच्या इंजिनाचं काम करीत असतानाही हेलिकॉप्टरच्या इंजिनाचं गणित डोक्यात सुरू राहिलं. हॅलिकॉप्टर उडविण्यासाठी हलकं व्हावं म्हणून आता नवीन अ‍ॅल्युमिनिअमचे पंखे, बॉडीसाठी नवीन साहित्याची जळवाजुळव केली. गॅरेजमध्ये मिळालेले सर्व पैसे या वेडासाठी घालवतच होतो. घरचे वैतागले होते; पण माझं वेड काही थांबत नव्हतं.
 आता शेवटचा प्रयोग म्हणून तिसरं मॉडेल यशस्वी करण्याचं निश्चित केले. पंखे 13 फूट लांबीचे केले. बॉडीचे वजन कमी करीत 380 र्पयत खाली आणलं. त्यासाठी आवश्यक साहित्यासाठी डोंगराई साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी 50 हजार रुपयांची मदत केली. अन् कारखान्यातील साहित्य वापराची परवानगी दिली होती. ’
तो एका दमात सांगत राहतो. आपण ऐकतच राहतो.

हेलिकॉप्टर उडालं पण धाडस आलं अंगाशी..
इथवर त्याची गोष्ट एका रेषेत चालली; पण पुढं असं झालं की, जानेवारी 2013 मध्ये एक  दिवस त्यानं हॅलिकॉप्टर उडविण्याची तारीख जाहीर केली. प्रदीप सांगतो, कॅमेरामन अन् व्हिडीओग्राफर यांना बोलावलं होतं. मला हेलिकॉप्टर उडणार असा विश्वास होता. तशी तयारीही झाली; पण ते पायलटप्रमाणे उडावयचं कसं याचं नॉलेज नव्हतं. तरीही धाडस केलं. एक तर हे हेलिकॉप्टर हवेत उडेल, नाहीतर मी आयुष्यातून उडेल, असे ठरवूनच धाडस केलं. गावातील लोक पाहण्यासाठी जमा झाले. मीही पायलटचा सदरा शिवून अंगात घातला. अन् थेट हॅण्डेलमारून मोटार सुरू केली. कसंतरी जमिनीपासून पाचएक फुटावर ते उचललं, पण पुढे कसं न्यायचं याची माहिती नव्हती. त्यामुळे तेथेच ते जोरात आदळलं. मला बेल्ट लावण्याची माहिती नव्हती. त्यामुळे मीही बाहेर फेकला जाऊन, काही साहित्य माझ्या अंगावर पडलं. त्यात हाताला व संपूर्ण अंगाला गंभीर जखमा झाल्या. पण त्याहीपेक्षा हेलिकॉप्टर उडल्याचा जास्त आनंद झाला होता. मला उठता येत नव्हतं त्यामुळे सगळे धावत माझ्याकडे आले, पण मला कॅमेर्‍यामध्ये माझं हेलिकॉप्टर उडत असल्याचं पाहण्याची इच्छा होती. ते पाहिल्यानंतर दवाखान्यात काहीवेळ मला अ‍ॅडमीट करण्यात आलं. त्यानंतर घरच्यांनी व नातेवाइकांनी मला हा हेलिकॉप्टरचा नाद सोडण्याचा आग्रह धरला. त्यासाठी माझ्या लग्नाची घाई सुरू झाली. काही दिवसांत लग्न करण्यात आलं. माझे वेड माहिती असल्याने पृथ्वीराज देशमुख यांनी मला रिमोट कण्ट्रोलचं हेलिकॅाप्टर लग्नात भेट दिले. त्यानंतर काही दिवसाने एक नेव्हीत काम कारणारे पाहुणे मला भेटले. त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी एका वैमानिक मित्राशी बोलून मला सांगितलं की, हॅलिकॉप्टरसाठी गाडीचं इंजिन उपयोगाचं नसून, त्यासाठी टरबाइन इंजिन गरजेचं असतं. मग माझ्या डोक्यात टरबाइन इंजिनाचा भुंगा घुसला. 
तोर्पयत मी हॅलिकॉप्टर उडविल्याच्या बातम्या सर्वदूर पसरल्या होत्या. ही बातमी शासनाच्या बेंगलोर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) र्पयत पोहोचली. मला एकेदिवशी फोन आला. कोणीतरी इंग्रजीत बोलत होते. मला काही कळत नसल्यानं मी त्यांना मराठीत बोलण्यास सांगितले. त्यानंतर थोडय़ा वेळाने त्याच नंबरवरून फोन आला. आता मात्र मराठीतून आवाज आला. तुम्ही हेलिकॉप्टरवाले प्रदीप मोहिते आहात का? मी बेंगलोरच्या ‘एचएएल’मधून संजय कुंटे बोलतोय. लवकरच तुम्हाला आम्ही भेटायला येणार आहोत, असं सांगून त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर तालुक्याच्या तहसीलदार साहेबांचा फोन आला की, तुम्हाला कलेक्टर साहेबांचा फोन येईल, तुम्ही तुमची माहिती द्या. त्यांचा फोन झाला की, लगेच कलेक्टर साहेब बोलले. तुम्हाला भेटायला ‘एचएएल’चे अधिकारी येणार आहेत, असं सांगून त्यांनी माझा संपूर्ण पत्ता घेतला. काही दिवसातच ‘एचएएल’ने अमर पिसे नावांचे त्यांचे मराठी इंजिनिअर यांना माझ्याकडे पाठविले. त्यांनी गॅरेजमध्ये येऊन सर्व माहिती घेण्यास सुरुवात केली. पंख्यांचा आकार आणि लांबी कशी ठरविली, असं विचारले. त्यावर मी आतार्पयत 50 ते 60 पंखे बदलल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अनेक उलट-सुलट प्रश्न विचारले; पण उत्तर देण्याऐवजी मी त्यांना केलेले प्रॉक्टिकल दाखवत होतो. तेव्हा त्यांनी मी बनविलेल्या पार्टची नावे कलेक्टिव्ह, सायकलिंक व रडार अशी असल्याचं सांगितलं. शिवाय किती माणसं काम करतात, असं विचारलं. मी एकटाच उद्योग करतो, असं सांगितल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी सर्व मॉडेलचे फोटो काढून घेतले. टरबाइन इंजिनचं त्यांना कौतुक वाटलं. त्यांनी मला बेंगलोरला ‘एचएएल’च्या पाहणीसाठी बोलवलं. चार दिवस राहण्यासह सर्व जाण्या-येण्याची व्यवस्था त्यांनी केली. मला संपूर्ण कंपनी दाखविली. तिथल्या इंजिनिअरबरोबर मी तोडक्या मोडक्या हिंदीत चर्चा केली. त्यांनी एक कार्यक्रम घेऊन मला ‘ध्रुव अवॉर्ड’ देऊन सन्मान केला. 
‘एचएएल’च्या भेटीनंतर मला आणखी विश्वास आला. आता थांबायचे नाही, असं म्हणून गॅरेजमध्ये पुन्हा हॅलिकॉप्टरचं नवीन मॉडेल बनविण्याचा उद्योग सुरू केला. आतार्पयत नऊ वर्षात सात मॉडेल तयार केली आहेत. सातव्या मॉडेलमध्ये सर्व स्वदेशी बनावटीचं साहित्य आहे. त्याचं वजन आता 45 किलो इतके कमी असून, 55 अश्वशक्तीचे इंजिन बसवलं आहे. त्यातील पाच पार्ट्सना पेटण्ट मिळालं आहे. त्यामुळे माझा हेलिकॉप्टर उडविण्याचा विश्वास आणखी वाढला आहे, पण पैशाची चणचण गप्प बसू देत नाही. घरचे वैतागले आहेत. त्यामुळे बायकोला घेऊन दोन महिन्यांपूर्वी पुणं गाठण्याचा निर्णय घेतला. मेहुणा बालाजी पाटील हा पिंपरीतील एका खासगी कंपनीत काम करत आहे. त्याच्या मदतीने देहू-आळंदी रस्त्यावर एक पत्र्याचं गॅरेज भाडय़ानं घेतलं आहे. त्या ठिकाणी चारचाकी गाडय़ांच्या दुरुस्तीचे काम सुरू केलं आहे. या ठिकाणी माझं लाडकं हेलिकॉप्टर ठेवलं आहे. त्याच्या प्रेरणेने मी गॅरेजचं काम करीत आहे,’ - असे सांगताना भावुक झालेल्या प्रदीपचे डोळे पाणावले. 
या मुलाची धडपड ऐकून आपण थक्क होतो. तो त्याची पाच पेटण्ट दाखवत असतो. त्याला त्याच्या प्रत्येक अपयशी पावलांतही यश दिसतं, कारण ते पाऊल त्याला पुढं घेऊन गेलेलं असतं, त्याची ही जिद्द ताकद बनलेली असते आणि आपण पाहत असतो त्या गॅरेजमध्ये एका हेलिकॉप्टरचं स्वप्न.



(लेखक लोकमतच्या पुणे-पिंपरी चिंचवड आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)
 

Web Title:  Garage to helicopter! when a small town garage mechanic makes a helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.