त्वचेवर टॅटू प्रयोग करताय?-हे वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:18 PM2019-05-16T14:18:06+5:302019-05-16T14:23:02+5:30
टॅटू काढताना आपण आपल्या त्वचेवर प्रयोग करतोय, ते प्रयोग फसणार नाहीत एवढी काळजी घ्या!
- वैद्य राजश्री कुलकर्णी
आपण फॅशनेबल राहावं, आकर्षक दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यातूनच मग फॅशनच्या जगात येणार्या अनेक गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात. नेलआर्ट, हेअर कलर आणि टॅटूइंग हे तर तरुणांच्या जगात परवलीचे शब्द झाले आहेत. टॅटू एक काढूनही भागत नाही तर अनेक टॅटू, कलर टॅटू असे अनेकांच्या अंगावर दिसतात. टॅटू इतके आवडतात तरुण मुलांना की फॅशन म्हणून सतत नवनव्या गोष्टी येतच राहातात.
फॅशन हे एक चक्र आहे, ते बदलतं. अनेकदा काही गोष्टी जुन्या होतात काही नवीन येतात. मात्र अनेकदा फॅशन म्हणून कपडे किंवा इतर काही अॅक्सेसरीज यांच्यात जे प्रयोग केले जातात त्याचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध नसतो. आणि असला तरी त्याचा लगेच थेट परिणाम जाणवत नाही. पण त्वचेशी निगडित सौंदर्यप्रसाधनं, लिपस्टिक, मस्कारा, इतर मेकअप साहित्य, नेलपेंट्स , हेअर कलर हे मात्न जपून आणि काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. कारण कधी कधी त्यांची अॅलर्जी येण्याचा धोका असतो किंवा इतर दुष्परिणाम जाणवू शकतात.
आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे टॅटू. एकप्रकारे अंगावर गोंदवूनच घेणं असतं ते. अंगावर जिथं आपल्याला आवडेल तिथं टॅटू काढून घेतले जातात. अगदी छोटय़ा दोन-तीन ठिपक्यांपासून तर अगदी हात-पाय भरून जातील इतपत डिझाइन्स काढून घेतल्या जातात.
खरं तर टॅटू ही कला आपल्यासाठी काही नवीन नाही. कारण पूर्वापार आपल्याकडे गोंदवून घेतलं जात असे. अनेक वनवासी जमातींचा तर हा एक प्रकारचा सांस्कृतिक वारसा आहे. गोंदणं हे एक प्रकारचं आभूषण समजलं जाई. कपाळ, छाती, मनगट, दंड, हात, बोटं अशा ठिकाणी गोंदवलं जाई. विशेष म्हणजे याचं आरोग्यदृष्टय़ा महत्त्व किंवा परिणाम यांची जाणीव तेव्हापासून होती; पण गोंदणं आणि टॅटू हे एकसारखं वाटत असलं तरी फरक आहे. तो म्हणजे गोंदणं आणि टॅटू काढण्यासाठी वापरली जाणारी साधनसामग्री वेगळी असतात आणि त्यांचा शरीरावर होणार्या परिणामात फरक दिसतो.
गोंदताना...
घेलवा नावाचं एक तेल गोंदवण्यासाठी वापरलं जातं. जे नंतर त्वचेवर हिरवा रंग देत असे. सुई किंवा साळिंदराचा काटा वापरला जात. रंग गडद यावा म्हणून वर कोळशाची पूड लावली जात. आणि याचा काही त्नास होऊ नये, म्हणून राखेचा वापर केला जात असे.
टॅटू काढताना.
आता जे टॅटूज काढले जातात त्यासाठी वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी रसायनं वापरून शाई बनवली जाते आणि तिचा वापर केला जातो. यात काळा, लाल, पिवळा, निळा, हिरवा अशा सगळ्या रंगांचा वापर केला जातो. लाल रंगाच्या शाईमध्ये टिटॅनियम ऑक्साइड हे रसायन असतं. अशी प्रत्येक रंगात वेगवेगळी रसायनं असतात. आपली त्वचा ही खूप नाजूक आणि संवेदनशील असते. काहीजणांची तर जरा जास्तच कोमल असते. अशा व्यक्तींना त्वचेवर अॅलर्जिक पुरळ येणं, त्वचा लाल होणं, खाज येणं, अगदी मोठे फोड, फुणसे येणं इतपत रिअॅक्शन येऊ शकते.
त्वचेच्या एकूण सात स्तरांपैकी साधारण तीन स्तरार्पयत टॅटू, त्याची शाई पोहोचते आणि तेवढा खोल त्याचा प्रभाव असतो. तीन स्तरांमध्ये हे टॅटू डिझाइन पूर्ण केलं जातं. आधी जी डिझाइन आवडली असेल ती रेखाटली जाते. मग त्यात रंग भरणं, शेडिंग वगैरे केलं जातं आणि शेवटी फिनिशिंग टच दिला जातो. हल्ली तर ही कला इतकी विकसित झाली आहे की यात थ्रीडी इफेक्ट्ससुद्धा देता येतात. शिलाई मशीनमध्ये ज्या पद्धतीनं सुईचा वापर केला जातो तशाच एक किंवा अनेक सुया यात वापरल्या जातात. प्रत्येकवेळी सुई टोचली, एक प्रीक झाला की एक थेंब शाई त्वचेत प्रवेशित होते. जेव्हा हे टॅटूज कायमस्वरूपी म्हणजे ‘पर्मनंट’ परिणामासाठी काढले जातात तेव्हा ही शाई एकदा त्वचेत गेली, पसरली की काही केल्या काढता येत नाही. ही प्रक्रि या दिसते तितकी सोपी नाही. प्रत्येक सुई टोचली की वेदनाही होतात.
टॅटू करून घेणार असाल तर.?
* स्वस्तातील टॅटू निश्चितच सुरक्षित नसतात. कारण तिथे वापरली जाणारी साधनं, सुया, शाई यांची कोणतीही खात्नी देता येत नाही. स्वच्छता, र्निजतुक उपकरणांचा वापर याविषयी अनास्था असते. त्यामुळे त्वचेचा जंतुसंसर्ग अर्थात इन्फेक्शन होण्याची शक्यता खूपच जास्त असते.
जर एकच सुई र्निजतुक न करता एकापेक्षा अधिक व्यक्तींसाठी वापरली जात असेल तर रक्ताद्वारे पसरणारे एचआयव्ही किंवा कावीळ यासारखे आजार एका व्यक्तीकडून दुसर्या निरोगी व्यक्तीला होऊ शकतात, जे खूपच भयावह आहे.
* काही व्यक्तींना ही शाई आणि एकूणच प्रक्रि या सहन होत नाही आणि जिथे टॅटू काढला असेल त्याच्या आजूबाजूची त्वचा खूप खाजते आणि काही दिवसांनी एकदम जाड होऊन तिथे ‘केलॉइड’ म्हणजे मृत पेशींचा एक कडक गोळा तयार होतो. जो कधी कधी आकारानं खूप वाढतो आणि त्वचा कुरूप दिसू लागते.
आजर्पयत असं सिद्ध झालं आहे की, काहीतरी फॅन्सी करायच्या नादात जे टॅटू काढून घेतात त्यापैकी अनेकांना नंतर पश्चात्ताप होतो आणि मग तो टॅटू काढून टाकण्यासाठी विविध प्रयत्न करतात. लेझर वगैरे उपचार करून ते काढणं खूप खर्चीक असल्यानं मग काही ऐकिव उपाय केले जातात जे अजूनच तापदायक असतात. उदा. गूळ आणि चुना एकत्न करून लावणं, इतर काही बाजारू उत्पादनं वापरणं यामुळे त्वचेला उष्णतेचा त्नास होणं, पुरळ येणं, जखम किंवा मोठा व्रण तयार होणं, खड्डा पडणं असे असंख्य त्नास उद्भवू शकतात.
काळजी काय?
* आपल्याला खरंच टॅटू काढायचा आहे का, तो कायम आपल्या त्वचेवर राहाणार आहे ते आपल्याला चालणार आणि आवडणार आहे ना, याचा पूर्ण विचार करून मगच टॅटू काढायचा विचार पक्का करावा.
* टॅटू किती लहान/मोठा हवा आहे तसेच तो शरीराच्या दिसणार्या भागावर हवा आहे की झाकलेल्या याचाही विचार करावा.
* चांगल्या विश्वासू आणि नावाजलेल्या ठिकाणीच टॅटू काढून घ्यावा.
* तिथली स्वच्छता, र्निजतुकीकरण, साहित्याची शुद्धता याची संकोच न करता पूर्ण चौकशी करावी. एकदम फार मोठा टॅटू सुरुवातीला काढूच नये, टेस्ट किंवा ट्रायल म्हणून आधी एखादी छोटीशी डिझाइन काढून बघावी. काही त्नास झाला नाही तर दुसर्या डिझाइनचा विचार करता येईल.
* टॅटू काढल्यानंतर त्वचेची काळजी घ्यायला हवी. त्वचा स्वच्छ ठेवायला हवी.
* त्वचा कोरडी होऊ देऊ नये. त्यासाठी मॉइश्चरायझर वापरावं.
* लगेच टॅटू काढलेल्या जागेला ऊन लागू देऊ नये.
* पोहत असाल तर टॅटू काढल्यानंतर काही दिवस पोहणं टाळावं. कारण संसर्ग होण्याची शक्यता असते.
* टॅटू काढलेल्या जागेवर शक्यतो सिंथेटिक कपडय़ांचा स्पर्श टाळावा.
* कमीतकमी दोन आठवडे काळजी घ्यावी.
* जर खाज, आग किंवा पुरळ अशी काही लक्षणं जाणवली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतर्ची पूर्ण मानसिक तयारी झाल्याशिवाय कोणाच्याही आग्रहाला बळी पडून टॅटू नक्कीच काढून घेऊ नये.
( लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)