गिफ्ट रॅपर

By admin | Published: May 9, 2014 11:47 AM2014-05-09T11:47:40+5:302014-05-09T11:47:40+5:30

दुसर्‍यानं तिसर्‍याला द्यायची भेट ‘सजवून’ देण्याची एक प्रोफेशनल कला

Gift wrapper | गिफ्ट रॅपर

गिफ्ट रॅपर

Next
तुम्हाला कुणी प्रेमानं गिफ्ट दिलं. ते गिफ्ट काय आहे हे उत्सुकतेनं उघडून पाहण्याआधीच तुम्ही थांबता.
ज्या पद्धतीनं ते गिफ्ट रॅप केलेलं असतं, सजवून मस्त पॅक करून दिलेलं असतं ते तुम्हाला पाहत रहावंसं वाटत.टराटरा कागदं फाडून ते उघडावंसं वाटत नाही, हातात घेऊन पाहत रहावंसं वाटतं.
इतकं ते सुंदर पॅक म्हणजेच खरंतर तर रॅप केलेलं असतं.
नव्या जगात आतल्या गोष्टीपेक्षा ‘पॅकेजिंग’ला जास्त महत्त्व आहे, असं तुम्ही बोलताना बोलून जाताच ना, अस्सलपेक्षा सजावटीलाच लोकं भुलतात असा त्रागा करता ना, पण ही सजावटीची आणि पॅकेजिंगची कला तर हातात असेल तर एक नवीन उत्तम कमाईचं काम तुमच्या हाताला मिळू शकतं, हे माहितीये का?
गिफ्ट रॅपिंग नावाचं एक मोठं क्षेत्रच आता उदयाला आलं आहे आणि तुम्ही घरबसल्या काम करून आपल्या हाताच्या कलेला प्रोफेशनल रूप देऊ शकता.
गिफ्ट रॅपर बनू शकता.!
 
एक साधी हाउसवाइफ होते मी. आमच्या घरात ‘बहू’ घराच्या बाहेर जाऊन काही काम करेल हे मान्यच होणारं नव्हतं. घरी बसून काम करण्याचं मात्र पूर्ण स्वातंत्र्य होतं. आणि मला नुस्तं बसवत नव्हतंच. आजही मी माझं काम घरातूनच करते, ना माझं काही दुकान आहे ना ऑफिस. तरीही बड्याबड्या कॉर्पोरेट्ससाठी मी गिफ्ट रॅपिंग करते, देशातच कशाला विदेशातूनही लोकं माझ्याकडे गिफ्ट रॅपिंगच्या ऑर्डर्स घेऊन येतात.
दिवाळी-नवीन वर्ष, ख्रिसमस या काळात तर अक्षरश: शेकडो गिफ्ट्स आम्ही रॅप करतो. गिफ्ट हॅम्पर्स तयार करून देतो. लग्नासाठीचे गिफ्ट रॅप करतो. विशेष म्हणजे प्रत्येक वेळेस, प्रत्येक वर्षी नवीन पद्धतीनं गिफ्ट्स रॅप करावे लागतात. आयडिया वापरून, एकदम हटके डिझाईन केलं तर लोकांना आवडतं आणि तर पुढचं काम मिळतं.
अर्थात हे काम सुरू झालं ते काही मी कुठं प्रशिक्षण घेऊन किंवा तयारी करून नव्हे. आमच्या समाजात लग्नात गिफ्ट्स देणं, ते उत्तम पॅक करणं, नवरा-नवरीचे कपडे उत्तम पॅक करून देणं याला फार महत्त्व असतं. अशीच एकदोनदा मी नातेवाईकांच्या लग्नाची पॅकिंग करून दिलं. मला सगळ्यांनीच सुचवलं की, हेच काम तू प्रोफेशनली का करत नाहीस. त्यातून ही आयडिया सुचली, जस्ट डायलवर जाहिरात केली आणि त्यातून मला लहान-मोठय़ा ऑर्डर्स यायला लागल्या. मग बडे कॉर्पोरेट्सच्या दिवाळी गिफ्ट पॅकिंगच्या ऑर्डरी मिळाल्या. आता माझ्याकडे दोन मुलं काम करतात आणि आम्ही घरीच गिफ्ट रॅपिंग करतो.
दहा वर्षे झाली आता मी हे काम करतेय.
या दहा वर्षांत मला एकच गोष्ट समजली आहे की, तुम्ही काम करायला लागलात की ते अधिक चांगलं कसं करायचं याच्या तुम्हाला आयडिया आपोआप सुचतात. लोकांना एकच गोष्ट आवडत नाही, त्यांना पर्याय द्यावे लागतात. आता तर लोकं जे गिफ्ट्स देतात त्या गिफ्ट इतकंच महत्त्वाचं असतं, त्याचं प्रेझेंटेशन. अनेक जण तर आत ५0 रुपयांची वस्तू घालतील पण त्याच्या पॅकिंगवर १00 रुपये खर्च करायला तयार होतील. त्यांच्या मनातली ही भावना ओळखून त्यांना आवडेल असं प्रेझेंटेशन करणं तुम्हाला जमलं पाहिजे. आणि आता नव्या कॉर्पोरेट कंपन्यांसाठी तर गिफ्टपेक्षाही आऊटर लूक जास्त महत्त्वाचा असतो. आपल्या कंपनीची ओळखच ते या गिफ्टमधून पाठवत असतात त्यामुळे त्यांच्यादृष्टीनं पॅकिंग हे अत्यंत प्रोफेशनल, सुंदर, डिसेंट असावं लागतं.
ते आपल्याला जमलं तर कामं भरपूर मिळतात.
आणि मग त्याला जोड द्यायची ती इनोव्हेशनची, आयडियांची आणि संयमाची. पेशन्स, तो सगळ्यात महत्त्वाचा. अनेकदा आपण कितीही चांगले सॅम्पल पॅकिंग दाखवले तरी ते लोकांना आवडत नाही, त्यांचं समाधान होईपर्यंत आपल्याला पर्याय दाखवावेच लागतात.
दिमाग को जादा काम करवाना पडता है.!
पण आपण अत्यंत सुंदर काहीतरी साकारतोय याचा आनंद पाहणार्‍याच्या नजरेत दिसला की, मग सगळे कष्ट वसूल होतात.
 
हे 'एवढं' तरी हवचं...
 
१)  इमानदारी हवीच. कामातली  आणि लोकांनी ज्या वस्तू
      आपल्या स्वाधीन केल्या आहेत त्या सांभाळण्याची.
२)  सुरुवातीला पैसे कमीच मिळतात, पण आपलं काम
      लोकांपर्यंत पोहचवायचं असेल तर कमी पैशात काम करायची तयारी हवी.
३)  लोकांशी बोलण्याची, त्यांच्या मनातलं जाणण्याची हातोटी पाहिजे.
४)  संयम पाहिजे, पुन्हा पुन्हा एकच काम करण्याची तयारी पाहिजे.
५)  सगळ्यात महत्त्वाचं, पाट्या न टाकता अत्यंत कल्पक काम
      करण्याची सौंदर्यदृष्टी पाहिजेच.
 
जागृती अग्रवाल, 
गिफ्ट रॅपर

 

Web Title: Gift wrapper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.