मुलींनी स्वप्नं पाहणं हा गुन्हा?
By admin | Published: November 10, 2016 01:48 PM2016-11-10T13:48:21+5:302016-11-10T13:48:21+5:30
आपण खरंच एकविसाव्या शतकात आहोत का? कारण अजूनही मुलीचं लग्न करून देणं आणि तिने काही झालं तरी सासरीच राहणं यातच घराची प्रतिष्ठा मानली जाते
- सावित्री
आपण खरंच एकविसाव्या शतकात आहोत का? कारण अजूनही मुलीचं लग्न करून देणं आणि तिने काही झालं तरी सासरीच राहणं यातच घराची प्रतिष्ठा मानली जाते. बायको, मुलगी, बहीण या नात्यांच्या पलीकडे एक स्त्री म्हणून आमचं काही अस्तित्व नाही का? एखादा निर्णय आमचा स्वत:चा असू शकत नाही का? प्रत्येक वेळी तू मुलगी आहेस, लोक काय म्हणतील याचा विचार केला पाहिजे का?
मागच्या वर्षी मे महिन्यात माझ्या ताईचं लग्न झालं. अॅरेेंंज मॅरेज. आता तिथं तिचं पटत नाही. पण तिला कुणी साथ देत नाही. ती शिकलेली आहे. नोकरी करेल, स्वत:च्या पायावर उभी राहीन. पण नाही. मन मारून तिला तिथं राहायला भाग पाडताहेत.
हाच निर्णय एखाद्या वेळी एका मुलाने घेतला तर पुढच्या क्षणी मुली या चुकांची लिस्ट तयार केली जाते. मग हेच मुलीने करणं चूक असतं. मुलगी असल्याची एवढी मोठी किंमत का मोजायची?
घरच्या मुलीत स्पष्टवक्तेपणा असू नये, कारण तो तिचा उर्मटपणा ठरतो. तिनं कमी बोलायचं किंवा बोलायचंच नाही. माझं म्हणाल तर मी अपंग आहे. वंशाच्या दिव्याच्या हव्यासासाठी माझा जन्म झाला.
मी रोज माझ्या पप्पांच्या शिव्या ऐकायच्या. त्यांचा प्रसंगी मार खायचा, कारण मला चालायला एका काठीचा आधार घ्यावा लागतो. लग्नाच्या बाजारात माझी काही किंमत नाही. मी अपंग आहे म्हणून मी स्वप्नं बघूच नयेत का?
- असे प्रश्न माझ्यासारख्या अनेकींचे आहेत.
समाज म्हणून कुठं सुधारलोय आपण, नुस्ते वरवरचे भ्रम आहेत.