लष्करात जायला निघालेल्या पोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 08:00 AM2021-02-04T08:00:00+5:302021-02-04T08:00:27+5:30

किती जणींनी ऐकलं असेल, चालली लष्कराच्या भाकरी भाजायला! मोठी सायबीण होणार आहेस का? हे टोमणे मागे टाकून या मुली पुण्यात पोहोचल्या. जागा बारा आणि भरतीला आलेल्या मुली १२ हजार काही हताश, निराश होऊन रडत परत गेल्या. काही मात्र जातानाही म्हणाल्या की, पुढच्या संधीचं सोनं करू, आता जमलं नसलं तरी आम्ही लष्करात जाऊच..!

Girls ready for going to the army! | लष्करात जायला निघालेल्या पोरी!

लष्करात जायला निघालेल्या पोरी!

Next

- निनाद देशमुख

 

फिजिकल चाचणी द्यायला पोरी जीव खाऊन धावत होत्या; पण त्यांच्या पोटात आग मात्र भलतीच होती.

जागा होत्या फक्त १२ आणि त्या होत्या तब्बल १२ हजार. शेकडो समस्या आणि अडचणींतून मार्ग काढत ‘त्या’ पुण्यात पोहोचल्या. काही तांत्रिकदृष्ट्या ‘अनफिट’ ठरल्या तर कुणाकडे पुरेशी कागदपत्रं, माहितीच नव्हती; पण सगळ्यांच्या डोळ्यात स्वप्न एकच होतं, लष्करात जायचं.

महाराष्ट्र, गुजरात तसेच गोवा विभागासाठी अलीकडेच पुण्यात महिलांची लष्करभरती करण्यात आली. केवळ १२ जागांसाठी प्रवेश पत्र मिळाले नसतानाही १० हजारांहून अधिक मुली हडपसर येथील एआयपीटीसमोर पोहोचल्या. गोंधळ झालाच, काही मुलींनी घोषणाबाजीही केली. काही काळ तणावही निर्माण झाला. मात्र, लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या मुलींना शांत केलं. खरंतर ही भरती गेल्या वर्षी होणं अपेक्षित होतं. मात्र, कोरोनामुळे ही भरती स्थगित करण्यात आली होती. दरम्यान मुलींकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. तीन राज्यांसाठी शंभरपेक्षा अधिक जागा रिक्त होत्या, त्यासाठी ही भरती होणार होती. मात्र, या जागांसाठी प्रत्यक्षात तब्बल २२ हजारांहून अधिक अर्ज आले. त्यातही केवळ प्रवेशपत्र मिळालेल्या उमेदवारांनीच भरतीसाठी यावं असं आवाहनही लष्करानं केलं होतं; पण अनेकींना ओळखपत्रं पोहोचलीच नव्हती आणि भरती आहे म्हटल्यावर तरुण मुलींचे लोंढेच भरतीसाठी आले. भरतीसाठी तर आल्या; पण राहाणार कुठं? अनेकींनी भरतीस्थळाच्या प्रवेशद्वारासमोरील फूटपाथवरच रात्र काढली. एकूण जागांपैकी पुणे विभागासाठी केवळ १२ जागा रिक्त होत्या. यासाठी लष्कराने ‘कट ऑफ’ लावत ४५० मुलींनाच भरतीसाठी बोलावलं होतं. मात्र, मिळेल आपल्यालाही संधी, भरतीला तर जाऊ असं म्हणत राज्यासह गोवा आणि गुजरात येथून मोठ्या प्रमाणात मुली आल्या. लष्करातर्फे केवळ ओळखपत्र देण्यात आलेल्या ४५० मुलींनाच प्रवेश देण्यात आला. ओळखपत्र असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असं समजल्यावर अनेकजणी हताश होऊन माघारी फिरल्या. रडवेल्या झाल्या; पण तरी त्यांच्या डोळ्यात स्वप्न एकच होतं, लष्करात जायचं.

तर लष्करात जायला निघालेल्या पोरींची ही गोष्ट. प्रतिकूल परिस्थितीतील जिद्दीची कहाणी.

गावोगावहून आलेल्या या मुलींशी गप्पा मारल्या आणि त्यातून जे चित्र समोर आलं ते विलक्षण झगड्याची अस्वस्थ कथा सांगतं...

---

या गर्दीत भेटली यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातल्या झोला या छोट्या गावातली गायत्री वऱ्हाटे. ती सांगत होती, ‘मी डॉक्टर व्हावं ही घरच्यांची इच्छा होती; पण नीट परीक्षेत मार्क कमी मिळाल्याने माझा नंबर लागला नाही. घरची परिस्थिती बेताची. वडील नळ फिटिंगची कामं करतात. मला डॉक्टर तर काही होता आलं नाही; पण माझा चुलत भाऊ लष्कर भरतीची तयारी करत होता. त्याला पाहूनच ठरवलं आपणही लष्करात जाऊ. आता शारीरिक चाचणीत मी पात्र ठरले आहे, याचा आनंद आहे.’

 

गायत्री तशी सुदैवी. तिला भरतीचं ओळखपत्रही मिळालं आणि शारीरिक चाचणीत ती उत्तीर्णही झाली. लॉकडाऊनमध्ये तिनं जिद्दीनं तयारी केली. वडिलांची कामं बंद असल्यानं त्याकाळात त्यांचे कष्टही तिनं पाहिले होते. त्यामुळे आपण लष्करात जायची संधी सोडायची नाही हे तिनं मनाशी पक्कं केलं. दहावीत ८५ टक्क्यांहून अधिक गुण असल्याने तिचा अर्ज वैध ठरला. प्रवेशपत्र मिळाल्याने ती तयारीला लागली. वणी येथे एक शिक्षक यासंबंधी प्रशिक्षण देत असल्याची माहिती तिला मिळाली. त्यांना गाठत तिने तयारीला सुरुवात केली. आता एक टप्पा यशस्वी झाला, अजून मोठी तयारी बाकी आहे. मात्र, गायत्री सांगत होती, ‘आमच्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आमच्याकडेही दोन एकर जमीन आहे. मात्र, त्यात पिकत नसल्याने आम्ही शेती करत नाही. मी लष्करात जायचं ठरवलं तर सुरुवातीला विरोध झाला. मात्र, माझ्या परिसरातील गावातून माझ्या एकटीची निवड झाली हे कळल्यावर विरोध मावळला. माझे वडीलही पाठीशी उभे आहेत. त्यांचा भरवसा खरा ठरवायचा आहे.’ गायत्री सोबत असलेल्या वडिलांदेखत सांगत होती. वडीलही लेकीची ही जिद्द कौतुकभरल्या नजरेनं पाहत होते.

--

औरंगाबादची वैष्णवी जगताप. ती सांगते, ‘बाबा दृष्टिहीन असल्याने आईवरच घरचा भार आहे. आई अंगणवाडी सेविका आहे. कोरोना काळात आईवर कामाचा भार खूप होता. तिचे कष्ट पाहूनच मी ठरवलं की, आपण लष्करात जायचं. लष्करात जाण्याची इच्छा लहानपणापासून आहे. मी खेळाडू आहे. माझं बाहेर जाणं आजी-आजोबांना आवडत नाही. मात्र, त्यांचा विरोध टाळून आईने मला त्यांना न सांगता, लष्कर भरतीसाठी पाठवलं. पहिल्याच प्रयत्नात संधी साधायचीच, या दृढ निश्चयाने मी मैदानात धावले.’ वैष्णवी नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली. तिला मोठी बहीण आहे. वैष्णवीने हँड बॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पदक पटकावलं आहे. लष्करात महिलांसाठी विशेष भरती असल्याची माहिती तिला मैत्रिणीकडून मिळाली आणि तिनं अर्ज केला. वैष्णवीला सोबत म्हणून तिची आई आणि बहीणही आल्या होत्या. एका वसतिगृहात राहत भरतीच्या दिवशी भल्या पहाटे तिला घेऊन त्या मैदानावर पोहोचल्या. शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या वैष्णवीपुढे मेडिकल चाचणीचे आव्हान आहे. ते पार पडलं की, लेखी परीक्षा तिला उत्तीर्ण करावी लागणार आहे. मात्र, लष्करात मोठ्या पदावर जायची आपली जिद्द आहेच असं वैष्णवी अभिमानानं सांगत होती.

--

‘पोलिसांची वर्दी पाहून तशी रुबाबदार वर्दी आपल्याकडं असावी असं वाटायचं; पण वडील म्हणत मोठं काही तरी कर. वडिलांना लष्करात भरती व्हायचं होतं. ते त्याच्या कहाण्या सांगत, त्या ऐकून त्यांचं स्वप्न माझं कधी झालं कळलंच नाही,’ असे प्रीती बोडखे सांगत होती.

 

प्रीती जालना जिल्ह्यातील वालसावंगी गावची. दोन एकर शेताच्या उत्पन्नात भागत नसल्याने वडील रतन बोडखे यांनी छोटं दुकान टाकलं. वडील शेताची तर आई छोट्या दुकानाची जबाबदारी सांभाळत संसाराचा गाडा हाकतात; पण दोघांची एकच इच्छा मुलांनी शिकावं. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे त्यांचं छाेटं दुकान बंद करण्याची वेळ आली. मात्र, त्याही काळात प्रीतीसमोर लष्कर भरतीचं स्वप्न होतं. प्रवेश अर्ज स्वीकारला गेल्याचं कळताच प्रीतीनं कुठल्या मदतीशिवाय सकाळी उठून सरावाला सुरुवात केली. शेतीकामात वडिलांना मदत करत श्रमाची कामं करत तिने तयारी केली. वडिलांनीच तिला मग लष्कर भरतीचं प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत जायला सांगितलं. लॉकडाऊनमध्ये जोरदार तयारी केल्याने ती शारीरिक चाचणीत पात्र ठरली.

 

प्रीती सांगते, ‘लोकांनी वडिलांना अनेक सल्ले दिले. मुलगी आहे, तिला एवढे शिकवून काय फायद्याचं? शेवटी ते परक्याचं धन. उद्या जर काही बरं-वाईट झालं, तर जबाबदार कोण, मात्र वडिलांनी कायम प्रोत्साहन दिलं. म्हणाले, लहान वयात काही तरी करून दाखव.’

--

वैष्णवी सकटे भेटली. सांगलीची. तिचे काका लष्करात होते. त्यांच्या मार्गदर्शनानं तिनं भरतीचे पहिले दोन टप्पे पार केले. ती सांगत होती, ‘काकांप्रमाणेच लष्करात भरती व्हायचं ठरवलं आणि तयारीला लागले!’ सध्या ती पुण्यात बी.एस्सी. करते आहे. काकांच्या प्रेरणेमुळे तिचा भाऊसुद्धा तासगाव येथील आर्मी स्कूलमध्ये लष्करात जाण्यासाठी तयारी करतो आहे. वैष्णवीचे वडील शिक्षक, आपल्या मुलीने मोठे होऊन नाव कमवावं या भावनेेने त्यांनीच तिला पुण्यात पाठवलं. आपण लष्करात जाऊन कर्तबगारी दाखवूच हा वैष्णवीचा दृढ विश्वास आहे.

--

अशा कहाण्या किती तरी जणी सांगतात. कमी-अधिक प्रमाणात सारख्याच. त्यातलीच ही एक, तिचंही नाव वैष्णवीच. मूळची जळगाव जिल्ह्यातील पारोळे तालुक्यातील राजवड गावची, वैष्णवी पाटील. तिचे वडील कल्याणला माथाडी कामगार म्हणून काम करतात. त्यांना आपली मुलगी लष्करात जावी असं वाटतं. त्यांनीच मुलीला प्रोत्साहन दिलं. कल्याणमध्येच लष्करी अकॅडमीत नाव घातलं. भरतीच्या दिवशीही भल्या पहाटे ते लेकीसह आले आणि त्यांच्या लेकीनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं.

सांगली जिल्ह्यातील कोलारपूरची विद्या माळी. ती सांगत होती, वडिलांना कायमस्वरूपी रोजगार नाही. धान्य विकत घेऊन ते बाजारात विकतात. शेती नसल्याने दुसऱ्यांच्या शेतीत काम करून करतात. लॉकडाऊनने तर फार कठीण दिवस दाखवले. मी मात्र ठरवलंच आहे की, ही परिस्थिती बदलायचीच. भाऊही सोबत आहे. सांगली जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या पुरानेही खूप नुकसान केले होते; पण त्याकाळात मला माणुसकीही दिसली. लोकांनी एकमेकांना खूप मदत केली. याच काळात ठरवलं की, आपणही लष्करात जाऊन मोठी झेप घ्यायची!’  विद्या बी.एस्सी.ही करतेय.

 

अमरावतीची समीक्षा देशभ्रतार. ती सांगते, माझे वडील अपंग आहेत. अमरावती कोर्टाबाहेर ते ऑपरेटर म्हणून काम करतात. मी जर लष्करात भरती झाले तर माझ्या घरची परिस्थितीही सुधारेल. समीक्षाने पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आयटीआय कोर्सही केला. आता तिला लष्करातली स्वप्नं खुणावत आहेत.

--

अशी किती उदाहरणं सांगावीत? प्रत्येकीची अशीच कहाणी. लष्करात जायचं हे स्वप्न एकीकडे आणि गावकीभावकीतली बंधनं त्यात कोरोनाकाळानं पाहिलेली परीक्षा दुसरीकडे. काही सुदैवी की त्यांना घरच्यांचा, भावाचा, वडिलांचा, काका-मामाचा पाठिंबा आहे. स्वप्नांना घरची माणसं बळ देत आहेत. काहींची लढाई मात्र त्याहून मोठी आहे. घरून पाठिंबा नाही. साधा ऑनलाइन अर्ज करायचा तर स्मार्टफोन नाही. भाड्याला पैसे नाहीत. भर थंडीत पुणं गाठलं तर राहायची खायची काही सोय नाही. पोटात भूक असताना फिजिकलची चाचणी द्यायला या मुली धावत होत्या; पण त्या पोटातल्या भूकेपेक्षा त्यांच्यातली आग त्यांना जास्त मोठी वाटत होती.

 

किती जणींनी ऐकलं असेल, चालली लष्कराच्या भाकरी भाजायला. मोठी सायबीण होणार आहेस का? मात्र हे सारं मागे टाकून या मुली पुण्यात पोहोचल्या.

काही हताश निराश रडत परत गेल्या. काही मात्र जातानाही म्हणाल्या की, पुढच्या संधीचं सोनं करू, आता जमलं नसलं तरी आम्ही लष्करात जाऊच.

हे लष्करात जाण्याचं स्वप्न कोरोना लॉकडाऊनने दाखवलेल्या भयाण दिवसांमुळे अजून पक्कं केलं आहे.

एक नक्की या लष्करात जायला निघालेल्या मुलींची धाव फार मोठी आहे.

--------------------------------------------------------------------------------

घरी न सांगता आली भरतीला

आम्ही चार बहिणी आहोत. मुलींनी शिकून काय करायचे, काही दिवसांनी लग्न लावून द्यायचे असा घरच्यांचा हेका होता. यामुळे मला लष्करात जायचे आहे हे कुणालाच माहिती नाही. मी आज भरतीला आले हेसुद्धा घरच्यांना माहिती नाही. काही झाले तरी मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असं सुजाता (नाव बदललेले) सांगत होती. तिचा आत्मविश्वास अत्यंत जबरदस्त होता. ती म्हणाली, आम्ही चार बहिणी, भाऊ नाही. चौघीही हुशार आहोत. प्रत्येकीचं काही तरी करून दाखवण्याचं स्वप्न आहे. माझंही लष्करात जाण्याचं स्वप्न आहे. विरोध होईल या भीतीने मी सांगितले नाही. माझी निवड झाली तरच मी घरी सांगणार आहे.

 

( निनाद लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे.)

ninad.de@gmail.com

Web Title: Girls ready for going to the army!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.