विदर्भातल्या खेडोपाडी पोलीस भरतीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:58 AM2021-02-04T07:58:14+5:302021-02-04T08:00:22+5:30
विदर्भातील गावागावांत हल्ली सकाळ-सायंकाळी काही मुली मुलांच्या बरोबरीने कवायती करताना दिसतात. कमरेला ओढणी खोचून गावच्या कच्च्या रस्त्यावर धावतात आणि पुस्तकात रमून स्पर्धा परीक्षेची तयारीही करतात.
- गोपालकृष्ण मांडवकर
अब स्वतंत्र मंचन कर पंचम लहराऊंगी..
- असं त्या म्हणत नसतील, पण त्यांची जिद्द हे शब्द खरे करताना दिसते. विदर्भातील गावागावांत हल्ली सकाळ-सायंकाळी काही मुली मुलांच्या बरोबरीने कवायती करताना दिसतात. कमरेला ओढणी खोचून गावच्या कच्च्या रस्त्यावर धावतात आणि पुस्तकात रमून स्पर्धा परीक्षेची तयारीही करतात.
त्यांचं ध्येय, पोलीस भरती.
१. सध्या विदर्भातही अनेक ठिकाणी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. आता गावोगावी अनेक मुली भरतीची तयारी करताना दिसतात. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर हे नक्षलग्रस्त जिल्हे. आर.आर. पाटील गृहमंत्री असताना पोलीस भरतीमध्ये पाठबळ मिळाले. या प्रक्रियेतील प्रश्नपत्रिकेत गोंडी भाषेवर आधारित २५ टक्के गुणांच्या प्रश्नांचा सहभाग केला. कसेबसे शिक्षण पूर्ण करून नोकरीची स्वप्ने पाहणाऱ्या आदिवासी युवक-युवतींसाठी ही पर्वणी ठरली. शेकडोंनी युवक पुढे आले. यात युवतीही आता मागे नाहीत. पोलीस विभागाकडून चालविल्या जाणाऱ्या भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरांमध्ये मुलींचा टक्का वाढला.
२. गडचिरोलीत एका खाजगी संस्थेकडून होणाऱ्या ३०० युवकांच्या प्रशिक्षणात आज १६० युवतींचा समावेश आहे.
३. भंडारा जिल्ह्यात तर पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सर्व ठाणेदारांना स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरे घेण्याचा सल्ला दिला आहे. गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यासाठी आधीपासूनच धडपडत आहेत. त्यांच्याकडील १५० प्रशिक्षणार्थींमध्ये ५० मुली आहेत. पालांदूरमध्ये १२० प्रशिक्षणार्थींमध्ये ७० मुली आहेत. लाखांदुरातही असेच चित्र आहे.
४. गोंदियामध्येही पोलीस विभाग यासाठी आग्रही आहे. देवरी, आमगाव, केशोरी या ठिकाणी होणाऱ्या प्रशिक्षणात मुलांएवढीच मुलींचीही गर्दी असते. स्थानिकांना मिळालेली ही संधी येथील तरुणींसाठीही पर्वणीच आहे.
५. चंद्रपुरातील जिल्हा स्टेडियम आजही कोरोनाकाळात सकाळ-सायंकाळ तरुणाईने गजबजलेले असते. भरती प्रक्रियेपूर्वी येथेही पोलीस विभागाकडून प्रशिक्षण शिबिर होत असते. सामाजिक संघटना आणि संस्थाही याकामी पुढे असतात.
६. यवतमाळ शहरातील तरुणीही यात मागे नाहीत. तिथे सध्या चार शिबिरे सुरू आहेत. त्यात १६० युवती सहभागी आहेत. यवतमाळच्या ग्रामीण भागात मात्र ही उणीव आहे. त्यामुळे शहरात येऊन या मुली प्रशिक्षणातून स्वत:ला घडवीत आहेत.
७. वर्धा शहरात असे प्रशिक्षण केंद्र सुरू नसले तरी पोलीस भरतीमध्ये पुढे राहण्यासाठी मुलींची धडपड सुरू असलेली मैदानावर दिसते.
८. अमरावती तर बलोपासनेत कायम पुढेच असते. तेथील स्टेडियम, खेळाची मैदाने, व्यायामाची परंपरा व त्यासाठी होणारा आग्रह यातूनही तरुणी घडत आहेत. विविध प्रशिक्षणांतून किंवा स्वबळावर त्यांची चाललेली धडपड सहज दृष्टीस पडावी, अशी आहे.
९. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या निमित्ताने मैदानावर उतरलेल्या तरुणी हा खेडोपाडी एक मोठाच बदल आहे.
(गोपालकृष्ण ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
g.mandaokar@gmail.com