लडकियोंकी कुश्ती

By admin | Published: August 25, 2016 05:04 PM2016-08-25T17:04:03+5:302016-08-25T17:29:58+5:30

‘रोहतक’च्या साक्षी मलिकनं ‘आॅलिम्पिक’मध्ये कमाल केली. पण साक्षी एकटीच नाही.

Girls' wrestling | लडकियोंकी कुश्ती

लडकियोंकी कुश्ती

Next

- सचिन जवळकोटे

‘रोहतक’च्या साक्षी मलिकनं 
‘आॅलिम्पिक’मध्ये कमाल केली.
पण साक्षी एकटीच नाही.
तिच्यामागे आहे कुस्तीच्या आखाड्यात घुमणाऱ्या 
तरुण मुलींची एक अख्खी पिढीच !
मुलीने जन्मही घेणं मुश्कील अशा 
अत्यंत पारंपरिक विचारांच्या कर्मठ हरियाणात
चौदा-पंधरा वर्षांच्या मुली जगाला चीतपट करण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन गावागावांतल्या मॅटवर घुमतात.
काय आहे ही जादू?


‘रिओ आॅलिम्पिक’मध्ये देशाला पहिलं पदक साक्षी मलिकनं मिळवून दिलं. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती स्पर्धेत देशाच्या एका लेकीनं चमत्कार घडविला. साक्षी मूळची रोहतकची. हरियाणा राज्यातली. या राज्यात गावोगावी मुलींच्या कुस्तीचं वेड झपाट्यानं पसरत चाललंय. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत कुस्तीच्या आखाड्यात हजारो मुली मोठ्या उत्साहाने उतरत आहेत. यामागं खूपशी कारणं. मुलींचा उत्साह, पालकांचा सपोर्ट अन् शासनाकडून भरभरून मदत या तीन गोष्टींमुळे अशा कैक साक्षी हरियाणातील गावागावांमध्ये तयार झाल्यात. 
आमीर खानसारख्या कलावंतालाही महिला कुस्तीपटूंच्या जीवनाचं आकर्षण वाटलंं. गीता अन् तिच्या इतर पाच बहिणींनाही कुस्तीच्या मैदानात उतरवणाऱ्या महावीर फोगट नामक मल्ल पित्यावर आमीरचा नवा चित्रपट यंदा दिवाळीला येतोय. नाव त्याचं ‘दंगल’. खरंतर हे नाव कुस्तीशी संबंधित. मराठीत आपण याला ‘आखाडा’ किंवा ‘मैदान’ म्हणतो. एखादा पहिलवान जसा महाराष्ट्रात ‘मैदान’ गाजवतो, तसं उत्तर भारतात कुस्तीत ‘दंगल’ घडते.
गेल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास या हरियाणात भटकून आलो होतो. तेव्हा बघितलेलं सगळं आता आठवतंय. 
साक्षीचं ‘रोहतक’ पार केल्यानंतर ‘निडानी’ गाव लागतं. गावालगतच असलेल्या मुलींच्या शाळेत गेलो. खेळासाठी सुप्रसिद्ध असलेल्या ‘निडानी’ गावानं आजपर्यंत शेकडो यशस्वी खेळाडू देशाला दिलेले. कुस्ती अन् कबड्डीमध्ये इथल्या मुलांनी थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेलं. गेल्या वर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिलवान कविता सिवाच इथलीच. ‘वर्ल्ड ज्युनिअर’मध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या ममता सिहागचाही बोर्ड शाळेत लागलेला.
केवळ खेळासाठी चालविणाऱ्या या ‘भरतसिंह’ शाळेत अलीकडे वेगळाच ट्रेंड आलाय. मुलांपेक्षा मुलींची संख्या वरचेवर वाढत चाललीय. प्राचार्यांच्या केबिनकडे जात असताना सहज मैदानावर नजर टाकली. दहा वर्षांपासून ते वीस-बावीस वर्षांपर्यंतच्या असंख्य मुली मन लावून खेळात रममाण झालेल्या. सुखबीरसिंग नामक पदाधिकाऱ्याशी बोलत-बोलत आम्ही पलीकडच्या नव्या इमारतीत शिरलो. आत गेल्यानंतर पाहतो तर काय.. एक भला मोठा हॉल, ज्यावर जवळपास पाच-सहा हजार स्क्वेअर फुटांचा मॅट टाकलेला. जवळपास पस्तीस मुली इथं कुस्तीची प्रॅक्टिस करत होत्या. कुणी एकमेकींची ताकद आजमावत होत्या, तर कुणी शक्तीला युक्तीतून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत होत्या. ज्या वयात झिम्मा-फुगडी खेळायला पाहिजे, त्या वयात या मुली वेगवेगळा ‘डाव’ टाकत होत्या. 
सलग दोन तास सराव केल्यामुळं पुरती घामेजलेली ममता सिहाग आमच्याजवळ आली. श्वास पुरता फुलला होता; पण सरावाचा आनंद चेहऱ्यावरून ओथंबून वाहत होता. ‘हिसार’च्या सिसाई गावातले मास्टर चंकिराम हे तिचे वडील. त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी कुस्ती खेळताना अपंगत्व आलं. त्यानंतर ममता, गीता अन् कविता या तिघी जन्मल्या. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या तिघीही कुस्तीमध्ये उतरल्या. तिच्या दोन्ही बहिणींनीही ‘सब ज्युनिअर एशियन’मध्ये चमक दाखविलेली.
‘मेरी दोनों बहनों की शादी हो गयी हैं. अब मेरे साथ मेरा छोटा भाई भी कुश्ती में आ गया हैं. बस एकही ख्वाब हैं.. पापा का सपना पूरा करना. अ‍ॅक्सिडेंट के बाद जो वो ना कर सके, वो हमें पूरा करना हैं’. बोलताना ममताच्या डोळ्यात स्वप्नाळू भाव दाटले होते. पंचवीस वर्षांपूर्वी दुर्दैवानं हतबल बनलेल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द तरळत होती.
बोलता-बोलता पुढच्या कुस्तीपटूकडं सरकलो. एकमेकांच्या मानेत हात टाकून चाचपडणाऱ्या दोन ‘बॉयकट’वाल्या ‘या मुली आहेत’ असं अगोदरच सांगितलं गेलं असल्यामुळं ओळख पटलेली; नाही तर दोन तरुण पोरंच कुस्ती खेळताहेत, असंच कोणत्याही नवोगताला नक्कीच वाटलं असतं. या दोघींतली एक होती किरण माथूर. सोनपतची. ‘एशियन ज्युनिअर’मध्ये सिल्व्हर मेडल घेऊन आलेली. वय वर्षे अवघे सतरा.
‘मेरा जुडवाँ भाई सूरज भी कुश्ती खेलता हैं. हम दोनों भी रेसलर चॅम्पियन बनना चाहिये, ये हमारे माता-पिता की ख्वाईश. इसीलिए पांच साल से हम तन-मन और लगनसे इस मॅटपे हैं.’ किरणच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. नजरेत चमक होती.
कुस्तीसाठी नुसतीच ताकद असून चालत नाही, तर चतुरता अन् चपळताही अंगी असावी लागते. सतत सराव करण्याची सवयही अंगी भिनावी लागते... अन् हेच गुण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात असल्याचा दावा इथली कोच मंडळी करतात.
आजपर्यंत ‘निडानी’च्या आखाड्यात तयार झालेल्या तब्बल अकरा मुलींनी राष्ट्रीय पातळीवर, तर तिघींनी आशियाई स्पर्धेत मेडल पटकावलंय. साक्षी मलिकमुळं जसं ‘रोहतक’ जगभरात गाजलंय, ‘महिला पहिलवानांचं गाव’ म्हणून ‘निडानी’नं जशी आपली वेगळी ओळख निर्माण केलीय, तसंच ‘बेटियों की कुश्ती’साठी अवघ्या हरियाणाचंही नाव जगाच्या नकाशावर आणलंय.
या झटापटीच्या खेळामुळे वयात आलेल्या तरुण मुलींना शारीरिक अडचणी येत असतील का, असा एक प्रश्न सगळ्यांच्याच मनात असतो. तो विचारला तेव्हा कविता म्हणाली, ‘आपको लगता हैं, मुझे अब एक बच्ची हैं.’ 
कविता मूळची कुस्तीपटूच. लहानपणापासून मॅटवर डाव मारत आलेली. मात्र, नंतर कबड्डीकडं वळली. घरच्यांनी एका व्यापारी मुलासोबत तिचं लग्नही लावून दिलं.
‘जब मैं एशियन गेम्स में गोल्ड मेडल जीती थी, तब तीन महिनोंकी प्रेग्नंट थी. मेडल लेने के बाद मैंने ये गुड न्यूज घर में सब को बतायी. सब बहुत गुस्से में आ चुके थे, लेकिन उन्होंने मुझे समझने की कोशीश भी की; क्योंकी अगर मैं ये बात घरवालों को पहले ही बताती, तो मुझे वहाँ खेलने की इजाजतही नहीं मिलती.’
सध्या मुलींच्या कबड्डीची कोच असलेली कविता आजही कुस्ती खेळते. तिला आता साडेतीन महिन्यांची मुलगीही आहे. गीताक्षी तिचं नाव. ‘आता या क्षणी मुलगी कुठाय?’ असा सवाल करताच कवितानं झटकन हॉलच्या कोपऱ्यात बोट दाखवलं. तिथं एक तरुण एका इवल्याशा बाळाला घेऊन निवांत उभा होता. ‘वो मेरे हजबंड हैं! मुझे आज लेने आये हैं,’ सांगताना कविताच्या चेहऱ्यावर नवऱ्याबद्दलचं कौतुक होतं. आपलीच काहीतरी चर्चा चालू आहे, हे लक्षात आल्यामुळं तोही आमच्याकडंच येऊ लागला. येताना कुशीतल्या बाळाला आजूबाजूला सराव करणाऱ्या मुली दाखवू लागला. ती गोड छोकरीही डोळे मोठमोठाले करून या मुलींच्या शड्डूचा आवाज कानात साठवू पाहत होती... कारण कदाचित भविष्यात तीही याच तालमीत तयार होणार असावी.
आम्ही बाहेर पडलो. पुढच्या चौकात कुस्तीपटू तरुण भोलासिंगचं घर लागलं. भोला सांगत होता, ‘मेरे घरमें सब पहेलवान... और मैं भी पहेलवान. मेरे दादाजींको भैसों का बहुत शौक. पुरे देश में घुमकर हर जगह की नयी-नयी भैंस उन्होने घर में लायी हैं. दूध, दही, मख्खन और घी चौबीस घंटे हमारे घर में. जब मेरी बहन सारिका छोटी थी तब लड़कों जैसे घुमती थी. मेरे साथ घर में प्रॅक्टिस करती थी. उसकी लगन देखकर पापाजींने तय किया कि सारिका भी कुश्ती सिखें!’
मग काय.. घरी दूध-दह्याचा जणू धबधबाच. तोंडाला लागलेलं लोणी पुसत त्याची बहीण रोज जोर-बैठका काढू लागली. शाळेतल्या कुस्तीत मैदान मारू लागली. तिचं हे यश पाहून तालुका-जिल्हा पातळीवरच्या स्पर्धेतही तिला उतरविलं गेलं. कधी ‘बगलडूब’ तर कधी ‘कलाजंग’ डावात समोरच्याला चितपट करणाऱ्या सारिकानं ‘मॅट’वरच्या ‘दंगली’त चांगलंच यश मिळविलं. सारिकाची आई सांगत होती, ‘मेरी बेटी जब घर में होती हैं, तब घरका पूरा काम करती हैं. खाना बनाती हैं. भैसों का काम करती हैं. उसे दूध निकालना भी आता हैं.’
‘रोहतक, सोनपत अन् निडानी’ या गावांतील मुलींची जिंदादिली कुस्ती पाहणं हा एक अद्वितीय अनुभव होता.
या गावांमध्ये फिरताना स्त्रिया दिसतात, त्या बहुतेक डोक्यावरून तोंडभर पदर घेतलेल्या. पारंपरिक चालीच्या.
आणि कुस्तीच्या आखाड्यात घुमत असलेल्या तरुण मुली मात्र जगाला नमवायला निघालेल्या.
कशी घालायची याची सांगड?
आमच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव ओळखून एकजण हळूच कानात पुटपुटला, ‘ये जो देख रहे हंै वो हमारी परंपरा.. और आखाडे में देखा था वो हमारा भविष्य!’


(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)


 

 

Web Title: Girls' wrestling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.