देणारा देतो, घेणारा घेतो, मग गुन्हा कोण करतो?

By Admin | Published: February 25, 2016 09:42 PM2016-02-25T21:42:06+5:302016-02-25T21:42:06+5:30

मुलीकडचे राजीखुशी हुंडा देतात, थाटामाटात लग्न लावून देतात, सरकारी नोकरीवाल्या, शहरी मुलांसाठी

Giver gives, takes the taker, then who does the crime? | देणारा देतो, घेणारा घेतो, मग गुन्हा कोण करतो?

देणारा देतो, घेणारा घेतो, मग गुन्हा कोण करतो?

googlenewsNext
>मुलीकडचे राजीखुशी हुंडा देतात, 
थाटामाटात लग्न लावून देतात,
सरकारी नोकरीवाल्या, शहरी मुलांसाठी 
पैशाच्या थैल्या सोडतात
त्या हुंड्याला मुलीतरी विरोध करतात का?
उलट हुंडा नको म्हणणाऱ्या मुलांचीच 
समाज उलटतपासणी करतो,
त्याच्या नसलेल्या दोषांची चर्चा करतो,
अशा मुलांचं लग्न जमत नाही.
हुंडा हे एक सामाजिक स्टेट्स आहे,
आणि त्याची हावरट हाव 
नव्या काळात वाढतेच आहे 
असं कडवट वास्तव स्पष्ट सांगणारी
काही पत्रं !
असंच असतं,
त्यात काय?
प्रत्येक मुलीच्या पालकांना वाटतं की, माझी मुलगी सुखात रहावी. त्यासाठीच मग तिच्या लग्नात वारेमाप खर्च करायला ते तयार होतात. तसाही लग्नाचा खर्च मुलीच्या पालकांनीच करायचा ही आपल्याकडची रीत. त्यासोबत संसारोपयोगी साहित्य द्यायचं, एखादी निश्चित रक्कम म्हणजे हुंडा मुलाला देणं हे सारं त्यात आलंच. मुलीचे वडील नोकरदार असतो अथवा सामान्य कष्टकरी त्यांना या खर्चाची चिंताच!
आमच्या शेजारचंच उदाहरण सांगतो. मुलगी प्राध्यापक. मुलगा डॉक्टर. तरी लाखो रुपयात हुंडा, सोनं मुलीच्या वडिलांनी दिलं. लग्नही थाटामाटात करून दिलं. त्या मुलीलाच मी विचारलं की, तू स्वत:च्या पायावर उभी आहेस. एवढी शिकलीस तरी हे असं का? तर ती म्हणाली, ‘हे असंच असतं.’ यातच मला सर्व उत्तरं मिळाली. तो मुलगासुद्धा अभिमानाने असतर असं, त्यात काय म्हणाल्यावर तर मी गप्पच बसलो.
म्हणजे प्रत्येकाला हुंडा घेऊ नये हे कळतं; पण लग्नाची वेळ आली की हीच न कळण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि मग परिणाम म्हणून खेड्यापाड्यात तर मुलीचे वडील कर्ज काढून, शेती गहाण ठेवून, उसने पैसे घेऊन, विविध मार्गांनी पैसा जमा करतात. आणि जावयाला देतात. कारण काय तर त्यानं आपल्या मुलीला सुखात ठेवावं! एवढं करूनही मुलीला सुख मिळेलच याची गॅरंटी नाही. म्हणून मला वाटतं याविषयावर नुस्ती चर्चा करण्यापेक्षा आणि ‘असंच असतं’ म्हणण्यापेक्षा स्वत:पासूनच ज्यानं-त्यानं सुरुवात करावी. अत्यंत साध्या पद्धतीनं दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं लग्न करावं. जोपर्यंत व्यक्तिगत पातळीवर हे सारं बदलत नाही, तोपर्यंत ही समाज रीत बदलणार नाही!
- संघपाल इंगळे,
राजुरी, उस्मानाबाद
मी मोडलं लग्न!
पैसा देणं-घेणं
पटत नाही मनाला अन्
हुंडा नको मामा
फक्त पोरगी द्या मला...
हे गाणं ऐकलं की वाटतं की, प्रत्यक्ष आयुष्यात का असं घडत नाही? मी एक शिक्षिका आहे. माझे विचार आधुनिक आहेत; पण मी स्वत:सुद्धा या दिव्यातून गेले आहे. आमच्या जवळच्या नात्यातील एक उत्तम स्थळ मला आले होते. माझ्या पालकांनी विचार न करता लग्न ठरवलं. पण लग्न ठरल्यापासून मुलगा व त्यांच्या पालकांनी मला व माझ्या पालकांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. त्या मुलाला मुंबईत मंत्रालयात सरकारी नोकरी होती. त्याचे वडील सरपंच. आम्हाला लग्न मोठ्या हॉटेलमध्ये करून द्या, लग्नात वराच्या बहिणींना सोनं घाला, लग्नानंतर मुलाला घर व गाडी घ्यायला पैसे द्या अशा अनेक मागण्या ते लोक करत. मुलाला स्वत:च्या नोकरीचा खूप अभिमान; पण विचार जुने, संकुचित व बुरसटलेले. शेवटी मी ते लग्न मोडलं. मला आणि माझ्या घरच्यांना खूप नावं ठेवली त्या लोकांनी. आमची बदनामी केली. परंतु मी त्यांना न जुमानता माझ्या निर्णयावर ठाम राहिले. म्हणून मी आता सगळ्यांना सांगते, तरुण पिढीनेच हुंडा नको म्हणायला शिकलं पाहिजे. पालकांना समजावून सांगितलं पाहिजे. लग्नासाठी चांगला जोडीदार महत्त्वाचा असतो, हुंडा नव्हे!
 
- अनुराधा
अ.नगर
गरीब बापानं एवढे पैसे आणायचे कुठून?
कुठं लग्नाला किंवा समारंभाला गेलं, एखादी चांगली मुलगी पाहिली की, काहीजण विचारतात लगेच, ‘नवरदेव चार-पाच लाखाचा तरी आहे बरं का, तुम्हाला झेपेल का?’ त्यात सरकारी नोकरी करणारा असेल तर म्हणजे बापरे, मुलीकडच्यांसाठी स्वप्नच ते! फक्त मोठ्यांनीच पाहावीत अशी स्वप्न. कारण पैसा कोण देणार एवढा लग्नात? 
त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यस्थी असणारी माणसं. ही मंडळी वधूपक्षाकडून मलई खातात, वरपक्षाकडेही मलईच खातात. त्यांची चांदी. माझ्या बऱ्याच मैत्रिणींची लग्नं या मध्यस्थांनी जुळवली. हुंडासुद्धा त्यांच्यामुळे जास्त द्यावा लागला. मी म्हणते जर दोन परिवारांना एकत्र यायचे असेल तर हा मध्यस्थी नकोच ना! सरळ मुला-मुलींच्या आई-वडिलांनी समोरासमोर बसून काय ते ठरवावं. उगीच कशाला बाकीच्यांची लुडबुड ? मला नवल वाटतं आजच्या नवीन पिढीची मुलं कसं काय अशावेळी शांत बसतात?
मी स्वत:च्या अनुभवातून सांगते. बहिणी, मावश्या म्हणतात, तू सावळी, छान; पण तुला अडीच-तीन लाख सहज लागतील. ही गोष्ट मला खूप टोचते. मीही गरिबांच्या घरी जन्मले. आई-वडील मोलमजुरी करतात. मीही शिक्षण घेत घेत त्यांना थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न करते. पण मी लग्न म्हटलं की घाबरते. कारण मला इतर मुलींप्रमाणे हुंडा देऊन आई-वडिलांना कर्जबाजारी करून, त्यांना रडवून स्वत: सुखाचा संसार थाटायचा नाही. कारण लग्न म्हटलं की उसनं देणं घेणं, नंतर नातेवाइकांचं टोचून बोलणं की, ‘काय केलं याने/हिने मुलीचं, काय दिलं आम्हीच सगळं बघितलं’! मला माझ्या आई-वडिलांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागू नये एवढीच इच्छा आहे.
धनश्री पवार,
बार्शी
देणारा राजी,
घेणारा खूश
तक्रार कसली?
विनीता वकील झाली. चांगल्या वकिलाकडे प्रॅक्टिस करू लागली. त्यादम्यान लग्न ठरलं. मुलगाही वकील. विनीता आनंदात. मात्र विनीताला हुंडा म्हणून २१ लाखांची मागणी झाली. ती तिच्या वडिलांनी अगदी आनंदात पूर्ण केली. आणि परत इतर मानापमानाचा खर्चही केला. अंदाजे तिच्या लग्नात ५० लाखांचा खर्च झाला. विनीताच्या वडिलांना विचारलं एवढा खर्च का केला तर ते म्हणाले, माझी मुलगी इतकी शिकलेली, तिला साजेसं स्थळ मिळालं. म्हणून मी आनंदानं खर्च केला. तो हुंडा नाही, माझी ऐपतीनुसार तिला देण्याची रीत आहे.
विनीता नवविवाहिता. स्वप्नरंजनात. तिला याबद्दल मतप्रदर्शन करायचं नव्हतं. तसं काही मत नव्हतंही तिचं वेगळं. उद्याची न्यायव्यवस्था सांभाळू पाहणाऱ्या या दांपत्याला आपण जे केलं त्यात काही गैर वाटलं नाही. हे झालं एक उदाहरण. हुंडा प्रथा बंद होण्याऐवजी आपल्या समाजात कशी वाढत चालली आहे त्याचं हे एक स्वेच्छेचं रूप आहे. समाजात जे स्वत:ला सुप्रतिष्ठित समजतात ते टोलेजंग लग्न लावतात. जातीत - समाजात एक स्टेट्स म्हणून या लग्नाकडे पाहिलं जातं. मुलाची श्रीमंती, शिक्षण, नोकरी, पगार, त्याचं वास्तव्य (गावात, शहरात) याप्रमाणे हुंडा ठरतो तसा तो मुलीच्या वडिलांची ऐपतही चार लोकांना सांगतो.
मुलगा जेवढा शिकलेला तेवढा जास्त हुंडा हे एक गणित आणि मुलीवाल्यांनाही वाटतंच की समाजात आपलं स्टेटस कायम रहावं, चर्चा व्हावी, प्रतिष्ठा वाढावी. यासगळ्याचा परिणाम म्हणून तगडी किंमत हुंडा म्हणून दिली जाते.
काही लोक मुलीला चांगलं स्थळ आलंय म्हणून स्वत:ला परवडत नसतानाही मुलगी चांगल्या घरी पडेल म्हणून एकमोठी रक्कम देऊ करतात. आपली मुलगी परगृही जाते तेथे ती सुखात रहावी ही त्यामागची भावना. हे सारं असं असताना कोण कुणाची तक्रार करणार? कोण आक्षेप घेणार.. चाललंय सगळं, सगळ्यांचंच बरं..
 
-श्रीपाद भटवे,
सोनवद
सांगा, तुमचा रेट काय?
 
माझं अजून लग्न झालेलं नाही. पण माझ्या मित्रांची झालीत, काहींची होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत तर काहींची होणार आहेत. त्यामुळे थोडाथोडका का होईना अनुभव माझ्या ओंजळीतही जमा झालेला आहे.
हुंडा घेणं ही आजकाल एक प्रतिष्ठा बनत चालली आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितीनुसार भाव लावला जातो. आमच्या गावात मुलगा आयटीआय झाला की तो पंचवीस हजारांचा मालक होतो. पोलिसात शिपाई झाला की दीड ते दोन लाख आणि पीएसआय झाला तर आठ-दहा लाख फिक्स ! हे एक प्रातिनिधिक उदाहरण. एव्हाना सगळीकडे हीच परिस्थिती आहे. मला असं वाटतं की उपवर मुलांना किंवा सर्वच तरु ण मुलांना हुंड्याबाबत आपलं स्पष्ट मत तयार करता येत नाही. ते याबाबत द्विधामन:स्थितीत असतात. याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मीच आहे. तसा मी पुरोगामी विचारांना मानणारा पण तरीही हुंडा घ्यावा की नको याबाबत माझंही स्पष्ट मत नाही.
हुंड्यामुळे आत्महत्त्या, विवाहितेस जाळून मारले इ. बातम्या ऐकल्या की तरु णांची हुंड्याबाबत चर्चा सुरू होते. शेवटी चर्चेअंती निष्कर्ष निघतो तो हा की, हुंडा वाईट आहे, हुंडा घेऊ नये. पण जेव्हा आपली स्वत:ची वेळ येते तेव्हा त्यांना आपली आर्थिक चणचण आणि प्रतिष्ठा आठवते. सरकारी नोकरी म्हणजे आजच्या काळात दुर्मीळ. एखाद्याला ती मिळाली रे मिळाली की त्याच्या मनावर बिंबवलं जातं की हुंडा हा तुझा हक्कच आहे. बहुमताच्या जोरावरच त्याच मन निर्णय घेतं आणि शेवटी तो त्याचा तथाकथित हक्क मिळवतोच.
आपल्या बहिणीच्या वेळेला हुंड्यामुळे झालेला मनस्ताप बघितलेले, अनुभवलेले तरु ण ‘‘मी हुंडा घेणार नाही’’ असा प्रण करताना पाहिलेत मी; पण तो प्रण पूर्णत्वास नेईपर्यंत हळूहळू त्यावरची पकड सैल होतानाही पाहिलीये. म्हणूनच हुंडा घेणं-देणं हा कायद्यानं गुन्हा असला तरी आपल्या समाजास तो मान्यच आहे.
कपिल आरके
सिल्लोड, जि. औरंगाबाद 
 
 
काय उपयोग शिक्षणाचा?
एका खेडेगावात राहणारी मी व माझी छोटी बहीण. आम्ही दोघीच बहिणी. आई-वडील दोघे सुशिक्षित, नोकरी करणारे. सध्या मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे. खरं तर माझ्या लग्नाला आणखी दोन-तीन वर्षे वेळ आहे, कारण मला उच्चशिक्षण घ्यायचं आहे. त्याला आई-वडिलांची काही हरकत नाही. त्यामुळे घरात कधी माझ्या लग्नाचा विषय नाही. पण एकदा गप्पांच्या ओघात वडील म्हणाले की, मी आपल्या मुलींसाठी काही लाख रु पये ठेवलेत, त्यांच्या लग्नासाठी. त्यावेळेस अचानक माझ्या डोक्यात वीजच चमकली. मी वडिलांना म्हणाले की, माझ्या लग्नासाठी तुम्ही अजिबात हुंडा द्यायचा नाही. कोणी मागत असेल तर मी स्वत: त्या मंडळींशी बोलेन आणि जर तुम्ही हुंडा दिलात तर मी लग्नच करणार नाही. पण माझी आई त्यावर बोलली की, असं काही करायचं डोक्यातपण आणू नको. लोक म्हणतील की, मुलगी किती उद्धट आहे. आमचं आम्ही बघू सगळं व्यवस्थित. खरं तर त्याक्षणी मला लाज वाटली माझ्या सुशिक्षित आई-वडिलांची. काय उपयोग त्यांच्या शिक्षणाचा, जे शिक्षण त्यांचे विचार बदलू शकले नाही. या सगळ्याचा मला खूप त्रास होतो.
-एक मैत्रीण
 
ढोंगी हावरट समाजाला
कोण आवरणार?
मी स्वत:च्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर आयुष्य जगणारी, म्हणूनच घरच्यांचा विरोध पत्करून सोशल वर्कमध्ये मास्टर्स केलं. मुंबईमध्ये जॉब करते आहे. मुलगी तेही तरुण म्हटल्यावर अनेक स्थळं यायची. पण मी माझ्या आजूबाजूला मुलीच्या लग्नात होणारा अमाप खर्च आणि हुंडा पाहिला आहे. या पद्धती मला मान्य नव्हत्या. म्हणून मग मी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. आई-वडिलांच्या विरोधात जाऊन स्वत:साठी मनासारखा जोडीदार निवडला.
त्याच्या घरचीही परिस्थिती जेमतेम. आई-वडील शेतीकरून पोट भरणारी लोकं. पण पावसामुळे त्याहीपुढे हात टेकलेले. आम्ही एकमेकांच्या साथीनं मुंबईत संसार थाटला.
दोन वर्षानंतर माझ्या पंधरा दिवसाच्या मुलाला घेऊन आई-वडिलांच्या आग्रहाने माहेरी गेले. मी सुखात आहे पाहून त्यांना बरं वाटलं. दरम्यान पण माझ्या गैरहजेरीत आई-बाबांनी माझ्या लहान बहिणीचं लग्न केलं. तेही माझ्याबद्दल खरं खरं सगळं सांगून की, मी त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय. पण आज बहिणीचं लग्न होऊन नऊ महिने झाले, या ना त्या कारणावरून तिला सासरचे लोक छळतात. माहेराहून पैसे आण म्हणतात. ते नको म्हणून बाबांनी त्यांच्या काही मागण्या मान्यही केल्या.
खरं तर लग्नात आई-बाबांनी बहिणीला संसाराला आवश्यक सर्व वस्तू, कपाट, बेड दिलं आहे. पण आज बहिणीचा नवरा तिला रोज फ्रीज, टीव्ही माहेरकडून आणण्यासाठी सांगतो. हे सांगायचं कारण म्हणजे ज्या गोष्टीपासून मी स्वत:ला दूर नेलं तो हुंडा माझ्या बहिणीच्या वाट्याला मात्र नक्की आला. मला ज्या वेळेपासून हे लक्षात आलंय त्यावेळेपासून मी आई-बाबांना काहीही वस्तू न देण्याबद्दल बजावलंय. तुम्ही त्यांच्याशी स्पष्ट बोलून हा विषय संपवा असं म्हणतेय. पण तिच्या संसारात विघ्न नको, होईल सारं ठीक म्हणत बाबा शक्य ते देताहेत. 
एरव्ही या कहाण्या खोट्या वाटतात. पण आपल्याच बहिणीच्या वाट्याला असा जाच आला की, हुंड्याचं समाजातलं वास्तव जास्त छळतं. आता माझ्या बहिणीला तर मी मदत करीनच; पण हुंड्यापायी मुलींना असं छळणाऱ्या या ढोंगी समाजाचं मात्र काही करता येत नाही, याचा राग येतो.
- कविता
मोठेपणात खोटेपणा
नक्की कोण करतंय?
 
कॉलेजमधला एक अनुभव सांगतो, कॉलेजमध्ये एखाद्या सामाजिक विषयावर कार्यक्रम असेल तर माझे मित्रमैत्रिणी मोठमोठ्यानं बोलून, सुधारणांचा विचार सांगतात. हुंडा देणं-घेणं कसा गुन्हा आहे यावर तावातावानं बोलतात. मात्र अनेकदा या गोष्टी फक्त भाषणातच राहिलेल्या नंतर दिसतात. मी अनेकदा मित्राच्या लग्न जमवण्याच्या बैठकीस गेलो आहे. मात्र आजवर कोणताही वधूपिता मी हुंडा देणारच नाही असं म्हणताना मी पाहिलेलं नाही. फार फार तर ते म्हणतात की, आमची काही फार हुंडा देण्याची ऐपत नाही, आमच्या परीने जमेल तेवढे देऊ. त्याचं हेच मुलाकडच्यांना हवं असतं. कारण त्यांना माहिती असतं की, जमेल तेवढं म्हणजे जनरीतीला धरून शक्य ते हे सारं देणारच!
माझा एक मित्र कॉलेजमध्ये असताना हुंडा घेणार नाही असं म्हणायचा; पण नोकरीला लागला तेव्हा मात्र हुंडा घ्यायला तयार झाला. त्याच्यासारखे अनेकजण म्हणतात, मुलीकडचे स्वत:हून देताहेत तर आपण का नको म्हणायचं? दुसरं एक कारणही पुढे केलं जातं, माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये आम्ही किती हुंडा दिला, आता आम्ही घेतला तर कुठं बिघडलं? तिसरं आणि सगळ्यात सोपं म्हणणं म्हणजे मी घरच्याना हुंडा घेऊन नका असं सांगितलं रे, पण ते ऐकत नाहीत, कुठं डोकं लावत बसणार? 
मुलगी पसंत आहे ना किंवा मुलगा आवडलाय ना तुला? एवढा प्रश्न मुलाला किंवा मुलीला विचारतात. त्यापेक्षा जास्त बोलताही येत नाही अनेकांना हेदेखील तितकंच खरं आहे. त्यातही मुलाला हुंडा नको असं म्हटलं तरी समाजात त्याच्याविषयी चर्चेला उधाण येतं. मुलगी मिळत नसेल त्याला, जास्त वय झालंय, काही दोष असेल मुलात अशा चर्चा सुरू होतात. म्हणून फक्त समाजात आपली पत टिकवण्यासाठी तरुणांना हुंडा घ्यावा लागतो हे वास्तवही नाकारता येत नाही.
अशा अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींचं काय करायचं हा प्रश्न आहेच!
मुकुंद नीळकंठ कुलथे
शिंगणेनगर, देऊळगाव राजा
शिकले आणि हुकलेच!
‘शिकले तेवढे हुकले’ अशी एक म्हण ग्रामीण भागात आहे. हुंड्याच्या बाबतीत तेच खरंय. कारण हुंड्याचा आकडा जास्तीत जास्त सांगणारे हेच शिकले - सवरलेले सध्याचे सुशिक्षित लोक आहेत.
माझा एक मित्र साधा पोलीस कॉन्स्टेबल आहे आणि त्यानं लग्नात हुंडा किती घ्यावा? १६ लाख आणि लग्नही अगदी थाटामाटात करून घेतलं. 
हा अपवाद नाही. जास्त शिकलेली मुलं जास्त हुंडा घेतात. जास्त शिकलेल्या मुलींचे पालक जास्त हुंडा देतात हे आजचं वास्तव आहे.
आपला मुलगा नोकरीला लागला की, मुलांचे आई-वडील सर्रास हुंड्यासाठी १०-१५ लाखांची मागणी करतात. त्यात हा दुष्काळ ! काय करावं मुलींच्या आई-वडिलांनी. दुष्काळामुळे अगोदरच खूप लोकं होरपळून निघाले आहेत. त्यात हे हुंडा मागणारे लाचखोर, त्यांना कशाची पर्वा नाही.
असे आज कितीतरी शेतकरी असतील ज्यांनी हुंड्यासाठी म्हणा किंवा मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं यासाठी म्हणा आपल्या जमिनी गहाण ठेवल्या आहेत. दुसऱ्याची भाकरी ओढून खाणारी ही माणसं, त्यांना कोण कसं समजवणार?
-जालिंदर कायंदे,
औरंगाबाद
उल्लेखनीय प्रतिसाद
‘हुंडा’ चर्चेत सहभागी होत अनेक वाचक मित्रमैत्रिणींनी लिहिले, ई-मेल्स पाठवल्या. प्रत्येक पत्र आम्ही वाचलं आहे, त्यातली तगमग समजून घेतली आहे. जागेअभावी सगळी पत्रं प्रसिद्ध करणं शक्य नाही. तरीही त्यातही ज्यांची पत्र वाचनीय होती, त्यांच्यातल्या निवडक मित्रमैत्रिणींची ही नावं.
 
शुभमानसी, इस्लामपूर, एस.आर.जाधव, बुलढाणा, प्रकाश कुळकर्णी, ता. जत, जि. सांगली,
संतोष कुमराळे, सोलापूर, 
जितेंद्र अग्रवाल, ता.माळशिरस, सोलापूर,
शुभम गुरव, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली,
प्रतिभा कांबळे, मनमाड, ता. नांदगाव, नाशिक,
मोनिका पवार, अमरावती,
धीरज अवघन, भरत जामोदे, ता. रावेर,
कोमल भाकरे,
एक वाचक, सोलापूर
राजू गवळी, औरंगाबाद
शांताराम रेडकर, वेर्ला-म्हापसा-गोवा
पूनम काळे, बोरगाव, ता.जि.लातूर
दत्तात्रय ढवळे, ता.माढा, जि.सोलापूर, नीलिमा शेरकुरे, नागझरी, जि. नागपूर,
दीक्षा खरात, औरंगाबाद,
सुरेश मोरेश्वर, नाशिकरोड
रोशन जाधव, तोरताठा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
माणिकचंद गंगवाल, लासूर
सूर्यकांत देशपांडे, नाशिक
राहुल लोहबांडे, नांदेड
निशा खंडेलवाल, शहादा
नीलेश वालझाडे, रांजणी, ता. घनसावगी, जि. जालना
मनोहर थारकर, मुंडगाव, जि. अकोला,
रोहित पुपुलवाड, नांदेड
छाया राठी, यवतमाळ
कुणाल काकडे, मिरजगाव, जि. अहमदनगर
शरदचंद्र तिवारी, अचलपूर
एल.के. गोवेकर, मेहकर, बुलढाणा
सुधा अवचार, चंद्रपूर
प्रवीण
प्रियंका
प्रशांत शिंदे, अकोले
एजाज खान, इगतपुरी, जि. नाशिक
वा.मा. वाघमारे, उस्मानाबाद
शीतल घोटणे, कडलगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
प्रशांत बन, पितांबर जाधव, शिंदखेडा, जि. धुळे
वैभव गायकवाड, सांगली
गट्टू मामा
दीपक भुयार, अमरावती
भाग्यश्री पाटील, लातूर,
अविनाश सुतार, सिंधुदुर्ग,
कपिल आस्के, सिल्लोड, जि.औरंगाबाद,
बाळू निकम,
शाहुराज घुगे, नांदेड,
अनिल बारसे, धुळे
पल्लवी खोजे, दापुरा, जि. वाशिम, 
अशोकराव ठाकूर, नाशिक, 
विनोद सुरवसे, कुर्डुवाडी, 
प्रभाकर अवचारी, परभणी, विवेक नेवारे, 
गणेश हिरवे, श्रीगोंदा, 
प्रशांत बावनकुळे, 
व्ही. जी धिंदळे, 
नेहा लेनेकर, 
श्याम टाले.
 

Web Title: Giver gives, takes the taker, then who does the crime?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.