अर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:03 PM2018-11-15T18:03:16+5:302018-11-15T18:03:22+5:30
जोसेफ स्टिग्लिट्झ हे अर्थशास्राच्या विश्वामधलं मोठं नाव. त्यांची पुस्तकं वाचा, भाषणं ऐका मग कळेल की, आपल्या अर्थव्यवस्थेचं नक्की काय चाललंय.
- प्रज्ञा शिदोरे
जोसेफ स्टिग्लिट्झ हे अर्थशाशास्राच्या विश्वामधलं मोठं नाव. 2002 साली त्यांनी ग्लोबलायझेशन अॅण्ड इट्स डिसकंटेण्ट्स हे पुस्तक लिहिलं आणि त्यामुळे ते भारतीयांनाही परिचयाचे झाले. या पुस्तकामध्ये त्यांनी आंतराष्ट्रीय नाणेनिधीला धारेवर धरलं. ते म्हणतात, ‘आपण ज्या भारतासारख्या अर्थव्यवस्थांना ‘विकसनशील’ म्हणतो त्यांचा खर्या अर्थाने ‘विकास’ होत नाहीये. त्या केवळ फुगत आहेत. आणि असं होण्याचं कारण ग्राहकांना मिळणारी अपुरी माहिती !’
त्याचं अजून एक पुस्तक असंच गाजलं. त्याचं नाव द प्राइस ऑफ इनिक्वालिटी. खरं तर हे पुस्तक त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये ‘विकासाचा’ भाग न बनू शकलेल्या वर्गासंबंधी लिहिलं आहे. पण वाचल्यावर असं लक्षात येतं की हे फक्त अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल नाहीये. तर ‘आम्ही लै मोठे झालो’ असं स्वतर्च म्हणवून घेणार्या प्रत्येक देशाबद्दल खरं आहे. म्हणजे हे पुस्तक वाचलं की खरंतर भारतच डोळ्यापुढे येतो. स्टिग्लिट्झ मते, अर्थव्यवस्थेचा भाग झालेल्या लोकांपेक्षा, जे याचा भाग बनू शकत नाहीयेत तेच या अर्थव्यवस्थांवर अधिक प्रभाव टाकतात.
काही महिन्यांपूर्वी स्टिग्लिट्झ भारतात आले होते. त्यांनी ग्लोबलायझेशन या विषयावर एक भाषण केलं. पुस्तक थोडं टेक्निकल आहे, त्यामुळे यू टय़ूबवर त्यांची भाषणं तुम्हाला नक्कीच ऐकता येतील. ते थोडं सोपं. मात्र याकाळाचं भान येण्यासाठी हे ऐकणं-वाचणं गरजेचं आहे.