सोन्याचा भाला

By admin | Published: September 22, 2016 06:19 PM2016-09-22T18:19:38+5:302016-09-22T18:19:38+5:30

समजा कुणाला ११ हजार व्होल्ट क्षमतेचा विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यात त्याला हात गमवावा लागला तर त्याचं काय होईल?

Gold spear | सोन्याचा भाला

सोन्याचा भाला

Next
>-  राकेश जोशी
 
शॉक लागल्यानं त्यानं एक हात गमावला, पण जिद्द मात्र पेटून उठली.
एका हातानं त्यानं दोनदा पॅरालिम्पिक सुवर्णपदक कमावलं..
 
समजा कुणाला ११ हजार व्होल्ट क्षमतेचा विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यात त्याला हात गमवावा लागला तर त्याचं काय होईल? 
उपचार झाले, जखमा बर्‍याही झाल्या, तरी काही जण त्या घटनेचा इतका ‘शॉक’ लावून घेतील की त्यांच्या आयुष्याच्या ‘डिक्शनरी’तून ‘रिस्क’ आणि ‘कॉन्फिडन्स’ या गोष्टी जवळपास हद्दपार होतील. पण या गोष्टीला अपवाद ठरला तो देवेंद्र.
ही कहाणी आहे देवेंद्र झांझरिया याची. रिओतील पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. त्या रात्री केवळ झांझरिया कुटुंबच नाही, तर अख्खं राजस्थान रात्रभर देवेंद्रच्या विजयाचा आनंद साजरा करत होतं. ‘सुवर्णा’वर नाव कोरताना त्याने जागतिक विक्रमाचीही ऐतिहासिक नोंद केली. 
राजस्थानातल्या चुरू जिल्ह्यातलं सार्दुलपूर हे एक गाव. एका  सर्वसाधारण कुटुंबात १0 जून १९८१ रोजी देवेंद्रचा जन्म झाला. तो आठ वर्षांचा होता. मित्नांसोबत खेळत असताना त्याला तब्बल ११ हजार व्होल्ट क्षमतेचा विजेचा झटका बसला. त्यात त्याचं शरीर संपूर्ण भाजलं. नव्हे त्याला त्याचा डावा हात गमवावा लागला. उपचार करणार्‍या डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की, भविष्यात तो जड काम करू शकणार नाही. 
देवेंद्रच्या जागी दुसरं कुणी असतं तर त्यानं हायच खाल्ली असती. मात्र इच्छाशक्ती आणि कुटुंबीयांनी दिलेल्या विश्‍वासाच्या बळावर त्यानं अशा एका खेळात भरारी घेतली की जो खेळताना मनगटात आणि हातात प्रचंड ताकद लागते. भालाफेक. 
दहावीचं वर्ष त्याच्या दृष्टीनं ‘टर्निंग पाइंट’ ठरलं. त्यानं पहिल्यांदा भाला उचलला तो वयाच्या १५ व्या वर्षी. सततचा सराव आणि जिवापाड मेहनतीच्या जोरावर देवेंद्रने जिल्हास्तरीय, आंतरमहाविद्यालयीन, राज्यस्तरीय स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी केली. एका आंतरविद्यापीठ स्पर्धेत त्याला पाहून प्रतिस्पर्धी त्याच्या प्रशिक्षकांना म्हणाले, ‘क्यूं सर, तुम्हे राजस्थान में कोई दो हातोंवाला अँथलीट नही मिला? कहासें लंगडा-लुला उठाके लेके लाए?’ 
या बोचर्‍या प्रश्नाचं आणि अपमानाचं उत्तर देवेंद्रनं आपल्या भाल्यानं द्यायचं ठरवलं. तेव्हा तर त्याला पॅरालिम्पिक स्पर्धा काय असते याचा साधा गंधही नव्हता. नशीब चांगलं म्हणून द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आर. डी. सिंह यांची व त्याची गाठ पडली. विशेष खेळाडूंसाठी असलेल्या या स्पर्धेची त्यांनी त्याला ओळख करून दिली. त्यानंतर देवेंद्रने भालाफेकीचे धडे गिरवत आता  इतिहास रचलाय.
मागच्या अँथेन्स पॅरालिम्पिक स्पर्धेत देवेंद्रनं ६२.१५ मीटर भालाफेक केला, तर यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये त्याने एफ ४६ प्रकारात ६३.९७ मीटर लांब भालाफेक करून स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आणि नवा जागतिक विक्रमही रचला. आतापर्यंत जागतिक स्पर्धेत भारताच्या कोणत्याही खेळाडूला दोन सुवर्णपदके पटकावता आलेली नव्हती. तो इतिहास देवेंद्रने आपल्या नावावर कोरून ठेवला. 
शरीराला अपंगत्व येऊ शकतं, पण मनाला नाही. आणि जिद्दीला आणि कष्टांना तर नाहीच नाही हेच देवेंद्रनंही सिद्ध केलं आहे.
त्याच्या जिद्दीचा भाला आता सोन्याचा झाला आहे.
 
- देवेंद्रची पत्नी मंजू राष्ट्रीय स्तरावरची कबड्डीपटू. मात्र देवेंद्र जागतिक स्पर्धेसाठी सरावानिमित्त महिनोन्महिने घराबाहेर असे. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा काव्यान फक्त फोटोतच वडिलांचा चेहरा पाहत असे. मंजूनं ठरवलं आपण खेळणं सोडायचं आणि घर सांभाळत देवेंद्रला पुढे जाऊ द्यायचं.
**
- देवेंद्रची सहा वर्षीय मुलगी जीया. ती बालवाडीत शिकते. ‘मी वर्गात पहिली आले तर तुम्हालाही मला गोल्डमेडल आणून द्यावे लागेल,’ असा हट्टच तिनं बाबांकडे केला होता. बाबाही आपल्या लाडलीचा हट्ट पुरा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. आणि त्यानं जीव तोडून भाला फेकला.
 
- २00४ साली अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक
-२0१२ साली पद्मश्री पुरस्कार. पद्मश्री पटकावलेला पहिला पॅरा- खेळाडू 
- २0१३ साली आयपीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण 
- २0१४ साली सर्वोत्कृष्ट पॅरा-खेळाडू पुरस्कार प्रदान 
- २0१५ साली दोहा येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक
- २0१६ साली रिओ स्पर्धेत सुवर्णपदक
- गाठीशी १४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय पॅरा-स्पर्धेचा अनुभव  

Web Title: Gold spear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.