गुगलमध्ये यशस्वी व्हायचं तर कोणते गुण लागतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 07:55 AM2019-11-21T07:55:00+5:302019-11-21T07:55:02+5:30
गुगलमध्ये काम करून यशस्वी व्हायचं तर कोणते महत्त्वाचे गुण हवेत? तंत्रज्ञान? सॉफ्टवेअर? गणित? - या प्रश्नाचं उत्तर गुगल केलं तर त्यांनाही भलतीच उत्तरं मिळाली.
- डॉ. भूषण केळकर
प्रोजेक्ट ऑक्सिजन दचकू नका बरं का !
ऑक्सिजन पुरवणीचा हा लेख आहे म्हणून या लेखाचं नाव ‘प्रॉजेक्ट ऑक्सिजन’ दिलेलं नाही. हे खरंच एका प्रकल्पाचं नाव आहे. हा प्रकल्प गुगल या कंपनीने सुरू केला आणि त्याचे निष्कर्ष हे सॉफ्ट स्कीलसाठी आत्यंतिक महत्त्वाचे आहेत म्हणून आजच्या या संवादाचं शिर्षक ‘प्रॉजेक्ट ऑक्सिजन’.
तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी गुगल, जी तुम्ही सर्वजण हमखास वापरताच. त्या कंपनीचे संस्थापक सर्गेई ब्रिन व लॅरी पेज या दोघांनी सुरुवातीला म्हणजे 1998-2005 र्पयत ज्या लोकांना कंपनीत नोकरी दिली ते सर्व तंत्रज्ञानात; ज्याला हार्ड स्कील म्हणता येईल, त्यात पारंगत होते. पुढे 2017 मध्ये गुगलने एक प्रकल्प हाती घेतला ज्यामध्ये हे तपासलं गेलं की 1998 पासून 2013 र्पयत कंपनीतील ज्या लोकांना घेतलं गेलं, काढलं गेलं, बढती दिली गेली आणि जे लोक उच्चपदस्थ झाले किंवा ज्यांनी लक्षणीय काम केलं, त्या लोकांची काय गुणवैशिष्टय़े होती?
त्यात सर्वात महत्त्वाचे जे 8 गुण आढळले. त्यात तंत्रज्ञानातील गती (हार्ड स्कील) हा 8 व्या क्रमाकांवर होता आणि पहिले 7 गुण जे महत्त्वाचे होते ते होते सारे सॉफ्ट स्कील्स.
आहे की नाही हे महत्त्वाचे आपल्यासाठी?
तर ते पहिले 7 गुण जे सॉफ्ट स्कील्समध्ये येतात ते कोणते?
* इतरांना मार्गदर्शन करणं
* संभाषण कौशल्य
* लिसनिंग (नीट ऐकणं)
* लोकांविषयी आस्था असणं
* संवेदना असणं
* संश्लेषणात्मक विचारसरणी
* प्रश्नांना भिडण्याची वृत्ती आणि बहुविध संकल्पानंचं परस्परावलंबन समजून-उमजून निर्णय घेण्याची क्षमता.
हे ते 7 सॉफ्ट स्किल्स. या प्रोजेक्ट ऑक्सिजन’चे निष्कर्ष हे गुगल कंपनीमधल्या भल्या भल्या म्हणवणार्या तंत्रज्ञांना आणि नेतृत्वाला चकित करणारे आहेत. कारण त्यांचा असा समज होता की, गुगलसारख्या कंपनीमध्ये सर्वात यशस्वी आणि योग्य मंडळींकडे तंत्रज्ञान, गणिती विश्लेषण इ. गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आढळतील! त्यांना वाटत होतं की स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स) या चार गोष्टी फार महत्त्वाच्या असतात; पण निघाले अगदी उलटेच!!
या पुढे प्रोजेक्ट अॅरिस्टॉटल हा असाच एक प्रकल्प आयबीएम, चेव्र्हनसारख्या मोठय़ा आणि काही लहान कंपन्या मिळून, एकूण 260 कंपन्यांना एकत्रित प्रकल्पही करण्यात आला. यामध्ये सुद्धा असं निष्पन्न झालंय की संभाषण कौशल्यं ही यापुढील काळात यशस्वी होण्यासाठी आत्यंतिक महत्त्वाची ठरतील.
ही गोष्ट आपण सर्वानी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यापुढच्या काळात ऑटोमोशनमुळे अनेक नोकर्या जाणार आहेत. ज्या नोकर्या व ज्या प्रकारची कामं टिकतील त्यामध्ये मानवी संबंध आणि मनोव्यापार यावर आधारित कौशल्यं विलक्षण महत्त्वाची ठरणारी आहेत. यात शंकाच नाही.
ही सर्व महत्त्वाची कौशल्यं तुम्ही-आम्ही फक्त तंत्रज्ञान वा हॉर्ड स्किल म्हणून शिकणार नाही! ती आपण शिकणार आहोत भाषा, मानव्यशाखा आणि अभ्यासेतर शिक्षणातून. त्याला पर्याय नाही.
एम.ए./एम.कॉम. झालेल्या व्यक्तीला फोनवर कसं नीट बोलावं हे कळत नसेल तर केवळ मास्टर्स झालेल्या शिक्षणाला, पुस्तकी शिक्षणाला यापुढे फारसं टिकणं अवघडच जाईल.
मानवी भाव-भावना समजणं, इतरांच्या प्रगतीमध्ये सुद्धा आपण रस घेणं (म्हणजे भोचकपणा नव्हे, बरं का), नीट ऐकता येणं इ. गोष्टी खूप आवश्यक होत आहेत.
एकूण काय तर ‘प्रोजेक्ट ऑक्सिजन’ आपल्याला सांगतोय की यापुढील जगात यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल हा प्राणवायू असेल !