गूगलची दिमागवाली विज्ञानयात्रा

By admin | Published: September 1, 2016 01:15 PM2016-09-01T13:15:17+5:302016-09-01T13:15:17+5:30

गूगल सायन्स फेअर नावाची एक अत्यंत कल्पक आणि बुद्धिमान स्पर्धा असते. जगभरातले १३ ते १८ वयोगटातले लहानगे संशोधक त्यात सहभागी होतात. जगभरातून निवडल्या गेलेल्या या संशोधकांत सहा भारतीय मुलं आहेत. त्यांची आणि त्यांच्या संशोधनाची ही एक झलक.

Google's Brain Sciences | गूगलची दिमागवाली विज्ञानयात्रा

गूगलची दिमागवाली विज्ञानयात्रा

Next
>- मयूर देवकर 
(मयूर लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.) 
 
आपलं डोकं म्हणजे ना.. इमॅजिनेशनची खाण आहे! सतत काही ना काही नवीन सुचत असतं. नव्या आयडिया, नव्या संकल्पना आपल्या डोक्यात जन्म घेत असतात, आणि त्यापैकी काही निवडक आयडिया मेंदूत गदर माजवतात. अनेकदा बालिश, वेडपट, नॉनसेन्स, स्वप्नाळू आहेत त्या कल्पना असंही लोक म्हणतात, आपणही स्वत:ला अण्डरएस्टीमेट करत तेच म्हणतो.
मात्र अशाच काही आयडिया जग बदलणाऱ्या, त्याला नवी दिशा देणाऱ्या ठरतात. 
अशा कल्पनांना आणि त्या कल्पना ज्यांच्या डोक्यात उगवतात त्यांना जगासमोर आणून त्यांचं योग्य ते पालनपोषण करण्याचं काम ‘गूगल सायन्स फेअर’ करते. एक प्रकारची ‘विज्ञान जत्रा’च म्हणा ना! देशोदेशीचे बालवैज्ञानिक आपापले अभिनव, कल्पक आणि रिव्होल्यूशनरी प्रोजेक्ट्स घेऊन या जत्रेत जमतात. विशेष म्हणजे, यंदा दोन भारतीय आणि चार भारतीय वंशाच्या ‘बालवैज्ञानिकां’ची निवड या सायन्स फेअरसाठी झाली आहे. त्याबरोबरच बांगलादेश, झांबिया, द. आफ्रिका, ब्राझील अशा अविकसित देशांच्या विद्यार्थ्यांचासुद्धा या यात्रेत समावेश आहे. 
स्पेस शटलची कार्यक्षमता वाढविण्यापासून ते शेतीसाठी उपयोगी जलव्यवस्थापन, ते स्तन व फुप्फुसाच्या कॅन्सरचं अचूक निदान करण्याचं संशोधन प्रक ल्प या शाळकरी विद्यार्थ्यांच्या अफाट बुद्धिमत्तेतून साकार झाले आहेत. जगभरातून निवडल्या गेलेल्या बुद्धिमान आणि कल्पक छोट्या संशोधकांत आपले जे भारतीय मित्र आहेत, त्यांची आणि त्यांच्या प्रोजेक्ट्सची ही ओळख! 
काय सांगावं, हे सारं वाचून आपल्यापैकी कोणाची ‘दिमाग की बत्ती’ उजळली तर त्यांचीही नावं पुढच्या सायन्सफेअरमध्ये झळकलेली दिसतील!
स्वत:ला कमी लेखण्याची चूक कशाला करायची?
 
 
श्रीयांक के., बंगळुरू
कीपटॅब : विसराळूंसाठी जादूची कांडी
आपल्या प्रत्येकात विसरभोळेपणा असतो. कधी गाडीची चावी कुठे ठेवली हे विसरतो, तर कधी ऐन परीक्षेच्या वेळी हॉल तिकीट कुठं ठेवलं हे आठवत नाही. अशा वेळी मग सारं घर डोक्यावर घेतलं तरी हवी ती वस्तू मिळत नाही. तेव्हा कशी चिडचिड होते, कसलं फ्रस्ट्रेशन येतं!
अशा वेळी जर कोणी आपल्याला ती वस्तू शोधून दिली तर काय उपकार होतील ना राव. हाच विचार डोक्यात घोळून घोळून श्रीयांकने ‘कीपटॅब’ नावाचं गॅजेट बनवलं. मायक्रो कंट्रोलर, कॅमेरा आणि अ‍ॅक्सेलरो मीटरपासून हे कीपटॅबचे प्रमुख घटक़ शर्टवर हे ‘वेअरेबल’ डिव्हाइस लावलं असता तुम्ही जसे फिरणार तसे आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढून डीप-लर्निंग-फ्रेमवर्कद्वारे त्यातील वस्तंूचे दोन गटांत वर्गीकरण करते. ते गट आहेत- ‘यूजर आॅब्जेक्ट्स’ म्हणजेच आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तू आणि ‘रेफरन्स आॅब्जेक्ट्स’ म्हणजे स्थिर वस्तू ज्यांचा लोकेशन ठरवण्यासाठी उपयोग होतो. ही सर्व माहिती मग क्लाऊड डाटाबेसमध्ये साठवली जाते. स्मार्टफोनवर ‘गूगल नाऊ’च्या साहाय्याने व्हाइस कमांड देऊन तुम्ही मग पाहिजे ती वस्तू शोधू शकता.
सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, तुम्ही जर गाडीची चावी (यूजर आॅब्जेक्ट) टीव्हीच्या (रेफरन्स आॅब्जेक्ट) बाजूला ठेवलेली असेल तर गूगल नाऊला गाडीची चावी कुठं आहे असं विचारलं असता ते सांगेल की, टीव्हीच्या बाजूला. इतकं सोपं साधं सरळ सिंपल आहे ‘कीपटॅब’.
बंगळुरूमधील इंदिरानगरच्या ‘नॅशनल पब्लिक स्कू ल’मध्ये शिकणाऱ्या श्रीयांकला विज्ञान-तंत्रज्ञानाची लहानपणापासूनच आवड. वडिलांनी लिगोची खेळणी आणून दिली आणि त्याच्यातील डिझायनर आणि डेव्हलपर जागा झाला. २०१२ साली झालेल्या पहिल्या ‘लिगो लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप’च्या अंतिम फेरीत तो तृतीय होता. 
तो म्हणतो, ‘दैनंदिन जीवनातील कामं अधिक सोपी आणि झटपट करण्यात तंत्रज्ञान व इंटरनेटची कशी मदत होऊ शकते याविषयी मला काम करायचं आहे.
 
 
मंशा फातिमा, हैदराबाद
शेतात मोजूनमापून पाणी भरणारा सेन्सर
आपल्या शेतीप्रधान देशात पाण्याचं महत्त्व प्राणवायूपेक्षा कमी नाही. आधीच आपल्याकडे दुष्काळ आणि लहरी मान्सूनमुळे शेतीसाठी पाण्याची भयंकर समस्या आहे. बरं आहे त्या पाण्याचादेखील नीट वापर केला जात नाही. याबाबत केवळ घोषणा आणि हळहळ व्यक्त केली जात असताना, पंधरावर्षीय फातिमाने स्वत: इनिशिएटिव्ह घेण्याचं ठरवलं. हैदराबाद येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलची ती विद्यार्थिनी. झटपट पुढे चाललेल्या जगाच्या गराड्यात मागे पडलेल्या लोकांचे आयुष्य तंत्रज्ञान-सुविधांच्या माध्यमातून समृद्ध केले जाऊ शकते, असं ती मानते. 
ती सांगते, भारतात ३५-४५ टक्के सिंचन भाताच्या शेतीसाठी वापरले जाते. भाताच्या पिकासाठी खूप जास्त पाणी लागत असले तरी अज्ञान, निष्काळजीपणा आणि सक्षम सुविधा नसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाणी शेतात सोडले जाते. 
यावर उपाय म्हणून तिने स्वयंचलित जलव्यवस्थापन प्रणाली विकसित केली. त्यानुसार पाणीसाठ्याच्या दरवाजापाशी अल्ट्रासॉनिक सेन्सर्स लावून गरजेपुरतंच पाणी शेतात सोडण्यात येतं. एवढंच नाही तर पिकाच्या वाढीनुसार पाण्याची पातळीदेखील बदलणं अपेक्षित असतं. म्हणून मग ‘रिअल टाइम क्लॉक’द्वारे पिकाच्या वाढीवर लक्ष ठेवून पोषक प्रमाणात पाण्याची इष्टतम पातळीदेखील राखली जाते. ही सगळी प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे आपल्या डोक्याला जास्त खुराक नाही.
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) अशा सर्व क्षेत्रात तिला पुढे काम करायचं आहे; पण नुसतं काम नाही, तर त्याद्वारे शेतकऱ्यांची जीवनशैली वृद्धिंगत करणारे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे तंत्रज्ञान विकसित करायचे आहे.
ती म्हणते, ‘अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येचं पोटं थेट शेतीवर अवलंबून आहे; परंतु बहुतांश शेतकरी प्रगत तंत्रज्ञानापासून दूरच आहेत. महाग, अनुपलब्धता किंवा पुरेसे ज्ञान नसणं अशी त्यामागे अनेक कारणं आहेत. त्यादृष्टीने मला माझ्या ज्ञानाचा वापर करायचा आहे.’
 
 
अनुष्का नाईकनवरे
जखमेवर हायटेक मलमपट्टी
हाताला खरचटलं किंवा छोटी-मोठी जखम झाल्यावर आपण काय करतो? अँटिसेप्टीकने धुवून मलमपट्टी करतो. बरोबर, मग काही दिवसांनी ती पट्टी काढतो आणि जखम बरी झाली नसेल तर पुन्हा ड्रेसिंग करतो; पण समजा पट्टी न काढताच जखमेची स्थिती - म्हणजे ती बरी झाली की नाही - हे कळलं तर? भारतीय वंशाच्या अनुष्का नाईकनवरे या तेरावर्षीय मुलीने अशी मलमपट्टी तयार केली आहे.
अमेरिकेतील पोर्टलँड येथे राहणारी अनुष्का सातव्या इयत्तेत शिकते. त्वचेला हानी न पोहोचवणाऱ्या (बायोकम्पॅटिबल) साहित्यापासून बनवलेल्या सेन्सर्सयुक्त मलमपट्टीची तिनं निर्मिती केली. यामध्ये जखमेचे तपमान, पीएच, ओलावा, संसर्ग, आॅक्सिजन पातळी अशी परिवर्तनशील माहिती पट्टी न बदलता सेन्सर्सद्वारे आपल्या मोबाइलवर पाठवण्यात येते. या माहितीच्या आधारे मग डॉक्टर पट्टी बदलण्याची योग्य वेळ आणि उपचार ठरवू शकतात.
अनुष्का सांगते, जखमेची देखरेख करण्यासाठी सूक्ष्म, बायोकम्पॅटिबल, स्वस्त, अचूक व मोठ्या प्रमाणात निर्मिती करणं शक्य असणाऱ्या सेन्सर्सची निर्मिती करण्याचा माझा उद्देश आहे. सर्वदूर रुग्णांना यामुळे प्रोफेशनल वैद्यकीय सेवा पुरवणं शक्य होईल.
 
 
अनिका चिराला
कॅन्सरचं स्क्रीनिंग
कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यू होण्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा दुसरा क्रमांक आहे. परंतु ब्रेस्ट कॅन्सरचा अंदाज बांधण्यासाठी सध्या वापरात असलेल्या एक्सरेद्वारे कॅन्सर गाठीचं निदान करणारी मॅमोग्राम स्क्रीनिंगची पद्धत पूर्णत: अचूक नाही. विविध संशोधनातून आढळून आले आहे की, स्क्र ीनिंग केलेल्या एकतृतीयांश महिलांचे रिझल्ट्स चुकीचे असतात. त्यामुळे कॅन्सरचा अचूक अंदाज वर्तवणारी पद्धती विकसित करण्याची नितांत गरज आहे.
ही गरज ओळखून कॅलिफोर्नियातील अनिका चिराला या विद्यार्थिनीने अशी नवी पद्धती विकसित केली आहे, जी नॉन-कॅन्सरस स्क्रीनिंग मॅमोग्राम्सद्वारे स्तनाच्या कॅन्सरच्या पुनरावृत्तीचा अचूक अंदाज व्यक्त करते. यामध्ये स्तनातील सर्व प्रकारच्या उतींच्या मॅमोग्राम्सना हिस्टोग्राम फीचर्सद्वारे (स्तंभालेख) दर्शविण्यात येते. अनिकाने तयार केलेल्या एकूण वर्गीकरण प्रणालीनुसार मग या स्तंभलेखांच्या आधारे कॅन्सरची शक्यता वर्तवण्यात येते.
अडचण आली की त्यावर कसा तोडगा काढता येईल यासाठी तिची धडपड चालू असते. तिच्या याच स्वभावातून आकारास आलेल्या संकल्पनेमुळे ती आज गूगल सायन्स फेअरच्या अंतिम फेरीत पोहोचली. ती सांगते, माझ्या प्रोजेक्टमधून रुग्णांना लाभ होईल या भावनेनेच मला खूप आनंद होतोय.
 
निशिता बेलूर, कॅलिफोर्निया
धातूचे दोष शोधणारे लेझर किरण
कारनिर्मितीच्या क्षेत्रात अत्यंत उपयोगी ठरेल असे संशोधन सातवीत शिकणाऱ्या निशिता बेलूरनं केलं. संगीत, साहित्याबरोबरच तिला गिटार व नृत्याची आवड. हॅरी पॉटरची चाहती निशिता हिने लेझर किरणांद्वारे धातूच्या पत्र्यातील दोष शोधून काढण्याची सोपी, परिणामकारक आणि परवडेल अशी नवी पद्धत शोधून काढली आहे.
चकाचक कारकडे ग्राहक आकर्षक होतात. स्क्रॅच किंवा बंप किंवा डेंट पडलेला असेल तर ती कार घेणार का तुम्ही? नाही ना? सध्या कारखान्यांत विशेष प्रशिक्षित लोक धातूच्या पत्र्याची पाहणी करून बाक, ओरखडे यासारखे दोष शोधत असतात. परंतु याला मर्यादा आहेत. त्यावर उपाय म्हणून निशिताने परावर्तित लेझर किरणांच्या आधारे हे दोष शोधणे शक्य आहे हे सिद्ध करून दाखविले.
ती सांगते, धातूच्या पत्र्यावरून परावर्तित झालेली लेझर किरणे फोटो-डायोडवर घेतले असता निर्माण झालेल्या विद्युत प्रमाणावरून पत्र्यातील सूक्ष्मातील सूक्ष्म दोष लक्षात येऊ शकतात. कारण दोष असेल तर लेझर लाईट अस्ताव्यस्तपणे परावर्तित होतील आणि फोटो-डायोडद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचे प्रमाण कमी होईल. सुरुवातीलाच दोष लक्षात आल्यामुळे ते दूर करणे सोपे जाईल. अधिक विकसित केल्यास आॅटोमोबाईल इंडस्ट्रीला वेळ आणि पैसा अशी दोन्ही प्रकारची बचत करणारे तंत्रज्ञान मिळू शकते.
 
निखिल गोपाल, न्यूजर्सी
स्मार्ट फोन मलेरिया टेस्ट 
अगदी सहजपणे प्रतिबंध केल्या जाऊ शकणाऱ्या रोगांपैकी एक म्हणजे मलेरिया. तरीदेखील केवळ लवकर निदान होत नाही म्हणून दरवर्षी लक्षावधी लोकांचा मलेरियामुळे मृत्यू होतो. विशेष करून भारत व आफ्रि के सारख्या देशांत याचा प्रादुर्भाव जास्त आहे. निखिल सांगतो, भारतात राहणाऱ्या माझ्या आत्याला मलेरियाचा जीवघेणा अनुभव आला. तेव्हापासून आपण यासाठी काही तरी केले पाहिजे हा विचार माझ्या मनात घर करून बसला.
सध्या उपलब्ध असलेल्या निदान-चाचणीतून केवळ मलेरिया आहे की नाही एवढेच कळते. परंतु रक्तामध्ये मलेरियाच्या विषाणूंची पातळी कशी आहे, रुग्णांची तब्येत सुधारतेय की आणखी खालावतेय याबाबत काहीच माहिती मिळत नाही. म्हणून निखिलने डोके चालवून स्वस्त, अधिक संवेदनशील आणि पोर्टेबल अशी मलेरिया निदान-चाचणी विकसित केली. यामध्ये केवळ स्मार्टफोन आणि ‘एलिसा’ मायक्रोफ्लुईडिक डिस्कच्या साह्याने मलेरिया प्रोटिन्सचा शोध घेण्यात येतो.
‘गूगल सायन्स फेअर’मध्ये विजेतेपद पटकावून जगाच्या पाठीवरून मलेरियाचे समूळ उच्चाटन करण्याचे कार्य अधिक जोरकसपणे चालू ठेवण्याचा मानस तो बोलून दाखवतो. जागतिक आरोग्य संघटनेचा मलेरिया विभाग आणि बिल अँड मिरांडा गेट्स फाउंडेशनच्या देखील तो संपर्कात आहे. 
 
काय आहे गूगल सायन्स फेअर?
आपल्याकडे विज्ञान प्रदर्शन असतं ना, अगदी तशीच ही स्पर्धा असते. सायन्स फेअर असं तिचं इंग्रजी नाव. या आॅनलाइन सायन्स स्पर्धेत जगभरातील १३ ते १८ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. विद्यार्थिदशेतच मुलांच्या कल्पनाशक्ती, विचारक्षमता आणि प्रयोगशील मनोवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २०११ साली स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. संकल्पनेला प्रयोगाच्या माध्यमातून मूर्त रूप देऊन त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असते. संकल्पना, संशोधन, प्रयोग, डेटा, निरीक्षण, निष्कर्ष, प्रश्न आणि सादरीकरणाच्या आधारावर प्रोजेक्ट्सचे मूल्यांकन केले जाते. दरवर्षी साधारणत: फेब्रुवारी ते मेदरम्यान सबमिशन्स स्वीकारले जातात. 
त्यासाठी https://www.googlesciencefair.com/en/ ही वेबसाईट पाहता येईल.
 
 
प्राईजेस, अवॉर्ड्स आणि बरंच काही...
जगभरातून प्रोजेक्ट्स सादर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमधून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सोळा विद्यार्थ्यांना एका पालकासह गूगलच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात सादरीकरणासाठी बोलावण्यात येतं. त्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि स्पॉन्सर्सतर्फे विविध बक्षिसे जिंकण्याची संधी असते. यामध्ये मुख्य बक्षीस म्हणजे- 
* ग्रँड प्राईज : यामध्ये विजेत्याला पुढील शिक्षणासाठी गूगलतर्फे ५० हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती देण्यात येते. याशिवाय इतर अनेकही पुरस्कार दिले जातात.
 
डोकेबाज... हम इंडियावाले!
अमेरिकेत होणाऱ्या सायन्स किंवा स्पेलबी कॉम्पिटिशन्समध्ये भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. पहिल्या गूगल सायन्स फेअरची (२०११) विजेती होण्याचा मान श्री बोस (टेक्सास) या भारतीय वंशाच्या मुलीनं मिळवला होता. केमोथेरपी औषधावरील तिच्या संशोधनाची ग्रँड प्राईजसाठी निवड करण्यात आली होती. याच स्पर्धेत निमल सुब्रमण्यमला त्याच्या ‘कॅन्सर बर्स्टर्स’ प्रोजेक्टसाठी ‘पीपल्स चॉइस अवॉर्ड’ने नावाजले गेले होते. पुढे विनयकुमार (आॅस्ट्रेलिया - २०१३), मिहिर गरिमेला (पिटसबर्ग - २०१४) बाजी मारली होती. भारताच्या अर्श शहा दिलबागीला श्वासातून शब्दनिर्मिती करण्याच्या प्रोजेक्टसाठी २०१४ साली व्होटर्स चॉइस पुरस्कार मिळाला होता. गेल्या वर्षीची स्पर्धा तर भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनीच गाजविली. अनिरुद्ध गणेशन, प्रणव शिवकुमार, क्रितीन नितियानंदम, ललिता प्रसिदा आणि दीपिका करूप यांनी विविध पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली. 

Web Title: Google's Brain Sciences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.