वास

By admin | Published: April 22, 2016 09:15 AM2016-04-22T09:15:49+5:302016-04-22T09:15:49+5:30

मी ‘मी’ आहे असं वाटतं ते स्वत:कडे आरशात पाहून. पण ती छबी उद्या दुस:याच कोणासारखी दिसली तर कसं वाटेल तसं वाटायचं. कारण स्वत:च्या शरीराचा गंध बदलला. त्या बदललेल्या गंधामुळे घाण वाटायची, आत्मविश्वास कमी व्हायचा, स्वत:विषयी एक तिरस्काराची भावना निर्माण व्हायची, आणि कसकसले वास सतत येत राहायचे.

Habitat | वास

वास

Next
>वेदनांच्या आठवणींचे, त्या दिवसांच्या अस्तित्वाचे, जखमांचे, सारे अशक्त मनाचे खेळ; पण ते खेळ पाठ सोडत नाहीत.
 
 
खडूपेटीचा वास, मग ती नवी असो की जुनी, ती उघडून वास घेण्याची माझी सवय आजही कायम आहे. नव्या पुस्तकांपेक्षा जुन्या पुस्तकांचा वास मला अधिक आवडतो. जुनी पुस्तकं अनुभवी वाटतात. वाचण्याच्या निमित्तानं अनेक हात त्यांना लागले असतात. त्यामुळे कदाचित जुनी पुस्तकं शहाणी, शांत वाटतात. गरम कॉफीचा वास, भाजून तयार होत असलेल्या पोळीचा वास, लाकूड तासताना त्यातून निघणा:या सूरनळी आणि भुशाचा वास..
अशा अनेक वासांच्या अनुभवांनी आपलं आयुष्य पुढे सरकत असतं. हे झाले भौतिक आयुष्यातील वास. पण प्रत्येक घराचाही एक वास असतो, त्याचा स्वत:चा असा. तो वास तिथल्या माणसांचा, घरातल्या वस्तूंचा, तिथे शिजणा:या अन्नाचा आणि विचारांचा असू शकतो. प्रत्येक घरात गेल्यावर तो जाणवतो.
 हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे कॅन्सरवरच्या उपचारांमध्ये वासाबाबतची संवेदना इतकी सेन्सेटिव्ह झाली होती की या आधी न दिसलेल्या आणि जाणवलेल्या अनेक गोष्टींचे गंध मला नव्यानं जाणवायला लागले. आणि हेही जाणवलं की माझ्या  शरीरालाही एक गंध आहे. इतकंच नव्हे तर माझ्या शी आणि शूलाही एक गंध आहे..
किमोथेरपीच्या दरम्यान सततच्या अॅण्टीबायोटिक्स किमोथेरपीच्या औषधांमुळे शूचा रंग-गंध वेगळा असायचा. 
मी ‘मी’ आहे कारण माझा स्वत:चा एक गंध आहे, जो इतरांपेक्षा वेगळा आहे. माझी आरशात दिसणारी छबी उद्या दुस:याच कोणासारखी दिसली तर कसं वाटेल.. 
सेम तसचं वाटायचं या बदललेल्या गंधामुळे. घाण वाटायची. आत्मविश्वास कमी व्हायचा. स्वत:विषयी एक तिरस्काराची भावना निर्माण व्हायची. टॉयलेटमधून बाहेर आल्यावर शांत, समाधानी वाटायचं नाही. 
प्रत्येक वासाबरोबर आपल्या काही आठवणी जोडलेल्या असतात. माझी सर्जरी झाली तेव्हा ती नळी आणि टाके निघेर्पयत रोजच्या अंघोळीसाठी बहीण मदत करायची. तेव्हा मी पिअर्स साबण वापरायचे. आजही त्या साबणाचा वास आला की मला ते बाथरूम, बहिणीचा भीतीनं थरथरणारा हात, मला हात वर करताना होणारी वेदना आणि रडणं हे सगळं आठवतं. तसाच एक वास होता टाटा हॉस्पिटलमधील टॉयलेटमधल्या फिनेलचा. त्या वासानं मला भयानक मळमळायचं. कोणत्याही क्षणी उलटी होईल वाटायचं. तिथे जायला नको म्हणून मी शू दाबून बसून राहायचे. 
आणखी एक न विसरता येणारा वास. आई गेली त्या रात्रीचा वास. तिला सायन हॉस्पिटलमध्ये जाऊन एनिमा दिला होता. कदाचित त्याचा वास, तिला होणा-या उलटय़ांचा वास की मृत्यूचा वास.. तो विचित्र वास ती गेल्यानंतर अनेक महिने येतच होता. ती गेली त्या खोलीत तर तो यायचाच, पण घरातल्या इतर खोल्यांमध्येही तो अधूनमधून जाणवायचा. 
कधी कधी अचानक रस्त्यात, लिफ्टमध्ये, गर्दीच्या ठिकाणी, कधी दबक्या पावलांनी, तर कधी भसकन अंगावर यायचा. 
माझ्या डोळ्यासमोर अंधेरी यायची, दरदरून घाम फुटायचा. आईच्या आठवणीनं डोळे भरून यायचे. अर्थात ते सगळे माझ्या अस्वस्थ आणि अशक्त मनाचेच खेळ होते. दिवस पुढे सरकत गेले तशी जखम हळूहळू भरू लागली आणि तो वास येणं बंद झालं.
 
- शची मराठे
 
shachimarathe23@gmail.com
( कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)

Web Title: Habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.