हल्ट प्राइज
By admin | Published: February 15, 2017 05:40 PM2017-02-15T17:40:14+5:302017-02-15T18:05:28+5:30
वाटतं ना, समाजासाठी काहीतरी भन्नाट करू, एकसे एक आयडिया येतात डोक्यात? मग प्रयत्न करा, काय सांगावं उद्या तुम्हाला नोबेलही मिळेल...
- ओंकार करंबेळकर
वाटतं ना,
समाजासाठी काहीतरी
भन्नाट करू,
एकसे एक आयडिया
येतात डोक्यात?
मग प्रयत्न करा, काय सांगावं
उद्या तुम्हाला नोबेलही मिळेल...
आपल्यासमोर भरपूर सामाजिक प्रश्न असतात, कधीकधी त्यातील काही
मुद्द्यांबाबत आपल्याला थोडंफार सूचत असतं. या प्रश्नावर अमुक मार्गाने विचार केला तर त्याची उकल होईल असं वाटत असतं. पण हे सांगायचं कोठे, कोणाला सांगायचं असे स्पीडब्रेकर्स डोक्यात येतात. काहीच सुचलं नाही तर त्या आयडियाचे अंकुर आपण मनातल्या मनात खुडून टाकतो.
आता तुझे शिकण्याचे दिवस आहेत, अभ्यास कर, कसल्या आयडिया सांगतोस असं म्हणून आपल्याला हटकणारे काय कमी असतात का? मग काय राहतात कल्पना बाजूला आणि धोपटमार्गाच्या ट्रेडमिलवर आपण पळत राहतो.
पण सामाजिक प्रश्नांवर हटके विचार करून त्यावर उत्तरं शोधणाऱ्यांना प्रोत्साहन देणारेही काही लोक असतात. २००९ साली अमेरिकेत हल्ट प्राइजची संकल्पना आकारास झाली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या संकल्पनेतून हे क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्ह सुरू झालं आणि त्यातूनच सामाजिक प्रश्नांची उकल करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं सुरू झालं. दरवर्षी न्यू यॉर्कमध्ये बिल क्लिंटन एक प्रश्न सर्वांसमोर मांडतात आणि जगभरातील विद्यार्थी त्या प्रश्नावर आपापल्या पद्धतीने, आकलनानुसार विचार करतात. सर्वात चांगली आणि नवोन्मेषी कल्पना निवडून तिला सामाजिक उपक्रम सुरू करण्यासाठी दहा लाख डॉलर्सचं भरभक्कम बक्षीसही दिलं जातं. या अशा प्रचंड रकमेच्या पुरस्कारामुळे नोबेल विजेते महंमद युनूस यांनी या पुरस्काराला विद्यार्थ्यांचं नोबेल असं नावच देऊन टाकलं.
प्रत्येक वर्षी ज्या संकल्पनेची किंवा प्रश्नाची घोषणा बिल क्लिंटन करतात, त्या प्रश्नी जगभरातील विद्यार्थी जय्यत तयारी करून कामाला लागतात. याला प्रेसिडेण्ट्स चॅलेंज असं म्हटलं जातं. प्रत्येक शैक्षणिक कॅम्पसमध्ये त्यावर विचार होऊन स्थानिक पातळीवर प्रतिनिधी निवडले जातात. प्रादेशिक पातळीची अंतिम फेरी दुबई, बोस्टन, सॅन फ्रॅन्सिस्को, लंडन, शांघाय या पाच मोठ्या शहरांमध्ये होते. त्यानंतर सहा प्रादेशिक चमूंची हल्ट प्राइज अॅक्सीलेटरच्या सहा आठवड्यांच्या कार्यक्रमासाठी निवड होते. या सहा आठवड्यांच्या काळामध्ये उद्योगासंबंधी प्रशिक्षण या चमूला दिले जाते. हे सगळे प्रशिक्षण हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलतर्फे दिले जाते. त्यानंतर न्यू यॉर्कमध्ये अंतिम फेरीमधील विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना बिल क्लिंटन यांच्यासह जगभरातून आलेल्या मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींसमोर मांडाव्या लागतात. या कल्पनांमधून सर्वोत्कृष्ट वाटणाऱ्या कल्पनेस हल्ट प्राइज दिले जाते. त्याबरोबर त्यांना याविषयाच्या संबंधित स्टार्टअपला सुरुवात करण्यासाठी निधी मिळतो. दरवर्षी जगातील १५० देशांमधील दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या विचारयज्ञामध्ये सहभाग घेतात. समाज उद्योजक अर्थात सोशल आंत्रप्रिनर निर्माण व्हावेत हा या पुरस्काराचा हेतू आहे.
टाइमबॉम्बकडे लक्ष आहे का?
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये हल्टच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नोबेलविजेते आणि बांगलादेशात ग्रामीण बँकेद्वारे गरीब जनतेला कर्जपुरवठा करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे नोबेलविजेते महंमद युनूस होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, आज जगातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी वेगाने वाढत आहे. समाजामध्ये अस्वास्थ्य निर्माण करणारा हा एक टाइमबॉम्ब आहे. सगळी संपत्ती जगातील काही ठरावीक भागात एकवटणे धोकादायक आहे. हा टाइमबॉम्ब कधीही फुटू शकतो, याकडे तुम्हा सर्वांचे लक्ष गेले पाहिजे.